सामाजिक कुप्रथांच्या ‘बेडिया’ तोडून अनेकांना सन्मानाचे जीवन देणा-या अरुणा छारी!

सामाजिक कुप्रथांच्या ‘बेडिया’ तोडून अनेकांना सन्मानाचे जीवन देणा-या अरुणा छारी!

Wednesday December 16, 2015,

4 min Read

२१ व्या शतकात राहूनसुद्धा भारतीय समाजात जाती प्रथा, अस्पृश्यता आणि बालविवाह यांसारख्या अनेक सामाजिक कुप्रथा आजही अस्तित्वात आहेत. याच समाजात आजही अशा अनेक जाती आहेत, ज्यांच्या समुदायात जन्माला येणा-या मुली मोठ्या होऊन वेश्यावृत्तीत काम करतात आणि जर मुलगा जन्माला आला तर, तो वेश्यावृत्तीशी संबंधित दलालीचे काम करतो. यातीलच एक ‘बेडिया’ प्रकारची जात आहे. याच जातीच्या जुन्या प्रथांना मुळांपासून संपविण्याचा प्रयत्न करत आहेत, मध्यप्रदेशच्या मुरैना मध्ये राहणा-या अरुणा छारी. ज्या स्वतः याच जातीतील आहेत आणि या समाजात जन्म घेणा-या मुलांना या सामाजिक कुप्रथेपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

image


अरुणा छारी यांना या कामाची प्रेरणा आपले काका राम स्नेही यांच्याकडून मिळते. ज्यांनी आपल्या चुलत बहिणीला वेश्या बनण्यापासून वाचविले, ज्यानंतर त्यांनी निर्णय घेतला होता की, ते या सामाजिक कुप्रथेला बंद करतील. त्यांच्या या कामात अरुणा छारी यांनी त्यांची खूप मदत केली. अरुणा या आज बेडिया जातीसाठी मध्यप्रदेशातील मुरैनामध्ये चालविल्या जात असलेल्या “विमुक्त जाती अभ्युदय आश्रमा”च्या अध्यक्ष देखील आहेत. अरुणा यांचे म्हणणे आहे की, “खूप वर्षापूर्वीच्या या कुप्रथेचे मुख्य कारण या समुदायातील निरक्षरता हे आहे. यामुळे हे लोक दुस-या समाजातील लोकांमध्ये सामील होऊ शकत नाहीत. या लोकांची मानसिकता होती की, या समाजातील लोक दुस-यांसोबत उठू बसू शकत नाहीत. यामुळे हे लोक सगळ्यांपासून विभक्त झाले होते. ज्यांना आता समाजात सामील करण्याचे आम्ही काम करत आहोत.”

image


अरुणा छारी स्वतः बेडिया समाजातील असल्यामुळे त्यांनी आपल्या समाजातील परिस्थितीला खूपच जवळून पाहिले होते, त्यामुळे त्यांचे मत होते की,“ जी परिस्थिती दुस-या मुलींसोबत घडली ती माझ्यासोबत देखील घडू शकत होती. त्यामुळे मी यात बदल घडवण्यासाठी स्वतःला शिक्षित केले. आज याच शिक्षणामुळे मी या समाजासाठी काहीतरी विचार करू शकले आहे.”

हेच कारण आहे की, अरुणा छारी आज बेडिया समुदायातील दुस-या मुलांचे भविष्य सुधारण्याचे काम करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, बेडिया समुदायातील लोक कुठल्याही गावात रहात नाहीत, तर हे लोक गावाबाहेर राहतात आणि आज ते केवळ मध्यप्रदेशात नाहीतर, युपी, हरियाणा आणि राजस्थान यांसारख्या राज्यात देखील वेगवेगळ्या नावाने राहतात.

मध्यप्रदेशातील मुरैना मध्ये या आश्रमाची सुरुवात वर्ष १९९२ मध्ये हा विचार करून करण्यात आली होती की, याच्यामार्फत समाजातील कुप्रथेला लांब ठेवले जाऊ शकेल. त्यासाठी या आश्रमाच्या सुरुवातीला १०० मुलांना येथे ठेवण्यात आले. मात्र आज ही संख्या २०० मुलांपर्यंत पोहोचली आहे. ही सर्व मुले बेडिया समाजातीलच आहेत. सुरुवातीस या आश्रमाला कर्ज घेऊन देखील चालवावे लागले, ज्यानंतर राज्यसरकारने त्यांची आर्थिक मदत केली. आज मुलांना आश्रमामध्येच महाविद्यालयापर्यंतचे शिक्षण दिले जाते. उच्च शिक्षणासाठी हे लोक मुलीनां वसतीगृहाची देखील सोय उपलब्ध करून देतात. अरुणा यांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुख्य उद्देश मुलींना सशक्त बनविणे आहे, जेणेकरून त्या आपल्या आपल्या घरगुती जबाबदा-या चांगल्या प्रकारे पार पाडू शकतील. आश्रमात राहणारी अनेक मुलं अनाथ देखील आहेत. तर आश्रमात राहणा-या ९२ मुलींचा विवाह देखील झाला आहे, तर सात मुलींचा विवाह आश्रमने स्वतःच्या खर्चातून केला आहे.

image


आश्रमात राहणारी बेडिया जातीची मुलं सकाळची सुरुवात एका प्रभात फेरीने करतात. ज्यानंतर त्यांना कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर त्यांना नाश्ता दिला जातो. ही मुलं त्यानंतर शाळेत जाऊन अभ्यास करतात. संध्याकाळी पुन्हा एकदा खेळणे आणि अभ्यास होतो. अरुणा यांचे म्हणणे आहे की, “आम्ही लोकांनी मुलांना शिक्षणासोबतच शारीरिक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमात देखील सामिल केले आहे. आम्ही या मुलांना अनेक प्रकारचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देखील देतो, जसे की, संगणक, टायपिंग आणि शिवण वगैरे. आश्रमात खेळावर विशेष लक्ष दिले जाते. हेच कारण आहे की, आश्रमातील अनेक मुलांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे, तर ७ मुलींनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक देखील पटकाविले आहे. या आश्रमात अनेक प्रसंगी विभिन्न प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते, ज्यात येथील मुलं-मुली आवडीने आपला सहभाग नोंदवतात. त्याव्यतिरिक्त प्रत्येकवर्षी होणा-या युवा उत्सवात भाग घेण्यासाठी आश्रमातील मुलं येतात. आतापर्यंत एकूण ५३ मुलं राष्ट्रीय पातळीवर खेळली आहेत. विशेष बाब ही आहे की, या आश्रमात तीच मुलं आहेत, जी गरीब आहेत आणि समाजाच्या त्या कुप्रथेतून बाहेर पडण्यासाठी संधी शोधत आहेत.

image


आश्रमामुळे आज बेडिया समुदायातील अधिकाधिक मुलं पोलिस दलात कार्यरत आहेत. येथे शिक्षण घेतलेली एक मुलगी विशेष शाखेत पोलीस उपनिरीक्षक पदावर आहे, तर अनेक मुलं खेळ विभागात आहेत, तर काही जिल्हा पंचायत मध्ये आहेत. तर काही मुलं दुस-यांना खेळाचे प्रशिक्षण देत आहेत. आश्रमात मिळणा-या सुविधा आणि शिक्षणाला बघता, बेडिया समुदायातील दुसरे लोक देखील आता आपल्या मुलांना साक्षर करण्यासाठी जागरूक होत आहेत. अरुणा यांचे म्हणणे आहे की, “आज आश्रमात शिकणारे मुलं समाजात प्रचारकाची भूमिका साकारत आहेत.” आश्रमात सामिल असलेले लोक देखील बेडिया समुदायाच्या सतत संपर्कात राहतात आणि सामाजिक कुप्रथेला दूर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम करतात. आश्रमाला ३३ लोकांचा एक गट सांभाळतो. आश्रमाला चालविण्यासाठी अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. असे असूनही ते सामाजिक बदल घडविण्याचा प्रयत्न करत आहेत. अरुणा यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत ते या कामाला सोडू शकत नाहीत.

“विमुक्त जाती अभ्युदय आश्रम” ला कुठल्याही प्रकारचे सहाय्य करण्यासाठी तुम्ही [email protected] वर संपर्क साधू शकता.

लेखक : हरीश बिश्त

अनुवाद: किशोर आपटे.