सहजसोप्या पध्दतीने ताणमुक्त जीवन जगा, ‘स्ट्रेस रिलीज फाऊंडेशन’चे अशोक देशमुख यांचा प्रयत्न!

सहजसोप्या पध्दतीने ताणमुक्त जीवन जगा, ‘स्ट्रेस रिलीज फाऊंडेशन’चे अशोक देशमुख यांचा प्रयत्न!

Thursday January 14, 2016,

3 min Read

आजच्या बदलत्या जीवनशैलीत माणसाच्या जीवनात सदैव ताण-तणाव येत असतात, त्यातूनही निरामय जीवनासाठी मग सा-यांनाच ‘मेडिटेशन’ करावे असे वाटते. पण अनेकांना तेही शक्य होत नाही कारण वेगवान जीवनशैली आणि आर्थिक कारणेही त्यामागे असू शकतात. मात्र पुण्यातील एका ज्येष्ठ नागरीकांने लोकांना हसत-खळेत तणावमुक्त करण्यासाठी एक संस्था चालविली आहे. या संस्थेच्या माध्यमातून आजवर पाच हजारांपेक्षा जास्त व्याख्याने देऊन त्यांनी लोकांना सहजसोप्या पध्दतीने दैनंदीन ताण-तणावांपासून मुक्त कसे रहायचे ते हसत-खेळत शिकवले आहे.

‘युवर स्टोरी’ने स्ट्रेस रिलिफ फाऊंडेशनच्या अशोक देशमुख यांच्याशी चर्चा केली. या कार्याची सुरूवात कशी झाली त्याबाबत देशमुख यांनी सांगितले की, “१९८८मध्ये टाटा मोटर्समध्ये नोकरी करत असतानाच योगाच्या सक्रीय प्रचाराचे काम सुरू केले.” पण हे काम सुरू असतातनाच काही गोष्टी त्यांच्या लक्षांत आल्या. ते म्हणाले की, “योगाच्या माध्यमातून लोकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा अभ्यास केला, जवळून निरिक्षण केले तेंव्हा जाणवले की आज सा-यांनाच जीवनात खूप प्रकारचे ताण असतात त्यातून दूर राहण्याचा प्रयत्न करताना लोक योगासारख्या गोष्टींकडे वळतात मात्र त्यातून त्यांना अपेक्षित परिणाम मिळतोच असे नाही. त्यासाठी त्यांच्या जीवनशैलीतील काही बाबी समजावून देणे गरजेचे आहे.” त्यातून सुरूवात झाली हसत-खेळत योग करण्याची. त्यानंतर जितके करता येईल तितके लोकांच्या ताणमुक्तीसाठीच कार्य करायचे असे ठरवून देशमुख यांनी टाटा मोटर्सच्या नोकरीतून निवृत्ती घेतली आणि आज वयाच्या ६५व्या वर्षी देखील ते ताणमुक्तीच्या कार्यात लोकांना प्रबोधन करण्याचे काम करतात.

image


या कार्यासाठी त्यांनी मराठीतून तणावमुक्ती ही पुस्तिका तयार केली आहे. शिवाय त्यांच्या व्याख्यानाची डिव्हीडी देखील तयार केली आहे. या कार्यामागची प्रेरणा त्यांच्या आईकडून त्यांनी घेतल्याचे ते म्हणतात. त्यांनी सांगितले की, लोकांचा ताण दूर करण्यासाठी प्रयत्नरत असताना एक दिवस आईने विचारले की तुझा ताण कमी करण्यासाठी तू काय करतोस? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात, “ पंढरपूरच्या वारीला लाखोंच्या संख्येने पायी जाणा-या वारक-याने या प्रश्नाचे उत्तर सहजपणाने मिळवून दिले. त्याला विचारले की, इतके लोक तुम्ही दरवर्षी जाता तुमची गैरसोय होत नाही का? त्यांने उत्तर दिले की, ‘नाही’, कारण आम्ही सारे वारकरी दुस-याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतो त्यामुळे कुणाची गैरसोय होण्याची तक्रारच राहात नाही.” त्यानंतर देशमुख यांनी अनेक ठिकाणी जाऊन लोकांना ताणमुक्तीच्या समस्येतून बाहेर पडण्याचे प्रबोधन करण्यास सुरूवात केली. ते करतानाही ‘फुकट काही नको’ हा मंत्रही ते स्वत:च्या वर्तनातून देण्याचा प्रयत्न करतात.

राज्य सरकारच्या यशदा, किंवा पुण्याच्या औद्योगिक पट्टयातील अनेक नामांकीत कंपन्यांच्या कर्मचा-यांना त्यांनी ताणमुक्ती या विषयावर व्याख्यानातून मार्गदर्शन ओघवत्या पध्दतीने हसून-खेळून प्रात्यक्षिकांसह देण्यास सुरुवात केली. अशा अनेक कार्यशाळा ते घेतात त्यासाठी त्यांनी आजवर ५०००पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.

image


या व्याख्यानातून योगा, रेकी, आणि नैतिकमुल्य शिक्षण आणि आचरणातील, वर्तनातील उणिवा कोणत्या आणि त्या कश्या दूर केल्या तर ताण-तणाव येणार नाहीत याचे ते विनोदी ढंगाने मार्गदर्शन करतात. वेळेवर आहार घ्या. तो कसा आणि किती घ्या, या सारख्या दैनंदिन जीवनातील सूचनांपासून त्यांच्या व्याख्यानाची सुरूवात होते. मग हळूहळू श्रोत्यांना आपल्या बोलण्यातून विश्वास देत त्यांच्या एकेक समस्या ते जाणून घेतात. जसे की पाठदुखी होते, डोके का दुखते त्यासाठी साधा सोपा व्यायाम कसा कोणता करावा याचे ते लगेच प्रात्यक्षिक करून देतात आणि नर्मविनोदाने दर्शकांना ते पटवूनही देतात. जीवनात किमान अपेक्षा ठेवा, आरोग्यासाठी दक्ष राहा असे सांगताना ते सुलभ योगाभ्यासही शिकवतात. त्यात मुलांसाठी, महिलांसाठी, नोकरदार, श्रमिकांसाठी असे वेगवेगळे प्रकारचे सोपे सोपे बसल्या बसल्या करायचे व्यायामाचे प्रकार ते करून घेतात आणि ताणमुक्तिबाबत जागरुकता निर्माण करतात. निरोगी राहण्यासाठी प्राणायाम, ध्यान, कपालभातीच्या सोप्या प्रकाराने ते उपस्थितांना जागृत करतात. योगनिद्रा, रेकी याच बरोबरीने जीवनात सकारात्मक दृष्टीकोन आणि इतरांच्या सहजीवनाची काळजी घेतल्यानेही ब-याचदा ताण येत नाहीत असा अनुभवाचा सल्ला ते देतात.

image


या कार्यात त्यांना आता राज्यातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतक-यांना मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे. अलिकडेच त्यांनी हिवरेबाजार या आदर्शगावात ताणमुक्तीच्या विषयावर ग्रामीण जनतेसमोर व्याख्यान दिले. त्यातून अशा प्रकारच्या कार्यक्रमांना ग्रामीणांपर्यंत पोहोचवावे असा त्यांचा संकल्प आहे. राज्य सरकार किंवा लोकप्रतिनीधींनी दत्तक घेतलेल्या गावांत प्रथम जाऊन प्रायोगिक तत्वावर हे कार्य सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.