‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’च्या अंधारात तेजाळली ‘ज्योती’

0

ज्योती धावळे यांच्यासाठी २००४ ते २००६ हा एक खडतर काळ होता. या दरम्यान त्यांच्यावर तीन वेळा गर्भपाताचा प्रसंग ओढवला. गर्भपात करण्याशिवाय त्यांच्याजवळ गत्यंतरही नव्हते. आत्मकरुणा, आत्मघृणा असे सगळे नकारात्मक भाव ज्योती भोवती फेर धरून होते… पिंगा घालत होते. ज्योती… नुसते नाव होते… होता केवळ अंधार…

दवाखान्याचे तिन्ही रिपोर्ट ज्योती यांनी टराटरा फाडून भिरकावले खरे, पण पुन्हा चौथ्यांदा जेव्हा त्या गर्भवती झाल्या आणि गर्भपात करायला म्हणून दवाखान्यात गेल्या तेव्हा त्यांच्या ललाटावर नियतीने काही वेगळेच लिहून ठेवलेले होते. एचआयव्ही पॉझिटिव्ह डिटेक्ट झालेला होता आणि गर्भपात न करताच ज्योती यांना दवाखान्यातून परतावे लागलेले होते. ज्योती यांना एड्सची लागण झालेली होती.

मोडलेल्या संसारातला तुकडा...

जीवनाचे ३८ शरद पार करून चुकलेल्या ज्योतीचे बालपण कष्टातच गेले. ज्योतीचे वडील वायूसेनेत अधिकारी होते. कुणालाही वाटेल असे कसे कष्टात गेले. बघा ज्योती स्वत: सांगताहेत, ‘‘मी एका मोडलेल्या संसाराचा तुकडा होते. सावत्र आई खरोखर सावत्र होती. मला कोंडून ठेवायची. खायला द्यायची नाही. एकवेळचे जेवणही माझ्यासाठी अहोभाग्य होते. गोष्टीतल्या सिंड्रेलापेक्षा माझी व्यथा वेगळी नव्हती.’’ सावत्र बहिणीचे मात्र खूप लाड व्हायचे आणि तिच्या लाडाकोडाचा प्रत्येक प्रसंग लहानग्या ज्योतीच्या मनात आपले जगणे म्हणजे कवडीमोल, अशीच भावना बिंबवायचा.

बालपणी वाट्याला आलेल्या उपेक्षेउपरही ज्योतीची वडिलांबद्दल कुठलीही तक्रार नाही. ज्योती म्हणतात, ‘मी त्यांचे पहिले अपत्य. घरातले वातावरणच असे असायचे, की बाबा माझ्याबद्दलच्या भावना व्यक्त करूच शकत नसत. त्यांच्या आपल्या अडचणी होत्या. अर्थात सगळेच काही सांगायला लागते किवा व्यक्त करायला लागते, असेही नसते. काही गोष्टी फक्त समजून घ्यायच्या असतात.’’

पायलट होण्याचे स्वप्न विरले...

एचआयव्हीच्या जोडीला ज्योती या आणखी एका आजाराने ग्रस्त आहेत. त्यांना जरा कमी ऐकू येते. ज्योती सांगतात, ‘‘मी ८० डेसिबल किवा मग त्यापेक्षा जास्तीचा आवाज ऐकू शकते. आता हा आवाज म्हणजे समजा एखाद्या रेल्वे इंजिनच्या शिट्टीएवढा. कोण काय बोलतंय, हे मी त्याच्या ओठांच्या हालचालीवरून बरोबर ओळखते. अचुक संवादासाठी लिखित सामुग्रीवर मला अवलंबून राहावे लागते. माझ्या उच्चारात काही दोष आहेत. ‘च’, ‘क्ष’, ‘स’ सारख्या शब्दांचे नेमके उच्चार मला जमत नाहीत. अर्थात ही अडचण माझी एकटीचीच नाही. माझ्यासारख्याच बहिरेपणाची समस्या असलेल्या अनेकांना या धाटणीचे काही शब्द उच्चारताना अडचणी येतात. समजण्यातही येतात.’’

मोठ्ठी झाल्यानंतर ज्योतीलाही वडिलांप्रमाणे फायटर पायलट (लढाऊ वैमानिक) बनायचे होते. उंच उडायचे होते. आकाशाला भिडायचे होते. त्या सांगतात, ‘‘हेच स्वप्न असल्याने मी ‘टॉप गन’ हा चित्रपट कितीतरी वेळा पाहिला. आजही एव्हिएटर चष्मा घातलेल्या टॉम क्रुझचे ते रूप मला वेड लावते. एअरफोर्स कँपमध्येच मी लहानचे मोठे झाले. लढाऊ विमाने उड्डाणे घेत, भरारी मारत, तेव्हाचा तो आवाज आजही आठवला, की माझ्या अंगावर शहारे येतात. आता मी तरी असल्या ऐटीत उडणाऱ्या या यंत्रांच्या प्रेमात का पडू नये? मला सांगा.’’

‘‘दुर्दैवाने… माझ्यातल्या बहिरेपणाने माझ्या या स्वप्नाचा चुराडा केला. पण आता मला त्याचा कुठलाही पश्चाताप नाही. जे होते ते चांगल्यासाठी होते, या तत्वावर आता माझा विश्वास बसलेला आहे. माझे अपंगत्व दु:खाचे रूपडे लेवून आलेला एक अप्रत्यक्ष आनंदच आहे, असेच मला आता वाटते.’’ हे सांगताना ज्योती आपले अवसान गळू देत नाहीत.

नऊ महिने जिने पोटात सांभाळले, हे जग दाखवले ती आई पुन्हा ज्योती यांच्या जीवनात आली आणि आकाशात भरारी घेण्याचे स्वप्न काय आणि आणखी कुठली आकांक्षा काय, सगळंच त्या आनंदापुढे फिकं वाटू लागलं. वास्तविक कुठल्याही दृष्टीने ही पुनर्भेट फलदायक ठरली नाही. ज्योती यासंदर्भात फार सांगत नाहीत. आई आली काय… ज्योतीचे अभ्यासातले मन उडाले काय आणि त्या वर्षी ती नापास झाली काय… पुढे ज्योतीने कसेबसे दिल्लीतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलमधून दहावीची परीक्षा पास केली, पण महाविद्यालयाचे तोंड काही ती पाहू शकली नाही.

प्रेमात नव्हे, ते पडणे नरकात...

आपलं जवळचं असं कुणीच नाही, ही एकाकीपणाची भावना ज्योती यांना आतून पोखरत असते. अशातच एका युवकाने ज्योती यांच्या मनाचे दार ठोठावले. ज्योती यांना वाटले जणू आपल्या सगळ्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या आणि हा जोडीदार आपल्यासाठी पाठवला. ज्या साधेपणावर ज्योती भाळल्या, तो साधेपणा नव्हे तर साधेपणाचा आव आणला जातोय, हे पहिल्याच गर्भारपणात त्यांना कळून चुकले.  ज्योती यांना डोहाळे लागलेले होते. कधी एकदा आई होते आणि बाळाला जोजवते, असे त्यांना झालेले आणि नवरा म्हणाला, ‘सरळ दवाखान्यात जा आणि गर्भपात करून घे.’ ज्योती यांना धक्काच बसला. ज्योती यांनी गर्भपाताला विरोध केला, पण त्यांचे ऐकणार कोण होते. दुसऱ्यांदा गर्भवती आहोत, असे जेव्हा कळले, तेव्हा आनंद होण्याऐवजी ज्योती यांचा थरकाप उडाला. ज्योती सांगतात, ‘‘मी नवऱ्याला विचारले, की गर्भपात करायला लावण्यापेक्षा ते निरोध का वापरत नाहीत. निरोध मला पसंत नाही, असे त्यावर नवऱ्याचे उत्तर होते.’’ आधीच ज्योती यांना गोळ्यांची अॅलर्जी होती, त्या गर्भनिरोधक गोळ्या घेतील कशा? ज्योती सांगतात, ‘‘मी पूर्णपणे व्हेजायनल निरोधावर अवलंबून होते. आणि व्हेजायनल निरोध बरेचदा फेल होतात. व्यवस्थितपणे ते वापरायचे असतात. नेमकेपणाचा अवलंब झालेला नसेल तर उपयोग होत नाही. दहा ते पंधरा मिनिटे वाट बघावी लागते आणि याला नेहमीच घाई असायची. त्याबाबतीत तर कमालीचा निर्दयी होता तो.’’

बलात्कार तो बलात्कारच...

तेव्हा इतके जाणवले नाही, पण आता हमखास जाणवते, की आपण वैवाहिक बलात्काराचे बळी आहोत, हे सांगताना ज्योती हळव्या होतात. ‘‘बलात्कार हा शेवटी बलात्कार असतो. तो बाहेर होवो वा वैवाहिक जीवनात. नवऱ्याला मुले नको होती. तरी त्याने निरोधचा वापर केला नाही. पहिल्या गर्भपातानंतर त्याला हात जोडून, खूप रडून विनवले आता तरी निरोध वापर, तरीही त्याने तसे केले नाही. मी जे निरोध स्वत: वापरायचे, त्याच्या वापरात जोडीदाराला थोडा धीर धरावा लागतो. तर तेही त्याने केले नाही. कितीतरी संभोग लादले… आणि वरून तिनवेळा माझ्यावर गर्भपाताची वेळ लादली… एचआयव्हीही लादलाच… यासाठी मी आधी सरकारला आणि नंतर समाजाला जबाबदार धरते… का धरू नये? सरकारला यासाठी, की सरकार वैवाहिक बलात्कारांसंदर्भात कलम ३७६ लावत नाही आणि समाजाला यासाठी, की तो नेहमीच बाईतच दोष शोधतो. बाईलाच दोषी सिद्ध करण्यावर टपलेलाही असतो.’’

सल इथली संपत नाही

गर्भपाताच्या या पातकात अप्रत्यक्ष का होईना आपणही सहभागी होतोच, ही अपराधाची भावना ज्योती यांच्यात ठासून भरलेली आहे. स्वत:ला आजही यातून त्या मुक्त करू शकलेल्या नाहीत. आताही त्या यावर विश्वासच ठेवायला तयार नाहीत, की त्यांच्यासमोर गर्भपाताशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ‘‘मी सर्वच बाबतीत त्या माणसावर अवलंबून होते. साधीसरळ होते. कौटुंबिक हिंसा कायदा वगैरे काय भानगडी आहेत, हे काहीही मला माहिती नव्हते. शिव्या ऐकण्याची सवय, मार खाण्याची सवय अशी काही जडलेली होती, की आत्मसन्मान कशाशी खातात, हे आता कुठे कळायला लागलेले आहे.’’

आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह आहोत, हे ज्योती यांना जेव्हा पहिल्यांदा कळले तेव्हा त्यांच्या पोटात तीन महिन्यांचा गर्भ होता. आधी तीन गर्भपात झालेले होते. दरम्यान त्यांना संक्रमित रक्त दिले गेले, की आणखी काय झाले हे नेमकेपणाने स्पष्ट होत नाही. आधीच्या गर्भपातांबाबतची सगळी कागदपत्रे ज्योती यांनी संतापात फाडून टाकलेली असल्याने हे मळभ अधिकच गडद आहे.

मुलाच्या वाट्यालाही सावत्र आई

क्रमाने चौथे, पण जन्माने पहिलेच मुल ज्योती यांना झाले. आधुनिक उपचार तंत्रामुळे हे मुल एचआयव्ही मुक्त आहे. लागोपाठ गर्भपात करायला भाग पाडणाऱ्या नवऱ्याने या मुलाच्या जन्मानंतर लगेचच ज्योती यांना फारकत दिली व मुलालाही आपल्यासोबत घेऊन गेला. आता ज्योती आपल्या पोटच्या गोळ्याची भेट तरी मिळावी म्हणून कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत.

‘‘माझ्या जीवनातील तो सर्वांत दूर्धर प्रसंग होता. मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, हे कळल्यावर मला धक्काच बसलेला होता. कितीतरी दिवस पुढे मी या धक्क्यातच होते. आणि त्यात भर टाकली ती नवऱ्याने. नवरा म्हणाला, की त्याचे दुसऱ्या एका बाईशी संबंध आहेत आणि तो तिच्यासाठी माझ्यासोबतचे नाते संपवतो आहे. मी म्हटलं चला आपण एखादी नोकरी शोधू. लग्न संपवायला, नातं तोडायला मी मानसिकदृष्ट्या अजिबात तयार नव्हते, पण मला जेव्हा कामवाल्या मावशींनी सांगितले, की मी घरी नसताना माझा नवरा त्याच्या प्रेमिकेला घरी आणतो. तेव्हा मी अगदी मनापासून स्वीकारले, की सगळे काही संपलेले आहे. काही शिल्लक उरलेले नाही.’’ ज्योती एक दीर्घ उसासा घेतात.

झाले गेले गंगेला मिळाले, अशी ज्योती यांची धाटणीच तयार झालेली आहे. लग्न मोडले म्हणून त्यांना फार असा पश्चाताप नाही. त्यांचा पूर्वाश्रमीचा पतीही आता नवा घरोबा करून मस्त मजेत आहे. ज्योती यांना वाईट एकाच गोष्टीचे वाटते, की त्यांनी नऊ महिने पोटात वाढवून, प्रसववेदना सहन करून जन्माला घातलेले मुलही सावत्र आईकडे राहातेय. आपल्या वाट्याला सावत्र आई आली, आपल्या मुलाच्याही वाट्याला सावत्र आई, ही वेदना त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

‘मी हरलेले नाही, खचलेले नाही’

‘‘फारकतीच्या तहनाम्यावर जे काही लिहिलेले होते, त्यातले एक अक्षरही माझ्यामते बरोबर नाही. न्याय्य नाही. न्यायालयीन कार्यवाहीच्या संकेतानुसार न्यायाधीशांनी पती आणि पत्नी दोघांना समक्ष बोलावून दोन्ही बाजू ऐकून घ्यायला हव्या होत्या. माझ्या बाबतीत असे झालेच नाही. मी कुठल्याही न्यायालयात अगर न्यायाधिशासमोर हजर झाले नाही. जबरदस्तीने माझ्याकडून तहनाम्यावर सही करवून घेतली गेली. याला काय अर्थ आहे.’’ हे सांगताना ज्योती अगदी ज्वाला झालेल्या असतात. पुन्हा शांत होऊन म्हणतात, ‘‘मी हरलेले, खचलेले नाही. बास माझ्या लढ्यात जीव ओतेल, अशा एका चांगल्या वकिलाच्या प्रतीक्षेत आहे.’’

ज्योती यांनीही दुसरे लग्न केलेय. विशेष म्हणजे त्यांचे हे नवे पती एचआयव्ही निगेटिव्ह आहेत. नवा नवरा त्यांना ‘एका ऑनलाइन चॅट रूम’च्या माध्यमातून मिळाला. ज्योती हे सांगताना सुखावतात, ‘एक, दोन, तिन नव्हे तर चक्क सहावेळा त्यांनी मला प्रपोज केले. मी प्रत्येकवेळेस नकार दिला. अखेर एकदा मी म्हटले चला प्रोफाइल बघायला काय जातंय. मी ते पाहिलं अन् फ्लॅटच झाले. त्याचे ते बाइकर जॅकेट आणि बाजूला ऐटीत उभी होंडा फायरब्लेड… मी मोहात पडले. (आकर्षित नव्हे, त्या आवर्जून स्पष्ट करतात.) शेवटी मी प्रस्ताव स्वीकारला. तेव्हा मी एका आयटी कंपनीत काम करत होते. पुढे जवळपास सहा महिन्यांपर्यंत चॅटिंग चालले होते. शब्द मी तरी जपूनच आणि मोजकेच वापरत होते. नंतर पुन्हा माझ्या आयुष्यात एका दु:खाची वावटळ आली.’’

२८ जून २०११ रोजी वडिलांचे निधन झाले. वडिलांचे अंतिम दर्शन त्यांना घ्यायचे होते. श्रद्धासुमने अर्पित करायची होती, पण सावत्र आईने तेही करू दिले नाही. ‘‘वडिलांचे असणेच माझ्यासाठी सर्वकाही होते…’’ ज्योती सांगतात… ‘‘सावत्र आईबद्दल कमालीचा संताप आणि वडिलांच्या मृत्यूचे दु:ख… माझी आतल्या आत खदखद चाललेली होती. मला कुणाची तरी गरज होती आणि माझी सर्वांत जवळची मैत्रिण दुबईला होती. माझा नवा मित्र विवेक. त्याला जेव्हा हे कळले, तो स्वत:च माझ्या घरी आला. भावनिक आधार मला दिला. मला सावरले. पुढल्या आठवड्यात भेटू म्हणून घेतलेला विवेकचा निरोप मला जडच झाला होता.’’ ज्योती म्हणतात, ‘‘माझा नवरा म्हणतो, की हे सगळे म्हणजे त्याच्यासाठी प्रेमच होते आणि तेही दुसऱ्या नजरेत जडलेले.’’

विवेकसवे आनंद गडे...

विवेकचे आई-वडील एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलीसमवेत आपला मुलगा (तोही धडधाकड) लग्न करतोय म्हटल्यावर हादरलेच होते, पण पुढे जसे त्यांना दिसत गेले, कळत गेले, की विवेक या लग्नामुळे आनंदी आहे. मस्त आहे. त्यांचा विरोध मावळत गेला. ज्योती सांगतात, ‘‘सासरच्यांची भीती माहितीच्या अभावातून होती.’’

विवेकच्या आई-वडिलांना पुढे जसे कळले, की अरे एचआयव्हीही इतर आजारांप्रमाणे एक आजारच आहे आणि औषधांद्वारे तो नियंत्रणात ठेवता येतो. सगळ्यांनीच ज्योतीचा स्वीकार केला. ज्योतीही आता नव्याने उजळल्या होत्या. नवे जग, नवे दालन त्यांच्यासाठी खुले झालेले होते. महत्त्वाचे म्हणजे पहिल्यांदा त्या खऱ्या प्रेमाचा अनुभव घेत होत्या.

ज्योती म्हणतात, ‘‘आयुष्यातली दु:खे आणि वेदना यांनी त्यांना केवळ सहानुभुतीची भावना शिकवली, पण विवेकसोबतच्या विवाहातून दया आणि क्षमा ही मूल्ये त्यांना कळली. माझ्या आयुष्यात विवेकच्या आगमनाहून रम्य, सुंदर असे काहीही नाही. विवेक सोबत असला म्हणजे माझ्याकडून होणारे प्रत्येक काम हे श्रेष्ठ दर्जाचे होते. आता जे काही माझ्याजवळ आहे, त्यात समाधान मानणे मी शिकून घेतलेले आहे. दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणही देणं लागतो, हे मला कळून चुकलंय. द्वेष मागे सोडून माफ करणेही मला जमू लागले आहे. आता मी आधीपेक्षा जास्त पोख्त, जास्त समजूतदार झालेले आहे.’’ ज्योती तेवतच असतात… ‘‘दुसऱ्या लग्नाने माझ्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. मी आज जे काही आहे, ते या लग्नामुळेच आहे. मी एचआयव्हीग्रस्त आहे, ही न्यूनगंडाने पछाडलेली माझी भावना गळून पडलेली आहे. मला हे जग आता सुंदर वाटू लागले आहे. मी एकेकाळी केवळ स्वप्नातच अशा जगाचा मागोवा घेत आले आणि आता असे जग चक्क माझ्या हाती आलेले आहे.’’

आज ज्योती आपल्या व्यावसायिक कारकिर्दीतही शिखरावर आहेत. आता त्या मागे वळून पाहात नाहीत. पुढेच पुढे वाटचाल सुरू आहे. ‘ब्लॅक स्वान एंटरटेन्मेंट’सोबत क्रिएटिव्ह मॅनेजर म्हणून त्या कार्यरत आहेत. कंपनीतल्याच ‘सोशल मिडिया’ आणि ‘पब्लिक रिलेशन’ विभागाच्या त्या प्रमुखही आहेत. त्या आणि त्यांची टीम दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘स्त्री-शक्ती’ या महिला सशक्तिकरण या विषयाला वाहिलेल्या कार्यक्रमाच्या महत्त्वपूर्ण घटक आहेत.

एचआयव्ही आणि एड्स रुग्णांच्या हक्कांबाबतही ज्योती यांचा आवाज बुलंद असतो. कितीतरी सामाजिक संघटनांतून त्या सक्रिय आहेत. कितीतरी अशासकीय स्वयंसेवी संस्थांनी त्यांच्या कार्याचा सन्मान केलेला आहे. पाकिस्तानातील ‘बेदार’ या संघटनेनेही त्यांना गौरवलेले आहे. ज्योती यांच्या दृष्टीने मात्र लोकांमध्ये सहज आणि स्वाभाविकपणे मिसळणे हीच त्यांची खरी मिळकत आहे.

‘मला लोकांमध्ये राहायचेय’

‘‘मला प्रसिद्धी फारशी आवडत नाही. उगीच डोक्यात हवा जाते. लोकांमधून बाहेर पडून तुम्ही लोकांसोबत सूर कसे जुळवू शकता. आणि त्याचा मग काय परिणाम होणार आहे? लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणे हाच खरा मार्ग मला वाटतो. बालपणी माझी काळजी वाहणारे कुणी नव्हते. प्रेमाला पारखे होणे म्हणजे काय, हे माझ्याहून अधिक चांगले कुणाला ठाऊक असणार आहे? मग अशा प्रेमाला पारखे झालेल्या लोकांना तुम्ही टीव्हीच्या स्क्रिनवरून किंवा वर्तमानपत्रातल्या बातम्यांच्या अगर मुलाखतींच्या माध्यमातून प्रेम देणार आहात? अशा लोकांना प्रत्यक्ष तुम्हाला भेटावेच लागेल. त्यांच्यात मिसळावेच लागेल. अन्यथा तुम्ही कुणीही असा… तुमचे प्रेम बेगडीच. प्रेमाला पारखी असलेली माणसे समाजात किती आहेत. बाप रे मोजता येणार नाहीत बिचारी.’’

वंचितांसाठी एकदा सक्रिय झाल्यानंतर विपरित परिस्थितीशी मुकाबल्याचे तंत्रही त्या आत्मसात करू लागलेल्या आहेत. सोशल मिडियावर स्वत:च्या आयुष्याशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट न संकोचता त्या स्वीकारतात. फेसबुकवर कुणाशीही बोलतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतात. आपल्या चाहत्यांवर, अनुयायांवर कौतुकाचा वर्षाव करतात.

आपण आयुष्यात आनंदाला पारखे का होतो, तर आनंदाची व्याख्या करताना कुठेतरी आपली चुक होते, ही बाब ज्योती मोकळ्या मनाने स्वीकारतात.

‘‘आनंद तुमच्याआतच ओसंडत असतो. दुसऱ्याच्या आत तुम्ही त्याचा शोध घेऊ शकत नाही. परिस्थितीतही नाही. तुम्हाला आनंदी राहायचेय तर खुशाल आनंदी राहा. परिस्थिती कशीही असो. वातावरण कसेही असो. मस्त रहा.’’

ज्योती हे सांगताना खुप आनंदी असतात. त्या म्हणतात, ‘‘तुमचा उत्साह वाढवणारे लोक हेच खरं तर तुमच्या प्रेरणेचेही स्त्रोत असतात. विवेक माझ्यासाठी असाच. त्याच्या दिशेनेच माझ्या आयुष्यात प्रेरणा आली. पाठोपाठ आनंदही. किंबहुना आनंदच मला शोधत माझ्यापर्यंत आला, असं मी म्हणेन!’’

‘‘मदर टेरेसा, प्रिंसेस डायना या माझ्या रोल मॉडेल आहेत. मदरने मला विनाअट प्रेम करायला शिकवले, तर प्रिंसेस डायनाने निरपेक्ष भावनेने दुसऱ्याला देणे शिकवले. मीही आपल्या छोट्याशा पातळीवरून… छोट्याशा पद्धतीने इतरांना दोन चांगल्या गोष्टी सांगण्याचा, शिकवण्याचा छोटासा प्रयत्न करते आहे.’’