तनवीर गिल… एमबीए करूनही पत्रकारितेत केली यशस्वी कारकीर्द !

तनवीर गिल… एमबीए करूनही पत्रकारितेत केली यशस्वी कारकीर्द !

Friday October 23, 2015,

3 min Read

डॉ. कँथ एम. किथ यांचा एक सुप्रसिद्ध उतारा आहे. सकारात्मक पद्धतीने जगण्यासाठी अनेकांना या उताऱ्यातून प्रेरणा प्राप्त झालेली आहे. आपल्या ‘द पॅरॉडॉक्सिकल कमँडमेंस्’ या पुस्तकातून डॉ. कॅथ लिहितात…

‘‘कुणी कितीही गुढ असो, अगम्य असो, चुकीचा असो वा आत्मकेंद्रित असो तरीही त्याच्यावर प्रेम करा. तुम्ही चांगले कार्य करत आहात आणि तरीही लोक जर तुमच्यावर अप्पलपोटेपणाचा आरोप करत असतील तर खुशाल करू द्या. चांगुलपणाचा मार्ग मात्र सोडू नका. तुम्हाला यश मिळाल्यानंतर अनेक चुकीचे लोकही तुमचे मित्र बनतात. अशा परिस्थितीतही तुम्ही तुमचे काम सुरूच ठेवा. तुम्ही आज जे काही चांगले कार्य करता आहात, उद्या कदाचित लोक ते विसरूनही जातील, तरीही तुम्ही चांगली कामे करत रहा. अनेकदा तुमच्या प्रामाणिकपणाचा आणि औदार्याचा फटका तुम्हाला बसू शकेल, पण म्हणून तुम्ही तुमचे हे सदगुण सोडू नका. एखाद्या मोठ्या माणसावर एखादी किरकोळ व्यक्तीही आरोप करू शकते. याउपरही तुम्ही मोठाच विचार करत रहा. तुमच्या वर्षानुवर्षांच्या कष्टावर एका क्षणात पाणी फिरू शकते. तरीही आपले कष्ट सुरू ठेवा. लोक तुमच्याकडून मदतीची अपेक्षा ठेवतील आणि तुम्ही ज्यांना मदत करायला जाल तेच तुमचे नुकसानही करतील, पण म्हणून लोकांची मदत करायचे सोडू नका. जगाला खुप काही चांगले देऊनही तुमची जगाकडून उपेक्षा होऊ शकते पण तरीही जगासाठी, समाजासाठी आणि लोकांसाठी चांगली कामे करत रहा.’’

तनवीर गिल यांनासुद्धा उपरोक्त उताऱ्यातून जगण्याची, जगण्याच्या तऱ्हेची प्रेरणा मिळालेली आहे. तनवीर जेव्हाही त्रस्त असतात. कुणाशी बोलण्याच्या मनस्थितीत नसतात, तेव्हा-तेव्हा त्या उपरोक्त उतारा वाचतात. पुन्हा-पुन्हा वाचतात. त्यातला आशय समजून घेतात… आणि कामाला लागतात… पुढली आव्हाने स्वीकारायला आणि त्यांचा सामना करायला त्या सज्ज होतात.

image


तनवीर यांचे बहुतांश कुटुंबीय ‘नेव्ही’शी संलग्न आहेत. तनवीरसाठी त्यांचे कुटुंब म्हणजे सगळं काही. आई-वडिलांनी त्यांना उत्तम शिक्षण दिले. उत्तम संस्कार दिले. कुटुंबातून झालेल्या संस्कारांच्या बळावरच आयुष्यात आपले स्वत:चे एक आगळे स्थान निर्माण करण्यात त्यांना यश प्राप्त झालेले आहे, असे त्या मानतात.

तनवीर यांनी स्वत:च्या भविष्यासाठी स्वत: काहीतरी ठरवून घेतलेले होते. पण नियतीने मात्र त्यांच्या ताटात वेगळेच काहीतरी वाढून ठेवलेले होते. त्या एमबीए झालेल्या होत्या आणि बँकिंगच्या क्षेत्रात आपली कारकीर्द त्यांनी सुरूही केलेली होती… आणि अशात एका मित्राने सांगितले, की एका चॅनेलमध्ये अँकरिंगसाठी पदे रिक्त आहेत आणि त्यासाठी ऑडिशन्सही चाललेल्या आहेत. तनवीरनेही एक प्रयत्न करून पहावा म्हणून या मित्राने सुचवले. हा मित्र जणू नियतीचा दूतच होता. मित्राच्या सांगण्यावरून तनवीरने अर्ज केला. गंमत म्हणजे तनवीरची निवडही झाली. नवे क्षेत्र, नवे आव्हान… सगळं काही नवं. मग तनवीर यांनी डॉ. कँथ एम. किथ यांचा उतारा वाचायला घेतला. तनवीर आता नवे आव्हान पेलायला तयार होत्या... सज्ज होत्या...

image


... आणि तनवीर आज एक यशस्वी टीव्ही अँकर आणि न्यूज प्रोड्युसर आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रासाठीच माझा जन्म होता, हे आता तनवीर यांना मान्य करावेच लागते. इथे वादविवाद होतात. चर्चा होते. परिसंवाद होतात. प्रश्न-उत्तरे झडतात. तनवीर या सगळ्यांतून तल्लीन होतात. बालपणापासूनच रंगमंचावरील विविध स्पर्धांतून सहभागाची तनवीर यांना हौस होती. नाना तऱ्हेची आव्हाने अगदी सहज म्हणून स्वीकारणे, हा त्यांच्या स्वभावाचाच एक भाग होता आणि आहे.

दररोज काहीतरी नवे शिकण्यासाठी तनवीर तयार असतात. सतत नाविन्याचा ध्यास असतो. काही तरी नवीन शिकत जायचे आणि आणि स्वत:ला कालच्या तुलनेत अधिक समृद्ध करत जायचे, असा त्यांचा प्रयत्न असतो. प्रयत्नात सातत्य असते. एवढेच काय तर स्वत:कडून झालेल्या चुकांमधूनही त्या काहीतरी शिकत असतात. उदाहरणार्थ भविष्यात पुन्हा तीच चूक घडू नये म्हणून इथून पुढे काय काळजी घ्यायची, हे समजून घेतात. स्वतंत्र वैचारिक बैठक असलेल्या त्या एक जागरूक महिला आहेत. जागरूक पत्रकार आहेत.