स्वच्छ व सुंदर भारताचे आशास्थान “बंच ऑफ फूल्स’’

0

बंच ऑफ फूल्स’ चा शब्दशः अर्थ मुर्खांचा समूह असा होतो, पण या समूहाचे कार्य आपल्या आजूबाजूचा राडारोडा आणि घाणीची साफसफाई करण्याचे आहे. ‘स्वच्छता अभियानाची’ जनजागृती करून लोकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी ‘बंच ऑफ फूल्स’ या संस्थेचा जन्म झाला. या संस्थेत बालचमू, तरुण, वयस्कर, महिला, अशा सगळ्या वर्गातल्या लोकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाने प्रभावित होऊन या समुहाने छत्तीसगडची राजधानी रायपुर मध्ये एक वर्षापासून स्वच्छता अभियानाची सुरुवात केली. ‘बंच ऑफ फूल्स’ ची स्थापना २ नोव्हेंबर २०१४ मध्ये सात मित्रांनी मिळून केली.


आज या संस्थेत १०० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग आहे, ज्यात स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे. ‘बंच ऑफ फूल्स च्या संस्थेतील सतीश भूवालका सांगतात की, " आमच्या मोहिमेचे हे नाव यासाठी ठेवले की लोकांनी आम्हाला मूर्ख संबोधण्याआधीच आम्ही स्वतः हे नाव अंगवळणी पाडून घेतले.


सतीश यांचा टुर्स एंड ट्रव्ह्ल्स व्यवसाय आहे. त्यामुळे परदेशवारी करून परत आल्यावर मिळालेल्या प्रतिसादात तेथील स्वच्छतेचे गुणगान ऐकायला मिळते. पण आपल्या देशात असे चित्र नाही ही मनाला सल लावणारी गोष्ट आहे. सतीश यांच्या घराजवळ आणि कार्यालयाच्या आजूबाजूला असाच गलिच्छपणा होता, ज्याला सफाईचा काही नियम नव्हता यातून मार्ग काढण्यास ते पूर्णपणे हतबल होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबरला देशभरात स्वच्छता अभियानाची सुरूवात केली तेव्हा सतीश यांना वाटले की हीच योग्य वेळ आहे. जर देशाचे पंतप्रधान हातात झाडू घेऊ शकतात तर आपल्याला या कामाची लाज का वाटली पाहिजे. या नंतर सतीशने स्वच्छता अभियाना संदर्भातली माहिती गोळा करून एक पावर पाॅईंट प्रेझेंटेशन तयार केले. त्या नंतर त्याने त्याच्या मित्रांना आपल्या घरी बोलावून स्वच्छता अभियानाशी निगडीत आपले प्रेझेंटेशन दाखविले. त्यामुळे प्रभावित झालेल्या मित्रांनी निर्णय घेतला की, या कामाची मुहूर्तमेढ स्वतः पासून रोवायची.


सतीशचे सगळे मित्र हे नोकरदार होते म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला की, दिवाळी नंतरच्या येणाऱ्या रविवारी आपल्या कामाचा आरंभ करायचा. दिवाळी नंतर २ नोव्हेंबरला पहिला रविवार होता. त्यांनी काली माता मंदिरा पासून सुरवात केली, कारण दिवाळीत देवाला अर्पण होणा-या फुलांची संख्या खूप जास्त होती, जी नंतर निर्माल्याच्या स्वरुपात बाहेर फेकून दिली जायची. सफाई कर्मचारी पण या काळात सुट्टीवर असल्याने शहराच्या स्वच्छते कडे दुर्लक्ष झाले होते. या लोकांनी तेथील सफाई करून परिसर स्वच्छ केला. या कामानंतर पाठीवर पडलेल्या शाबासकीमुळे त्यांना आणखी हुरूप आला. अशा तऱ्हेने या सात मित्रांनी तीन-चार महिने हे अभियान यशस्वी पणे चालू ठेवले. त्यांनी सोशल मिडिया तर्फे आपला उपक्रम लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रभावित होऊन अनेक लोक त्यांच्या मोहिमेला जोडले गेले. आज त्यांच्या टीम मध्ये १०० कार्यकर्ते आहेत, ज्यात १८ वर्षापासून ६० वर्षापर्यंतचे लोक आहेत, व त्यात स्त्रियांची संख्या ही लक्षणीय आहे. विशेष गोष्ट ही, की या टीम मध्ये डॉक्टर, इंजिनियर विद्यार्थी, आणि व्यावसायिक पण मोठ्या प्रमाणावर सामील आहेत. प्रारंभी लोकांनी आमच्यावर अविश्वास दाखवला पण आमच्या जिद्द आणि चिकाटीने आम्ही सदर अभियान गेल्या एक वर्षापासून दर रविवारी शहरातल्या वेगळ्या भागातील सफाईने यशस्वीपणे राबवीत आहोत.


‘’बंच ऑफ फूल्स’’ ची एक वेबसाईट पण आहे, या व्यतिरिक्त फेसबुक आणि सोशल मिडिया द्वारे ते लोकांशी संपर्क साधून आपल्या कार्याची आगाऊ माहिती देतात. जेथे सफाई करायची आहे व रविवारी सफाई झाल्या नंतरचे सगळे फोटो अपलोड करून जागेचा कसा कायापालट होतो ही माहिती लोकांपर्यत पोहचवितात. या टीमने अनेक डम्पिंग ग्राउंडला कार पार्किंग,बाईक पार्किंग आणि प्ले ग्राउंड मध्ये परिवर्तित केले आहे. याच कारणाने रायपूरच्या ६१ जागांचा कायापालट झाला आहे. ही टीम निस्वार्थी पणे ऊन, वारा,पाऊस सणवार यांची पर्वा न करता अविरत आपली स्वच्छता मोहीम राबवत आहे.

‘’बंच ऑफ फूल्स’’ चे सदस्य विशिष्ट भागातल्या लोकांना पूर्व कल्पना देऊन दर शुक्रवारी जागेची निवड करून शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब करतात व रविवारी सफाई कार्य पार पडतात. स्वच्छतेच्या जागृतीसाठी ते लोकांना पत्रके वाटतात. सतीश सांगतात की, ‘’जास्तीत जास्त लोकांनी आमच्या टीम मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे’’.


आमचे कार्यकर्ते सकाळी ६ वाजल्या पासून जागेवर हजर असतात, व साफ सफाई करून राडारोड, गाळ कचरा पेटीतच टाकून कामाला पूर्ण विराम देतात. दर आठवड्याच्या साफ सफाई अभियाना दरम्यान हे लोक पथ नाट्य करून जनजागृतीचे काम करतात, कचऱ्याचे वर्गीकरण करायला सांगतात, तसेच अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांविषयी माहिती देतात.


सतीश सांगतात की, काही लोक आमच्या कामाविषयी टीका करतात पण बरेच लोक समर्थन पण करतात. ‘’बंच ऑफ फूल्स’’ च्या सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. बंच ऑफ फूल्स चे एक विशिष्ट टी शर्ट अशा सदस्याला दिले जाते जो सलग चार आठवडे अभियानात सहभागी असतो. सतीशला एका गोष्टीची सल आहे की, " साफ सफाई करण्याबाबत लोक अनुत्साही आहे, ते घरातला कचरा बाहेर टाकून अस्वच्छता पसरवितात’’. नगर सेवक आपल्या परीने तत्पर आहे पण लोकांनी सुद्धा सहकार्य करून कचरा हा कुंडीतच टाकावा, शहर व देशाला ‘’स्वच्छ व सुंदर’’ ठेवण्यास हातभार लावावा.


लेखक : हरीश बिश्त

अनुवाद : किरण ठाकरे