वेब दुनियेच्या जागतिक महाजालात नाशिकचा मानस गाजरे 'अॅन्ड्रॉइड गेमकिंग'

वेब दुनियेच्या जागतिक महाजालात नाशिकचा मानस गाजरे 'अॅन्ड्रॉइड गेमकिंग'

Friday November 13, 2015,

4 min Read

अमेरिकेत झालेल्या कॅजुअल कनेक्ट (casual connect)मध्ये त्याचे तीन गेम प्रदर्शनात ठेवण्याची परवानगी मिळाली... तर ऑगस्ट २०१५ मध्ये युरोप येथे झालेल्या कार्यक्रमात त्याला नामांकन मिळाले ..... पुण्यात झालेल्या कॉन्फरन्समध्येही फील डॉट्स या गेमला तीन हजार डॉलर मिळाले तर लंडन येथे नुकत्याच झालेल्या टीगा स्पर्धे मध्ये त्याच्या डुप्लेक्स या गेमचा समावेश करण्यात आला.... हे सारं काही वाचून ही किमया साधणारा आणि हे मोबाईल गेम तयार करणारा अमेरिकेतील तज्ञ असावा असे आपल्याला वाटेल असेल नाही का ? मात्र नाही. तसे नसून आयटी क्षेत्रात दुर्लक्षित असलेल्या नाशिक शहरातील मानस गाजरे या युवकाने ही किमया साधली आहे. सध्या जगभरात अॅन्ड्रॉइड मोबाईलचा बोलबाला आहे. आणि यातील वैविध्यपूर्ण गेमने सर्वच वयोगटातील लोकांना वेड लावले आहे. मानस गाजरे याने गुगल प्लेवर आता पर्यंत अनेक अॅप्लिकेशन तयार केलेत आणि त्यातील काही गेम्सला संपूर्ण जगातून मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली असून त्याच्या “बलून ब्रो अॅरो” या गेमला गुगलच्या फ्री डाऊनलोड च्या लिस्ट मध्ये पहिला क्रमांक तर “क्नोक डाऊन” या गेमला गुगलच्या नवव्या क्रमांकाचे स्थान मिळाले आहे. मार्च २०१५ मध्ये अमेरिकेत झालेल्या गेम डेव्हलपर्स मध्ये त्याची निवड करण्यात आली होती. सॅन फ्रान्सिस्को मधून त्याला स्कॉलरशिप म्हणून दोन हजार डॉलर देण्यात आले आहे.


image


खानदेशातील रहिवासी

जळगावचा रहिवासी असलेला मानस गाजरे याने बारावी पर्यंतचे शिक्षण नाशिक मध्ये पूर्ण केले. तर मुंबई येथून कॉम्पुटर इंजिनियरचे शिक्षण पूर्ण करत असताना त्याला प्रोग्रामिंगमध्ये रस निर्माण झाला. शिकत असताना त्याने २०११ साली आयटी कंपनीची स्थापना करून उद्योजगतेमध्ये पदार्पण केले. अभियंत्याचा कल सॉफ्टवेअर कडे असतो त्यामुळे मानस यानेही प्रारंभी काही ‘कस्टमाईज्ड सॉफ्टवेअर्स’ तयार केले. मात्र सर्व्हिसेस पेक्षा अॅन्ड्रॉइड त्याला जास्त भावले. एक तर हा ओपन सोर्स प्लॅटफॉर्म असून याचा विलक्षण गतीने प्रचार प्रसार होत आहे. या माध्यमातून जगभरात पोहचणे शक्य असून याचा प्रभावही वाढीस लागत असल्याचे त्याने हेरले. यातून त्याने अॅन्ड्रॉइडचे सखोल अध्ययन केले .


image


“झाबुझा” नावाच्या कंपनीची स्थापना

एम एस सी मॅथमँटीक्स करत असतानाच मानस याने स्वतःची “झाबुझा” नावाची कंपनीची स्थापना केलीय. या कंपनीत सुरवातीला मानस यांचा पाच ते सहा सहकाऱ्यांचा ग्रुप होता मात्र आता या ग्रुपमधले संख्याबळ अधिक वाढले असून सध्या वीस ते पंचवीस सहकारी या कंपनीत काम करतात. आता पर्यंत मानसने दही हंडी, बलून स्मॅश, फ्रुट स्मॅश, आईस्क्रीम कॅच, गणपती, पेपर स्नेक, सेव्ह ट्रीज, मॅजिक, सिक्युरिटी असे विविध २० टूडी तसेच थ्रीडी मोबईल गेम तयार केले आहेत. याच बरोबर भारतीय संस्कृती सणांना साजेशे गणेशोत्सव आणि दसऱ्यानिमित्त विविध गेमही तयार करण्यात येतात. यासाठी हे युवक एक संकल्पना निवडून त्यावर हॅकेथॉन कार्यशाळेचे आयोजन करून सलग ३२ तास काम करतात. यामधून एका गेमची निर्मिती केली जाते आणि तयार झालेले सर्व गेम गुगलच्या प्ले स्टोर येथे युजर्सना फ्री मध्ये डाउनलोड करून वापरता येतात. लोकांचा स्मार्ट फोनचा वाढता वापर बघता कॉम्पुटर इंजिनियर असलेल्या मानस गाजरे याने सुरवातीला अॅन्ड्रॉइड मोबाईलचे अॅप तयार करत असताना स्मार्टफोन मध्ये खेळता येणाऱ्या गेमची निर्मिती करण्याचा विचार केला आणि त्याने पहिला गेम तयार केला “बलून ब्रो अॅरो” जो गुगल प्लेवरील गेम्स कॅटेगरीत अपलोड करण्यात आला. सुरुवातीला दिवसाला शंभरहून अधिक लोकांनी हे अॅप्स डाउनलोड केले. तर पुढील पंधरा दिवसात हा वेग प्रचंड वाढला. ते पाहता गुगल प्लेने या गेमला टॉप फ्रीमध्ये टाकले. सध्या दिवसाला वीस हजाराहून अधिक लोक हे अॅप्स डाउनलोड करीत असून आजवर तीस लाखाहून अधिक युजर्सनी हे अॅप्स डाउनलोड केले आहे. देश विदेशातील अॅप्सना मागे टाकत अशी कामगिरी करणारा मानस हा पहिलाच तरुण ठरलाय.


image


सर्वाधिक पसंती मिळालेला “बलून ब्रो अॅरो” गेम :

या गेममध्ये मोबाईलच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला विविधरंगी फुगे उडताना दिसतात. डाव्या बाजूला असलेल्या धनुष्यबाणाने हे फुगे फोडायचे असतात. यात सुरुवातीला २५ बाण उपलब्ध असतात. तुम्ही सलग तीन फुगे फोडले तर दोन बाणांची भर पडते. जसजसे फुगे फुटतील तसा स्कोअर वाढत जातो.


image


समाजोपयोगी अँप्स

कुंभमेळ्यातही नागरिकांना जोडण्यासाठी आणि परराज्यातून आलेल्या नागरिकांसाठी 'नाशिक सिटी कनेक्ट' हे अॅप तयार करण्यात आले आहे. यात शहरातील महत्वाचे क्रमांक, बस, रेल्वे, टॅक्सीची माहिती, वेळापत्रक व पर्यटनाची माहिती देण्यात आली आहे. सध्याचे जग हे स्मार्ट फोनचे युग म्हणून ओळखले जाते. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसून येतो... यामुळे संवादाचे एक वेगळे माध्यम झाले असले तरी याच स्मार्ट फोनचा वापर काही वेळेला टाईमपास करण्यासाठी केला जातो.


आगामी संकल्पना

आता सध्या मानस गाजरे पुढील पिढीतील लॅपटॉप, डेस्कटॉपचे वर्च्युअल गेम तयार करण्याचे काम करत आहे. पुढील जग थ्रीडी पेक्षा सिक्स डी वर जाणार आहे त्यामुळे मानस सध्या यावर काम करत असून रिअलइस्टेट मधील संकल्पना तो प्रत्यक्षात साकारणार आहे. विकत घेणारी सदनिका कशी असेल ते थेट आपल्याला आपल्या मोबाईलावर पाहता येणार आहे. त्यामुळे भविष्यातील बाजारपेठेला लक्षात घेऊन त्याने आणि त्याच्या टीमने २०२० ची तयारी जोमाने सुरु केली आहे


image


नाशिक शहराची ओळख म्हणजे मंदिरांची नगरी ती आता हळूहळू मदिरेची म्हणजेच वाईन कपिटल म्हणून होऊ लागली आहे. या बदलाला साजेसे कुठलाही आयटीचा मंच नसताना मानस गाजरे आणि त्याची टीम आपली कल्पना साकारत आहेत. वेब दुनियेच्या जागतिक महाजालात आपला ठसा उमटवत असल्याने नासिक विविध विषयात आपले नाव सातासमुद्रापार पोहचवीत आहे हे ही नसे थोडके.

    Share on
    close