'अम्मू ते अम्मा' एका प्रवासाची सांगता 

0

पाच डिसेंबर २०१६ हा दिवस भारतीय राजकारणात मोठ्या अक्षरात लिहून ठेवला जाईल, या दिवशी देशाने गेल्या पंचविस तीस वर्षात असामान्य प्रतिभा धडाडी आणि लोकप्रियता असलेल्या दक्षिणेतील एका ख-या खु-या नायिकेला गमावले आहे. अभिनेत्री आणि नंतर नेत्या म्हणून जयललिता जयराम यांच्या बद्दल जितके कौतुक आणि प्रेम सामान्य जनतेला होते त्यामागे त्यांची सामान्य माणसाबद्दल असलेली कणव आणि मनापासून वाटणारी आपुलकी होती. 

२४ फेब्रूवारी १९४८ रोजी कर्नाटकच्या म्हैसूरु जिल्ह्यात त्यांचा जन्मा झाला. आपल्या बालवयातच त्यांनी हुशार विद्यार्थिनी म्हणून नाव कमाविले आणि दहावीच्या शालांत परिक्षेत राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तिर्ण होवून सुवर्ण पदक मिळवले होते. त्यानंतर त्या अभिनयाच्या क्षेत्रात गेल्या. त्यांचे १४०पेक्षा जास्त लोकप्रिय सिनेमे आहेत आणि त्यात त्यांनी  नायिका म्हणून लोकांचे प्रेम आणि आपुलकी मिळवली आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्या. ज्येष्ठ अभिनेता एम जी रामचंद्रन यांच्या प्रभावाखाली त्यांनी अण्णा दुराई यांच्या द्विडी चळवळीत काम सुरु केले. सामान्य जनतेच्या, दलित मागास समाजाच्या सामाजिक जाणिवांच्या बाजूने लढताना समाजकारण आणि राजकारणाचे धडे घेतले. अण्णा द्रमुक पक्षाच्या त्या महासचिव झाल्या आणि १९९१ पासून २०१४ पर्यंत त्यांनी पाच वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री म्हणून जनतेच्या भल्याच्या योजनांना आकार देण्याचे काम केले. त्यांनतर त्यांच्या सामाजिक अभिसरणाच्या कामातून त्यांच्या आम्मा या नावाचे जणू ब्रँण्डिंग झाले आणि त्यांच्या नावाने सरकारी योजनांपासून अगदी नित्य वापराच्या वस्तू देखील बाजारात मिळू लागल्या इतक्या त्या लोकप्रियतेच्या शिखरावर जावून पोहोचल्या होत्या.

राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी तमिळ, इंग्रजी, तेलगू, कन्नड अशा विविध सिनेमांतून अभिनय केला होता, केवळ वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी कलेच्या क्षेत्रात पदार्पण केले. १९६५ ते ७२ च्या दरम्यान त्यांनी या क्षेत्रात आपले सौंदर्य आणि प्रतिभेच्या बळावर अधिराज्य गाजविले. १९८४ मध्ये त्यांनी राज्यसभेत पाऊल टाकले आणि राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. १९८७ मध्ये एम जी रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांनी अण्णा द्रमुक पक्षातील फूटीतून मार्ग काढत राजकीय सूत्रे आपल्या हाती घेतली, आणि रामचंद्रन यांच्या राजकीय वारस असल्याने पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून तामिळनाडूच्या जनतेच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. त्यांना राजकारणात ‘पुरातची तलाईवी’ म्हणजे क्रांतीकारी नेत्या आणि ‘आम्मा’ म्हणजे ‘आई’ ची उपमा देण्यात आली आणि त्याप्रमाणे त्या जगल्या.

एका अय्यर परिवारात जन्मलेल्या जयललिता यांच्या मेलूरकोट या कर्नाटकातील गावात त्याचे आजोबा सर्जन होते, त्याचे वडील त्या २ वर्षांच्या असताना मृत्य़ू पावले. त्यांनतर त्या आईसोबत बंगळूरूला आल्या. त्यांच्या आईने तमिळ सिनेमाच्या क्षेत्रात काम सुरू केल्यानंतर त्यांनाही हाच कारकिर्दीचा वारसा मिळाला. त्यांच्या आईने चित्रपट कारकिर्दीसाठी आपले नांव संध्या असे ठेवले होते, शिक्षण पूर्ण करतानाचा १९६१ मध्ये आईच्या सांगण्यावरून त्यानी पहिल्यांदा 'एपिसल' या इंग्रजी सिनेमात काम केले. वयाच्या १५व्या वर्षी सुरु केलेल्या अभिनयाच्या क्षेत्रात मग त्या महानायिका म्हणून गाजल्या. शिवाजी गणेशन, एम जी रामचंद्रन आणि धर्मेंद्र यांच्यासारख्या दिग्गजांच्या सोबत त्यांनी भूमिका केल्या. सुमारे ३००पेक्षा जास्त सिनेमातून त्यांच्या भूमिका आहेत.

राजकीय जीवनात द्रविड मुन्नेत्र कढगम पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पदार्पण केले. सामाजिक विषमतेच्या वातावरणातून सामाजिक न्यायाच्या भूमिकेत सरकार आणि राजकीय पक्षांनी कसे वागले पाहिजे जेणेकरून सामान्य वंचित माणसाला त्याचे न्याय आणि हक्कांचे वातावरण मिळेल असा त्यांच्या पक्षाचा प्रयत्न होता त्यात त्यांनी जीव ओतून काम केले आणि अम्मा म्हणून उपाधी मिळवत्या झाल्या. लौकीक अर्थाने त्या ‘आई’ नव्हत्या मात्र हजारो लाखो वंचितांना त्यांनी आईच्या मायेची पाखर घातली.

या सा-या प्रवासात त्यांना अनेक आव्हाने होती जशी ती राजकीय होती तशी व्यक्तिगत देखील होती. अनेक क्रांतीकारी निर्णय घेताना त्यांनी आपली बांधिलकी कायम सामान्य वंचित माणसाशी असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही त्यातून त्या तावून सुलाखून बाहेर पडल्या. त्यांच्या मनात गरिबांच्या बद्दल कणव प्रचंड होती. नुकत्याच जन्माला येणा-या बाळासाठी त्यांनी अम्मा किट मोफत देण्याचा उपक्रम केला त्याला असाधारण प्रतिसाद मिळाला, त्यासारख्या अनेक योजना होत्या ज्या त्यांच्या नावे सुरु करण्यात आल्या मग त्या मुलींच्या शिक्षणाच्या असोत किंवा गरिबांना दोन वेळचे मोफत अन्न देण्याच्या असो, त्यांनी कायम सत्ता सामान्य माणसाच्या भल्यासाठी असल्याचे दाखवून दिले त्यामुळे जनतेच्या पाठिंब्यावर त्यांचे विरोधकही त्यांना नामोहरम करू शकले नाहीत.