स्पर्धा परीक्षेला बसलाय, कनेक्ट व्हा ‘टेस्टबुक’शी!

1

‘गॅट’, ‘कॅट’, ‘एसबीआयपीओ’, ‘एसबीआय क्लर्क’, ‘आयबीपीएस पीओ’सह अन्य स्पर्धा परीक्षांतून उत्तीर्ण होणे म्हणजे एका चांगल्या नोकरीची शाश्वती, असे आपल्याकडे हमखास मानले जाते. देशभरातील तरुणाईला या परीक्षांचे आकर्षण असते. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी ही मंडळी कष्टही फार उपसते. कसर उरते ती परीक्षेच्या सरावाची. ती भरून काढण्यासाठी २०१४ मध्ये ‘टेस्टबुक’ची स्थापना करण्यात आली. ‘टेस्टबुक’ काय करते?...तर उमेदवारांची कृत्रिम परीक्षा (मॉक टेस्ट) घेते. ऑनलाइन स्पर्धा परीक्षेचा सराव करवून घेते.

‘लेट अस व्हेंचर’ आणि ‘आह व्हेंचर्स’सह आणखी काही बाहेरील गुंतवणूकदारांकडून आम्हाला दीड कोटी रुपये भागभांडवल प्राप्त झालेले आहे, हे जेव्हा ‘टेस्टबुक’ कंपनीने जाहीर केले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिल्लीतील गुंतवणूकदार उत्सव सोमाणी आणि ‘कार्लाइल समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक शंक़र नारायण यांचा या गुंतवणुकीत मोलाचा वाटा होता. शिवाय काही बँकर्स, शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक, मोबाईल विशेषज्ञ तसेच काही उद्योजकही यात सहभागी आहेत.

हम सात साथ है...

‘टेस्टबुक’च्या संकल्पनेमागे मुंबई आयआयटीचे ६ आणि दिल्ली आयआयटीचा १ असे ७ माजी विद्यार्थी आहेत. या सर्वांनी मिळूनच संकल्पना कागदावर उतरवली आणि पुढे ती अंमलातही आणली. गेल्या वर्षभरात हा उपक्रम यशाचे नवनवे उच्चांक गाठतो आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ‘टेस्टबुक’ फक्त ‘गॅट’ याच एका स्पर्धा परीक्षेची तयारी करवून घेत होते. तेव्हा कंपनीकडे १३ हजार विद्यार्थी युजर म्हणून नोंदणीकृत होते. सध्या कंपनीकडे ५५ हजार नोंदणीकृत युजर आहेत. या सर्व उमेदवारांनी मिळून ३० लाखांहून अधिक प्रश्न सोडवलेले आहेत, असा कंपनीचा दावा आहे, हे विशेष! कंपनीचा दावा खरा मानला तर त्याचा थेट अर्थ हा निघतो, की प्रत्येक युजरने सरासरी ५५ प्रश्नांची उकल करण्यात यश मिळवलेले आहे. ‘टेस्टबुक’वर उपलब्ध असलेला सगळा अभ्यासक्रम हा संबंधित परीक्षांचे टॉपर्स तसेच संबंधित क्षेत्रांमधील शिक्षणाचा दीर्घकाळ व गाढा अनुभव असलेल्या तज्ज्ञांकडून तयार केला गेलेला आहे.

सध्या सेवा नि:शुल्क

सध्या ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क आहे. नजीकच्याच काळात काही प्रिमियम सुविधाही उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. तूर्त कंपनीचे प्राधान्य उपलब्ध झालेल्या भांडवलाच्या जोरावर आपले प्रॉडक्ट अधिक दर्जेदार करण्याला आणि युजर्सच्या संख्येत वाढ करण्याला आहे. आतापर्यंत कंपनीच्या या प्रॉडक्टचा विस्तार केवळ नेटवर्कच्या माध्यमातून झालेला आहे. आता आपले प्रॉडक्ट बाजारात अधिक प्रभावीपणे उतरवता यावे म्हणून कंपनीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत.

भविष्यात मोठी बाजारपेठ

‘टेस्टबुक’ संस्थापक म्हणतात, ‘‘ऑनलाइन परीक्षांची तयारी करवून घेणे, हा सध्या भारतीय शिक्षणातला उदयाला येत असलेला बाजार (संधी) आहे. परीक्षेत उत्तीर्ण होण्यात जर एखादे उत्पादन (मार्गदर्शन) विद्यार्थ्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असेल तर एक मोठा वर्ग (परीक्षार्थी) त्यासाठी पैसे मोजायला तयार बसलेला आहे. आम्ही अगदी सुरवातीलाही ऑनलाइन स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणाऱ्या उपक्रमांची एक यादी तयार केली होती. आता तर हे क्षेत्र अधिकाधिक आव्हानाचे होत चाललेले आहे. प्रचंड स्पर्धा यातही आलेली आहे. याच क्षेत्रात कार्यरत ‘टॉपर’ कंपनीत ‘एसएआयएफ पार्टनर्स’ आणि ‘हेलियन व्हेंचर्स’कडून २.२ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झालेली आहे. ‘एंबाइब’ने ‘कलारी’कडून ४ दशलक्ष डॉलरची गुंतवणूक प्राप्त केलेली आहे. शिवाय आणखीही काही कंपन्या या क्षेत्रात आपले पाय पसरत आहेत. ग्राहकांकडून साइटवर व्यतित केली जाणारी वेळ, प्रश्नांचे स्वरूप आणि त्यांची उकल करण्याच्या आधारावर परीक्षेत मिळालेले यश अशा सगळ्या गोष्टी या सर्व नवोदित कंपन्यांचे भवितव्य ठरवतील.’’

कम ऑन आयआयटीयन्स!

‘टेस्टबुक’ही अजून या हिशेबाने प्राथमिक अवस्थेतच आहे. इंधन म्हणून तरीही एक मोठी गुंतवणूक कंपनीला उपलब्ध झालेली आहे. आता या रकमेचा अचुक आणि पुरेपूर वापर आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी करणे आणि त्या माध्यमातून बाजारातील एका मोठ्या भागावर आपला जम बसवणे, हे आव्हान ‘टेस्टबुक’समोर आहे. आव्हान पेलण्यात ‘टेस्टबुक’ यशस्वी ठरली तर त्यासारखा आनंद नाही. ‘टेस्टबुक’साठी येणारा काळ खचितच कसोटीचा आहे. सातही आयआयटीयन्सना मिळून प्रयत्नांच्या दाही दिशा धुंडाळ्याव्या लागतील. अर्थातच हे सातही आयआयटीयन्स आहेत, हे विसरून चालणार नाही. आजकाल आयआयटीयन्सचे घोडे कुठल्याही क्षेत्रात अगदी चौखुर उधळतात, हेही लक्षात घ्यावेच लागेल.

Related Stories

Stories by Chandrakant Yadav