राज्य अपंग वित्त व विकास महामंडळास केंद्र शासनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

0

दिव्यांगांच्या कल्याणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळास केद्र शासनाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे हा पुरस्कार स्विकारणार आहेत. हा पुरस्कार मिळाल्याने दिव्यांगांसाठी आणखी चांगले काम करण्यास बळ मिळाले असल्याची भावना महामंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अखत्यारीतील दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या वतीने दिव्यांग क्षेत्रातील विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळासोबत योग्य समन्वय ठेवून कार्य केल्याबाद्दल महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळास उत्कृष्ट राज्याचा पहिला पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कार जाहीर झाल्यावर  सामाजिक न्याय मंत्री बडोले म्हणाले की, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अपंग वित्त आणि विकास महामंडळासोबत योग्य समन्वय ठेवून राज्यातील दिव्यांग व्यक्ति व संस्थांना सेवा देण्यासाठी अपंग वित्त व विकास महामंडळ सदैव कार्यरत आहे. या पुढील काळातही दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी अधिक चांगल्याप्रकारे योजना तयार करून कार्य करण्यात येईल. या पुरस्काराने दिव्यांगांसाठी काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.

गेल्या दोन वर्षात महामंडळाचे अध्यक्ष तथा सामाजिक न्याय मंत्री बडोले यांच्या नेतृत्वाखाली महामंडळाचे कामकाज प्रभावीपणे सुरू आहे. या काळात विदर्भातील १ हजार दिव्यांगाना कर्ज वाटप, राज्यस्तरीय साहित्य, कला व उद्योजकता संमेलनाचे नागपूरमध्ये यशस्वी आयोजन करून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यात आले. तसेच राज्यातील उद्योग क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या १३ दिव्यांग व्यक्तिंना उद्योजकता पुरस्कार देण्यात आले. असे पुरस्कार देण्याची प्रथा बडोले यांच्या अध्यक्षीय काळात सुरू करण्यात आली. तसेच दिव्यांगांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीची व्यवस्थाही महामंडळाच्या वतीने सुरूवात करण्यात आली.

सामाजिक न्याय मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष बडोले यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय अंपग वित्त व विकास महामंडळाने राज्याच्या महामंडळास २१ कोटी रुपयांचा निधी दिला. या निधीतून दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्जवाटप तसेच शंभर दिव्यांगांना मोटारसायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच राज्यभर दिव्यांग स्वावलंबन अभियानाची राबविण्यात येत असून त्याची सुरूवात गोंदिया येथून झाली आहे. गोंदियातील सुमारे पाचशे दिव्यांगांनी या अभियानाचा लाभ घेतला आहे. महामंडळाच्या कर्ज वाटप तसेच कर्ज वसुलीमध्ये गतीमानता आणण्यात आली आहे. महामंडळामध्ये कर्जमंजुरी समितीची स्थापना करण्यात करण्यात येऊन कर्ज प्रकरणाला चालना देण्याचे काम श्री. बडोले यांनी केले आहे. बडोले यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाने दिव्यांगांच्या उत्थानासाठी केलेल्या या सर्व प्रयत्नांची दखल घेऊन केंद्र शासनाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचा हा पुरस्कार महामंडळास जाहीर झाला आहे.