महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून उद्योगात ‘आनंद’ मिळवणारा तरुण आणि यशस्वी उद्योजक

0

उच्च शिक्षण घेऊन मोठे उद्योगपती झालेले अनेकजण असतात किंवा केवळ काही गुण कमी पडले म्हणून चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यानं निराश झालेले अनेक विद्यार्थी आपण पाहिले असतील. पण आनंद नाईक हे एक असे तरुण उद्योजक आहेत ज्यांनी चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून दिलं आणि कमी वयात यशस्वी उद्योजक होण्याचा विक्रम करुन दाखवला आहे. हा निर्णय घेतला तेव्हा पुढे काय करायचं हे माझ्या मनात स्पष्ट होतं असं आनंद सांगतात.


आनंद मुळचे कर्नाटकातील हुबळीचे...कोटामध्ये ते आयआयटी प्रवेश परीक्षेची जोरदार तयारी करत होते. पण अचानक त्यांनी सर्व काही सोडून आपलं घर गाठलं. घरी आल्यानंतर चिंतातूर आई-वडिल आणि आसपासच्या लोकांचे टोमणे सहन करत आनंद यांनी कर्नाटकचं मुख्य व्यावसायिक केंद्र असलेल्या हुबळीमध्ये ‘बोर्डबीज टेक सोल्युशन्स’ (BoredBees Tech Solutions) ची स्थापना केली. आपण करत असलेलं काम लोकांना समजावून सांगणं एक आव्हान होतं, त्यात तंत्रज्ञानाची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याचं आनंद सांगतात. पण तेव्हा या क्षेत्रात तज्ज्ञांची खूप कमतरता असताना पहिलं टेक स्टार्टअप सुरू केल्याचं आनंद सांगतात.


स्टार्टअप सुरू केल्यानंतर त्यांनी मोठमोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करत असलेल्या त्यांच्या काही शालेय मित्रांना सोबत येण्याचा आग्रह केला आणि त्या मित्रांनीही साथ दिली. अनुभवी इंजीनिअर तर मिळाले पण त्यांनी सोबत राहण्यासाठी जास्त पैसा लागेल हे जाणवल्यानं आनंद यांनी आयसीएआय आणि इतर संस्थांमध्ये शिकवण्यास सुरूवात केली. त्याचबरोबर उत्पन्न वाढवण्यासाठी काही शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी माहिती-तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. सुरूवातीच्या काळात उत्पादनाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी बर्डबीजने आऊटसोर्सिंग केलं. त्यामुळे या क्षेत्रात एक उद्योग साधन व्यवस्थापन कंपनी (ERP )म्हणून त्यांनी ठसा उमटवला. त्याशिवाय कंपनीनं आतापर्यंत दीडशेहून अधिक मोबाईल ऍप्लिकेशन्स तयार केलेत आणि ते तीन लाखांपेक्षाही जास्त डाऊनलोड झालेत.

उत्तर कर्नाटकातील एक मोठं व्यावसायिक केंद्र असलेल्या हुबळीमध्ये पारंपरिक व्यवसायांच्या क्षेत्रात एक आयटी सोल्युशन कंपनी स्थापन करण्याचा अनुभव वेगळा ठरला. दुर्लक्षित आणि स्पर्धेचा अभाव असलेली बाजारपेठ म्हणून आनंद यांनी आपलं जन्मस्थान व्यवसायासाठी निवडलं. पण पारंपरिक व्यवसायांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो हे पटवून देणं त्यांना कठीण गेलं. अनेकवेळा पैसे मिळण्यासाठी अनेक महिनोंमहिने वाट पहावी लागायची आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यावर दुकानदार त्य़ासाठी घासाघीस करायचे आणि दबाव आणायचे, असं आनंद सांगतात. पण काळ बदलत गेला आणि इतर स्पर्धक या क्षेत्रात आल्यानंतरही मात्र पहिलं स्टार्टअप असल्याचा फायदा मिळाल्याचं ते सांगतात.


आनंद यांच्या टीममध्ये आज साठ जण आहेत, त्यातील काहीजण वयाने आनंदपेक्षा मोठे आहेत. पण कोणालाही कामावर घेण्याआधी आनंद त्यांच्याशी स्पष्टपणे बोलतात. टीममधल्या प्रत्येक व्यक्तीकडे असलेलं ज्ञान आणि त्यांचा अनुभव यांचा सन्मान राखला गेला पाहिजे हेच ते प्रत्येकाला बजावतात. त्यांच्या टीममधील सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती ६२ वर्षांची आहे.

बर्डबीज सुरू करुन दोनच वर्ष झाली असताना त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना ‘सर्वोत्कृष्ट युवा उद्योजक’ हा पुरस्कार रतन टाटा यांच्या हस्ते देण्यात आला. कमी वयात आणि उद्योगाच्या सुरूवातीला एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर आत्मविश्वास तर वाढतोच पण बाजारपेठेतही तुम्हाला मान्यता मिळते, असं आनंद सांगतात.

बर्डबीज आता या क्षेत्रातील एक मोठं नाव झालंय. पण या यशानंतरही आनंद स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी आतापर्यंत देशाच्या अनेक भागात जाऊन किशोरवयीन मुलांशी संवाद साधलाय. “ 18 बट नॉट टीन ” या अभियानांतर्गत ते विद्यार्थ्यांनी उद्योगांकडे वळावं यासाठी त्यांच्याशी संवाद साधतात. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उद्योग सुरू केला तेव्हा खूप टीका सहन करावी लागल्याचं आनंद सांगतात. त्यामुळेच तरुणांनी मोठी स्वप्न पाहावी आणि त्यात अपयश आलं तरी निराश होऊ नये, असा सल्ला ते देतात.


कमी वयातच अपयश आणि यशाची चव चाखल्यानंतर आनंद आता भविष्याबद्दल खूप गांभिर्यानं विचार करतात. आता हा व्यवसाय इतर शहरांमध्ये नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

लेखक – प्रतीक्षा नायक

अनुवाद – सचिन जोशी