न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध पार्सन्स स्कूल ऑफ डिजाईनची भारतात मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राधा कपूर यांची कथा

न्यूयॉर्कच्या सुप्रसिद्ध पार्सन्स स्कूल ऑफ डिजाईनची भारतात मुहूर्तमेढ रोवणाऱ्या राधा कपूर यांची कथा

Friday December 04, 2015,

5 min Read

तुम्ही आजपर्यंत यशस्वी महिलांच्या अनेक कथा वाचल्या असतील, पण त्यांच्या परिस्थितीपेक्षा अगदी विरुद्ध असा व्यावसायिक प्रवास राहिला आहे राधा कपूर यांचा.... राईट ब्रेन्ड व्यक्ती (अशा व्यक्ती जन्मतः अधिक सर्जनशील आणि भावनाप्रधान असतात) म्हणून जन्मलेल्या राधा या आपल्या नैसर्गिक वैशिष्ट्याला आवर घालून अधिक सुरक्षित अशी कॉर्पोरेट क्षेत्रातील कारकिर्द करण्याच्या मार्गावर होत्या... मात्र त्यांच्या पालकांनी वेळीच मध्यस्थी करत त्यांना यापासून रोखले. साधारणपणे भारतीय पालकांच्या विचारसरणीबाबतच्या सर्व समजांना त्यांनी यानिमित्ताने एकहाती खोटे ठरविले. आपल्या मुलीने सुरक्षिततेसाठी म्हणून आपल्या आवडीशी तडजोड करावी हे राधा यांच्या वडीलांना मुळीच मान्य नव्हते आणि त्यांनी ते होऊदेखील दिले नाही. विशेष म्हणजे स्वतः येस बॅंक लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष असलेले राधा यांच्या वडीलांनीही स्वतःही कारकिर्दीच्या एका महत्वाच्या टप्प्यावर कॉर्पोरेट कारकिर्द सोडून व्यावसायिक होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आपल्या मुलीचा आनंद हा तिच्या मनाचे ऐकण्यातच आहे, हे त्यांना चांगलेच कळत होते.

राधा यांच्याकडे सौंदर्यशास्त्राची उपजत जाण आणि अगदी अपारंपारीक जागांमधील डिजाईनच्या पैलूंनाही दाद देण्याची हातोटी ही कायमच होती आणि आईवडीलांकडून आवश्यक तो पाठींबा आणि हलकासा रेटाही मिळाला. यातूनच पुढे त्या न्यूयॉर्क येथील पार्सन्स – द न्यू स्कूल ऑफ डिजाईन येथे आपली या विषयातील औपचारीक पदवी मिळविण्यासाठी गेल्या. “ मी त्याआधी मुंबईबाहेर कधीच राहिले नव्हते. मात्र माझ्या आईवडिलांमुळेच मी हे करु शकले. मला माझ्या सुरक्षित कवचातून बाहेर काढल्याबद्दल मी माझ्या पालकांची नेहमीच ऋणी आहे. खरे तर मी अशी धाडसी उडी घेतली पाहिजे, हे त्यांना नेहमीच वाटत असे,” राधा सांगतात.

डिजाईनचे विविध दृष्टीकोन आणि त्याचबरोबर त्यांचा सर्वप्रकारे व्यवहारयोग्य वापर, या गोष्टींनी खच्चून भरलेल्या अशा एका संस्थेत पाच वर्षे घालविल्याने, काहीतरी अर्थपूर्ण करण्याच्या योजनेसहच राधा भारतात परत आल्या.

image


एका वर्षानंतर अलोक नंदा या भागीदारासह त्यांनी ब्रॅंडकॅनवास या त्यांच्या पहिल्या उपक्रमाला सुरुवात केली, तीदेखील अगदी तरुण वयात... “ पार्सन्समध्ये शिकलेले सर्व काही मी येथे उपयोगात आणले. माझा पहिला उपक्रम हा कला आणि ब्रॅंड यांना एकत्र करुन व्यावसायिक जागांमध्ये अधिक अर्थ भरणारा असाच मला हवा होता, जसे की त्यांच्या सजावटीची शैली ही त्यांची विचारधारा आणि तत्वे यांचा मूर्तीमंत नमुना असायला हवी,” त्या सांगतात. अर्थापासून प्रेरणा घेऊन केलेल्या कलाकृतींमधूनच हे साध्य करता येते – जसे की ग्राफीक वॉल आर्ट, वॉल म्युरल्स, डेकोरेटीव्ह पेंटींग्ज, पॅनेल डिजाईन्स, फ्रेम्ड आर्ट व्हिडीयो इन्स्टॉलेशन्स आणि त्याचबरोबर सुपर इन्स्टॉलेशन्स. पण लवकरच त्यांची आपली क्षितिजे रुंदावण्याची तीव्र इच्छा परत आली. “ मला डीजाईनमधील काही तरी वेगळ्याचा शोध घ्यायचा होता. करियरचा शोध घेताना, आमची पिढी निवडत असलेल्या पर्यांयांमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत – हटके पर्याय हा एक नियम बनला आहे. आम्हाला त्याला आधार द्यायचा होता. आम्हाला डिजाईनचा विचार मधोमध ठेऊन उद्योजकता आणि नाविन्य या गोष्टींना चालना द्यायची होती,” त्या सांगतात.

हे करण्यासाठी, त्यांना जो उघड पर्याय वाटला तो म्हणजे, त्या ज्या महाविद्यालयातून शिकल्या ती त्यांची मातृसंस्था... जिने त्यांना खूप काही दिले होते. मुख्य म्हणजे, त्याच वेळी पार्सन्सही अमेरिकेबाहेर विस्तार करण्याची योजना आखत होती आणि त्यांच्या भारतातील कामाचे नेतृत्व करण्यासाठी राधा पुढे झाल्या.

आज, लोअर परेलच्या इंडीयाबुल्स सेंटरमधील झोकदार अशा इंडीयन स्कूल ऑफ डिजाईन ऍन्ड इनोव्हेशन (आयएसडीआय)ची उभारणी राधा यांनी शून्यातून केली. या संस्थेची ही इमारतच अनेकांना प्रेरणा देते. सर्जनशीलता, नाविन्य आणि टिकाव हा आयएसडीआयच्या तत्वज्ञानाचा पाया असून, भारतीय डिजाईनच्या क्षेत्रात ही संस्था आज आघाडीवर आहे. तसेच डिजाईन आणि इतर सर्जनशील उद्योगांमध्ये कारकिर्दीच्या नवीन संधी निर्माण करण्यातही संस्था आघाडीवर आहे. राधा यांच्या मते एका अशा अभ्यासक्रमाची निर्मिती आवश्यक आहे, जो मुलांना त्यांच्या सर्जनशीलतेचा वापर करुन व्यावसायिक डिजाईन कसे बनवावे ते शिकवेल आणि त्याचवेळी त्याचे रुपांतर एका व्यवहार्य बिझनेस मॉडेलमध्ये कसे करावे हेदेखील शिकवणारा असेल.

image


“ आमचा अभ्यासक्रम हा डिजाईन, व्यवसाय आणि तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम आहे. डिजाईन स्कूल्समधील शिक्षणानंतरचा रोजगार दर हा केवळ १६.२ टक्के एवढा आहे, त्यामुळे निश्चितच यामध्ये काही तरी कमी आहे. त्यामुळेच उद्योगांसाठी तयार असतील असे प्रतिभावान विद्यार्थी पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत.” २०१३ मध्ये केवळ चाळीस विद्यार्थ्यांसह संस्थेला सुरुवात झाली होती तर आता दरवर्षी संस्थेत ४५० कलाकार तयार होत आहेत आणि आपले शब्द खरे करुन दाखवित, राधा या डिजाईनच्या माध्यमातून भारतीय परिस्थितीत क्रांती घडवित आहेत आणि त्यांच्या आसपासच्या परिसरातूनच याला सुरुवात झाली आहे. नाविन्यपूर्ण पर्यावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने त्यांनी लोअर परेल येथे इनोव्हेशन डिस्ट्रीक्ट, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध इनोव्हेशन डिस्ट्रीक्टस् चे प्रतिबिंब दिसेल असे मॉडेल, उभारले आहे. भारतात हे अगदी पहिल्यांदाच झाले आहे. त्याचबरोबर डिजाईनमधील नाविन्य आणि तंत्रज्ञान स्टार्टअप्स ना प्रोत्साहन देण्यासाठी आयएसडीआयने क्रिएटीव्ह एक्सलरेटर उभारण्यासाठी नुकताच मायक्रोसॉफ्ट वेंचर्सबरोबर सहकार्य करार केला आहे.

आयएसडीआय पार्सन्सच्या एका सामाजिक उपक्रमाद्वारे राधा या गरजू महिलांच्या सक्षमीकरणासाठीही काम करत आहेत. याद्वारे त्यांना दागिने आणि ऍक्सेसरीजचे डिजाईन करण्यासाठी आणि या गोष्टींचे विपणन करण्यासाठी मदत केली जाते. याशिवाय आयएसडीआयमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या वंचित गटातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी म्हणून दर वर्षी आयएसडीआयतर्फे कमीत कमी एक कोटी रुपये बाजूला टाकले जातात.

२००९ मध्ये राधा यांनी ‘डीओआयटी क्रिएशन्स’(DOIT Creations) या होल्डींग अम्ब्रेला कंपनीची स्थापना केली असून, सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे संकल्पनीकरण आणि जाहिरात करणे हा या कंपनीच्या स्थापनेमागचा उद्देश होता. ‘गेम-चेंजिग, ब्रेकथ्रु आयडीज’ ना आधार देण्याची भूमिका कंपनीने यशस्वीरीत्या निभावली आहे.

या व्यतिरिक्त आपली इतर आवडही त्या जोपासत आहेत. नुकतेच त्यांनी प्रो कबड्डी लीगमधील दिल्ली फ्रॅंचायझीचे मालक म्हणून आपले भागभांडवल गुंतवले आहे आणि इंडीया हॉकी लीगमधील मुंबई फ्रॅंचायझीमध्येही...

“ क्रिकेट खालोखाल कब्बडीला टीआरपी आहे. त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गरज आहे ती चांगल्या पॅकेजिंगची... आणि मुख्य म्हणजे आमचा या गोष्टीवर विश्वास आहे,” राधा सांगतात.

राधा हे सगळे एकाच वेळी कसे करु शकतात, हा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. त्यावरील उत्तर देताना त्या सांगतात, “ लहानलहान गोष्टींमध्ये देव असतो. तुमच्या आवडीचा प्रामाणिकपणे शोध घ्या आणि ती प्रत्यक्षात उतरवा.”

लेखक – बिंजल शाह

अनुवाद - सुप्रिया पटवर्धन