‘मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हेच त्यांच्या मन:शांतीचे कारण! तन्ना दंपतीना तरूणमुलाच्या अकस्मात निधनाने मिळाला जगण्याचा नवा मार्ग!

0

देवाची खरी भक्ती, त्याची पूजा करण्यात नाही तर मानवतेचा धर्म निभावण्यात आहे. २०११मध्ये मुंबईमध्ये एका अपघातात एकमेव मुलगा गमाविल्यानंतर जेव्हा दमयंती तन्ना आणि प्रदीप तन्ना यांनी देवाला शरण जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा खूप लवकर त्यांना समजले की, मनाची खरी शांती मंदीरात नव्हे तर दुस-यांची मन:पूर्वक सेवा केल्यामुळे मिळते. या विचारांना त्यांनी आपल्या जगण्याचे उद्देश बनविले आणि समाजाचा असा एखादा वर्ग नाही, जो त्यांच्या सेवेपासून वंचित राहिला असेल. मुलाच्या आठवणीत त्यांनी २६जानेवारी २०१३ला निमेश तन्ना चैरीटेबल ट्रस्टची स्थापना केली आणि आज याच्यामार्फत मुले, वृद्ध आणि दुस-या गरजूंना मदत केली जाते. दमयंती आज देखील तो दिवस आठवतात, ज्यानंतर त्यांचे आयुष्य आणि जगण्याचा उद्देश पूर्णपणे बदलला. 

युवर स्टोरी सोबत संवाद साधताना दमयंती सांगतात की, “निमेश २३वर्षांचा होता, जेव्हा त्याला पहिला पोर्टफोलियो शूट मिळाला. त्याला फोटोग्राफी करण्याची आवड होती. त्या दिवशी तो खूप खुश होता आणि मित्रांसोबत त्याचा रात्रीच्या जेवणाचा बेत होता. रात्री त्याने लोकल ट्रेन पकडली आणि गर्दीमुळे तो दरवाज्याकडे उभा राहिला. रुळाच्या खूप जवळ असलेल्या खांबाला तो पाहू शकला नाही आणि त्याचे डोके त्याला आदळले. खूप रात्र झाल्यावर जेव्हा तो परतला नाही, तेव्हा आम्हाला चिंता व्हायला लागली. मित्रांना विचारपूस करूनही निमेश कुठेही सापडला नाही. सकाळी पोलिसांनी आम्हाला या अपघाताबाबत सांगितले.”

या घटनेनंतर तन्ना दाम्पत्याचे आयुष्य थांबल्यासारखे झाले. त्यांना वेळ व्यतीत करणे कठीण होऊ लागले. अशातच शुभचिंतकांनी त्यांना चारधामची यात्रा करण्याचा सल्ला दिला. जवळपास दीडवर्षापर्यंत मंदीर आणि शिवालयात मन:शांती शोधत राहिलो. मात्र अनेक प्रयत्नानंतर देखील, निमेशच्या जाण्याचे दु:ख त्यांचे मन हळवे करायचे आणि शांती कुठेच मिळत नव्हती. 

त्यांनी युवर स्टोरीला सांगितले,

“सर्वांचा सल्ला मानून आम्ही चारधामच्या यात्रेसाठी निघालो. मात्र, जसे घरी परतलो, पुन्हा तसेच एकटेपणा आणि खालीपणा होता. आम्हाला समजत नव्हते की, असे काय करावे ज्याने मनाला शांती मिळेल. पुन्हा एक दिवशी असेच बसलो असताना आम्हाला विचार आला की, आमच्यासारखे असे अनेक लोक असतील. ज्यांच्याकडे आपले कुणीच नसेल आणि ज्यांना मदतीची गरज असेल. फक्त याच विचारांना आम्ही जगण्याचा उद्देश बनविला.” 

सर्वात पहिले तन्ना दाम्पत्याने आपले विचार त्यांच्या मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितले. या चांगल्या कामाबाबत ऐकून सर्वांनी त्यांना पुढे जाण्यास मनौधैर्य दिले. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळपासच्या गरजू लोकांचा शोध घेणे सुरु केले. जवळपास दीड महिन्यापर्यंत ते घरो-घरी जाऊन अशा लोकांना शोधायला लागले. अशा २७वृद्ध व्यक्तींची यादी तयार झाली, जे आजारी होते आणि ज्यांना मदतीची गरज होती. आपल्या सेवेची मर्यादा वाढविण्यासाठी त्यांनी मंदीर आणि स्टेशनच्या बाहेर देखील कागदीपत्रक लावले. हळू हळू गरजू लोकांची संख्या वाढायला लागली. देवाने दिलेले खूप काही होते, त्यामुळे सुरुवातीला पैशांची समस्या झाली नाही. जशी जशी लोकांना याबाबत माहिती मिळाली, तशी अनुदान देणा-या लोकांची संख्यादेखील वाढायला लागली. सुरुवातीला ते स्वतःच आपल्या नातेवाईकांच्या मदतीने डबा देण्यास जायचे, मात्र नंतर समस्या आल्यामुळे त्यांनी हे काम मुंबईच्या डबेवाल्यांना सोपविले. ट्रस्टकडून प्रत्येक दिवशी १०२ वृद्धांना दुपारचे मोफत जेवण त्यांच्या घरपोच दिले जायचे. जेथे साधारणत: डबेवाले एका डिलिवरीचे महिन्याचे ६५०रुपये घेतात, तसेच निमेश तन्ना चैरिटेबलट्रस्टच्या डब्याच्या डिलिवरीचे ४५०रुपयेच घेतात. 

युवर स्टोरी सोबत संवाद साधताना दमयंती सांगतात की,

“मुलुंडमध्ये आमची दोन दुकाने आहेत आणि देवाने दिलेले खूप काही आमच्याकडे आहे. आम्ही आमच्या पैशांतूनच या कामाची सुरुवात केली. मात्र लोकांना याची माहिती मिळाल्यावर अनुदान देणा-या लोकांची कमतरता नव्हती. आमच्याकडे आज एकूण आठ महिला कामगार वर्ग आहे, जो सकाळपासूनच जेवणाच्या तयारीत लागतो. रोज येथे ११० लोकांचे जेवण बनते. चव आणि वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष देऊनच जेवण तयार केले जाते. आमचा पूर्ण प्रयत्न असतो की, त्यांना पूर्ण पोषण आहार मिळावा. जेवणाचे प्रमाण इतके असते की, एका डब्यात दोन लोक आरामात दोन वेळचे जेवण जेऊ शकतात.” 

तन्ना दाम्पत्याने आपली सेवा केवळ वृद्ध व्यक्तीपर्यंतच सीमित ठेवली नाही तर, समाजाचा कुठलाही वर्ग त्यांच्या सेवेपासून वंचित राहिलेला नाही. भांडूपच्या आदिवासी भागात अशी ५०कुटुंब आहेत, ज्यांना ट्रस्ट कडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी १५-१६ किलो धान्य वाटले जाते. त्यांना राशनचे सामान जसे तेल, साखर आणि अन्य गरजेच्या वस्तू दिल्या जातात. निमेशच्या वाढदिवस ५ ऑगस्ट २०१३पासून सुरु झालेल्या या सेवेमुळे अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांना जेवणाची व्यवस्था झाली आहे, ज्यांच्यासाठी दोन वेळचे जेवण देखील शक्य नव्हते. लहान मुले देखील त्यांच्या या सेवेपासून वंचित नाहीत. एके दिवशी ते असेच आपल्या मित्रांसोबत गेले असताना मुंबई जवळील डहाणू येथील सरकारी शाळेत गेल्यानंतर त्यांनी पाहिले की, मुलांना पायात घालायला चपला नव्हत्या आणि थंडीमुळे स्वतःचा बचाव करण्याचे साधन देखील नव्हते. त्यांनी त्याचवेळी मुलांची मदत करण्याचा निर्णय घेतला. 

युवर स्टोरी सोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की, मुलांच्या पायात चपला नव्हत्या. थंडीपासून वाचण्यासाठी चादर नव्हत्या. संस्थेने ९ शाळेतील एकूण ११०० मुलांना चादर, चप्पल आणि खाण्याच्या वस्तू वाटल्या. दमयंती सांगतात की, त्यांच्या चेह-यावरील आनंद बघण्यासारखा होता आणि हीच त्यांच्यासाठी मोठी भेट होती. त्यांनतर त्यांनी व्हॉट्स ऍप ग्रुप बनविला, जेथे जवळील गरीब मुलांचा वाढदिवस साजरा करण्याची योजना बनवितात. या लोकांनी अशा काही कुटुंबांना नव्या ट्रस्टमध्ये दाखल केले आहे. त्यांनतर त्यांच्यासोबत जाऊन त्यांचा वाढदिवस साजरा करतात. संस्थेकडून सामान विकत घेऊन मुलांमध्ये वाटतात.

निमेशच्या जाण्याचे दु:ख नेहमीच राहील. मात्र ख-या सेवेलाच आपली पूजा मानून दिवस- रात्र दुस-यांच्या सेवेत असलेल्या तन्ना दाम्पत्याने दाखवून दिले की, दुस-यांसाठी कसे जगले जाते. आपले दु:ख विसरून, दुस-यांच्या चेह-यावर आनंद आणण्यासाठी देवाची भक्ती आहे आणि मनाची शांती आहे. याहून मोठा कुठला आनंद नाही.

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

७० वर्षाच्या अमला रुईया यांनी राज्यस्थानच्या २०० दुष्काळग्रस्त गावात केली हरितक्रांती  

शिक्षणातून वंचित मुलांचं आयुष्य बदलणाऱ्या कुमारी शिबुलाल

‘विज्ञानवाहिनी’ निवृत्त लोकांनी मुलांच्या विकासासाठी सुरु केलेली एक मोहीम  

लेखिका : शिखा चौहान
अनुवाद: किशोर आपटे