‘साईझ एट’च्या न्यूनगंडातून स्त्रीला मुक्त करणारा फॅशन जगतातील नवा आविष्कार – स्टोअर अनटोल्ड

 ‘साईझ एट’च्या न्यूनगंडातून स्त्रीला मुक्त करणारा फॅशन जगतातील नवा आविष्कार – स्टोअर अनटोल्ड

Sunday September 11, 2016,

5 min Read

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणत्याही महिलेला सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता व्यवसायिक जबाबदाऱ्याही ताकदीने पेलण्यासाठी आपला फॅशन सेन्सही जपावा लागतो. अशात कोणती स्टाईल आपल्यावर योग्य दिसेल, कोणते कपडे आपल्याला चांगले दिसतील किंवा कोणते कपडे आपल्यावर चांगले दिसणार नाहीत याची निवड करणं महत्त्वाचं ठरतं. त्यातही आपला बांधा चारचौघींसारखा सुडौल नसेल तर ही निवड करणं आणखीनच कठिण होऊन बसतं...

image


सध्या उपलब्ध असलेल्या फॅशन ई-कॉमर्स पोर्टल्सवर काही ठराविक साईझ आणि ऑप्शन्समध्ये कपडे उपलब्ध असल्याने एखादी स्टाईल कितीही आवडली तरीही ती आपल्यासाठी नाहीच असा विचार करून मनाचा हिरमोड करून घेण्यापलिकडे महिलांकडे दुसरा पर्याय नसतो. महिलांच्या मनातली हीच भावना लक्षात घेऊन अंकिता मंत्री लाहोटी आणि सृष्टी नाधानी या दोघींनी स्टोअर अनटोल्ड या नव्या फॅशन ई-कॉमर्स पोर्टलला सुरूवात केली. आज देशभरातील अनेक महिला या पोर्टलद्वारे त्यांना हवे तसे, त्यांना आवडतील त्या स्टाईलमधले आणि त्यांना हव्या त्या साईझमधले कपडे ऑर्डर करतायत. स्टोअर अनटोल्ड ही कल्पना आज महिलांना हवे तसे कपडे उपलब्ध करून देणारी फॅशन जगतातील बदलाची एक नवी नांदी ठरलीये.

image


एखाद्या फॅशनबेस्ड पोर्टलवर कपड्यांची खरेदी करताना ते कपडे आपल्याला आपल्या साईझमध्ये उपलब्ध होतील किंवा नाही, किंवा मग एखादी स्टाईल आपल्याला सूट होईल किंवा नाही असा प्रश्न पडूच नये या विचारातून स्टोअर अनटोल्डला सुरूवात झाली. अंकिता ही मूळची मुंबईतली तर सृष्टी ही मुळची कोलकत्याची पण दोघींनाही फॅशनची प्रचंड आवड. सृष्टीने पुण्यातील फॅड इंटरनॅशनल या फॅशन डिझायनिंग इन्स्टीट्यूटमधून पदवी घेतली आणि त्यानंतर लंडन कॉलेज ऑफ स्टाईलमधून तिने पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. तर अंकिताला ग्राफिक डिझायनिंग, स्टायलिंग, फोटोग्राफीची उपजत आवड होती. एकमेकींशी भेट होण्यापूर्वी अंकिताने स्टायलोप या फॅशन ब्रॅण्डसाठी काम केलं होतं...तर सृष्टी ही क्वीर्कबॉक्स या फॅशन ब्रँडसाठी काम करत होती...एका सुट्टीच्या दिवशी फॅशनशी संबंधित माहिती सर्च करत असतानाच लिंक्ड इन या सोशल नेटवर्किंग साईटवर या दोघींची पहिली भेट झाली..

image


सुरूवातीला एकमेकींशी जुजबी गप्पा मारल्यानंतर त्यांना समजलं की फॅशन हा या दोघींचाही आवडता विषय आहे...आणि मग सोशल नेटवर्किंग साईटवरूनच या दोघींची एकमेकींसोबत फॅशन या विषयावर तासंतास चर्चा झडायला लागल्या. आणि त्यातूनच एकेदिवशी सृष्टीने अंकितासमोर फॅशन ब्लॉगसाठी लिहिण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. सुरूवातीला नाही म्हणणारी अंकिता नंतर त्यासाठी तयार झाली आणि या दोघींनी मिळून एक फॅशन ब्लॉग सुरू केला. या फॅशन ब्लॉगवरून त्यांनी फॅशनशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करायला सुरूवात केली. या ब्लॉगवर नवनवीन माहिती लिहिणे, ती वाचणाऱ्या महिलांना स्टायलिंगच्या वेगवेगळ्या टिप्स देणे त्यांनी सुरू केलं. एवढंच नाही तर त्यांनी त्यांची काही पर्सनल कलेक्शन्सही ब्लॉगवर शेअर केली. ज्याला वाचकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळाला. या ब्लॉगसाठी रिसर्च करताना त्यांना आढळलं की फॅशनच्या बाबतीतली आपली मतंही एकमेकींशी चांगलीच जुळतायत. मात्र तरीही त्यांची एकमेकींशी भेट काही झालेली नव्हती. एप्रिल २०१४ मध्ये सृष्टीच्या भावाच्या लग्नासाठी तीने अंकिताला कोलकत्याला येण्याचं आमंत्रण दिलं. यानिमित्ताने या दोघींची पहिली भेट झाली. आणि आजवर असलेली सोशल मीडियावरच्या मैत्रीची वीण खऱ्या आयुष्यातही आणखी घट्ट झाली.

सृष्टी- सहसंस्थापक स्टोअर अनटोल्ड

सृष्टी- सहसंस्थापक स्टोअर अनटोल्ड


या भेटीत त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. आणि त्यातूनच फॅशन क्षेत्रात नवीन काहीतरी करून बघण्याचा विचार या दोघींच्याही मनात डोकाऊ लागला. चर्चेदरम्यान त्यांच्या लक्षात आलं की आपण दोघीही कोणत्याही कपड्यांची ऑनलाईन खरेदी करू शकत नाही. कारण ई-कॉमर्स पोर्टलवर उपलब्ध असलेले कपडे हे काही ठराविक साईझमध्येच उपलब्ध असतात. त्यामुळे एखादी स्टाईल आवडूनही आपल्याला ती हवी त्या साईझमध्ये उपलब्ध नसते. आपल्याप्रमाणेच ही समस्या अनेक महिलांना भेडसावत असेल असं या दोघींना वाटलं. अशा महिलांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अशा महिलांसाठी त्यांना हव्या त्या स्टाईलमधले, त्यांना हव्या त्या साईझचे कपडे शिवून घरपोच देणारं एखादं ई कॉमर्स पोर्टल सुरू करावं अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली. आणि तिथूनच स्टोअर अनटोल्ड या संकल्पनेचा जन्म झाला.

अंकिता- सहसंस्थापक स्टोअर अनटोल्ड

अंकिता- सहसंस्थापक स्टोअर अनटोल्ड


कल्पना चांगली असली तरीही ती प्रत्यक्षात आणताना काही गोष्टी या दोघींनी ठरवून घेतल्या. पहिली म्हणजे काही ठराविक डिझाइन्सच सुरूवातीला साईटवर उपलब्ध असतील. याशिवाय त्या डिझाइनखाली तयार होणारे कपडे हे लिमिटेड एडिशनपुरतेच उपलब्ध असतील. त्यानंतर ही डिझाइन्स आणि त्याचे पॅटर्न्स बदलत जातील. या साईटवरून महिलांनी त्यांचं आवडतं डिझाइन सिलेक्ट केल्यावर त्यांच्या साईझचे कॉलम्स स्वतः लिहावे लागतील. त्यानंतर ठराविक दिवसात तुमचे कपडे शिवून तुम्हाला घरपोच पोहोचवले जातील. शिवणकामात काही त्रूटी आढळल्यास त्यात बदल करून देण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आलाय. याशिवाय कॅश ऑन डिलिव्हरी, कस्टमर फिडबॅक यासारखे ऑप्शन्सही उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढवण्यात त्यांना यश आलं.

image


याच विश्वासाच्या बळावर पेनीलेस एक्सट्रीमिस्ट हे पहिलं कलेक्शन त्यांनी आणलं आणि या पहिल्याच कलेक्शनला ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. त्यानंतर वेअर युअर इमोशन्स हे नवं कलेक्शन त्यांनी आणलं या कलेक्शनमध्ये तुमचा वाढदिवस, प्रमोशन किंवा एनीव्हर्सरी अशा चांगला दिवस हे कपडे घालून साजरा करण्याची संधी देण्यात आली. हे कलेक्शनही स्टोअर अनटोल्डच्या महिला ग्राहकांनी डोक्यावर घेतलंय. ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करून आपल्या कलेक्शनमध्ये बदल केल्यामुळे आज स्टोअर अनटोल्ड हे नाव इतर फॅशन पोर्टल्सच्या स्पर्धेत अभिमानाने उभं आहे.

अंकिता आजही मुंबईत रहाते आणि सृष्टी कोलकत्यात पण स्टोअर अनटोल्डच्या निमित्ताने त्या सतत एकमेकींच्या संपर्कात असतात. दोघींनी आपापली छोटीशी टीम तयार केलीये. या टीमच्या साथीने आज या दोघी स्टोअर अनटोल्डची धुरा यशस्वीपणे सांभाळतायत.

image


परफेक्ट साईझ एट (size 8) फिगर असलेली महिला हिच सुंदर महिला असा एक अंधविश्वास सध्या सगळीकडे बोकाळलाय. त्यामुळे नोकरी, करिअर, कुटुंब, मुलबाळं ही सारी कसरत करत जगणाऱ्या महिलांचं कालांतराने शरीराकडे दुर्लक्ष होतं. अशावेळी आपण चारचौघींसारखे कपडे घालू शकत नाही असा एक न्यूनगंड महिलांच्या मनात घर करून बसतो. हा न्यूनगंड हटवून त्यांनीही स्वतःला आवडेल आणि चांगली दिसेल अशी फॅशन करावी यासाठी खास स्टायलिंगच्या टीप्स देणारी सेमिनार्सही स्टोअर अनटोल्डच्या वतीनं घेण्यात येतात. स्त्रीच्या मनातील न्यूनगंडाची भावना कमी करून तिचा आत्मविश्वास द्विगुणीत करण्याचा प्रयत्न या सेमिनार्सद्वारे करण्यात येतो. स्टोअर अनटोल्डची जबाबदारी सांभाळता सांभाळता त्या ही जबाबदारी समर्थपणे सांभाळतायत.

आयुष्य हे खूप सुंदर असून प्रत्येकाला ते आनंदाने जगण्याचा अधिकार आहे. स्त्रीयांवर आधीच बरीच सामाजिक बंधनं असून प्रत्येक गोष्टीत त्यांनी काय करावे आणि काय करू नये हे त्यांना अगदी लहानपणापासून सांगितलं जातं. त्यामुळे कधी घरचे तर कधी बाहेरचे काय म्हणतात या दडपणाखालीच त्यांना कायम वावरावं लागतं. अशातच फॅशनच्या नावावर परफेक्ट साईझ एटचा धरलेला आग्रह यामुळे त्यांच्या मनात स्वतःच्या शरीराविषयी न्यूनगंड निर्माण होतो. आणि मनात असूनही त्यांना हवे ते कपडे घालता येणं शक्य होत नाही. त्यामुळे आपण आहोत तसं स्वतःला स्विकारून अभिमानाने आयुष्य जगता यावं यासाठी स्टोअर अनटोल्ड कायम प्रयत्नशील आहे.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा