गुरगांव ते जयपूर सुपर एक्सप्रेस वे वरून प्रवासाचा वेळ केवळ ९० मिनिटे!

0

रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच राजस्थानच्या दौसा येथे सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घोषणा केली की, जयपूर ते गुरगांव यांच्या दरम्यान सुपर एक्सप्रेस वे तयार केला जाईल, त्यामुळे या दोन्ही शहरांचा प्रवास करण्यासाठी सध्या सहा तास लागत असले तरी या नव्या मार्गाने हे अंतर केवळ ९० मिनिटांत पार करता येणार आहे.


माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी याबाबत तपशिलात माहिती दिली, ते म्हणाले की, “ आम्ही सर्वाधिक वेग मर्यादा असलेल्या सुपर एक्सप्रेस वेची निर्मिती करत आहोत, हा मार्ग गुरगावच्या बाहेरून जाईल आणि जयपूरच्या रिंग रोडला जावून मिळेल. हा संपूर्ण मार्ग २००कि.मी.चा असेल. हा मार्ग ऍक्सेस कंट्रोल असल्याने यावर समान गतीने शेवटपर्यंत प्रवास करता येणार आहे.”

गुरगांव आणि जयपूर हे अंतर २६० कि.मी. आहे, सुपर एक्सप्रेस वे त्यातील २०० किमी अंतरांचा असेल जो गुरगावच्या बाहेरून जावून जयपूरच्या बाहेरील रिंग रोडला जोडला जाईल. ऍक्सिस कंट्रोल पध्दतीने हा मार्ग तयार केला जाईल, ज्यात निर्मिती करतानाच वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. या रस्त्यावरून चालणे आणि थांबणे यास मनाई असेल. या रस्त्याचे आरेखनच असे केले जाईल की वाहने अतिवेगाने यावरून धावतील. सध्याच्या रस्त्यावर वाहतुकीची वेग मर्यादा ९० किमी प्रती तास आहे. सुपर एक्सप्रेस वे वर ती शंभर किमी पर्यंत वाढेल. 

हरियाना आणि राजस्थान या दोन राज्यांना जोडणा-या या मार्गाबाबत राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी काम सुरू देखील केले आहे. त्याबाबत गडकरी म्हणाल की, “ हरियाना सरकारने या योजनेला मंजूरी दिली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली आहे की त्यांनी भुमी संपादन आणि परवानग्यांची कामे पूर्ण करुन दिल्यावर लगेच आम्ही कामाला सुरूवात करू.

अशी अपेक्षा आहे की नव्या सुपर एक्सप्रेस वे वरील काम १५ महिन्यात पूर्ण केले जाईल, त्यासाठी १६ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाईल.