नवीन लेखक आणि कलाकारांचा ऑनलाईन ‘बुकहंगामा’ 

0

बायर कॉर्पसायन्स या आंतरराष्ट्रीय कंपनीतून जनरल मॅनेजर - सप्लाय चैन या पदावरुन एप्रिल २०१३ मध्ये निवृत्त झाल्यावर विक्रम भागवत यांच्याकडे खुप वेळ होता. गेली ३५ वर्षे बायर कॉर्पसायन्समध्ये काम करताना जो काही वेळ त्यांना मिळत होता तो त्यांनी आपल्या कलेला म्हणजे लिखाणाला दिला होता. यातूनच मग १०० सारखी मालिका घडली होती. पुढे बीपी सिंग यांच्या गेल्या १८ वर्षांपासून सुरु असलेल्या सीआयडी या हिंदी मालिकेचा भागही ते बनले. नाटकावर विक्रम भागवत यांचं विशेष प्रेम होतं. ‘एक शून्य रडते आहे’ हे त्याचं पहिलं नाटक. १९७९ साली पहिल्यांदाच रंगमंचावर आलं. त्यानंतर गोवा हिंदू असोसिएशन, भूमिका, भद्रकाली प्रोडक्शन अशा नावाजलेल्या नाट्यसंस्थासाठी त्यांनी नाटकं लिहिली. नोकरी करताना लिखाण फक्त छंदापुरतं राहिलं नव्हतं. तर व्यावसायिक रंगमंचावर विनय आपटे आणि मंच्छिंद्र कांबळे सारख्या दिग्गजांबरोबर त्यांनी काम केलं. ही सर्व नाटकं गाजली. रसिकांना आवडली. हाऊस फुल्लचे बोर्ड लागले. ही नोकरी व्यतिरिक्तची कमाई. लोकांच्या वाहवाहने मिळालेली. १२  एप्रिल २०१३ ला निवृत्त झाल्यानंतर आता त्यांच्याकडे खूप वेळ होता. नोकरीसाठी द्यावा लागणाराही वेळ आता स्वत:साठी वापरता येणार होता. यातूनच त्यांच्यात दडलेला नवा उद्योजक वयाच्या ६० व्या वर्षी पुढे आला. तो त्यांना स्वस्त बसू देत नव्हता. लिखाण साथीला होतंच पण आता त्याचं व्यावसायिक रुप त्यांना खुणावत होतं. त्यातून नवनवीन लेखक घडवण्याबरोबरच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत या नव्या आणि जुन्या लेखकांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विक्रम भागवत कामाला लागले. 

फेसबुक या सोशल साईटचा योग्य वापरही करता येतो. तो फक्त टाईमपास साठी नव्हे तर लोकांना चांगल्या कामासाठी एकत्र आणण्यासाठीही होतो. याचा अनुभव विक्रम भागवत यांना तेव्हा आला जेव्हा त्यांनी १२  एप्रिललाच फेसबुक पेज तयार केलं. ज्याचं नाव होतं ‘न लिहिलेली पत्रे’(Unwritten Letters). हे पेज सुरु केल्यानंतर ते विसरून गेले होते. काही दिवसांनी अचानक पुन्हा या पेजवर गेल्यावर समजले की पेजला २५ पेक्षाही जास्त लाईक मिळालेत आणि अनेकांनी हे नक्की काय आहे, कसं जोडले शकतो, याची विचारपूसही केली होती. काहीही न करता आपसुक आलेल्या विचारणा आणि लाईक्समुळं विक्रम भागवत यांना हुरुप आला. 

लहानपणी ते आजीबरोबर राहिलेले त्यामुळं ते आईला पत्रं लिहित. नंतर जर्मनीच्या एका मित्राबरोबर त्याचा पत्रव्यवहार खूप वर्षे चालला. इथंच खरी लिखाणाला सुरुवात झाली. त्यावेळी टेलिफोन नव्हता, व्यक्त होण्यासाठी होती ती ही पत्रं, जी अनेकदा रात्री रात्री जागून लिहिलेली, जसी सुचतील तशी लिहिलेली. काही लिहिलेली, काही पाठवलेली आणि काही न लिहिता फक्त मनात विसावून राहिलेली ही पत्रं... न लिहिलेली पत्र या पेजवर असंच एक पत्रं लिहिलं होतं. त्याला जो प्रतिसाद मिळाला तो कल्पनेपलिकडचा होता. यावरुन एक गोष्ट लक्षात आली की अनेकांना लिहायला, वाचायला आवडतं, त्यांना व्यक्त व्हायचंय, काहीही लिहायचं, मनातल्या गोष्टी, सांगायच्या राहून गेलेल्या, आपल्या आवडत्या किंवा नावडत्या वस्तूंबद्दलची पत्रं, जे जसं घडतंय तसं, तुम्हाला आवडलेलं आणि न आवडलेलंही, असं सर्वकाही. आणि त्यानंतर काही दिवसात जे घडलं ते ना भुतो ना भविष्यती असंच होतं. 

न लिहिलेली पत्रं या पेजवर….

सात हजार हून जास्त पत्रं लिहिली गेली

आठवड्याला हे पेज दोन लाख अठ्ठ्याहत्तर सातशे त्र्याएन्शी लोकांपर्यंत पोचलं

पाच लाख लोक या पेजवर येऊन गेले

पंचवीस हजार हून जास्त लोकांनी पेजला लाईक केलं.

हे सर्व काही घडलं काही आठवड्यांमध्ये

विक्रम सांगतात “पहिलं पत्रं दररोज सकाळी सहा वाजता पोस्ट केलं जायचं आणि सहा वाजून 5 मिनिटांनी त्यावर लाईक आणि कमेन्ट आलेली असायची. याचा अर्थ अनेकांची रोजची सकाळ ही 'न लिहिलेली पत्र' ने व्हायची.”

सृजन.... एक अनोखा प्रयोग

महिन्याभराच्या कालावधीत न लिहिलेल्या पत्रांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक ढोबळ आखणी केली असता यातून ६०  पुस्तकं तयार होतील इतकं साहित्य या पेजवर तयार झालेलं होतं. हे खरं रोमांचक होतं. आता हे पुढच्या पातळीवर घेऊन जायचं होतं. यासाठी मदतीला आले जयंत पोंक्षे आणि सुनिल गोवर्धन हे दोन मित्रं, समविचारी, नव्याचा ध्यास असणारे लेखक. संगीत दिग्दर्शक आणि लघुपट बनवणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यांच्या स्वप्नांना एक डिजीटल व्यासपीठ देण्याच्या ध्यासानं सृजन सुरु झालं. यामुळे असंख्य नव्या स्वप्नांना जागतिक उडी घेता येणार होती. २०१७ पर्यंत या व्यासपीठावरुन नवोदीत कलाकारांना जगासमोर आणण्याचं काम सृजनतर्फे करण्याचा ध्यास घेण्यात आला. विक्रम सांगतात, “ ३१  मार्च २०१४  ला सृजन ड्रिम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुरुवात झाली. कवियत्री  अरुणा ढेरे आणि वैभव जोशी यांनी ती लाँच केली. पण गेल्या वर्षभरात अनेक गोष्टी लक्षात येत गेल्या. नव्यानं विकसित होत असलेल्या डिजीटल तंत्रज्ञानातले बारकावे लक्षात येत होते. किवर्ड, एसईओ फेसबुक आणि गुगल एड अशा अनेक गोष्टींचं जाळं उलगडत जात होतं. यामुळे सृजनची आखणी नव्यानं करायला लागणार होती. त्यातूनच मग ‘बुकहंगामा डॉट कॉम’ची सुरुवात झाली.”

बुक हंगामा डॉट कॉम – दिमाखदार एन्ट्री

सृजन नावामुळे या पुस्तक खरेदीसाठी इंटरनेट सर्फिंग करणाऱ्या लोकांना या वेबसाईटचा पत्ता लागणं कठीण होतं. नावावरुन तरी ही कसली वेबसाईट आहे हे समजत नव्हतं. “ आमची पुस्तकं पीडीएफ फॉरमॅटमध्ये होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर इपब फॉर्मॅटला मोठी मागणी असताना पीडीएफ म्हणजे जगभरात पसरलेल्या मराठी लोकांपर्यंत पोहचणं कठीण होत होतं. शिवाय पुस्तक खरेदीची प्रक्रिया अधिकाधिक सरळ सोपी करण्यात आली. यामुळे कुठल्याही अडथळ्यांशिवाय पुस्तकांची खरेदी या डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन उपलब्ध करुन देण्यात आली.” बुकहंगामाशी योगायागानं जोडला गेलेला अक्षय वाटवे  सांगत होता. तरुण अक्षयनं आपल्या काही महिन्यांच्या अनुभवावरुन या क्षेत्रातल्या अनेक क्लुप्त्या शिकून घेतल्या आणि त्या बुकहंगामासाठी वापरल्याही. आता त्या यशस्वीही होतायत.

बुक हंगामा डॉट कॉम या नव्या रुपात लाँच झाल्यावर २०१५ ज्या पहिल्या चार महिन्यात इथं येणाऱ्या वाचक आणि पुस्तक खरीदारांची संख्या वाढत गेली. पेमेन्ट गेटवे ही सहज सोपे असल्यानं शिवाय नवीन साहित्याचा मोठा खजिनाच हाती लागल्यानं बुक हंगामा डॉट कॉम डिजीटल पुस्तक वितरणात मोठं नाव बनलं. 

“अधिकाधिक लेखकांना आणि जोडण्यासाठी नुक्कड कथा अगोदर ब्लॉग आणि त्यानंतर यशस्वी डिजीटल व्यासपीठ मिळवून लेखन आणि सादरीकरण व्यवसायाची सांगड घालण्यात आली. यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. माध्यमांनीही या एकूणच डिजीटल व्यासपीठाचा गौरव केला. आणि जागतिक पातळीवर बुक हंगामाचा ठसा उमटला. दीपा मिट्टीमनी यांच्या ‘माझ्या पिल्लांच्या बाबास’ या पुस्तकाला २०१५ सालच्या डिजीटल बुक स्पर्धेचं नामांकन मिळालं. ही एक उपलब्धी होती.” विक्रम सांगत होते. 

आता मराठी पुस्तकांसाठी अनेक वेबसाईट आहेत. पण बुक हंगामा डॉट कॉममध्ये मिळणारी नव्या लेखकांची मैफल बाकी कुठेच दिसत नाही. दिवसेंदिवस यातल्या लेखकांची संख्या वाढतेय. त्यांना मार्गदर्शनही दिलं जातं. अगदी ५०  रुपयांपासून ही पुस्तकं उपलब्ध आहेत. यामुळे खासकरुन परदेशात स्थायिक झालेल्या मराठी माणसाला त्याच्या मातीचा गंध मिळतो. तिथले विचार मिळतात आणि आपल्या एसी कोचमध्ये बसून मायमराठीच्या मायेची फुंकरही मिळते. आज बुकहंगामा डॉटकॉमचे सर्वाधिक वाचक हे परदेशात आहेत. जगातला कुठलाही कोपरा नाही जिथं बुक हंगामाची पुस्तकं पोहचली नाहीत. यामुळे मराठीचा प्रचार आणि प्रसार होण्यासही मदत होईल आणि नवी लेखकांची पिढीही तयार होईल. या अशा सर्व सकारात्मक बाबी प्रत्यक्षात  उतरवण्यासाठी  बुक हंगामा डॉटकॉमची वाटचाल सुरु आहे. 


यासारख्या आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित 

नेटीझन्सचा नवा अड्डा.... नुक्कड कथा...