दिवंगत प्रियजनांना श्रद्धांजली देणारा ऑनलाईन मंच shradhanjali.com

10

या जगाचा निरोप घेतल्यानंतर दिवंगत प्रियजनांचा परिवार वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या दिवंगत व्यक्तीला विविध माध्यमातून श्रद्धांजली देत असतात. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वर्तमानपत्रात शोक संदेशपण छापतात. पण बऱ्याच वेळा हे छापील संदेश लोकांच्या पायदळी तुडवले जातात किंवा त्या कागदात काही खाण्याच्या वस्तू विकल्या जातात. या गोष्टीने अस्वस्थ झालेले विवेक व्यास आणि विमल पोपट यांनी shraddhanjali. com या वेबसाईट ची सुरुवात केली.


विवेक हे सन २०१० मध्ये राजकोटच्या एका विमा कंपनी मध्ये नोकरी करीत होते. एकदा रस्त्याच्या कडेला उभे राहून कागदात गुंडाळलेले सामोसे खाल्यानंतर कागद फेकणार तोच विमल यांनी त्यावरचा शोकसंदेश वाचला. तो वाचून ते दोघे अस्वस्थ झाले. त्यांना वाटले की शोकसंदेश हा आपल्या मनातील भावना असून त्या अजून सन्मानासह व्यक्त झाल्या पाहिजे. या प्रश्नाच्या उत्तरादाखल आम्हाला shraddhanjali. com सुरु करण्याची कल्पना सुचली. विवेकच्या कथनानुसार हे भारतातले अशा प्रकारचे पहिलेच पोर्टल आहे ज्यावर लोक आपल्या दिवंगत सदस्यासाठी शोकसंदेश देणारं पेज तयार करू शकतात. तसेच आपल्या मित्र, नातेवाईकांकडे हा संदेश पाठवू शकतात. यामुळे भावी पिढीचे सदस्यही मागच्या पिढीच्या दिवंगत लोकांसंदर्भातले शोक संदेश ह्या पोर्टल वर जाऊन वाचू शकतात.


या वेबसाईटवर कोणतीही व्यक्ती आपले नाव नोंदवून आपल्या सदस्यांचा फोटो टाकून व्हिडीओ अपलोड करू शकते. तसेच दिवंगत सदस्याच्या आवडीचे संगीत शोकसंदेशाबरोबर टाकता येते. या पोर्टल मध्ये वाढदिवस तसेच पुण्यतिथीचे रीमायंडर फिचर सुद्धा उपलब्ध आहे. या पेजचा मालकी हक्क पूर्णपणे पेज तयार करणाऱ्या सदस्याकडे असतो. त्यामध्ये हवी असलेली अधिक माहिती तो कधीही टाकू शकतो अथवा काही भाग काढू पण शकतो.

विवेक सांगतात की, ‘त्यांच्या वेबसाईटवर प्रत्येक पेजची नोंदणी ३० वर्षापर्यंत केली जाते. त्यासाठी ५००० रुपये शुल्क आकारले जाते. त्यानंतर मात्र कोणतेही शुल्क आकारले जात नाही. वेबसाईटवर १, ५, १० वर्षासाठीचे पॅकेज पण उपलब्ध आहे. आम्ही पोर्टलला एका अशा मंचाच्या रुपात लोकांसमोर सादर करू इच्छितो की जिथे ते आपल्या दिवंगतांच्या आठवणीने आपल्या भावनांना उजाळा देऊ शकतात.


विवेक आणि विमलच्या या प्रयत्नांची लिम्का बुक ऑफ रेकोर्डने पण प्रसंशा केली. लिम्का बुक ऑफ रेकोर्डच्या मान्यतेप्रमाणे ही वेबसाईट देशातली पहिली श्रद्धांजली देणारी वेबसाईट आहे. या वेबसाईटवर १०० पेक्षा अधिक कॉम्प्लीमेंटरी प्रोफाईल उपलब्ध आहेत. समाजसेवक, राजकीय नेते, खेळाडू इत्यादींचा पण यात समावेश आहे.

लेखक : अनमोल

अनुवाद : किरण ठाकरे