डॉक्टर्स आणि इंजिनियर्सच्या जगातील ‘आकाश’चा नवा प्रवास

डॉक्टर्स आणि इंजिनियर्सच्या जगातील ‘आकाश’चा नवा प्रवास

Monday October 26, 2015,

4 min Read

आकाश शैक्षणिक सेवा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी १९८८ मध्ये सुरू झाली. भारतात या कंपनीने आत्तापर्यंत शंभरहून अधिक केंद्रे उघडली आहेत. दरवर्षी ही कंपनी ८५००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण (कोचिंग) देते. आपल्या या कार्यामुळे ‘आकाश शैक्षणिक सेवा’ने प्रशिक्षण केंद्रांच्या जगात आपले स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आणि आता विद्यार्थ्यांना अधिक सुविधा देण्यासाठी या कंपनीने ‘ई-लर्निंग व्यासपीठ’ देखील सुरू केले आहे.

image


या वर्षी मे महिन्याच्या अखेरीला सुरू झालेल्या ‘आकाश आयकनेक्ट सेवे’च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. आपल्या गरजेनुसार आपल्याला हव्या त्या सुविधांची निवड करण्याचा पर्याय देखील कंपनीने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. या पोर्टलला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत.

‘आयकनेक्ट’मध्ये विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ लेक्चर, स्टडी मटेरियल आणि ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मेडिकल आणि इंजिनियरींगच्या प्रवेशासाठी प्रोत्साहित करणे हा या मागचा उद्देश आहे. यासोबतच ८वी, ९वी आणि १०वीच्या विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या परीक्षेची तयारी करवून घेणे हाही एक उद्देश आहे. या व्यतिरिक्त एनटीएसई, केव्हीपीवाय. जेएसटीएसई. ऑलिंपियाड सारख्या कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांसाठी देखील हे पोर्टल विद्यार्थ्यांना मदत करते.

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तज्ज्ञांकडून शकांचे समाधान करणे, कामगिरी दाखवणारा डॅशबोर्ड. कोर्स मॅप अशा प्रकारच्या इतर अनेक विशेष सेवा हे पोर्टल देत असते. भविष्यात या पोर्टलमध्ये डिस्कशन फोरम, कंटेंट एनरिचमेंट आणि टास्क मॅनेजर फीचर्स सारख्या सुविधा देखील उपलब्ध केल्या जाणार आहेत. आकाशने बेंगळुरूच्या ‘क्लाऊड बेस्ट इंटरॅक्टिव्ह लर्निंग सोल्यूशनची कंपनी’ असलेल्या ‘ट्रिबाईट टेक्नॉलॉजी’सोबत करार देखील केला आहे.

‘आकाश आयकनेक्ट’ विद्यार्थ्यांना निवडीचे स्वातंत्र्य देते. विद्यार्थी पूर्ण कोर्स किवा एखादा विषय किंवा एखादे प्रकरण (धडा) आपल्या मर्जीने खरेदी करू शकतात. ९९ रूपयांपासून प्रकरण खरेदीची किंमत सुरू होते तर १०,९९९ रूपयांपासून संपूर्ण कोर्स उपलब्ध आहेत. आकाश आता आयकनेक्टला गूगल प्ले आणि अप स्टोअरवर लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आणखी मदत मिळणार आहे.

युवरस्टोरीने आकाशच्या संस्थापकांसोबत संस्थेचा विकास आणि भविष्यातील योजनांबाबत बातचित केली आणि त्याबाबत जाणून घेतले.

प्रश्न – गेल्या १५ वर्षांमध्ये परीक्षेच्या तयारीचे क्षेत्र कशा प्रकारे विकसित झाले आहे?

उत्तर – परीक्षेच्या तयारीने भारतातील शिक्षण उद्योगाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित केले आहे. या क्षेत्रात योगदान देणारी काही मोठी नावेही समोर आली आहेत, तर दुसरीकडे काही लोक एकत्र येऊन या उद्योगाला नवा आकार देऊ पाहत आहेत. डिजिटल क्रांती ही सुद्धा एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे हे क्षेत्र बदललेले आहे. काही नवे लोक परीक्षेच्या तयारीसाठी वेगळ्या पद्धती अवलंबून त्यांचे चांगले परिणाम देखील देत आहेत हे पाहून खूप बरे वाटते. विद्यार्थ्यांचे ज्ञान जलद गतीने वाढवण्याची मागणी हे या मागचे कारण आहे. १९९९ मध्ये केवळ एक-दोन लाख विद्यार्थी आयआयटी-जेईई परीक्षा देत असत, मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येचे हे प्रमाण आता लाखोंमध्ये रूपांतरीत झाले आहे. हीच स्थिती अन्य प्रवेश परीक्षांच्या बाबतीत सुद्धा आहे. परंतु जलद गतीने बदललेल्या या क्षेत्रातील काही गोष्टी मात्र सकारात्मक नाहीत. या क्षेत्रात केवळ पैसे कमावण्यासाठी आले आहेत असे ही काही लोक आहेत. आणि तरूण प्रतिभेला योग्य प्रशिक्षण देण्याच्या मोहिमेसाठी ही चांगली गोष्ट नाही.

प्रश्न – डिजिटल माध्यमाला गंभीरपणे घेतले पाहिजे असे ‘आकाश’ला केव्हा वाटले?

उत्तर – या क्षेत्रात आम्ही सर्वात प्रथम आलो असल्याने आम्ही इतरांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असतो. २००८ मध्ये ‘बेसिक ऑनलाईन असेसमेंट टूल’ लाँच करत आम्ही डिजिटल क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर आम्ही डिव्हीडीवर आधारित शिक्षण देण्याची योजना सुरू केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन टेस्टचे व्यासपीठ दिले. याद्वारे आपल्या घरी बसून हे विद्यार्थी आरामात टेस्ट देऊ शकत होते. आमच्याकडे डिजिटल उत्पादनांची मालिकाच आहे. आम्ही लवकरच ही उत्पादने लाँच करणार आहोत. ही उत्पादने एकसारखी नसून वैविध्यपूर्ण स्वरुपाची आहेत आणि विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीसाठी खूपच उपयोगाची आहेत.

प्रश्न – छोट्या संस्था डिजिटल माध्यमांमध्ये मोठे नाव कमवत आहेत, याबाबत आपल्याला काय वाटते?

उत्तर – उद्योगासाठी ही खूपच चांगली गोष्ट आहे. छोटे लोक आपल्या क्षमतेनुसार नव्या कल्पानांसह पुढे येत आहेत. हे तंत्रज्ञानाचे खूपच मोठे क्षेत्र आहे. सध्या आपण पाहत आहोत ते तंत्रज्ञानाचे खूपच छोटे रूप आहे. छोट्या आणि तरूण कंपन्यांची आज या अमर्याद असलेल्या क्षेत्राला गरजही आहे आणि अशा कंपन्यांना या क्षेत्रात शिरकाव करता येईल अशी जागा सुद्धा आहे. आम्ही या क्षेत्राकडे लक्षपूर्वक पाहत आहोत आणि योग्य लोकांसोबत भागीदारी करण्यासाठी देखील आम्ही उत्सुक आहोत.

प्रश्न – पारंपारिक वर्ग (क्लासरूम्स) आता संपण्याच्या मार्गावर आहेत असे आपल्याला वाटते का?

उत्तर – पारंपारिक वर्गांना बदलावे लागले आहे हे गेल्या काही दशकांपासून आपण पाहत आलो आहोत. मला वाटते की एक चांगल्या वर्गाचे आपले स्वत:चे काही लाभ असतात आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड दिली, तर त्याला एक नवी उंची मिळू शकेल. जर कोणी बदल स्वीकारू शकले नाही, तर मग ते या उद्योगाचे एक ‘कोडॅक’ बनून राहिल.

डिजिटल वर्ग हे काही वर्गातील क्षैक्षणिक कार्यक्रमांना पर्याय म्हणून पुढे येणार नाहीत, मात्र डिजिटल माध्यम हे वर्गातील शिक्षणाचा विस्तार नक्की करेल.

प्रश्न- आजपासून पाच वर्षांनंतर ‘आकाश’ कशी दिसेल?

उत्तर- आजपासून पाच वर्षांनंतर ज्या गोष्टी बदलणार नाहीत, त्या आहेत आमची नव्या गोष्टींची भूक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांबाबत जाणीव करून देण्याचे आमचे वेड. देशाच्या कानाकोप-यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणाली पोहोचवणे हे आमचे लक्ष आहे. योग्य विद्यार्थी आणि त्यांच्या स्वप्नांमध्ये कोणती भिंत उभी राहू नये हाच या मागचा उद्देश आहे. आमचे हे लक्ष गाठण्यासाठी आम्ही इंटरनेट, मोबाईल, टॅबलेट अशा तंत्रज्ञानाच्या सर्व माध्यमांचा पूर्णपणे लाभ घेणार आहोत.

या उद्योगात आम्ही पहिले आलेलो असल्यामुळे सतत चांगली कामगिरी करून दाखवण्याची आमची क्षमता, उत्पादनाची गुणवत्ता आणि आमच्या सेवांनी केवळ आकाशलाच नव्हे, तर संपूर्ण उद्योगाला बदलून टाकले आहे.