स्मार्टफोन शिवायही करा रेल्वेचा स्मार्ट प्रवास... रहा 'मोबीटीप'सोबत अपडेट

0

उपनगरीय रेल्वे सेवेला मुंबईची लाईफ लाईन म्हटलं जातं. ते खरंही आहे म्हणा. आता लोकलसेवा ही स्मार्ट होत आहे. रोजचे ८०  लाखांहून अधिक प्रवासी लोकमधून प्रवास करतात. त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची कुठली बाब असेल तर ती म्हणजे अगदी त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनलेली लोकलची माहिती वेळेवर मिळावी. अनेकदा गाड्यांच्या वेळा बदलतात, याला कारणं अनेक असतात. तांत्रिक ते मानवी चुकांमुळे या गाड्यांचं वेळापत्रक कोलमडतं. मग प्रचंड गर्दी आणि त्यात सर्वसामान्य मुंबईकर होरपळतो, याचं मुख्य कारण म्हणजे वेळेवर माहिती न मिळणं. गाड्या वेळेवर आहेत की नाही याची माहिती न मिळाल्यानं प्रवाशांचा खोळंबा होतो. गर्दी इतकी प्रचंड असते की मग फलाटावर येणाऱ्या गाडीत चढताच येत नाही. यासंदर्भातली अद्यायवत माहिती मिळाली तर आपल्याला वेळेचं नियोजन करता येतं. यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे प्रशासन आणि लोकलचे प्रवासी उपाय शोधत होते, आता तो सापडलाय. 'मोबीटीप'च्या माध्यमातून फक्त आता मिस कॉल द्या आणि मध्य आणि आता एक एप्रिलपासून पश्चिम रेल्वे मार्गावरच्या गाडीची सद्यस्थिती जाणून घ्या आणि हो यासाठी तुमच्याकडे स्मार्ट फोनच असला पाहिजे याची गरज नाही. तो नसतानाही फक्त एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला लोकलची माहिती मिळते. यामुळे प्रवास सुकर होतो. 

पक्के मुंबईकर असलेले पंकज सालवे, अजित कुमार आणि अरुणा कुमार यांनी ही सेवा उपलब्ध करुन दिलीय. महत्त्वाचे म्हणजे रेल्वे प्रशासनाने ती अधिकृत केलीय. म्हणजे रेल्वेच्या अनाऊंसमेन्टमध्ये या सेवेचा उल्लेख होतो. हे तिघे गेले कित्येकवर्षे मुंबईच्या लोकलमधून प्रवास करतायत. त्यामुळे रोजच त्यांना गर्दीचा आणि माहिती न मिळाल्यानं उडालेल्या गोंधळाचा सामना करावा लागत होता. त्यावर उपाय म्हणून वेळेवर माहिती देणारी सेवा सुरु करता येईल का यावर तिघांनी विचार केला. पंकज आणि अजित यांची पार्श्वभूमी मॅनेजमेन्टची होती आणि अरुणाची तांत्रिक. यामुळे तिघांनी एकत्र येऊन 'आयकॉन्स' नावाची कंपनी स्थापन केली.  मिस कॉलचा वापर करत जाहिरात करण्याची अनोखी युक्ती या कंपनीनं शोधून काढली. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना या सेवेचं प्रेजेन्टेशन दिलं. त्यांना ते आवडलं आणि लागलीच ही सेवा मध्य रेल्वेत सुरु करण्याचे आदेश दिले. 

अगदी सोप्प आहे. मध्य रेल्वेसाठी 1800 212 4501 किंवा पश्चिम रेल्वेसाठी 1800 212 4502 या क्रमांकावर मिस कॉल द्या. म्हणजे तुम्ही मोबीटिपशी जोडले जाता. त्यानंतर लोकलसंदर्भातली सर्व माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे पुरवली जाते. अगदी मोफत. “ ही माहिती रेल्वेच्या कंट्रोलरुममधून मिळालेली असते. आमचं बॅक ऑफिस रेल्वेच्या कंट्रोल रुमशी सतत संपर्कात असतं. त्यामुळे कोणतीही समस्या निर्माण झाल्यास  नोंद आमच्याकडे होते आणि आम्ही ती नोंदणीकृत मोबाईलधारकांना पाठवतो. असा सोपा प्रकार आहे हा.“ आयकॉन्स इन्फोवे प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक पंकज सालवे सांगत होते.

आधी ही सेवा फक्त मध्य आणि हार्बर सेवेसाठी उपलब्ध होती. आता 1 एप्रिल 2016 पासून ती पश्चिम रेल्वेसाठीही उपलब्ध असेल. गेल्या तीन महिन्यात तीन लाखांहून अधिक प्रवाश्यांनी यावर आपली नोंदणी केलीय. ही एसएमएस हेल्पलाईन सेवा 24 तास सुरु आहे. “ आमचा एकच उद्देश होता. की लोकांना थेट रेल्वेची माहिती मिळावी. ही माहिती मिळत नसल्यानं अनेकदा बाके प्रसंग ओढावतात. लोक वैतागून रेल्वेच्या मालमत्तेची तोडफोड करतात. हे का होतं याचा आम्ही विचार केला आणि ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही अश्या प्रवाशाला ही माहिती मिळाल्यास तो आपल्या प्रवासाचं नियोजन करु शकेल यावर आम्ही विचार केला. आणि त्यातून मोबीटिप आकाराला आलं.” अजीत कुमार सांगत होते. 

आता आयकॉन्स इन्फोवे प्रायव्हेट लिमिटेडला या मोफत एसएमएस सेवेचा काय फायदा? याचं उत्तर ही त्या एसएमएसमध्ये एसएमएसच्या शेवटेचे काही कॅरेक्टर जाहिरातीसाठी आहेत. त्यातून अनेक गोष्टींची जाहिरात करता येते. एकाचवेळी लाखो लोकांना हा एसएमएस मिळत असल्यानं आपली जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याची खात्री असते. यातून जो पैसा मिळतो त्यातला काही हिस्सा रेल्वेला दिल्यानंतर उरलेला आयकॉन्सला मिळतो. यामुळे मोफत एसएमएसचं आर्थिक गणित जुळतंय. आता आयकॉन्स अॅप घेऊन येतंय, यामुळे गाडीचं खरंखुरं एक्झॅक्ट लोकेशन माहिती करुन घेणं सोपं जाणार आहे. यासाठी जीपीएस तंत्राचा पहिल्यांदाच वापर करण्यात येणार असल्याचं अरुणा कुमार यांनी सांगितलं. या संपूर्ण तांत्रिक बाबी अरुणाच पाहतात. 

सध्या मुंबईकरांमध्ये एम-इंडीकेटर ही सेवा फार प्रचलित आहे. पण ही सेवा रेल्वेची अधिकृत सेवा नाही. अधिकृत असल्यानं मोबीटिपचं महत्त्व वाढू लागलंय. शिवाय काही आणीबाणीची परिस्थिती आल्यास रेल्वे कंट्रोल रुमची अधिकृत माहिती मिळत असल्यानं प्रवाशांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. अगोदर रेल्वे प्रशासन  अशा पध्दतीची सेवा देण्यास प्रयत्नशील होतं. पण आयकॉन्सनं सुरु केलेल्या या सेवेलाच रेल्वेनं अधिकृत दर्जा देऊन मुंबईतल्या लोकल प्रवाश्यांना मोठा दिलासा दिला आहे. 

आयकॉन्स इन्फोवे प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आता अॅपनंतर आपली सेवा देशभर कशी नेता येईल याची आखणी करत आहे. ही आखणी जास्तीत जास्त लाभदायक करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत.