लष्करात धाडसी कारकीर्द घडविणाऱ्या रिटायर्ड कॅप्टन तनुजा काबरे

2

लष्करात कारकीर्द घडविणे आणि ती यशस्वीरित्या पूर्ण करणे, ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि जर ती एका स्त्रीची कारकीर्द असेल, तर ती तेवढीच कौतुकास्पददेखील आहे. लष्करातील रिटायर्ड कॅप्टन तनुजा काबरे यांची अशीच अभिमानास्पद कारकीर्द आपल्याला त्यांना सलाम करण्यास भाग पाडते. शाळेत आठव्या इयत्तेत शिकत असताना तनुजा यांनी लष्करात कारकीर्द घडविण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण देखील केले. सध्या त्यांनी 'Guardians of Frontier' नावाची संस्था स्थापन केली असून, तेथे त्या सशस्त्र सेनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करतात.

याबाबत अधिक बोलताना त्या सांगतात की, 'माझे शिक्षण वाशी फादर एग्नेल स्कूल येथील शाळेत मराठी माध्यमातून पूर्ण झाले. लहानपणापासूनच मला लष्करी गणवेशाचे तसेच साहसी खेळांचे आकर्षण होते. त्यामुळे आठवीत शिकत असताना मी ठरवले की, मी काही डॉक्टर किंवा इंजिनियर बनणार नाही. मी अशाच क्षेत्रात कारकीर्द घडविन जेथे मला गणवेश परिधान करण्यास मिळेल. त्यामुळे तेव्हापासूनच मी लष्कराबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर याच दिशेने जिद्दीने मी माझे प्रयत्न सुरू ठेवले. रुईया महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतानादेखील मी एनसीसीमध्ये सहभागी झाले. अखेरीस योग्य दिशेने अथक प्रय़त्न केल्यामुळे मार्च २००७ साली माझे स्वप्न पूर्ण झाले आणि मी लष्करात भरती झाले. त्याकाळी लष्करात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच स्त्रियांचे प्रमाण होते. त्यातही महाराष्ट्रातील स्त्रियांचे प्रमाण फार कमी होते. त्यावेळेची आणि आत्ताची तुलना केल्यास सध्या हे प्रमाण खूप चांगले आहे. आता महिलादेखील लष्करात सामील होण्यासाठी प्रयत्न करतात आणि हे चित्र फारच सकारात्मक आहे.'

लष्कराच्या क्षेत्रात मुलींच्या सहभागाबद्दल बोलताना तनुजा सांगतात की, 'या क्षेत्रात कारकीर्द घडविणे हे फार साहसी आणि अभिमानास्पद आहे. अनेक लोक सांगतात की, या क्षेत्रात जीवाला धोका आहे. पण आजच्या काळात धोका हा सर्वत्रच आहे. रस्त्यावर चालतानादेखील तुमचा अपघात होऊ शकतो, म्हणून तुम्ही रस्त्यावर चालणे तर सोडत नाही ना. आणि युद्धाचं म्हणाल तर ती रोज रोज होत नाहीत. लष्करात कारकीर्द घडवल्यास तुम्हाला कायम एका गोष्टीचा अभिमान वाटतो की, तुम्ही देशाचे रक्षण करत आहात. एक मुलगी म्हणून मी सांगते की, हे क्षेत्र सुरक्षित आहे. आमच्या काळी मुलींना सहा महिन्यांचे प्रशिक्षण असायचे तर मुलांना ११ महिन्यांचे प्रशिक्षण असायचे. मात्र तरीही मुली मुलांच्या तोडीस तोड सराव करत. शारीरिक मर्यादांचे म्हणाल तर आपण आपल्या मर्यादांचा तेव्हाच विचार करतो, जेव्हा आपल्याकडे वेळ असतो. जर तुम्ही ध्येयाने पछाडलेले असाल, तर तुम्ही या अडचणींवर सहजरित्या मात करू शकता. आणि तसे पाहता तिथे या मर्यादांचा विचार करण्यास वेळच मिळत नाही. याशिवाय या क्षेत्रात अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेस भावनिकरित्या विचार करुन चालत नाही. हा नियम तर प्रत्येक क्षेत्रात लागू आहे. उदाहरणार्थ एखाद्या डॉक्टरला शस्त्रक्रिया करताना भावनिक होऊन चालणार नाही. तिथे त्याला त्याच्या भावनांना आवर घालावाच लागतो. खास करुन लष्कर क्षेत्राबद्दल बोलायचे तर, इथे तुम्ही २४/७ ऑन ड्युटी असता आणि तुमच्याकरिता तुमचे काम हेच प्राधान्यस्थानी असते.' एक मुलगी म्हणून आपला लष्करातील अनुभव कथन करताना तनुजा म्हणतात की, 'माझी पहिली पोस्टिंग ही जम्मू-कश्मिरमधील राजौरी येथे झाली होती. तेव्हा तेथे मी एकटीच मुलगी होती. माझ्यासोबत सर्व पुरुष लष्करी अधिकारी होते. मला त्यांच्याकडून फार सहकार्याची आणि विश्वासार्ह वागणूक मिळाली. त्यांच्यामुळेच पुढील स्तरावर जाण्यासाठीचा माझ्यातील आत्मविश्वास दुणावला. विशेष म्हणजे, त्यावेळेस मला कोणत्याही क्षणी असे वाटले नाही की, एक मुलगी म्हणून मी इथे असुरक्षित आहे. उलट तेथील प्रत्येक जवान मला एक स्त्री किंवा महिला म्हणून नव्हे, तर त्यांच्या बरोबरीच्या लष्करी अधिकाऱ्याप्रमाणेच समान वागणूक देत होता.'

या क्षेत्रात येण्यासाठी मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला, असे तनुजा सांगतात. याबाबत अधिक बोलताना त्या सांगतात की, 'जेव्हा मी माझ्या घरातल्यांना सांगितले की, मला लष्करात कारकीर्द घडवायची आहे. तेव्हा त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला. सहसा मुलींना क्वचितच असा पाठिंबा मिळतो, पण मी त्याबाबत सुदैवी. डिफेन्समध्ये कारकीर्द घडवायची आहे, या माझ्या निर्णयाला मुख्यत्वे माझी आई, बहिण आणि आजी या तिघींनीही पाठिंबा दिला. तिथेही 'वुमन्स पॉवर'चा मला अनुभव आला. त्यामुळे मला घरातून चांगलाच प्रतिसाद मिळाला. याशिवाय मला सासरच्या मंडळींकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. माझे लग्न ठरले तेव्हा माझ्या सासरच्या मंडळींनी मला लष्करात काम करण्याची बंदी घातली नाही. उलट त्यांनी मला सहकार्यच केले. लग्नानंतरदेखील मी दोन वर्ष लष्करात माझी सेवा रुजू केली. माझ्या सासरच्या आणि माहेरच्या मंडळींच्या सहकार्य़ामुळेच माझी कारकीर्द यशस्वीरित्या पार पडली.'

आजच्या तरुणांना सल्ला देताना तनुजा सांगतात की, 'डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक अशा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करा. तुम्ही एकप्रकारे देशाची सेवाच करत असता. मात्र या क्षेत्रात आल्यास तुम्हाला गणवेशधारी सेवा करण्याची संधी मिळते. तुम्हाला आदर मिळतो. तुम्हाला अभिमानास्पद वाटते. लष्करातील जीवन हे खूप आव्हानात्मक आणि साहसी आहे, ते तुम्हाला अनुभवायला मिळते.'

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

जगातील देशांच्या संयुक्त लष्करी सरावाचे नेतृत्व करणारी पहिली महिला लष्करी अधिकारी 'सोफिया कुरेशी' यांना जागतिक महिला दिनानिम्मित युवर स्टोरीचा सलाम  

अशक्याला शक्य करून दाखवणा-या, देशाच्या पहिल्या ‘ब्लेड रनर’ किरण कनोजिया!

निर्मला केवलानीः स्वप्न बघण्याची प्रेरणा देणारी लढवय्यी