ठाणे जिल्‍हयातील धसई गाव ठरले देशातील पहिले कॅशलेस गाव

ठाणे जिल्‍हयातील धसई गाव ठरले देशातील पहिले कॅशलेस गाव

Friday December 02, 2016,

2 min Read

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी काळया धनाच्‍या विरोधात मोहीम उघडत पाचशे आणि हजाराच्‍या नोटांवर बंदी आणून क्रांतीकारी पाऊल उचलले. भ्रष्‍टाचार, आतंकवादाला थोपविण्‍यासाठी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे स्‍वप्‍न बघितले आहे व त्‍यादृष्‍टीने वाटचाल सुरू केली आहे या एकुणच प्रक्रियेत महाराष्‍ट्रातले धसई गाव देशातले पहिले कॅशलेस गाव म्‍हणून समोर येणे ही महाराष्‍ट्राचा अर्थमंत्री म्‍हणून माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. येत्‍या काळात महाराष्‍ट्रातील बहुसंख्‍य गावेच नव्‍हे तर संपूर्ण महाराष्‍ट्र देशातील पहिले कॅशलेस राज्‍य ठरावे यावर आपला भर राहिल असे प्रतिपादन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

image



ठाणे जिल्‍हयातील धसई हे गाव देशातील पहिले कॅशलेस गाव म्‍हणून समोर आले असुन वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला. देशातील पहिल्‍या कॅशलेस गावाचा मान धसई गावाला मिळणे हा महाराष्‍ट्राचा सन्‍मान आहे. हा उपक्रम महाराष्‍ट्रातील इतर जिल्‍हयांसाठीच नव्‍हे तर देशातील सर्वच जिल्‍हयासांठी आदर्शवत व प्रेरणादायी आहे, असेही यावेळी बोलताना वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

image



धसई गावात 1 डिसेंबर रोजी आयोजित सदर कार्यक्रमात वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह बँक ऑफ बडोदा चे महाप्रबंधक नवतेज सिंग, वीर सावरकर प्रतिष्‍ठानचे रणधीर सावरकर, आ. किसन कथोरे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्‍वतःचे डेबीट कार्ड वापरून मुरबाड तांदूळ खरेदी करत कॅशलेस गाव उपक्रमाचा शुभारंभ केला. यानंतर गुरूकृपा स्‍टोअर्स या दुकानाला त्‍यांनी भेट दिली व तेथील स्‍वाईप मशीन व अन्‍य व्‍यवस्‍थांची पाहणी केली.

धसई हे गाव ठाणे जिल्‍हयातील मुरबाड तालुक्‍यातील सुमारे 10 हजार लोकसंख्‍येने गाव असुन सदर गावानजिकच्‍या 60 छोटे गाव व्‍यापार उदीमासाठी या गावावर निर्भर आहेत. बँक ऑफ बडोदा च्‍या सहकार्याने सदर गाव कॅशलेस करण्‍याचा उपक्रम हाती घेण्‍यात आला आहे. या गावातील नागरिकांकडे जनधन खाते असल्‍यामुळे डेबीट कार्ड आधीपासुनच त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध आहे. 39 स्‍वाईप कार्ड मशीनसाठी अर्ज करण्‍यात आलेले आहे. या मशीन खरेदी करणा-यांमध्‍ये वडापाव विकणारे सुध्‍दा आहेत. ज्‍या दुकानदारांकडे चालु खाते नव्‍हते त्‍यांच्‍यासाठी सुध्‍दा त्‍वरीत खाते उघडण्‍यात आले आहेत. या कामासाठी बँक ऑफ बडोदाच्‍या टीमने सातत्‍याने परिश्रम घेतले आहेत. हे गाव कॅशलेस होण्‍याच्‍या दृष्‍टीने वीर सावरकर प्रतिष्‍ठान सारख्‍या नामवंत एनजीओ ने सुध्‍दा महत्‍वपूर्ण भूमीका बजावली असुन संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन नागरिकांना प्रशिक्षीत करण्‍याचे काम सुध्‍दा करण्‍यात आले आहे. या उपक्रमाच्‍या शुभारंभप्रसंगी नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.