हजारो मैलांचा प्रवास करून दरवर्षी मुंबईकरांच्या भेटीला येताहेत परदेशी पाहूणे ‘फ्लेमिंगोज्’!  

0

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत परप्रांतियांचे लोंढे येणे ही काही नवी बाब नाही. गेल्या काही दिवसांत तर या लोंढ्यांना समस्या समजून रोखण्याचा राजकीय प्रयत्नही काही लोकांनी सुरू केला आहे. पण याच मुंबईत हजारोंच्या संख्येने हजारो मैलांचे अंतर कापून काही महिन्यांच्या वास्तव्याला येणा-या परप्रांतियांचे स्वागत मोठ्या उत्साहाने केले जाते हे सांगितले तर तुम्ही बुचकळ्यात पडाल ना? अहो हे परप्रांतीय माणसे नाहीत पक्षी आहेत, त्यांचे नाव आहे ‘फ्लेमिंगो’! त्यांच्या स्वागतासाठी मुंबईच्या वन्यजीव संवर्धन करणा-या मंडळींसोबतच आता मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई नैसर्गिक इतिहास परिषद (बॉम्बे नँचरल हिस्ट्री सोसायटी)यांनी संयुक्तपणाने मोहिम हाती घेतली आहे.

१९९४ च्या सुमारास या पाहूण्यांकडे मुंबईच्या पक्षीप्रेमींचे लक्ष गेले आणि त्यांच्या या दरवर्षी होणा-या मुंबई आगमनाचे स्वागत होऊ लागले. या परदेशी पाहूण्यांच्या मुंबई भेटी बाबत युअर स्टोरीच्या वाचकांना काही माहिती मिळावी म्हणून हा प्रयत्न!

फ्लेमिंगो हे दोन प्रकारचे असतात, ग्रेटर आणि लेसर असे त्यांचे दोन प्रकार आहेत. मुंबईच्या समुद्रातील शिवडीकडच्या पाणथळ जागांवर पंधरा वर्षापूर्वी या पाहूण्यांना पाहण्यात आले. आता त्याचे अस्तित्व उरण, ऐरोली खाडी परिसरातही असते हे माहिती झाले आहे. मुंबईच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी सोडले जाते तसेच आजूबाजूच्या  औद्योगिक भागातून मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषणही केले जाते याचा या पाहूण्याच्या येण्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने पक्षीप्रेमी सातत्याने त्यांच्या येथील वास्तव्यात विघ्न येऊ नयते असा प्रयत्न करताना दिसतात. पर्ल बेटावरून हजारो किलोमिटरचा प्रवास करून येणा-या या पाहूण्याचे प्रथम दर्शन शिवडीच्या समुद्रात झाले. हा भाग मुंबई पोर्ट ट्रस्टच्या ताब्यात आहे त्यामुळे २० -३० हजारांच्या संख्येने झुंडीने येणा-या या पाहूण्याच्या स्वागताच्या आणि इथल्या वास्तव्यातील काळजीच्या दृष्टीने पोर्ट ट्रस्टने गेल्या काही वर्षापासून प्रयत्न सुरू केले आहेत कारण या पाहूण्यांना पाहण्यासाठी देशी विदेशी पक्षीप्रेमी पर्यटक सुध्दा आता येऊ लागले आहेत.

सेंचुरी ऐशीयाचे बिटू सैगल म्हणाल की, या पक्ष्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय झाल्याने आम्हालाही निसर्गाच्या अनमोल ठेव्याची सेवा केल्याचा आनंद झाला आहे”. ते म्हणाले की, “ येथे केवळ फ्लेमिंगोज नाहीतर कॉमन टेर्न तसेच मेडिअन इगर्ट अशा विविध प्रजातीच्या पक्षांचे आश्रयस्थान आहे.”

बॉम्बे नँचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ दिपक आपटे म्हणाले की, "हा निसर्गाचा ठेवा आहे, त्याबाबत आम्ही मागील वर्षी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला त्यांच्या संवर्धनाबाबत सहकार्य करण्यासाठी कळविले आहे. महाराष्ट्र सरकारच्या वन्यजीवन विभागाने ठाणे खाडी परिसरात या पाहूण्याचे अभयारण्य निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

झुलॉजीचे प्राध्यापक असलेले डॉ.परविश पांडे म्हणाले की, “नव्या पिढीला या पक्षी प्रजाती आणि त्यांच्या जीवनाच्या प्रवासाबाबत माहिती देणे आवश्यक आहे, कांदळवने आणि या पक्ष्यांच्या संवर्धनातून आपण आपल्या निसर्गाचे रक्षण करण्यास शिकले पाहिजे.”

गुजरातच्या कच्छच्या रणातून प्रवास करूनही काही पक्षी येथे येतात. त्यात स्ट्रोक्स, होर्न, इबिएस अशा पक्ष्यांचा समावेश होतो. शिवडी माहूल परिसरात या पक्ष्यांचे नैसर्गिक आश्रयस्थान असल्याने तेथे त्यांना निवांत राहता यावे असा प्रयत्न केला जात आहे. या भागात पोर्टच्या परिसरातील रिफायनरींचे प्रदुषित पाणी सोडले जाते, तरीही या पाहूण्यांना मुंबईचे काय आकर्षण आहे? त्यांना या भागातील नैसर्गिक ओढ का आहे? येथील सलाईन आणि अल्काईन प्रकारच्या पाण्यात त्यांचे आवडते खाद्य मोठ्या प्रमाणात सापडते. काही पक्षीतज्ज्ञांच्या मते हे पक्षी आपल्याकडच्या बदक, हंस , बगळे या प्रजातीपैकीच आहेत. त्यामुळे आता या पाहूण्यांसाठी शिवडी-माहूल परिसर महत्वाच्या पक्ष्यांचा विभाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरवर्षी येणा-या हजारो फ्लेमिंगोना येथे राहण्यासारखे वातावरण राहिले नाही तर मोठ्या प्रमाणात ही प्रजाती नष्ट होण्याची भिती आहे. त्यामुळे निसर्गाच्या या अनमोल ठेव्याचे जतन करण्याची आपली सा-यांची जबाबदारी आहे. सैगल म्हणतात की, “ खराेखर आम्ही मुंबईकर किती भाग्यवान आहोत की समुद्रकिनारा आणि तोही कांदळवनांनी बहरलेला, आम्हाला मिळाला आहे, त्यामुळे केवळ इथल्या समुद्रकिना-याचे समुद्राच्या लाटांपासूनच रक्षण होते असे नाहीतर फ्लेमिंगोसारख्या पाहूण्यांनाही येथे यावेसे वाटते याचा अर्थ हा परिसर खरंच निसर्गत:च किती सुंदर असेल नाही का? हजारो मैलांच्या प्रवासावरून हे पाहूणे येतात आणि इथल्या निसर्गाचे सौदर्य वाढवतात ही आपल्याकरीता निसर्गाची अनमोल देणगीच नाही का?” त्यामुळे या परप्रांतियांना ‘या पाखरांनो’ म्हणायला हवे नाही का?

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

जंगलबुकच्या मोगलीकडून प्रेरणा घेतलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील ‘निखिल मोगली’ची प्रत्यक्ष कथा; वाघांच्या संवर्धनासाठी कार्यरत!

'जलदिंडी' करतेय नदी संवर्धनाचा जागर

एका संगणक अभियंत्याने स्व:बळावर पर्यटनासाठी विकसित केले 'ईको टूरीझम'