शांताबाई...शांताबाईचा संघर्ष अविरत सुरुच...

2

“वीस वर्षांपूर्वी माझ्या लहान मुलीला प्राजक्ताला रडताना शांत कसं करायचं यासाठी मी तिला जोजवायला म्हणून शांताबाई शांताबाई हे गाणे म्हणायचो. खरेतर तेव्हा हे गाणे असे नव्हतेच मीच आपला शांत हो शांत हो म्हणत शांताबाई शांताबाई म्हणायला लागलो, पुढे मग शब्द जुळत गेले आणि एक गाणं माझ्या नकळत तयार झालं. या गाण्याची तिला इतकी सवय झाली की मी गाणे गाऊ लागताच ती शांत व्हायची. मग मी ही या गाण्यात एक एक ओळ वाढवत गेलो. शांताबाई...शांताबाई, रुपाची खाण..दिसते छान...या गाण्याच्या ओळी म्हणजे माझ्या मुलीच्या साजऱ्या रुपाचे जणू वर्णनच...”

या भावना आहेत गायक संगीतकार संजय लोंढे यांच्या. एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आलेल्या या अवलिया कलाकाराशी बोलताना जाणवतो तो त्याच्यातला साधेपणा आणि आपल्या कलाकृतीबद्दलचा भाबडा विश्वास. यावर्षीच्या गणेशोत्सवात शांताबाईच्या या सूरांनी धूम उडवली होती. सगळ्या गणेशोत्सव मंडळांपासून ते अगदी क्लब, डिजेमध्येही हे गाणे मोठ्या प्रमाणात गाजले आणि अजूनही गाजतेय.

पुण्यातल्या नानापेठ परिसरातल्या आठ बाय दहाच्या झोपडीवजा घरातनं सुरु झालेला शांताबाईचा हा प्रवास राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलाय. ज्याबद्दल संजय सुमित म्युझिकला धन्यवाद देतात पण अधिक श्रेय देतात ते त्यांच्यावर दैवाने अचानक ओढवलेल्या परिस्थितीला. काही महिन्यांपूर्वी सख्ख्या भावाच्या ऑपरेशनसाठी संजय यांना पैशाची गरज होती, अचानक ओढवलेल्या या परिस्थितीला तोंड कसे द्यावे हा विचार करत असतानाच त्यांनी शांताबाई हे गाणे २५ हजारामध्ये सुमित म्युझिकला विकले.

“म्युझिक कंपनीने यानंतर माझ्या या गाण्यासोबत त्याच्या संगीताचे हक्कही माझ्याकडून विकत घेतले शिवाय माझ्या आवाजातच हे गाणे रेकॉर्डही झाले. आणि मी गायक संगीतकार संजय लोंढे, शांताबाईचा हा ट्रॅक घेऊन तुम्हा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचल्याचे” संजय सांगतात. शांताबाईचा ट्रॅक म्युझिक कंपनीने प्रकाशित केला. संजयवर ओढवलेला कौटुंबिक संघर्ष तर यामुळे थांबला पण नवा संघर्ष सुरु झाला तो शांताबाई या गाण्यासोबत वाढत जाणाऱ्या चुकीच्या चर्चा प्रतिक्रियांचा.

जितक्या वेगाने हे गाणे लोकप्रिय झाले तेवढ्याच वेगात या गाण्यासंदर्भात अनेक अश्लिल व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईटवर येऊ लागले, ज्यामुळे पांढरपेशा समाजाने शांताबाईचा हा ठेका ऐकून नाकं मुरडलीत. शांताबाई या गाण्याला घेऊन अनेक अश्लील व्हिडिओही पसरवले जाऊ लागले ज्याला संजय विरोध करतात.

संजय सांगतात “ तुम्ही हे गाणे नीट ऐकले तर मी या गाण्यात कुठलेही अश्लील शब्द वापरलेले नाही. माझ्या आत्याचे नाव शांताबाई आहे, आणि हे गाणं मी माझ्या मुलीसाठी लिहीलं होतं. आज माझी मुलगी मोठी झालीये सोबत गाणंही. पण गाण्याच्या प्रसिद्धीसोबत जी अवाजवी चर्चा किंवा प्रतिक्रिया ऐकायला मिळतात त्यामुळे मात्र मन खिन्न होतं.”

संजय यांनी याआधीही अनेक गाणी लिहिली आणि गायली आहेत, सुरेल आवाजाची देणगी त्यांना आधीपासूनच मिळालीये पण त्याच्यातल्या कलाकाराला लोकाश्रय हा शांताबाई या गाण्याने दिला. आता लोकाश्रयाबरोबरच टीकाही मिळणारच, संजय आता याही अनुभवासाठी स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला तयार करतायत. कारण लवकरच शांताबाई या गाण्यावरचा व्हिडिओ प्रदर्शित केला जाणार आहे.