धार्मिक विधींसाठी भटजीपासून पूजा साहित्यापर्यंत सगळ्याची जबाबदारी सांभाळेल ‘मुहूर्त माझा’

धार्मिक विधींसाठी भटजीपासून पूजा साहित्यापर्यंत सगळ्याची जबाबदारी सांभाळेल ‘मुहूर्त माझा’

Friday November 20, 2015,

4 min Read

माणूस जन्माला यायच्या आधीपासून ते स्वर्गवासी झाल्यानंतरही अनेक धार्मिक विधी पार पाडावे लागतात. हिंदू धर्मात तर १६ संस्कार, वास्तूसंबंधित विविध प्रकारच्या पूजा, शांती, यज्ञ यासारखे अनेक धार्मिक विधी येतात. हे धार्मिक विधी करायचे म्हटले की दोन गोष्टी सर्वात आधी पहाव्या लागतात त्या म्हणजे मुहूर्त आणि त्या मुहूर्तावर उपलब्ध असतील असे भटजी. या दोन गोष्टी जुळून येण्यासाठी बरीच धडपड केल्यानंतरही भटजी ठरलेल्या मुहूर्तावर येतीलच याची शाश्वती नसतेच आणि ठरलेल्या मुहूर्तावर भटजी आले तरी धार्मिक विधीसाठी आवश्यक साहित्य ते स्वतःबरोबर आणणार असतील तर ठीक नाहीतर ते येण्यापूर्वी धार्मिक विधीची संपूर्ण तयारी केलेली असावी लागते. सर्व पूजा साहित्य बाजारातून आणून ठेवावे लागते. अशात आपण रहात असलेला परिसर ओळखीचा नसेल, आपण नुकतेच त्याठिकाणी रहायला आलो असू तर हा धार्मिक विधी पार पाडणे एक कसरतच होऊन जाते. भटजी कुठे मिळणार पासून सामान कुठून आणायचे यापर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. मुळचे अमरावतीकर असलेल्या सुघोष सोवळे यांनाही २००९ मध्ये लग्नानंतरच्या धार्मिक विधींसाठी पुण्यात हीच कसरत करावी लागली आणि त्यातूनच ‘मुहूर्त माझा’ची संकल्पना उदयाला आली.

image


www.muhurtmaza.com हे धार्मिक विधींसाठीचे देशातील पहिले कम्प्लिट ऑनलाईन सोल्युशन आहे. “माझ्या कुटुंबात धार्मिक विधींना खूप महत्त्व दिले जाते. माझे लग्न झाल्यानंतर पूजा करायची होती. आम्ही पुण्यात नवीन होतो. त्यामुळे भटजी शोधण्यापासून ते पूजेसाठी लागणारे साहित्य आणण्यापर्यंत सगळ्यासाठी मला प्रचंड धावपळ करावी लागली. परिसर नवीन असल्यामुळे खूप दमछाक झाली. तेव्हा माझ्या मनात आलं की माझ्यासारखे नोकरीनिमित्त किंवा अन्य कारणामुळे स्थलांतरित होणारे बरेच असतात. त्यांनाही कुठला धार्मिक विधी पार पाडायचा असल्यास अशीच धावपळ करावी लागत असेल. त्यात प्रत्येक प्रदेशातील धार्मिक विधींमध्ये येणाऱ्या फरकामुळे त्यांना मनाप्रमाणे तो विधी पार पाडून मिळत असेलच असे नाही आणि या अशा विचारांमधूनच मुहूर्त माझाची संकल्पना मला सुचली,”असं मुहूर्त माझाचे संस्थापक सुघोष सोवळे सांगतात.

image


२०१२ मध्ये सुघोष यांनी muhurtmajha.com ही वेबसाईट रजिस्टर केली. मात्र त्यावेळी नोकरी करता करता सुघोष हे काम स्वतःच सांभाळत होते. वेबसाईटही तितकीशी अपडेट नव्हती. मात्र तरीही याला मिळणारा प्रतिसाद पाहता नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ हे काम करण्याचे ठरविले. सुरुवातीला मार्केटचा पूर्ण अभ्यास केला. अशातच निलेश गुढे आणि वैभव डोमकुंडवार या त्यांच्या मित्रांची त्यांना साथ मिळाली आणि मूहुर्त माझाने वेग पकडला. सेल्स ऍण्ड मार्केटींग क्षेत्रातील १५ वर्षांचा अनुभव असलेले सुघोष आता मुहूर्त माझाचे ऑपरेशन, सेल्स ऍण्ड मार्केटींग सांभाळतात. तर मुहूर्त माझाचे सहसंस्थापक निलेश गुढे यांनी आयटी विभागाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे तर वैभव डोमकुंडवार स्ट्रॅटेजिक ऍडवायजर म्हणून काम पहातात.

पारदर्शी व्यवहार हे muhurtmajha.com चे विशेष. या वेबसाईटवर एकूण १४० प्रकारचे धार्मिक विधी उपलब्ध आहेत. यामध्ये गर्भसंस्कार, नामकरण. अन्नसंस्कार, उपनयन, विवाह ते अंत्यसंस्कार यासारखे जन्मापूर्वीपासून मृत्यूपर्यंत केले जाणारे १६ संस्कार आहेत. त्याचप्रमाणे गृहप्रवेश, वास्तूशांती, कलश पूजन, सत्यनारायण पूजा, विविध प्रकारची शांती, यज्ञ इ. केले जाते. या धार्मिक विधींच्या यादीबरोबरच पंचांगानुसार उपलब्ध मुहूर्तांची यादी, धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या भटजींची एकूण संख्या, विधीची पद्धत, विधीला लागणारा वेळ, पूजा साहित्याची यादी आणि दक्षिणा याची सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जेणेकरुन एखाद्या धार्मिक विधीसाठी बुकिंग करताना त्या विधीबाबत सर्व प्रकारची माहिती उपलब्ध होते. यामध्ये पूजा साहित्यासहित अथवा पूजासाहित्याविना भटजी बुक करण्याची सोयही आहे. त्यानुसार दक्षिणा वेगवेगळी घेतली जाते. तसेच दक्षिणा ऑनलाईन देण्याची किंवा भटजींना प्रत्यक्ष देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

image


सध्या ३०० भटजी मुहूर्त माझाशी जोडले गेले आहेत. विशेष म्हणजे विविध प्रदेशातील धार्मिक विधी पार पाडण्याच्या पद्धतीमध्ये असणारी विविधता लक्षात घेऊन मुहूर्त माझाने निरनिराळ्या प्रदेशातील भटजींशी सहयोग केला आहे. “आपण एखाद्या दुसऱ्या शहरात रहायला गेलो तर अनेकदा तिथल्या पद्धती आणि आपल्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तसंच वेगवेगळ्या जातींमधील पद्धतीही वेगवेगळ्या असतात. याचा विचार करुन आम्ही विविध प्रदेशातील भटजींना ऑन बोर्ड ठेवले आहे,” सुघोष सांगतात. कोकणी, विदर्भीय, मराठवाडी, देशस्थ एवढेच नाही तर कानडी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय आणि सिंधी भटजीही मुहूर्त माझावर उपलब्ध आहेत. जेणेकरुन तशी मागणी असल्यास त्या त्या विशिष्ट प्रदेशातील भटजींना धार्मिक विधी पार पाडण्यासाठी पाठविले जाते.

image


सध्या पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, बंगळुरु आणि हैदराबाद येथे मुहूर्त माझा सेवा पुरवित असून लवकरच आणखी काही भटजींशी सहयोग करुन २५ नव्या शहरांमध्ये आपला कार्यविस्तार करण्याचा सुघोष यांचा विचार आहे. आतापर्यंत मुहूर्त माझाद्वारे १५० हून जास्त धार्मिक विधी पार पाडण्यात आले असून भविष्यात हा आकडा प्रत्येक शहरामागे महिन्याला २५० पर्यंत नेण्याचे मुहूर्त माझाचे लक्ष्य आहे. मुहूर्त माझाच्या फेसबुक पेजला अवघ्या पाच आठवड्यात ३५०० हून जास्त लाईक्स मिळाले आहेत. या संकल्पनेला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता दीड महिन्यांपूर्वीच मुहूर्त माझाने आपले आयओएस आणि ऍन्ड्रॉइड ऍप बाजारात आणले आहे. यामुळे घरातला धार्मिक विधी आता चालता बोलता, इतर कामांची धावपळ सांभाळतानाच अधिक सहजरित्या करणे शक्य आहे.