मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ऩुरजहाँ सफई नियाझ

मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या  ऩुरजहाँ सफई नियाझ

Saturday March 05, 2016,

3 min Read

ऩुरजहाँ सफई नियाझ हे नाव गेल्या महिन्याभरापासून मुंबईत चांगलंच गाजलं. तसं पाहिलं तर नुरजहाँ यांचा मुस्लिम समाजातल्या महिलांसाठीचा लढा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. पण त्यांच्या आंदोलनानं टोकाची भूमिका गाठली ती गेल्या महिन्याभरातच. मुस्लिम महिलांना मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा यासाठीचं हे आंदोलन आता जोर धरु लागलंय. आता ते कोर्टात आहे. एकीकडे अहमदनगरमध्ये महिलांना शनि मंदिरात प्रवेशासाठी हिंसक आंदोलन सुरु असतानाच हाजी अलीचं आंदोलनही त्याच वेळी सुरु झालं. धर्माच्या तथाकथित रखवालदारांविरोधात उभ्या ठाकलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व नुरजहाँ करत होत्या. मुस्लिम समाजातली प्रत्येक महिला कुराणाचं पठन करते. मग त्या कुराणाचा दाखला देऊन काही धर्मगुरु महिलांना अपवित्र कसे काय ठरवतात असा सवाल त्यांनी केला आहे. कुराणातल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवतच नाहीत त्यामुळं महिलांवर अन्याय होत आहे असं त्याचं ठाम मत आहे. त्याविरोधातच हा लढा आहे. मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नुरजहाँ यांचा हा लढा प्रेरणादायी आहे.



image


हाजी अली दर्गा इथं महिलांना प्रवेश मिळावा या आंदोलनाचे बीज दहा वर्षांपूर्वी पेरले गेले होते. २००४मध्ये नुरजहाँ यांनी भारतीय मुस्लिम महिला आंदोलन ही संघटना सुरु केली. हाहा म्हणता ती वाढली. देशातल्या १३ राज्यांमध्ये या संघटनेचा प्रसार झाला आणि ७० हजार हून अधिक सदस्यांनी या आंदोलनाला नवीन मजबूती दिली. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हेच नुरजहाँ यांचे यश आहे.

“ आमच्या संघटनेतल्या महिलांची संख्या वाढतेय. याचाच अर्थ असा मुस्लिम समाजातल्या महिलांना बदल हवाय. कुणी उठतो आणि धर्माच्या नावावर महिलांना बुरख्याखाली राहण्याचे आदेश देतो. हे आता चालणार नाही. ही आमच्या हक्कांची लढाई आहे. बुरखा आम्ही मान्य केलाय. पण या बुरख्याखाली एक चालणारं डोकं आहे. मेंदू आहे. आणि त्या मेंदूला जे पटत नाही ते आम्ही नाही करणार” नुरजहाँ अगदी आत्मविश्वासानं सांगत होत्या. 

Photo Courtesy - DNA 

Photo Courtesy - DNA 


गेल्या वर्षी नुरजहाँ यांनी हाजीअली दर्ग्यात मुस्लिम महिलांना प्रवेश मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका आता अंतिम टप्प्यात असून राज्य सरकारने त्यांच्या मागणीला न्यायालयात समर्थनही दिले आहे. ही याचिका दाखल करण्यापूर्वी नूरजहाँ यांनी राज्यातल्या मुस्लिम मौलाना अणि मौलवी यांना भेटून पत्र पाठवून महिलांना हाजीअली दर्ग्यात् प्रवेश देण्याविषयी विनंती केली होती. मात्र त्यांनी पवित्र कुराणाचा दाखला देत ही मागणी फेटाळून लावली. “अनेकदा मुस्लिम धर्मगुरु यांना चर्चेचे निमंत्रणही दिले. मात्र त्यांनी साधी चर्चेची तयारीही दाखवली नाही. अखेर आमच्या संघटनेने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला” नूरजहाँ यांनी स्पष्ट केले. नूरजहाँ म्हणतात, ज्या कुराणाचा हे धर्मगुरु दाखला देत आहेत, त्यांनी या पवित्र ग्रंथाचा विपर्यास केला असून चांगल्या गोष्टी ते समाजापर्यंत पोहचवत नसल्याचे त्या ठामपणे सांगतात. 

image


मुस्लीम समाजातल्या अनेक रुढी परंपरांबद्दल त्याचं मत अगदी ठाम आहे. त्या म्हणतात “इंडियन पर्सनल मुस्लिम लॉ बोर्ड हे भारतीय संविधानावर नाही त्यांचे नियम ही आम्हाला मान्य नसून मुस्लिम महिलांसाठी वेगळा कायदा अंमलात आणावा अशी आमची मागणी आहे. त्याकरीता आम्ही त्याचा मसूदाही तयार केला असून त्याच्या प्रती आम्ही आमच्या विचारांशी सहमत असलेल्या खासदार यांना दिल्या आहेत. मुस्लिम समाज हा मागासलेला आहे, त्याच बरोबर मुस्लिम महिलांची अवस्था त्याहून वाईट आहे. यासाठी मेहर म्हणून नवरा मुलाचे एका वर्षाचे वार्षिक उत्पन्न लग्नाच्या आधी मुलींना मिळायला हवे अशी तरतूदही आम्ही आमच्या मसूद्यात केली आहे.” 

image


भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या संघटनेनं समाजातल्या महिलांचे प्रश्न अधिक प्रखरपणे मांडण्याची तयारी सुरु केलीय. त्या म्हणतात “मुस्लिम समाजातील काही लोक कट्टरवादी आहेत, पण आमच्या आंदोलनाला ही जोरदार प्रतिसाद मिळत असून आता कुणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे नूरजहाँ यांनी म्हटलंय.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाणी :

इस्लामिक कायदेतज्ज्ञ आणि विद्वानांचा विरोध पत्कारत राजस्थानातील दोन मुसलमान महिला बनल्या काजी

image