आगळ्यावेगळ्या पद्धतीने समाजसेवेचा वसा चालवणाऱ्या भावना प्रधान

5

आपल्याला जर एखाद्या गरजूला मदत करायची असेल, तर त्यासाठी कोणत्याही स्वयंसेवी संस्थेची गरज नाही, आपण आपल्या लहानश्या कृतीतूनदेखील एखाद्याचे जीवन सावरू शकतो. आणि याचेच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ समाजसेविका भावना प्रधान. आज वयाची पासष्टी उलटून गेल्यानंतरही गरजूंना मदत करण्याची त्यांची वृत्ती निश्चितच कौतुकास्पद आहे. निसर्गाच्या कणाकणात ईश्वर सामावलेला आहे, अशी भूमिका असलेल्या भावना प्रधान यांनी आजवर देवासमोरील दानपेटीत किमान दान केले असेल. मात्र आपल्या दातृत्वाच्या भावनेतून त्यांनी आजवर अनेकांना स्वावलंबी बनण्यास मदत केली आहे तसेच अनेक गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. 'देव देव करत बसण्यापेक्षा गरजूंना प्रतिमाह घरखर्चातील काही रक्कम द्यावी, असे मी मनोमन ठरवले होते. विशेष म्हणजे जेव्हा माझ्या तीनही मुलांचे उच्च शिक्षण पूर्ण झाले, तेव्हापासून आजवर मी अविरत या नियमाचे पालन करत आहे', असे भावना सांगतात.

समाजसेवेतील आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल बोलताना भावना सांगतात की, 'मला लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती. माझे आई-वडील हे समाजपयोगी कामे करत असत तसेच अनेक गरजूंना मदतदेखील करत असत. माझे वडील पन्नास घरगड्यांची नावे ‘रात्रशाळेत’ घालत व त्यांचा खर्च करत. आई घरातील कपडे बोहारणीला न देता मोलकरणीला देई. ते सर्व मी पाहात होते. त्यामुळे समाजसेवेचे बाळकडू मला माझ्या घरातूनच मिळाले. कालांतराने माझे लग्न झाले आणि मी संसारात रमले. या दरम्यान एकदा आम्ही इंदापूरजवळील वानस्ते गावात गेलो. तेथील गरिबी पाहून मला त्या लोकांसाठी काहीतरी करायला हवे, याची जाणीव झाली. तेव्हा त्या परिस्थितीत आम्ही तेथील अंगणवाडीला आवश्यक असलेल्या वस्तू दान करण्याचे ठरवले.' भावना यांनी एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतर त्यांनी पत्रकारितेचा एका वर्षाचा पदविकेचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. आपल्या या समाजसेवेच्या कार्याच्या सुरुवातीबद्दल सांगताना भावना सांगतात की, 'पत्रकारितेच्या शिक्षणामुळे माझा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विस्तारत गेला. सुरुवातीच्या काळात मी वर्तमानपत्रे, टिव्ही, मासिके यांमधून अनेक संस्थांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक शोधून काढले. त्यांच्याशी संपर्क केला असता मला समजले की, प्रत्येक संस्थेच्या गरजा वेगळ्या असतात. त्यानुसार कार्य करण्याचे मी मनोमन पक्के केले. याच दरम्यान गरजू मुलांना व्यवहारी, बोधपूर्ण शिक्षण आणि संस्कार यांची गरज आहे, याची मला जाणीव झाली. तेव्हा मी पंचतंत्र, इसापनीती, संस्कार, शास्त्रीय माहिती, विज्ञानशास्त्र, शिवणकाम, बागकाम, पशुपालन, दुग्धव्यवसाय या विषयांची पुस्तके विकत घेतली. प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर मी मुलांकरिता संदेश लिहिले. असे पुस्तकांचे संच मी अनेक गावांना तसेच संस्थांना दिले. याशिवाय मी लिहिलेले लेख, माझा हिंदूधर्म, छोटे उद्योग, ग्रामीण भागात करण्यासारखे व्यवसाय, आदर्श गाव-आदर्श शाळा यांच्या प्रतींचे वाटप केले. आजवर त्यांनी गरीब गरजू महिलांना स्वखर्चाने ४५ शिवणयंत्रांचे वाटप केले आहे. तर विविध गावांमध्ये सहा हजार पुस्तकांचे वाटप केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक संस्थांना खेळाच्या सामानाचे वाटप तसेच फर्स्ट एड किटचे वाटप केले आहे. याशिवाय अंध मुलांकरिता काही विशेष कार्य करावे म्हणून त्यांनी गोष्टींचे मुद्रण करुन त्याच्या कॅसेट्स तयार केल्या. याशिवाय हिंदू धर्माची माहिती, समाजसुधारणा याविषयीची माहितीदेखील रेकॉर्ड करुन त्यांनी त्याचे संच तयार केले. ते संच त्यांनी अनेक संस्थांना भेट दिले. देवळातील देवीसमोर खण ठेवण्यापेक्षा आदिवासी महिलांना ब्लाऊजपीस देण्याचा उपक्रम त्या राबवतात.'

माझ्या या समाजकार्यात माझ्या कुटुंबाने मला मोलाची साथ दिली आहे, असे भावना सांगतात. त्या पुढे सांगतात की, 'माझे पती माझ्या प्रत्‍येक उपक्रमात उत्‍साहाने भाग घेतात. आमच्‍या कृतींचा संस्‍कार मुलांवरही होऊ लागला. मी गरजू मुलांना खेळणी वाटप करत असे. माझ्या मुलांची खेळणी खेळून झाली, की ते मला ती खेळणी गरजू मुलांना देण्‍यास सुचवत.' आपल्या या समाजकार्यात आलेल्या एका अनुभवाबद्दल बोलताना भावना सांगतात की, 'माझ्या एका मैत्रिणीने मला एका बालगुन्हेगाराची माहिती दिली. गुन्ह्याच्या वेळेस तो लहान होता. त्याची मुक्तता करताना न्यायाधीशांनी सांगितले होते की, या मुलास जर चांगला रोजगार उपलब्ध करुन दिला, तर तो योग्य मार्गास लागेल. तेव्हा माझ्या मैत्रिणीने माझ्याशी संपर्क करुन मी त्या मुलास मदत करू शकते का, अशी विचारणा केली होती. तेव्हा मी त्या मुलास एक शिवणय़ंत्र दिले. आज तो मुलगा भिवंडीत स्थायिक असून, शिवणकामाद्वारे आपला उदरनिर्वाह करत आहे. अशाप्रकारे मी आजवर अनेक व्यक्तींना  शिवणयंत्र देऊन रोजगारास सहाय्य केले आहे.' भावना यांची मुले परदेशात स्थायिक आहेत. त्यामुळे त्यादेखील बराच काळ परदेशात वास्तव्यास होत्या. तेव्हा त्यांना तेथील समाजकार्याचा परिचय झाला. त्याबाबत बोलताना त्या सांगतात की, 'आपण तेथील चर्चमध्ये भेटण्याची वेळ ठरवून जायचे. तेथे जुने कपडे, वस्तू, खेळ इत्यादी द्यायचे. तेथील स्वयंसेवक त्या वस्तू गरिब, गरजूंना वाटतात. भारतीय लोक देऊळ, गुरुद्वारा, मॉल या ठिकाणी ‘ड्रॉप बॉक्स’ ठेवतात. त्यात तुम्ही कपडे, खेळणी, इतर वस्तू दान करू शकता. त्या वस्तू जहाजांमधून भारतात आणून त्‍याचे वाटप करण्याचे काम चालू आहे. भूकंप-त्सुनामीत अशाच प्रकारे मदतीचे वाटप झाले. 'ख्रिश्चन एड' इत्यादी संस्थांतर्फे तर एखाद्या मुलाचे पालकत्व घेता येते. तुम्हाला एक कार्ड दिले जाते, त्यावर त्या मुलाचा फोटो असतो. अमेरिकेतही बेरोजगार, बेघर लोक हिंडत असतात, पण त्यांची सोय रात्री अनाथाश्रमात केली जाते. तेथे ट्रेनमधल्या स्लीपर्सप्रमाणे चार थरांचे पलंग व सामायिक बाथरूम असते. तेथील गृहिणी स्वत: जॅम बनवून चर्चमध्ये नेऊन देतात. बहुविकलांगांसाठी अनेक एकर जागा असते. त्यात ते रोपवाटिका तयार करणे, पुष्पगुच्छ तयार करणे अशी कामे आनंदाने करताना दिसतात.'

भावना यांना या समाजकार्यासाठी आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ 'जनसेवा पुरस्कार', २००७ साली महात्मा गांधी सेवा समिती सन्मानचिन्ह, महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनातर्फे समाजसेविका पुरस्कार - २००९, माऊली शिक्षण प्रसारक मंडळातर्फे 'स्वामी विवेकानंद आदिवासी मित्र पुरस्कार - २००९', समतोल फाऊंडेशन सन्मानचिन्ह २०१०, श्रमिक मुक्ती संघ सन्मानचिन्ह २०११, आदिवासी संघटना आणि जनसेवा फाऊंडेशन सन्मानचिन्ह – २०१२, मुंबई नागरिक समिती सन्मानचिन्ह २०१३, मुक्ताई अनाथाश्रम सन्मानचिन्ह २०१५ या पुरस्कारांनी भावना यांना आजवर सन्मानित करण्यात आले आहे. ‘देश माझा- मी देशाचा’ ही भावना असेल तर तुमच्याही हातून अशी सेवा सहज घडेल, असा सल्ला त्या आजच्या पिढीला देतात.  

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

 कचरा वेचकमुलांना स्थान मिळवून देणा-या ‘वंचितांचा रंगमंच’च्या रंगकर्मी हर्षदा बोरकर!

अक्षरश: हजारो महिला उद्योजिकांच्या ‘दिपस्तंभ’ ठरल्या आहेत ‘आम्ही उद्योगिनी’च्या ‘मीनलताई मोहाडीकर’!

मदर तेरेसांकडून मिळाला समाजसेवेचा वारसा - पलक मुच्छल