भारतीय शिक्षण पद्धतीचे खंदे समर्थक, आधुनिक शिक्षण क्रांतीचे जनक ! : ‘सिंबायोसिस’चे प्रा. डॉ शांताराम बळवंत मुजुमदार !

भारतीय शिक्षण पद्धतीचे खंदे समर्थक, आधुनिक शिक्षण क्रांतीचे जनक ! : ‘सिंबायोसिस’चे प्रा. डॉ शांताराम बळवंत मुजुमदार !

Saturday August 27, 2016,

8 min Read

“ ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे, सत्य शिवाहून सुंदर हे ” या गीतकार जगदीश (नाना) खेबुडकर यांच्या गीतातील ओळींनी माझ्या मनात रुंजी घातली, जेव्हा मी सिंबायोसिसच्या पायऱ्या उतरून बाहेर पडत होते. महाराष्ट्रातील ज्योतीराव फुले, महर्षी शिंदे, गोखले, आगरकर अशा शिक्षण क्षेत्रातील दिव्य पुरुषांची उज्ज्वल परंपरा आजही २१ व्या शतकात कायम तेवत ठेवणाऱ्या ज्ञान महर्षींना मी भेटून आले होते. “ विद्या विनयेन शोभते” या सुविचाराचे मूर्तिमंत दर्शन म्हणजे आधुनिक शिक्षण महर्षी भारतीय शिक्षण पद्धतीचे खंदे समर्थक आणि सिंबायोसिस या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा डॉ शां ब मुजुमदार ! त्यांच्या सिंबायोसिसच्या वाटचालीबाबत ‘युवर स्टोरी’च्या वाचकांना अवगत करण्याचा हा एक प्रयत्न.

image


ब्रिटीशांनी या देशात आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असली तरी शिक्षणाच्या क्षेत्रात भारतीय गुरुकुल परंपरेतील नालंदा विद्यापीठासारख्या शिक्षण संस्थांची कीर्ती अनेक शतकांपासून पसरली होती. या देशाला पारंपारिक अध्यात्म परंपरा आहे आणि अत्याधुनिक विज्ञान, तंत्रज्ञानाचा वारसा देखील. परंतु ब्रिटीशांच्या गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात शिक्षणक्षेत्रात देखील बौद्धिक गुलामगिरीचे जोखड या देशाला स्वीकारावे लागले आणि स्वातंत्र्यानंतर कित्येक वर्षाने देखील आमची शिक्षणपद्धती त्यातून बाहेर पडलेली नाही. हे ओळखून या देशाला आपली स्वतःची वेगळी शैक्षणिक ओळख आणि जगभरात मान्यता मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न सिंबायोसिसने केला आहे. ऑक्सफर्ड, केंब्रिज आणि हॉवर्ड या विदेशी शिक्षण संस्थांइतकेच प्रतिष्ठेचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण भारतात येथील विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकते. या देशाच्या भविष्यासाठी उपयोगी पडेल अशी शिक्षणपद्धती गरीबातील गरीब हुशार विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण माफक दरात उपलब्ध करून देणारी सिंबायोसिस ही आधुनिक नालंदा किवा तक्षशीलाच आहे असे त्यामुळेच म्हणावेसे वाटते.

image


डॉ मुजुमदार यांची सिंबायोसिस येथील त्यांच्या कार्यालयात ‘युवर स्टोरी’ने भेट घेतली आणि त्यांच्या सर्जनशील ऋजूत्वाची प्रचीती आली. आपल्या व्यस्त दिनचर्येतही ८१ वर्षीय शिक्षण महर्षी डॉ मुजुमदार यांनी अगदी नेमक्या शब्दात केवळ काही मिनिटांत आपल्या व्यक्तिगत माहितीपासून सिंबायोसिसच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवला.

शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राहिलेल्या छत्रपती शाहू महाराजांच्या त्या काळातील कोल्हापूर संस्थांनमधील गडहिंग्लज या गावी ३१ जुलै १९३५ रोजी डॉ मुजुमदार यांचा जन्म झाला. त्यांचे वडील व्यवसायाने वकील होते आणि जेष्ठ विधीज्ञ म्हणून त्या काळात प्रतिष्ठित होते. डॉ मुजुमदार म्हणतात की, “माझ्या वडिलांनी मला आत्मविश्वासाने जगायला शिकवले तर आईने संस्कार दिले. वडिलांकडील धिटाई आणि आईकडील गीताई हेच जीवनाचे आधार ठरले”.

image


डॉ मुजुमदार यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गडहिंग्लज येथे झाल्यानंतर डॉक्टर होऊन वैद्यकीय सेवेत जाण्याचा त्यांचा विचार होता मात्र इंटरसायन्स विषयात अपेक्षित गुण न मिळाल्याने त्यांनी राजाराम महाविद्यालयात बीएससी करिता प्रवेश मिळवला. त्यानंतर त्यांनी एमएससीकरिता पुणे विद्यापीठात वनस्पतीशास्त्र हा विषय निवडला आणि पुढील अभ्यास सुरु ठेवला. तेथूनच प्रथम वर्गात पहिला क्रमांक पटकावून त्यांना पीएचडी करायची होती. मात्र दुर्दैवाने विद्यापीठ अनुदान मंडळाची शिष्यवृत्ती त्यांना मिळू शकली नाही आणि चांगले गुण मिळून देखील अपयश पाहावे लागले. त्यामुळे पुण्याहून पुन्हा गडहिंग्लजला परत यावे लागले आणि या संधीसाठी एक वर्ष वाट पहावी लागली. याबाबत बोलताना डॉ मुजुमदार म्हणाले की, “ तो एक वर्षाचा बेकारीचा काळ माझ्या आयुष्यातील त्रासदायक काळ ठरला जो मी आजही विसरू शकत नाही. त्यानंतर शिक्षण पूर्ण करून १९६० मध्ये त्यांनी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत एक वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पुढे कोल्हापूरातील गोखले महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून त्यांनी काही काळ नोकरी केली. त्याच काळात फर्ग्युसन महाविद्यालयात नोकरीसाठी त्यांनी अर्ज केला आणि ही नोकरीच नव्हे तर वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती मिळवली. याच काळात मुलांच्या वसतिगृहाचे प्रमुख म्हणून जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. १९६९ चा तो काळ होता आणि दिवाळीच्या सुट्टीत घडलेल्या एका प्रसंगाने डॉ मुजुमदार यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

image


याबाबत सांगताना ते म्हणाले की, “ दिवाळीच्या सुट्टीत भारतीय मुले आपापल्या गावी निघून गेली होती त्यामुळे वसतिगृहाचे स्वयंपाकघरदेखील बंद ठेवण्यात आले होते. वसतिगृहाचा प्रमुख म्हणून देखरेख करताना माझ्या लक्षात आले की, वसतिगृहाच्या एका खिडकीतून एक स्कर्ट परिधान केलेली मुलगी एका मुलाला दररोज डब्बा आणून देते. मला वाटले की काहीतरी भानगड असावी. सगळी मुले गावी गेली असताना या मुलीचे वागणे माझ्या लक्षात आले आणि मी जाऊन खोलीचे दार वाजवले”. डॉ मुजुमदार म्हणाले की, “ खोलीचे दार उघडल्यानंतर जे मी पहिले त्याने मी हादरून गेलो. सखाराम नावाचा मॉरीशस येथील विद्यार्थी कावीळने आजारी पडला होता आणि एकटाच पडलेल्या या मुलाला त्याची बहिण खिडकीतून जेवणाचा डब्बा आणून देत होती याचे कारण मुलांच्या वसतिगृहात मुलींना प्रवेश नव्हता”. डॉ मुजुमदार म्हणाले की, “ आपली अडचण सांगितल्यानंतर कृश झालेल्या त्या मुलाला नीट चालताही येत नव्हते आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवून तो रडू लागला. या प्रसंगाने मी हेलावून गेलो. त्याची अवस्था पाहून मला वाईट वाटले आणि तोच माझ्या जीवनातील टर्निग पाॅईण्ट ठरला.

image


त्यानंतर डॉ मुजुमदार यांनी पुण्यातील अशाच निराधार एकट्या राहणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या अडचणी जाणून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला, त्याकरिता त्यांनी ‘सिंबायोसिस’ नावाची संस्था सुरु केली. डॉ मुजुमदार म्हणाले की, “सिंबायोसिस ही जीवशास्त्रीय संज्ञा आहे. दोन भिन्न जाती-वर्णातील प्राणी एकत्र सहजीवन जगतात त्यालाच सिंबायोसिस असे म्हणतात. विदेशातून भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील स्थानिक विद्यार्थ्यांसोबत बंधुत्वाने एकोप्याने राहता यावे आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून शिक्षणासाठी दूरवरून आपल्या आप्तस्वकीयांना सोडून आलेल्या या मुलांना येथे देखील जीवाभावाचे मित्र आणि आपुलकीची माणसे मिळावी असा सिंबायोसिसच्या स्थापनेमागे मूळ हेतू होता. त्याकरिता सण उत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रम घेतले जाऊ लागले आणि या साऱ्या मुलांना सहजीवनाचा आनंद आपुलकीचा ओलावा मिळावा असा प्रयत्न सुरु झाला. परंतु तो पुरेसा नव्हता केवळ प्रासंगिक कारणाने मुले एकत्रित येत होती, मात्र त्यांच्यातील दुरावा नंतर कायम राहत होता. त्यामुळे त्यांनी एकत्र राहावे, शिकावे, खावे-प्यावे, बोलावे यासाठी सिंबायोसिसने शिक्षण क्षेत्रात १९७० नंतर विधी महाविद्यालय आणि इतर संस्थांची सुरुवात केली आणि या संस्थांचा विस्तार होत गेला. सिंबायोसिस मध्ये विदेशी आणि भारतीय मुलांना एकत्रितपणे शिकण्याची आणि सहजीवनातून नव्या शिक्षण पद्धतीची सुरुवात झाली.

फर्ग्युसन महाविद्यालयातील सेवानिवृतीला सोळा वर्ष बाकी असताना सिंबायोसिसच्या कार्यविस्ताराकरिता स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय डॉ मुजुमदार यांनी घेतला. त्यावेळी आपल्या निवृत्तीवेतनाच्या रकमेसह राहता बंगला विकून त्यांनी निधी उभारला आणि सिंबायोसिसच्या प्रगतीसाठी सर्वस्व अर्पण केले त्याबाबत बोलताना डॉ मुजुमदार म्हणाले की, “ सिंबायोसिस हेच माझ्या जीवनाचे इतिकर्तव्य मानून मी त्यावर लक्ष केंद्रित केले. त्यावेळी राजकारणासारख्या इतर क्षेत्राकडे जाण्याची संधी असूनही मी सिंबायोसिसला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आणि दर्जेदार शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम निर्माण करून गुणवान विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यात संस्थेने पुढाकार घेतला”.

image


सिंबायोसिसच्या या शिक्षणक्रांतीला सन २००१ मध्ये अखेर यश आलेच. केंद्र आणि राज्यसरकारने अभिमत विद्यापीठाचा ( Deemed University ) दर्जा दिल्याने सिंबायोसिसच्या प्रगतीला वेग आला. अभिनव शिक्षणपद्धतीचा अभ्यासक्रम आणि परीक्षापद्धतीचा विकास करण्यात सिंबायोसिस अग्रेसर राहिली आणि एक दर्जेदार शिक्षणसंस्था म्हणून मग सिंबायोसिसचा विस्तार बंगळूरु, हैदराबाद, नोइडा आणि नाशिक इत्यादी ठिकाणी करण्यात आला. आज देशात सिंबायोसिसच्या ४५ शिक्षण शाखा विस्तारलेल्या आहे. पाच राज्यात ४० हजार देशी-विदेशी विद्यार्थी येथे गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण घेत आहे. पारंपारिक आणि अत्याधुनिक शिक्षण पद्धतीचा मेळ घालून स्वदेशी पद्धतीचा नवा पॅटर्न तयार करण्याचे कार्य सिंबायोसिसने केले आहे. भारतीय संस्कृतीमधील संस्कार आणि ज्ञान यांना जगभरातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडून “वसुधैव कुटुंबकम् ” या सूत्रानुसार नव्या शिक्षणपद्धतीचा विकास सिंबायोसिसने करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ मुजुमदार यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने सन २००५ मध्ये पद्मश्री, २०१२मध्ये पद्मभूषण तर महाराष्ट्र सरकारने पुण्यभूषण आणि महाराष्ट्रगौरव या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. २७जुलै २०१५ रोजी दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा डॉ अब्दुल कलाम स्मृती पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे.

image


शिक्षणक्रांतीच्या या महायज्ञात यशाचे रहस्य काय ? असे विचारले असता डॉ मुजुमदार म्हणाले की, “ नितीमुल्यांवर विश्वास ठेवून ध्येयासाठी प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न हेच या यशाचे गमक आहे. गुणवत्तेशी आम्ही कधीही तडजोड करत नाही आमचे प्राध्यापक आणि विद्यार्थी कोणत्या जातीधर्माचे आहे हे न पाहता केवळ गुणवत्तेच्या निकषावर त्यांची निवड केली जाते. त्यामुळे पहिल्या दहा क्रमांकाच्या शिक्षणसंस्थेमध्ये सिंबायोसिसचा आवर्जून उल्लेख केला जातो. पारंपारिक शिक्षणाला दूरस्थ शिक्षणाची जोड देत सिंबायोसिसने देशातील दूरपर्यंतच्या दोन लाख विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यालाच जोड देत कौशल्य प्रशिक्षणासाठी देखील इंदोर आणि पुणे येथे शैक्षणिक अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे. त्यावर बोलताना डॉ मुजुमदार म्हणाले की, “पारंपारिक बहिस्थ शिक्षणासोबत कौशल्यविकासाच्या शिक्षणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे आणि शिक्षणाच्या क्षेत्रातील हे तीन समांतर स्त्रोत आहेत असे मी मानतो.”

image


डॉ मुजुमदार यांनी वयाची ऐंशी पार केली आहे आणि सिंबायोसिसच्या भविष्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “ माझ्या दोन मुली स्वाती आणि विद्या सध्या सिंबायोसिसची जबाबदारी पार पाडत आहेत. जगातील पहिल्या क्रमांकाच्या शंभर संस्थांमध्ये सिंबायोसिसला स्थान देण्यात त्या नक्कीच यशस्वी होतील असा मला विश्वास आहे. ज्ञानदानाच्या या अखंड महायज्ञात प्रेरणास्त्रोत काय आहे ? अशी विचारणा केली असता डॉ मुजुमदार म्हणाले की, “परमेश्वर हा प्रत्येकाचे प्रेरणास्थान असतो कुणी व्यक्ती प्रेरणास्थान असताना ज्या मर्यादा येतात त्यापेक्षा परमेश्वरावर श्रद्धा ठेवून तुम्हीच तुमची प्रेरणा झाला तर यश नक्कीच मिळते. सिंबायोसिस हेच माझे ध्येय मानून ‘वर्क इज वर्कशीप’ या भावनेने मी काम केले हीच माझी प्रेरणा राहिली. हे करताना अनेक अडचणी आल्या. परंतु संकटाने मी कधी हार मानली नाही आणि संकटातून संधी शोधण्याचा माझा पिंड बनत गेल्याने मी परमेश्वरावर श्रद्धा ठेवून पुढे जात राहिलो”.

image


सिंबायोसिसच्या भविष्यातील आलेखाबाबत बोलताना डॉ मुजुमदार म्हणाले की ऑक्सफर्ड, केंब्रिज किवा हॉवर्ड यांच्या शिक्षणपद्धतीचे सारेच कौतुक करतात, पण आम्हाला भारताची अशी वेगळी शिक्षण पद्धती का विकसित करता येणार नाही ? जिची स्वतंत्र ओळख असेल. सिंबायोसिस असे शिक्षणाचे मॉडेल जगाला देण्याचा प्रयत्न करत आहे. जिथे पारंपारिक अध्यात्म आणि अत्याधुनिक विज्ञान तंत्रज्ञान यांचा मेळ घालून नवी शिक्षणपद्धती विकसित करता येईल. जगभरात हॉर्सपॉवर असेल तर आम्ही आमची ऑक्सपाॅवर का निर्माण करू शकत नाही ? जी आमची वेगळी ओळख असेल. देशातील सध्याच्या ‘स्टार्टअप इंडिया - स्टॅन्डअप इंडिया’ या कार्यक्रमाचे देखील डॉ मुजुमदार यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, “या योजनेची अंमलबजावणीदेखील चांगल्या पद्धतीने व्हायला हवी. आमच्या देशातील गुणवत्तावान तरुणांचा कौशल्यविकास विदेशात गेल्यानंतरच का होतो ? याचा शोध घेतला पाहिजे. या तरुणांना याच देशात त्यांची गुणवत्ता आणि कौशल्य विकसित करता आली तर जगातील प्रगत देश म्हणून या देशाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी देशातील ‘स्क्रॅप कॅल्चर’ देखील दूर केले पाहिजे असे परखड मतदेखील डॉ मुजुमदार यांनी आग्रहाने मांडले. सिंबायोसिसच्या निर्मात्या या शिक्षण महर्षींच्या कार्याला युवर स्टोरीचा मनोमन सलाम !

    Share on
    close