प्रदुषणमुक्तीसाठी शाळकरी मुलांनी पंधरा दिवसांत तयार केली सौरऊर्जाधारित कार!

0

‘ते स्वत:च मोजतात उंची आकाशाची

पाखरांना शिकवण नाही द्यावी लागत उडण्याची.’

सध्याच्या काळात वाढत्या प्रदुषणाच्या समस्येशी आपण लढत आहोत, आणि वायूप्रदुषणात भर घालणा-या अनेक कारणांपैकी एक आहे रस्त्यांवरून वेगेवेगळ्या इंधनावर चालणारी वाहने. या वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्याच्या प्रयत्नांतर्गत सारेचजण आपले योगदान देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्याकरीता सदैव नवनवे प्रयोगही केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गाझीयाबादच्या काही शाळकरी मुलांनी सौरऊर्जेला वापरून चालणा-या एका कारची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे सौरऊर्जेवर चालणा-या या कारचे निर्माते नववी, दहावी, अकरावीत शिकणारे विद्यार्थीच आहेत. हे विद्यार्थी केवळ पंधरा दिवसांच्या कठोर परिश्रमातून ही कार तयार करून रस्त्यावर चालवण्यात यशस्वी झाले.

गाजियाबादच्या राजनगर येथील शिलर पब्लिक स्कूलचे सात विद्यार्थी अर्णव, तन्मय, प्रथम, प्रज्ञा, उन्नती,दिपक, आणि यश यांनी ही कार तयार करण्यात यश संपादन केले. यातील अकरावीत शिकणा-या अर्णव यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. ‘युवरस्टोरी’ला आपल्या या मोहिमेची माहिती देताना त्यांनी म्हटले की, “ आज वाढत्या प्रदुषणामुळे सारी दुनिया त्रस्त आहे. रस्त्यावर चालणा-या वाहनांनी सर्वाधिक प्रदुषण केले जाते. याशिवाय आम्हाला असेही लक्षात आले की, सूर्यप्रकाश असाच वाया चालला आहे. त्याचा उपयोग अश्याप्रकारच्या कामात का करून घेता येणार नाही? म्हणून प्रयोग करताना सौरऊर्जेवर चालणारे वाहन तयार करण्याचे ठरवले”.

त्यानंतर त्यांनी आपल्या शाळेचे संचालक ए.के गुप्ता यांच्याशी आपले मनोदय व्यक्त केले, ज्यांनी सोलर कार तयार करण्याच्या या कामात प्रोत्साहन दिले.

त्यानंतर अर्णव यांनी शाळेतील आपल्या विचारांच्या काही नवीन करून दाखवण्याची आस असणा-या नववी आणि दहावीच्या काही विद्यार्थ्यांना एकत्र केले आणि सोलर कारसाठी कार्याला प्रारंभ केला. आपल्या या कारची माहिती देताना अर्णव सांगतात की, “ प्राथमिक संशोधनानंतर आम्ही ठरवले की, आपण या कारचे दोन भागात विभाजित करून काम सुरू करु त्यानुसार फ्रंट आणि बँक असे काम सुरू झाले. या कारचा फ्रंट नँनो कार आणि बँक ई-रिक्शाकडून प्रेरित आहे. हेच कारण आहे की, आमच्या या कारचे सारे संचालन फ्रंट मध्ये होते आणि मागच्या भागात ट्रांन्समिशन”.

या कारबाबत आणखी माहिती देताना अर्णव सांगतात की, “ आमच्या या कारच्या छतावर ३००वॉटचे पँनेल लागले आहेत जे ८००वॉटच्या शक्तिच्या ९० एमएएचवाल्या चार बँटरिजना भारित करतात या बँटरीज कारच्या मागच्या भागातील प्रवाशांच्या बसण्याच्या सीटखाली लावण्यात आल्या आहेत. नंतर त्यांच्याच मदतीने कार चालते जी कमाल ४०ते ६० किलोमीटर प्रती तास वेगाने धावू शकते. एकदा बँटरीजना पूर्णत: चार्ज केल्यानंतर ही कार १६०किलोमीटर धावू शकते.” या शिवाय ही कार डिस्टंस सेंसर आणि हिट सेंसर यांनी सुसज्जीत आहे जी इतरांनी याआधी तयार केलेल्या कारपेक्षा वेगळी आहे. अशाप्रकारे या विद्यार्थ्यांनी केवळ पंधरा दिवसात आपल्या कल्पनेला मूर्तरुप देत सोलर कार यशस्वीपणाने तयार केली.

या विद्यार्थ्यांनी जेंव्हा सौरऊर्जेवर संचालित होणा-या इतर वाहनांवर नजर टाकली तेंव्हा त्यांना असे लक्षात आले की, ज्यामधून केवळ एक किंवा दोन प्रवासी प्रवास करू शकतात. अर्णव सांगतात की, “आम्ही पाहिले की सौरऊर्जेवर चालणारी इतर वाहने केवळ एक किंवा दोन प्रवाश्यांपुरती आहे.म्हणून आम्ही ई-रिक्शातून प्रेरणा घेत याला पाच लोकांना बसण्यास सक्षम बनविले आणि आमच्या कारमध्ये एकावेऴी जास्तीत जास्त पाचजण आरामात बसू शकतात.” या कारचे आणखी एक वैशिष्ट्य हे आहे की, छतावर पँनल असल्याने प्रवासा दरम्यानही ती सहजपणाने चार्ज होत राहते त्यामुळे या कारने लांबवरचा प्रवासदेखील सहजपणाने करता येणे शक्य आहे.

ही कार तयार करायला सुमारे एक लाख रूपयांचा खर्च आला जो पुर्णत: शिलर शाळेने केला. आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कारबद्दल बोलताना ए के गुप्ता सांगतात की, या सात विद्यार्थ्यांनी वास्तवात छान कामगिरी केली आहे. यांनी तयार केलेली ही सोलर कार अनेक प्रकारे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून तयार केल्या जाणा-या सोलर कारपेक्षा चांगली आहे. ही कार तयार करण्यासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केली आणि त्यासाठी त्यांच्या पालकांनी पूर्णत: सहकार्य केले”. श्री गुप्ता सांगतात की, सध्या या कारसाठी पेटंट प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कार तयार करणा-या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा हा समूह आता आपल्या या सोलर कारला वास्तविक रूप देण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत आणि त्यांना अपेक्षा आहे की, येत्या काही दिवसांत ते या कारला असे रूप देतील ज्यातून त्यांना चालताना एका चांगल्या प्रकारच्या कारचा लूक देता येईल. यासोबतच हे विद्यार्थी आपली ही कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर चालवून दाखवू इच्छितात आणि त्यांच्या शाळेचे संचालक त्यासाठी प्रयत्नरत आहेत.

लेखक: निशांत गोयल

अनुवाद : किशोर आपटे.