अभिनयाने महिला चाहतावर्गाला भुरळ पाडणारा अवलिया...- अभिनेता मिलिंद गवळी

0

“ माझ्या अभिनयाच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत मी अनेक स्त्रीप्रधान सिनेमांमध्ये काम केलेय, कधी नायिकेचा दीर म्हणून कधी तिचा बिघडलेला लाडावलेला भाऊ म्हणून तर कधी तिचा प्रेमळ नवरा म्हणून. माझ्या या भूमिका सिनेमात दुय्यम स्थानावर होत्या मात्र मी यातनं माझ्या प्रेक्षकांच्या आणि विशेषत महिला चाहत्यांच्या मनात प्रेमाचे पहिले स्थान पटकावलेय.

मी जेव्हा गावाकडच्या कार्यक्रमांमध्ये जातो तेव्हा सर्वसामान्य महिला मला आवर्जुन भेटायला येतात, माझ्या सिनेमांबद्दल, मी साकारलेल्या भूमिकांबद्दल बोलतात, मला प्रेमाने ओवाळतात, इतकंच नाही तर सणवार किंवा समारंभ असेल तर मला भाऊ मानून राखी बांधतात, काही जणी मला मिलिंद भावजी म्हणतात, माझी दृष्ट काढतात. त्यांचे हे प्रेम पाहिले की आत्तापर्यंतच्या आपल्या कामाचं चीज झाल्याचं जाणवतं. खरं तर कुठलाही पुरस्कार माझ्या या चाहत्यांच्या प्रेमाची जागा घेऊ शकत नाही.”...या भावना आहेत प्रसिद्ध अभिनेता आणि आता अथांग या स्त्रीप्रधान सिनेमातून सहनिर्माता-दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरु करणाऱ्या मिलिंद गवळीची.

मिलिंदच्या अभिनयाची कारकीर्द पाहिली तर एक गोष्ट आवर्जुन सांगावी लागेल ती म्हणजे संत सखू, हौसेने केला पती, पालखी, आई तुझा आशिर्वाद, भक्ती हिच खरी शक्ती, सासर माझे मंदिर, सासुच्या घरात, कार्ल्याची एकविरा,हिरवा चुडा अशा एक ना अनेक सिनेमांमुळे मिलिंदचा एक भला मोठा महिला चाहतावर्ग बनलाय. मिलिंदही ही बाब चांगलीच जाणतो. एका नायकाला साजेसा देखणा चेहरा आणि त्या चेहऱ्यावरचं तेवढंच लोभसवाणं हास्य यामुळे मिलिंद गवळी नेहमीच महिला प्रेक्षकांमध्ये आवडता नायक म्हणून ओळखला गेलाय.

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या अथांग या सिनेमाचे दिग्दर्शन आणि सहनिर्मिती मिलिंदने केलीये. मिलिंदने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाचा विषय हा स्त्रीप्रधान आहे हे विशेष. “अथांग ही दिग्दर्शक आणि सहनिर्माता म्हणून माझी पहिलीच कलाकृती. शहरी आणि ग्रामीण महिला प्रेक्षकांच्या आवडीचा चपखल मेळ घालणारी कथा म्हणजे अथांग हा सिनेमा. शिल्पा या अनाथ हुशार चित्रकार मुलीभोवती हा सिनेमा गुंफण्यात आलाय. आपल्या हुशारीने ती तिच्या आयुष्यातली गुंतागुंत कशी सोडवते हे या सिनेमात दाखवण्यात आलेय.”

असं म्हणतात की प्रत्येक संवेदनशील अभिनेता हा त्याच्या कारकीर्दीच्या एका टप्प्यावर दिग्दर्शक बनतोच बनतो. मिलिंदही आज त्याच्या व्यावसायिक आयुष्याच्या याच टप्प्यावर आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा निवडताना अथांगसारखी स्त्रीप्रधान कथा निवडावी हे नोंद घेण्यासारखी बाब आहे. मिलिंदच्या मते “प्रत्येक सिनेमाला त्याचा त्याचा चाहतावर्ग असतो पण महिलांचे भावविश्व ही मनोरंजन क्षेत्राची कधीही न ढासळणारी बाजू आहे आणि कुठलाही सिनेमा हा या भावविश्वाचा भाग न बनता तयार होऊच शकत नाही.”

“फक्त ते भावविश्व मांडण्याचे दृष्टीकोन हे प्रत्येक दिग्दर्शकाचे वेगवेगळे असतात. काहींसाठी सिनेमात ती एक सोशिक स्त्री असते, काहींसाठी आजची पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उभी रहाणारी तरुणी असेल, कधी ती आई असते कधी सर्वसमर्पण करणारी बायको, तर कधी पोटची मुलगी. मनोरंजन क्षेत्रात खासकरुन सिनेमा तसंच टेलिव्हिजनवर महिलांचे हे भावविश्व वेगाने बदलताना दिसतेय, आता यात त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात कंगोरेही येऊ लागलेय. मी आज याच बदलाकडे खूप सकारात्मक दृष्टीने पहातो, मला अभिमान आहे की माझा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा हा अशाच भावविश्वाला मांडणारा एक स्त्रीप्रधान सिनेमा आहे.”

मिलिंदने १९८४ साली हम बच्चे हिंदुस्तान के या सिनेमानं बालकलाकार म्हणून सुरुवात केली. त्यानंतर गोविंद सरैया यांच्या वक्त से पहले, बी आर इशारा यांच्या अनुमती, प्रदीप मैनी यांच्या वर्तमान या सिनेमातनं त्याने काम केलेय.

मराठा बटालियन, असंच पाहिजे नवं नवं, देवकी, विठ्ठल विठ्ठल या चित्रपटांमधल्या भुमिका हे मिलिंदच्या अभिनय कारकीर्दीतले महत्वाचे टप्पे आहेत. पण सख्खा भाऊ पक्का वैरी या सिनेमाच्या यशामुळे मिलिंद पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचा लाडका अभिनेता बनला, हा सिनेमा सर्वात अधिक आठवडे तिथे चालला. महिमा खंडोबाचा ते सासर माझे मंदिर अश्या जवळपास पस्तीस ते चाळीस विविध ग्रामीण विषयांवर आधारित सिनेमांमध्ये काम करुन तो ग्रामीण सिनेमाचाही चेहरा बनला.

मिलिंद टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरही काही काळ रमला. “टेलिव्हिजन हे खऱ्या अर्थाने महिला प्रधान आहे असे मला वाटते. तुम्ही कोणतीही मालिका पहा, त्यात स्त्री व्यक्तिरेखा अधिक प्रभावी असतात कारण चोवीस तास घरकामात दंग असणारी गृहिणी ही या मालिकांची हक्काची प्रेक्षक आहे.

परिवर्तन, मानो या ना मानो, आहट, तहकीकात, डाकघर अपना घर, सीआयडी सारख्या हिंदी तसंच अथांग, ऊन पाऊस, तिसरा डोळा, गहिरे पाणी सारख्या मराठी मालिकांमध्ये मी काम केलेय. आणि या मालिकांमधून मला मिळालेली लोकप्रियता अवर्णनीय आहे. भविष्यात टेलिव्हिजनच्या या दुनियेत आपल्या महिला चाहत्यांसाठी नवीन काही तरी करण्याचा मानसही ” मिलिंदने यावेळी बोलून दाखवला.