जुने संगणक अद्ययावत करणारी ʻरिन्यूआयटीʼ

0

तुमच्या वापरात नसलेला एखादा लॅपटॉप असाच पडलेला असेल कारण तुम्ही नवीन लॅपटॉप घेतला. त्यात तुमचा सर्व डाटा ट्रान्सफर केला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वापरात नसलेल्या अशा वस्तूंना काही मर्यादितच पर्याय उपलब्ध होतात. कॉर्पोरेट जगतात किंवा एखाद्या मोठ्या संस्थेत दर दोन ते तीन वर्षांनी संपूर्ण सिस्टम नवी करण्यात येते. त्यावेळेस जुन्या सिस्टमचे काय होते, त्या कोण खरेदी करते?, या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे, रिन्यूआयटी (RenewIT). २०१० साली रिन्यूआयटीला सुरुवात झाली. जुने संगणक किंवा लॅपटॉप संस्थांकडून विकत घेऊन, त्याची दुरुस्ती करुन शाळा, स्वयंसेवी संस्था किंवा असे लोक जे नवाकोरा संगणक विकत घेऊ शकत नाहीत, अशा लोकांना ते या संगणकांची, लॅपटॉपची अल्पदरात विक्री करतात.

रिन्यूआयटीचे सह-संस्थापक मुकुंद बीएस सांगतात की, ʻप्रत्येक भारतीयाला संगणक उपलब्ध करुन देण्याचे रिन्यूआयटीचे लक्ष्य आहे.ʼ एका लग्नसमारंभात मुकुंद यांची एका अमेरिकन नागरिकाशी भेट झाली, जो एका मोठ्या संस्थेकडून जुने संगणक आणि लॅपटॉप विकत घेणार होता. त्यानंतर तो त्या संगणकांचे भाग काही कंपन्यांना विकणार होता. मुकुंद सांगतात, ʻत्याच वेळेस माझा चुलत भाऊ राघव त्याचा लॅपटॉप अपग्रेड करत होता. त्याच्या इमारतीचा सुरक्षा रक्षक अल्पदरात संगणक विकत घ्यायचा प्रयत्न करत होता. या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे मला आणि राघवला जाणीव झाली की, अशा अनेक संस्था असतील, ज्या दर दोन-तीन वर्षांनी अद्ययावत संगणक प्रणाली विकत घेऊ शकत नाहीत. तसेच २० हजार रुपयांचा नवा लॅपटॉप किंवा संगणकदेखील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला माणूस विकत घेऊ शकत नाही.ʼ, असे मुकुंद सांगतात. सध्याच्या काळात ज्याप्रमाणे मोबाईलच्या किंमतीत कमालीची घट झाल्याने जवळपास सर्वांच्याच हाती मोबाईल दिसू लागले आहेत, तशीच काहीतरी परिस्थिती संगणकाच्याबाबतीत व्हावी, अशी आम्हाला आशा आहे. तंत्रज्ञानाबद्दलची साक्षरता फक्त मोबाईल किंवा टॅबलेटच्या सहाय्याने मिळवता येऊ शकत नाही, याचीदेखील आम्हाला कल्पना असल्याचे मुकुंद सांगतात.

सध्या कोणत्याही नोकरीसाठी संगणकाचे शिक्षण असणे आवश्यक असते. आमच्या टिमने सध्या मोठ्या संस्थांकडून संगणक विकत घेण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. कारण एखाद्या व्यक्तिकडून संगणक विकत घेणे, व्यवहारात अडचणीचे ठरते. ʻलॅपटॉप, संगणक आणि सर्व्हर एखाद्या संस्थेकडून किंवा व्यक्तिकडून ठराविक दरात विकत घेण्याची आमची कल्पना आहे.ʼ, असे मुकुंद सांगतात. अनेक संस्था त्यांच्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अडगळीच्या वस्तू काढण्यासाठी एक माध्यम शोधतच होत्या. त्यामुळे या दुकडीला या कामासाठी कोणत्याही संस्थेत जास्त धडपड करावी लागली नाही. कॉर्पोरेट जगतात परिस्थिती काहीशी वेगळी होती. अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची जुने संगणक किंवा लॅपटॉपच्या विल्हेवाटाची एक वेगळी प्रणाली असते. ते भरपूर संगणकांचा व्यवहार एकाच वेळेस करतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांना असा व्यवहार करणे, काहीसे आव्हानात्मक होते.

गेल्या पाच वर्षात रिन्यूआयटी कंपनी ५०० हून अधिक कंपन्यांच्या संपर्कात आली आहे. मुकुंद सांगतात की, ʻसुरुवातीच्या दिवसात जेव्हा आम्ही भंगारातील वस्तूंवर काम करत होतो, तेव्हा अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांच्याकडील बिघडलेल्या संगणकाची विक्री करत असत. उदाहरणार्थ आम्हाला ते वापरात नसलेले एक टन सामान ३० रुपयांना विकण्यात येत असे कारण आम्ही असंघटीतरित्या काम करत होतो. कालांतराने आम्ही संस्थांना हे पटवून देत होतो की, एका संगणकाच्या मॉडेलची किंमत दुसऱ्यापेक्षा वेगळी असू शकते. गाडी विकतानाची जी संकल्पना असते, त्याप्रमाणे आम्ही आमची रणनिती तयार केली. गाडी विकताना ज्याप्रमाणे ते कोणते मॉडेल आहे, किती सालापूर्वीचे आहे, आजवर किती किलोमीटर ती गाडी धावली आहे, असे अनेक मापदंड असतात. तेच आम्ही संगणकाच्या बाबतीत करायचे ठरवले. त्यानंतर आम्हाला या गोष्टींवर लक्ष ठेवणारी एक टीम मिळाली, जी आम्हाला एखाद्या संगणकाबद्दल इत्यंभूत माहिती देत असे आणि त्यावरुन त्या संगणकाची किंमत ठरवत असत.ʼ कॉर्पोरेट क्षेत्रातील काही कंपन्या किंमतीवरुन मतभेद करत असत. मात्र काही कंपन्यांचे ध्येय ते सामान विकण्याचे असल्याने ते या दरावरुन वाद घालत नसत. सुरुवातीच्या काळात मुकुंद स्वतः कंपन्यांमध्ये किंवा संस्थांमध्ये जाऊन याबाबत चर्चा करत. मात्र कालांतराने त्यांनी लॉजिस्टिक प्रोव्हायडरसोबत संबंध जोडले. संगणकाची खरेदी किंमत ही ३०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत कशीही बदलू शकते. तर विक्री किंमत ही चार हजारपासून ते २५ हजारपर्यंत असू शकते. एकदा जर मुकुंद यांच्या टिमने संगणक विकत घेतला तर ते त्याच्या अद्ययावत बदल करतात. याकरिता त्यांनी आयटीइएसमधील लोकांना नियुक्त केले आहे. त्यांच्या टिममध्ये तांत्रिक अधिकारी, व्यवस्थापक आणि विक्री करणाऱ्या लोकांचा समावेश आहे.

२०१४च्या अखेरपर्यंत रिन्यूआयटीचा महसूल तीन कोटींच्या घरात गेला होता. तसेच त्यांनी आतापर्यंत जवळपास २० हजार संगणकांची विक्री केली आहे. प्रत्येक वर्षी कंपनी ३० ते ४० टक्क्यांनी वाढ नोंदवते आहे. मुकुंद सांगतात की, ʻआम्ही भलेही समाजाच्या हितासाठी हे काम करत आहोत. तरीही त्यात सातत्य राखणे जरुरीचे आहे. आम्ही कधीही या कामासाठी अनुदान किंवा निधीची मागणी केली नाही.ʼ अनुदानासाठी अजून अनेक प्रक्रिया शिल्लक असल्याची मुकुंद यांना कल्पना आहे. शासकीय शाळांमध्ये तसेच काही खासगी शाळांमध्ये ही टीम संगणक लॅबच्या स्थापनेचे काम करत आहे. रिन्यूआयटी संगणकाचा पुरवठा करत असलेल्या अशाच एका शाळेतील कर्मचारी सुनिथा पेरुमल सांगतात की, ʻरिन्यूआयटीसोबतचा माझा अनुभव खुप चांगला आहे. संगणक शिकण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांकरिता संगणक उपलब्ध करुन देण्याची शाळेची इच्छा आहे. सध्याच्या काळात संगणकाचे ज्ञान हे सर्वांसाठी उपयुक्त आहे.ʼ गेल्याच वर्षी रिन्यूआयटी ही भारतातील पहिली मायक्रोसॉफ्टने मान्यता दिलेली संगणक दुरुस्त करुन विकणारी कंपनी ठरली आहे. शाळांमध्ये संगणक लॅब स्थापन करण्याबाबत रिन्यूआयटीने उत्तर प्रदेश सरकारसोबत नुकतीच चर्चा केली आहे.

लेखक - सिंधु कश्यप

अनुवाद - रंजिता परब

Related Stories