बीटेकच्या विद्यार्थ्याने सुरु केले 'नाईट फूड एक्सप्रेस’, रात्रपाळी करणाऱ्यांसाठी केली पोटोबाची व्यवस्था 

0


झपाटयाने वाढणाऱ्या शहरीकरणामुळे लोकांना नोकरीच्या निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात बस्तान  हलवावे लागते. कुटुंबापासून दूर रहाणा-या व्यक्तीला रात्री नोकरी करतांना मोठी समस्या भेडसावते ती म्हणजे जेवणाची, कारण रात्रीची नोकरी करतांना व्यक्ती बऱ्याच वेळा स्वतःच्या आरोग्याकडे कामा अभावी दुर्लक्ष करतो, त्यामुळे सहाजिकच त्याला उपाशी झोपावे लागते किंवा फ्रीज मधील शिळ्या अन्नावर समाधान मानावे लागते. अशाच प्रकारच्या समस्येला सामोरी गेलेले दिल्लीच्या नोएडामधील रमा शंकर गुप्ता यांनी या  समस्येवर उपाय शोधून स्वतः एका अशा किचनची सुरवात केली जी रात्रपाळी करणाऱ्यांना उपाशी न रहाता एक समाधानकारक पर्याय उपलब्ध करून देऊ शकते.

मूळचे मध्यप्रदेश मधील कटनी जिल्यात रहाणारे रमा शंकर गुप्ता यांनी फरीदाबाद येथील आरवली इंजिनीअरिंग कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक मधून बीटेकची पदवी घेतली. यानंतर नोएडा येथील एचसीएल कंपनीत त्यांनी रात्रपाळीत एका प्रशिक्षकाचे काम केले. रमा शंकर यांनी युवर स्टोरीला सांगितले की,"रात्र पाळी मध्ये काम करत असतांना नोएडा मध्ये फक्त एकाच ठिकाणी जेवण मिळत असलेल्या ठिकाणी मी व माझे मित्र जेवायला जायचो. पण तेथील जेवणाची चव आम्हाला मुळीच आवडायची नाही. इतकेच नाहीतर शिफ्ट संपवून आम्ही पहाटे चार वाजता घरी पोहायचो तर आमच्यात तसूभरही ताकद नसायची की आम्ही स्वतःसाठी स्वयंपाक करू शकू. त्यामुळे आम्ही उपाशीच झोपायचो".

या समस्येने त्रस्त असलेल्या रमा शंकर यांनी विचार केला की एक असा व्यवसाय सुरु केला पाहिजे ज्यामुळे रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करणाऱ्यांना चांगले जेवण मिळू शकेल. कामाच्या सुरवातीला त्यांनी आपल्या आई वडिलांना विश्वासात घेऊन त्यांची संमती मिळवली. प्रारंभीच्या गुंतवणुकी बद्दल रमा शंकर सांगतात की," मी या कामाच्या सुरवातीला वडिलांकडून दीड लाख रुपये घेतले व जुलै २०१३ मध्ये नोएडाच्या सेक्टर-४५ मध्ये ‘नाईट फूड एक्सप्रेस’ या नावाने व्यवसायाची सुरवात केली". या कामासाठी एक स्वयंपाकी व मदतनीस हाताखाली ठेवला. सुरवातीच्या ६ महिन्यात अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. याच दरम्यान मी स्वतः जेवणाच्या ऑर्डर पोहचवण्याचे काम करत होतो. हळूहळू लोकांना जेवणाची चव आवडू लागली व कामाचा विस्तार होत गेला".

आज हे नोएडाच्या व्यतिरिक्त दिल्लीमध्ये मयूर विहार,पटपडगंज आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात इंदिरापूरम, वैशाली, क्रासिंग रिपब्लिक व ग्रेटर नोएडा मध्ये आपली सेवा देत  आहे. लवकरच पूर्ण दिल्लीमध्ये आपली सेवा देण्याचा त्यांचा विचार आहे.

‘नाईट फूड एक्सप्रेस’मध्ये उत्तर भारतीय व चायनिज अशा दोन्ही प्रकारचे व्यंजन मिळतात. नोएडा मध्ये दुपारच्या १२ ते सकाळच्या ५ वाजेपर्यंत लोकांच्या ऑर्डर्स स्वीकारल्या जातात. जेवणाच्या किंमती  स्वस्त असल्यामुळे सामान्य माणूस सुद्धा यांच्या जेवणाची चव चाखू शकतो. यांच्याकडे सगळ्यात कमी किंमतीचा पराठा हा ५० रुपयाचा असून रस्सा चिकनची किंमत सगळ्यात जास्त म्हणजे ६०० रुपये आहे. रमा शंकर सांगतात की ३०० रुपयेच्या ऑर्डरवर ते कोणत्याही प्रकारचे सेवा दर आकारत नाही, याच्यापेक्षा कमी ऑर्डरवर ते ५० रुपये किंमत आकारतात.

या क्षणाला त्यांच्याकडे दोन स्वयंपाकी व चार मदतनीस कामाला असून घरपोच सेवेसाठी त्यांनी सात मुलांची नियुक्ती केली आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार जास्त ऑर्डर मिळत असल्यामुळे सेवा पोहचवणाऱ्यांची संख्या दहा वर जाते. आपल्या कामाच्या वेळेस जाणवणाऱ्या अडचणींनबद्दल रमा शंकर सांगतात की कधीकधी लोक रात्रीच्या जेवणाची ऑर्डर देवून झोपून जातात अशावेळेस त्यांना उठवणे मोठ्या जिकरीचे काम असते. अशा वेळेस जेवण परत येते. अनेक वेळा लोक खोट सांगून सुद्धा जेवणाची नोंद करतात अशा लोकांना ते काळ्या यादीत टाकतात.

‘नाईट फूड एक्स्प्रेस’ सध्या स्वतःच्या वेबसाईट निर्मितीचे कार्य करत आहे, जेणेकरून लोक ऑन लाईन जेवणाची ऑर्डर नोंदवू शकतात. या व्यतिरिक्त त्यांची योजना ही एक अॅप बनवण्याची आहे म्हणजे ते ग्राहकांपर्यंत चांगली सेवा पोहचवू शकतील. भविष्यातील योजनेबद्दल ते सांगतात की आपल्या व्यवसायाचा विस्तार पूर्ण एनसीआर मध्ये करून पुढे पुणे व बेंगलोर मध्ये त्यांच्या विस्ताराची योजना आहे. या कामासाठी ते अनेकांच्या संपर्कात असून पुढच्या दोन वर्षामध्ये या जागांवर ‘नाईट फूड एक्स्प्रेस’ ची दमदार सुरवात केली जाईल.  

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi  facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

आता वाचा संबंधित कथा :

खवय्यांसाठी शेफ आणि ब्रँड अँम्बॅसॅडर विकास खन्ना यांचा ‘जुनून’!

मेफिल्डकडून २१ कोटी मिळवून मुंबईच्या ‘बॉक्स8’ने रचला इतिहास

बिर्याणी घरपोच वितरीत करणारे क्विक सर्व्हिस रेस्टोरेंट ʻचारकोल बिर्य़ाणीʼ


लेखक : हरीश
अनुवाद : किरण ठाकरे