संतांच्या आदर्शवत भूतदयेच्या कामातून, सामाजिक भान आणि पर्यावरण रक्षण करणारी 'पॉज'

संतांच्या आदर्शवत भूतदयेच्या कामातून, सामाजिक भान आणि पर्यावरण रक्षण करणारी 'पॉज'

Wednesday April 26, 2017,

3 min Read

संत एकनाथ महाराज यांच्या चरित्रात अशी घटना सांगितली आहे की, एकदा गंगेची कावड पाण्याने भरून घेवून त्या पाण्याने देवाला अभिषेक घालायला जात असताना रस्त्यात तहानाने लोळण घेत असलेले गाढव त्यांनी पाहिले. आपल्या खांद्यावरून कष्टाने पायपीट करून आणलेली ती कावड गाढवाच्या मुखी ओतून ‘गंगेचे पाणी(गंगोदक) घालून हाच माझा देवाचा अभिषेक’ असे त्यांनी म्हटले होते. संत एकनाथ महाराज यांची गोष्ट आपण कधीना कधी लहानपणी वाचली असेलच, भूतदया! हाच तो विषय आहे. संत तुकाराम यांनी म्हटल्यानुसार ‘जे जे दिसे भूत तया मानूनी भगवंत’ या उक्तीनुसार मुक्या प्राणीमात्रांना खाऊ-पिऊ घालणा-यांच्या, आसरा देण्यासाठी स्वत:ला झोकून देणा-यांच्या अनेक कहाण्या आपण ‘युवर स्टोरी मराठी’वर देखील अनेकदा दिल्या आहेत. आणखी अशाच एका कहाणीबाबत येथे सांगत आहोत, ही कहाणी आहे, पक्षी,प्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या डोंबिवलीतील ‘प्लॅण्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल फॉर वेल्फेअर सोसायटी’ (पॉज) संस्थेची!


image


सध्या सर्वत्र उन्हाच्या काहिलीने माणसांचे पाणी पाणी होत असते, गारव्यासाठी मग आपण शितपेय, आणि अनेक पर्यायांचा शोध घेत असतो. पण मुके प्राणी, पशु-पक्षी यांना तसे काही पर्याय असत नाहीत. मात्र त्यांनाही उन्हाळ्यात पिण्याचे पाणी सुलभपणे मिळावे म्हणून पॉज संस्था आणि त्याचे स्वयंसेवक धडपडत असतात. त्यासाठी संस्थेच्या वतीने ठाणे, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरातील मुख्य, गल्ली-बोळातील रस्ते, पक्ष्यांचा अधिवास भागात पक्ष्यांच्या पाणी पिण्याच्या सोयीसाठी सिमेंटची भांडी ठेवली आहेत. मागील काही वर्षांत अशा प्रकारची सुमारे तीनशे पेक्षा अधिक भांडी विविध भागांत संस्थेने ठेवली आहे. 

‘पॉज’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश भणगे म्हणाले की, “ उन्हाळ्यात लहान-मोठे खड्डे, तळी गाळाने भरलेली असल्याने तेथील पाणी आटण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्या त्या भागात वर्षांनुवर्षे वास्तव्य करणाऱ्या पशू-पक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती न करता त्या भागातच पाणी उपलब्ध होईल म्हणून ‘पॉज’ मागील तीन वर्षांपासून काम करते आहे”


image


सुदैवाने ठाणे शहर परिसर, घोडबंदर रस्ता भागातील झाडे, तेथील झुडपे, ठाणे ते भिवंडीपर्यंतच्या नाशिक महामार्गाच्या दुभाजकांमधील झाडे, कल्याण-डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा या परिसरात देशी आणि विदेशी पक्ष्यांचा अधिवास अधिक प्रमाणात असतो.

या ठिकाणी ठेवलेल्या कुंडय़ांमध्ये ‘पॉज’चे स्वयंसेवक दर दोन ते तीन दिवसांनी पाणी टाकण्याचे काम करतात. एका कुंडीतील पाणी तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस राहणार नाही याची काळजी घेतली जाते कारण अशा बाहेरील पाण्यामध्ये डास अंडी घालतात, असेही भणगे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “ त्यामुळे अन्य आजार, पक्ष्यांना विकार होण्याची भीती असते. त्यामुळे पाणी बदलण्याची प्रक्रिया प्राधान्याने होते ”.त्यांच्या या कार्याला स्थानिक भागात भूतदयावादी नागरीक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असून लोक ईश्वरी कार्य समजून यामध्ये सहभाग घेत असतात.

संस्थेच्या वतीने गेल्या तीन वर्षांत अनेक ठिकाणांवर सिमेंट कुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. अशा कुंडय़ा दिसल्या तर आजूबाजूच्या रहिवाशांनीही पाणी टाकून तेथील वन्यजीवांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे. अशा प्रकारे अन्य भागात रहिवाशांना पक्ष्यांना पाणी देण्यासाठी सिमेंटच्या कुंडय़ा हव्या असतील तर रहिवाशांना मोफत देण्याची व्यवस्था ‘पॉज’तर्फे केली आहे. त्यासाठी भणगे यांच्या संपर्काचा क्रमांक- ९८२०१६१११४. येथे देत आहोत.

माणूसकीच्या नात्याने भूतदयेच्या या कामातून वेगळे समाधान आणि सामाजिक बांधिलकीचे भान जपत असतानाच भणगे आणि त्यांच्या पॉज संस्थेचे सहकारी नकळत पर्यावरणाच्या रक्षणाचे मोलाचे काम निरपेक्ष भावनेने करत आहेत. 

    Share on
    close