‘कुतूहल’ शिक्षणातील नवा प्रयोग

0


झाडावरुन सफरचंद खाली कसं पडलं याचं कुतूहल वाटून न्युटननं गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला. आकाशात उडणाऱ्या पक्षांबद्दल कुतूहल वाटत राईट बंधूंनी विमाननिर्मितीचा ध्यास घेतला. मानवाच्या प्रगतीच्या प्रवासामागचं मूळ आहे त्याला वेळोवेळी वाटत आलेलं कुतूहल...मात्र आजच्या हाय टेक दुनियेत वेगानं, अतिवेगानं पळण्याच्या नादात माणसाला सभोवतालाच्या गोष्टींकडे बघायला वेळ कुठे उरलाय...मात्र आपल्या पूर्वजांकडून मिळालेली नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती जपत ती आजच्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलाय श्वेता नखातेनं. ‘कुतूहल’ या नावानं वैज्ञानिक खेळण्याचं दुकानं आणि लायब्ररी सुरु करत श्वेतानं लहान मुलांच्या शिक्षणाची नवी दिशा पालकांना दाखवलीय.

शिक्षकी पेशात असलेल्या श्वेताला पुस्तकांपलिकडचं शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवायचं होतं, गणित, विज्ञान हे विषय शाळेच्या चार भिंती आणि पुस्तकांच्याबाहेर येऊन मुलांना भेटले तर... आणि म्हणूनच ‘Play with methods’ या संकल्पनेचं सूत्र अंगिकारत विज्ञान, गणित, इंग्रजीमधील विविध संकल्पनांवर आधारीत खेळ श्वेतानं मुलांपर्यंत पोहोचवायला सुरवात केली आणि मग याच खेळांची लायब्ररीही सुरु केली. कुतूहलतर्फे इयत्ता तिसरी आणि चौथीच्या मुलांसाठी वाचन-लेखन विकास प्रकल्प घेण्यात येतो, या प्रकल्पात काय वाचायचं आणि कसं वाचायचं तसंच हात आणि डोळ्यांचे व्यायाम मुलांना शिकवले जातात. मुलांच्या कन्सेप्टस् क्लिअर झाल्या की ते गोष्टी पटपट शिकतात. म्हणून मुलांना त्यांचा वेळ आणि स्पेस द्या, तुम्ही सतत मुलांच्या डोक्यावर बसू नका. मुलांच्या रोजच्या वेळापत्रकात त्यांचा त्यांचा असा थोडा वेळ मिळायला हवा. त्या वेळात त्यांनी काय करायचं हे मुलांनाच ठरवू द्या. यासाठीच आम्ही अनेक शाळांमध्ये ऍक्टिव्हिटी क्लब घेतो. विलेपार्ल्यातील पार्ले टिळक विद्यालय, एअरपोर्ट कॉलनी स्कूल आणि होरायझन हायस्कूल या तीन शाळांतील विद्यार्थी अभ्यासक्रमातील विषय खेळांच्या माध्यमातून शिकताहेत. विविध खेळ हाताळणं, निरिक्षण करणं, त्या खेळांच्या संकल्पना आणि त्यांच्या मेकॅनिझममधून मुलांना खूप काही शिकायला मिळतं.

गणित, भाषा, विज्ञान विषयांतील संकल्पनांवर आधारीत आठशे ते हजार खेळ कुतूहलमध्ये आहेत. आणि दोन वर्षांपासून ते बारा-पंधरा वर्षांपर्यंतची मुलं कुतूहलचे सभासद आहेत. मोठ्या मुलांना त्यांच्या आजूबाजूला दिसणारी अनेक उपकरणं कशी चालतात याचं प्रचंड कुतूहल असतं. पेन्सिल सेलच्या आत काय असतं, रेडिओ, टीव्ही कसा चालतो... त्यांचा कल साधारणतः मुलं सातवी-आठवीत गेल्यावर समजू शकतो. अशा मुलांसाठी आम्ही इलेक्ट्रॉनिकचे क्लासेस घेतो. त्यात ती रमून जातात. त्याचप्रमाणे इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यासाठी बालवैज्ञानिक परीक्षा दरवर्षी होतात. या परीक्षेच्या प्रॅक्टिकल परीक्षेची तयारी आम्ही करुन घेतो.

आजची मुलं खूप शार्प आहेत. आमच्या पिढीला जे समजण्याची अक्कल वयाच्या आठव्या किंवा दहाव्या वर्षी होती, तीच समज आज वयाच्या चवथ्या किंवा पाचव्या वर्षी या मुलांना येते. त्यामुळे पालक आणि शिक्षकांवरची जबाबदारी वाढलीय. मुलांशी बोलताना, वागताना खुप दक्षता आणि पेशंन्स बाळगावा लागतो. श्वेता विचारपुर्वक सांगते. आजचे पालक मुलांना टीव्ही बघू नका सांगतात, पण मग टीव्ही नाही तर दुसरं काय करायचं याचा पर्याय मुलांसमोर ठेवत नाहीत. आम्ही कुतूहलमार्फत आपले पर्याय मुलांनी स्वतः शोधावेत यासाठी प्रयत्न करतो. आजची आईदेखील जिनिअस आहे. आपल्या मुलांसाठी ती चांगले क्लासेस शोधते, चांगले डे केअर शोधते...मुलांच्या भविष्याची तिला काळजी आहे, शिवाय तिला स्वतःच्या करिअरकडेही लक्ष द्यायचं असतं. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांसाठी कुतूहलचा पर्याय निवडतात.

  वाढत्या व्यापामुळे दहा वर्षांपूर्वी दादरमध्ये सुरु केलेलं हे वैज्ञानिक खेळण्याचं दुकान- लायब्ररी आता विलेपार्ले इथं स्थिरावलीय. पाठांतर, घोकमपट्टी अशा शिकवण्याच्या पारंपारिक पद्धती मागे सारत मुलांचं कुतूहल शमवणारी, त्यांच्या जाणीवा समृद्ध करणारी, मुलांचा शिकण्यातील उत्साह वाढवणारी, सतत नवनवे प्रयोग करण्याची मुभा देणारं कुतूहल मुलांची आवडती जागा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे कुतूहल पोहोचावं यासाठी श्वेता नखाते यांचे प्रय़त्न चालू आहेत.

Related Stories

Stories by shachi marathe