देशातील पहिल्या ‘मदरमिल्क बँक’ने वाचविले १९००पेक्षा जास्त चिमुकल्यांचे प्राण!

0

कुठल्याही अर्भकासाठी आईचे दूध अमृतासारखे असते, एका अहवालानुसार, जर जन्माला येताच मरणा-या १०० मुलांपैकी १६ मुलांना आईचे दूध मिळाले तर त्यांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. मात्र काही कारणांमुळे अशा मुलांपर्यंत आईचे दूध पोहोचू शकत नाही आणि ते मृत्युमुखी पडतात हीच गोष्ट लक्षात ठेवून राजस्थानच्या उदयपुरमध्ये राहणारे योगगुरु देवेंद्र अग्रवाल यांची संस्था “मां भगवती विकास संस्थान” ने “दिव्य मदर मिल्क बँक” ची स्थापना केली आहे. जी केवळ आईकडून दूधच जमा करत नाही, तर गरजू मुलांपर्यंत दूध पोहोचविण्याची व्यवस्था देखील करते. उदयपुर आणि त्याच्या जवळील भागात “दिव्य मदर मिल्क बँक” चे यश बघून राज्य सरकारने या योजनेला आता आपल्या योजनेत सामिल केले आहे आणि विभिन्न शहरात अशाप्रकारच्या १० मदर मिल्क बँक उघडण्याची घोषणा केली आहे. यासाठी सरकारने १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

“दिव्य मदर मिल्क बँक” चे संस्थापक योगगुरु देवेंद्र अग्रवाल यांनी याची स्थापना एप्रिल, २०१३ मध्ये केली होती. त्यांचे म्हणणे होते की, हे सुरु करण्याचे एक मोठे कारण त्यांच्या संस्थेकडून चालविण्यात येत असलेली ‘महेशाश्रम’ मोहीम होती. या मोहिमेमार्फत जे लोक जन्माला येताच मुलींना फेकून देतात किंवा सोडून देतात, त्यांना ते आश्रय देतात, त्यांना वाढवतात. त्यासाठी “मां भगवती विकास संस्थान” ने उदयपुर आणि त्याच्या जवळच्या अनेक ठिकाणी पाळणाघरे लावली आहेत. जेथे येऊन कुणीही आपल्या मुलीला त्यांना सोपवू शकतात. आतापर्यंत येथे १२५ मुलींना आणण्यात आले आहे. योगगुरु देवेंद्र अग्रवाल यांच्या मते, महेशाश्रमचे स्वप्न ‘एनआयसीयू’ आहे. ज्यात जगातील सर्वात चांगल्या सुविधा आहेत. मात्र, याव्यतिरिक्त या मुलींना अनेकदा सर्दी किंवा दुसरा आजारही होतो आणि याचे कारण त्यांना आईचे दूध मिळत नव्हते, जी मुलींची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कारण आईच्या दूधात अनेक जंतूनाशक तत्व असतात, जे या मुलींना मिळू शकत नव्हते.

तेव्हा योगगुरु देवेंद्र अग्रवाल यांनी विचार केला की, अनाथ मुलींसाठी आईच्या दूधाची व्यवस्था केली पाहिजे. कारण, असे मुलं जे एनआयसीयू मध्ये असते, त्यापैकी जर काही मुलींना आईचे दूध मिळाले असते, तर त्यांचा जीव वाचवता येऊ शकला असता. त्यानंतर ते या गोष्टीची माहिती शोधण्यात व्यस्त झाले की, जगात कुठे अशा प्रकारचे काम चालविले जाते. ज्यानंतर त्यांना माहित पडले की, ब्राझील मध्ये याप्रकारचे काम चालविले जाते, हे काम चालविणारे खूप मोठे जाळे तेथे आहे. जे जगात ह्यूमन मिल्क बँकिंगच्या नावाने सर्वात मोठे जाळे आहे. त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की, उदयपुर मध्ये देखील या प्रकारची ह्यूमन मिल्क बँक सुरु करावी. तेव्हा योगगुरु देवेंद्र अग्रवाल आणि त्यांच्या साथीदारांनी “ह्यूमन मिल्क बँकिंग असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका” वर काम करणे सुरु केले आणि त्याच विचारांवर या लोकांनी उदयपुर मध्ये मदर मिल्क बँकच्या स्थापनेसाठी राज्य सरकार कडून मदत मागितली.

ज्यानंतर सरकारने हसत हसत या लोकांना हे चांगले काम करण्याची मान्यता दिली. उदयपूरचे आरएनटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या पन्नाधाई शासकीय महिला चिकित्सालयात आज ही मदर मिल्क बँक सुरु आहे. विशेष बाब ही आहे की, याला “ह्युमन मिल्क बँकिंग असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका” च्या मार्गदर्शक तत्वांनुसार तयार केले करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर, या मिल्क बँकच्या कर्मचा-यांचा खर्च आणि त्याचे संचालन देवेंद्र अग्रवाल यांची संस्था “मां भगवती विकास संस्थान” करते. या बँकेत जमा होणारे दूध सर्वात पहिले रुग्णालयात एनआयसीयू मध्ये मृत्युशी झगडणा–या मुलांना दिले जाते. त्यानंतरच शिल्लक राहिलेल्या दूधाला महेशाश्रम मधील अनाथ मुलींना दिले जाते. आतापर्यंत या बँकेत ३२ पेक्षा अधिक महिलांनी साडे सात हजार पेक्षा अधिक वेळा दूध दान केले आहे. “दिव्य मदर मिल्क बँक” च्या मते आईच्या या दूधाने आतापर्यंत जवळपास १९०० अर्भकांचा जीव वाचविण्यात आला आहे.

योगगुरु देवेंद्र अग्रवाल यांच्या मते, या बँकेत तीन प्रकारचे डोनर येतात. पहिल्या त्या महिला येतात, ज्यांच्याकडे मुलांच्या खुराकापेक्षा अधिक दूध असते, दुस-या त्या महिला असतात ज्यांची मुलं उपचारांवर असतात आणि मुलांची दूध थांबवले जाते, त्यामुळे त्या आपल्या मुलांना दूध पाजू शकत नाही, तर त्या येथे येऊन दूध दान करू शकतात आणि तिस-या प्रकारची महिला डोनर ती असते ज्यांची मुलं जन्माला येताच मरतात. मात्र, हे लोक अशा महिलांना दूध दान करण्यासाठी जबरदस्ती करत नाहीत. योगगुरु देवेंद्र अग्रवाल सांगतात की, “जेव्हा आम्ही या मिल्क बँकची सुरुवात केली होती, तेव्हा लोक आम्हाला बोलायचे की, आम्हाला कोणी दूध का दान करेल? कारण, लोकांचे मत होते की, कोणी रक्त दान करू शकतं. मात्र, आपल्या मुलासाठी असलेले दूध कोणी कसे दान करेल आणि ते जास्त असले तरी, ते कोणी दान का करेल.”

या मिल्क बँक मध्ये दूधदान देण्यापूर्वी महिलांना एका विशेष प्रक्रियेतून जावे लागते. त्यामार्फत ज्या महिलांना दूध द्यायचे असेल, त्यापूर्वी त्यांची तपासणी केली जाते. जेणेकरून त्यांना माहित पडावे की, त्या महिलांना कुठला रोग तर नाही किंवा कुठल्या प्रकारचे व्यसन तर त्या महिला करत नाही. त्याव्यतिरिक्त दुध देणा-या महिलांचे २ एमएल रक्त घेतले जाते. जेणेकरून तपासणीत त्या महिलांना एचआयव्ही किंवा दुसरा रोग तर नाही हे जाणून घेतले जाते. या सर्व तपासणी नंतरच एखादी महिला आपले दूध दान करू शकते.. याव्यतिरिक्त ज्या महिला येथे दूध देण्यासाठी येतात, त्यापूर्वी त्यांना सांगितले जाते की, त्या दूध दान देण्यापूर्वी आपल्या मुलाला त्याचे दूध पाजावे. त्यानंतर ब्रेस्ट पंपच्या मदतीने वाचलेले दूध काढले जाते.

मिल्क बँक मध्ये जमा होणा-या दूधाला विशेष प्रक्रिया करून सुरक्षित ठेवले जाते. सर्वात पहिले आईकडून मिळालेल्या दूधाला तेव्हापर्यंत -५ अंशावर ठेवले जाते, जोपर्यंत आईच्या रक्ताचा नमुना येत नाही. त्यानंतर सर्व डोनर महिलांच्या दुधाला एकत्र करून त्याला निर्जंतूक केले जाते. त्यानंतर ३० एमएल चा एक युनिट तयार करून त्याला बंद केले जाते. त्यानंतर १२ युनिटची एक तुकडी बनविली जाते. त्यातील एका युनिटला वेगळे करून मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेत कल्चर रिपोर्ट(प्रतवारी) साठी पाठविले जाते. तर शिल्लक युनिटला कल्चर रिपोर्ट येईपर्यंत -२० अंशात सुरक्षित ठेवले जाते. या दुधाची एक विशेष बाब असते की, हे दूध तीन महिन्यापर्यंत सुरक्षित ठेवले जाऊ शकते.

ही देशातील पहिली कम्युनिटी ह्यूमन मिल्क बँक आहे. “दिव्य मदर मिल्क बँक” आईकडून दूध जमा करण्यासाठी अनेक ठिकाणी कॅम्प देखील लावतात. विशेष बाब ही आहे की, या योजनेत राज्य सरकारने देखील आपली रुची दाखविली आहे. त्यासाठी राज्यभरात १० मदर मिल्क बँक उघडण्याची योजना आहे. त्यासाठी १० कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. उदयपुर मध्ये “दिव्य मदर मिल्क बँक” च्या स्थापनेनंतर योगगुरु देवेंद्र अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, त्यांची योजना आता राजस्थानच्या बाहेर उत्तरप्रदेश आणि हरियाणा मध्ये देखील या प्रकारची बँक उघडण्याची आहे. यासाठी त्यांची लोकांशी चर्चा सुरु आहे.

लेखक : हरिश बिश्त

अनुवाद: किशोर आपटे.