हरवलेला ‘चिवचिवाट’ पुन्हा जागविण्यासाठी प्रयत्नशील प्रमोद माने

0

जवळपास सगळ्याच लहान बाळांना सर्वात पहिली सांगितली जाणारी गोष्ट असते ती चिऊ-काऊची. या गोष्टीतले चिऊ-काऊ मग लहान मुलांच्या विश्वातला एक भाग होऊन जातात. मग कधी कधी या सानुकल्यांना जेवण भरवतानाही ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ म्हणत खाऊ घातले जाते. काही वर्षांपूर्वी अशी गोष्ट सांगितली जात असतानाच एखादी चिऊताई चिवचिव करत घरासमोर यायची आणि लहान मुल चिऊताईला पटकन ओळखायचे. आता मात्र ही चिऊताई कुणालाच दिसेनाशी झाली आहे. दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. याबाबत आजवर अनेक माध्यमांमधून बोलले गेले. मात्र या समस्येवर उपाय शोधणारे, चिमण्या वाचविण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करणारे मोजकेच आहेत. यापैकीच एक म्हणजे प्रमोद माने.

रुईया महाविद्यालयातून पॉलिटीकल सायन्स घेऊन बीए झालेला प्रमोद चिमण्यांची संख्या वाढविण्याकरिता २००७ सालापासून प्रयत्नशील आहे. “चिमण्यांच्या घटत्या संख्येबाबत बऱ्याच वर्तमानपत्रांमधून वाचलं होतं. मात्र या समस्येवर उपाय म्हणून काय करता येईल याबाबत कुठेच काही उल्लेख नव्हता. तेव्हा मी आणि माझ्या मित्रांनी याविषयी नेटवर माहिती शोधली आणि आमच्या लक्षात आलं की चिमण्या कधीच झाडावर घरटं करत नाहीत. त्या नेहमी एखाद्या मोठ्या छिद्रात, बाल्कनीतील पोटमाळ्यावर, एखाद्या कोपऱ्यात, दोन भिंतींमधल्या बोळात घर करतात. मात्र दिवसेंदिवस वाढलेल्या शहरीकरणामुळे, पारंपारिक घरांऐवजी बॉक्स टाईप फ्लॅट आणि काचेच्या इमारती उभ्या राहिल्यामुळे चिमण्यांना घरटी बांधायला जागाच शिल्लक राहिली नाही आणि हेच चिमण्यांची संख्या घटण्यामागचं मुख्य कारण ठरलं आहे. तेव्हा मी चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनवून ती जागोजागी लावण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मी ‘स्पॅरोज शेल्टर’ नावाची संस्था सुरु केली. या संस्थेअंतर्गत आम्ही लाकडाची घरटी बनवतो आणि ती लोकांच्या बाल्कनी, टेरेस, बॉक्स ग्रील खिडकी अशा ठिकाणी फिक्स करतो,”असं प्रमोद सांगतो. ही घरटी बसवताना तिथे थेट ऊन किंवा पाऊस येणार नाही, घरटे कावळे किंवा घारीच्या नजरेस पडणार नाही अशापद्धतीने बसविले जाते. जेणेकरुन चिमण्यांना हे घरटे अंडी घालण्यासाठी सोयीचे होईल: कावळे, घारी पिल्लांना खाणार नाहीत.

आजवर ‘स्पॅरोज शेल्टर’च्या माध्यमातून प्रमोदने ५० ते ६० हजार लोकांपर्यंत कृत्रिम घरटी पोहचविली आहेत. या अभियानाच्या यशस्वीतेसाठी विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रीटीजना त्याने घरटी भेट म्हणून दिली आहेत. “आतापर्यंत बसविलेल्या घरट्यांपैकी ७० ते ८० टक्के घरट्यांमध्ये चिमण्यांनी घर केले आहे. चिमण्या वर्षातून दोन वेळा प्रत्येकी तीन अंडी घालतात. यानुसार ढोबळ गणित मांडल्यास आतापर्यंत चिमण्यांच्या जवळपास तीन लाख पिल्लांनी या घरट्यांमध्ये जन्म घेतला असं म्हणता येईल,” असं प्रमोद सांगतो.

घरटी बनविण्यासाठी प्रमोदने धारावीमध्ये एक वर्कशॉप सुरु केले आहे. तिथे चार कारपेन्टर घरटी बनविण्याचे काम करतात. “२०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतची घरटी आमच्याकडे उपलब्ध आहेत. विविध साईज आणि डिझाईनमध्ये ही घरटी उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत ६०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत आहे. छोट्या घरट्यात एका चिमणीचं कुटुंब राहू शकतं तर मोठ्या घरट्यांमध्ये २ ते ३ चिमण्यांची कुटुंब राहण्याएवढी जागा असते. काही केवळ फीडर आहेत. जिथे पक्ष्यांना केवळ दाणे खाण्यासाठी, पाणी पिण्यासाठी बसण्याची सोय असते. असे फीडर्स २०० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत,” प्रमोद सांगतो. पूर्वी किराणा मालाच्या दुकानासमोर पोत्यातून पडलेले धान्य पक्ष्यांना दाणा मिळण्यासाठी उपयोगी यायचे. मात्र आता मॉल आणि सुपरमार्केट संस्कृतीमध्ये दुकानाबाहेर पडलेले धान्य पहायला मिळत नाही. परिणामतः पक्ष्यांना दाण्याची वानवा भासू लागली आहे. हे सुद्धा चिमण्यांच्या घटत्या संख्येचे एक कारण आहे. ‘स्पॅरोज शेल्टर’ने फीडरच्या माध्यमातून चिमण्यांच्या राहण्याबरोबरच पक्ष्यांच्या दाण्याचीही व्यवस्था केली आहे.

प्रमोदने www.sparrowshelter.org.in या नावाने वेबसाईट सुरु केली आहे. घरटे लावण्यापूर्वी पक्षी त्या ठिकाणी आकर्षित होतील यासाठी काय करावे, घरटे कुठे लावावे, फीडर घरट्यापासून किती अंतरावर असावे यासह चिमण्यांच्या विषयीची खूप चांगली माहिती या वेबसाईटवर देण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यामातून तुम्ही घरटे आणि फीडर ऑनलाईन ऑर्डर करु शकता किंवा 9867633355 या प्रमोदच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करुनही तुमची ऑर्डर नोंदवू शकता. ‘स्पॅरोज शेल्टर’चे स्वयंसेवक तुमच्याकडे येऊन योग्य पद्धतीने घरटे बसवूनही देतात.

चिमण्यांबरोबरच या घरट्यांमध्ये रॉबिन बर्ड, बुलबुल असे छोटे पक्षीही अंडी घालत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या पक्ष्यांचेही संरक्षण-संवर्धन होत असल्याचे प्रमोद सांगतात. रॉबिन बर्ड, पोपट अशा पक्ष्यांसाठीही खास घरटी आणि फीडर संस्थेच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत. “आमच्या उपक्रमामुळे चिमण्यांची संख्या वाढत असली तरी नष्ट होणाऱ्या चिमण्यांच्या तुलनेत नव्याने जन्माला येणाऱ्या पिल्लांचं प्रमाण फारच कमी आहे. चिमण्यांप्रमाणे इतर छोट्या पक्ष्यांचं प्रमाणही कमी होत आहे. त्यामुळे या छोट्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न व्हायला पाहिजेत,” असं प्रमोद सांगतो. याचकरिता या संस्थेने एकाचवेळी हजार पक्ष्यांना दाणा-पाणी, निवारा आणि संरक्षण देऊ शकेल असा ‘बर्ड गॅलरी’ प्रोजेक्ट सुरु केला आहे. हा प्रोजेक्ट राबविला गेल्यास भविष्यात छोट्या पक्ष्यांची संख्या तिप्पटीने वाढेल असा त्यांना विश्वास वाटतो.

“चिमणीला राज्य पक्ष्याचा दर्जा मिळाला पाहिजे जेणेकरुन तिच्याबाबत कायदे बनतील. वेगवेगळ्या स्तरांवर तिची दखल घेतली जाईल. कॉलेजमध्ये चिमणीवर प्रोजेक्ट ठेवले जातील, वैद्यकशास्त्रात तिला आवश्यक औषधांचा विचार होईल, सरकारकडून तिच्या संवर्धनासाठी हेल्पलाईन चालवली जाईल, जी आजतागायत चालवली गेली नाही. एकूणच चिमणीचं संरक्षण आणि संवर्धन यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होतील,” असं प्रमोद सांगतो. प्रमोदने मुख्यमंत्र्यांनाही चिमण्यांचे कृत्रिम घरटे भेट देऊन चिमणीला राज्य पक्ष्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.

प्रमोद पुढे सांगतो, “स्थलांतरित परदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी गर्दी करणारे लोक आपल्या पक्ष्यांबद्दल मात्र फार जागरुक नाहीत. परदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी दुर्बिण घेऊन जाणं किंवा नेचर ट्रेल करणं म्हणजे पक्षीप्रेम नव्हे. पक्षी केवळ आपल्या हौसे-मौजेसाठी नाहीत. ते ही जीव आहेत आणि परदेशी पक्ष्यांचं सौंदर्य पहायला जाण्याबरोबरच आपण आपलं वैभवही टिकवायला पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला पाहिजे. माझ्या या प्रवासात असे वरवरचे पक्षी प्रेमी बरेच भेटले. मात्र त्यांच्याबरोबरच खूप चांगली माणसंही भेटली. एका प्रदर्शनात मी घरटी घेऊन एकटाच स्टॉलवर उभा होतो. एका ७० वर्षांच्या काकांना जेव्हा माझ्या कामाबद्दल समजलं तेव्हा मला मदत करण्यासाठी ते स्वतःहून दुपारी एक वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत माझ्याबरोबर थांबले. अशा लोकांमुळे काम करायला नवी ऊर्जा मिळते. हुरुप वाढतो.”

चिमण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 'स्पॅरोज शेल्टर' या संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबविले जातात. विविध सोसायट्या, मॉल, शाळा, कंपन्यांच्या आवारात प्रदर्शन आयोजित करुन लोकांना याकरिता प्रेरित केले जाते. भविष्यात ही संस्था बंद व्हावी हे प्रमोदचे स्वप्न आहे. तो सांगतो, “माझ्याप्रमाणे अनेकांनी चिमण्यांच्या आणि छोट्या पक्ष्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी सक्रिय व्हावं. जेणेकरुन भविष्यात ही समस्या सुटावी आणि अशा संस्थेची गरजच पडू नये.”

आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या लहानपणीच्या छोट्याश्या विश्वातील चिऊताईला वाचविण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न केले तर प्रमोदचे हे स्वप्न निश्चितच साकार होऊ शकेल आणि आपल्या पुढच्या पिढीलाही चिऊताई प्रत्यक्ष पहाता येईल.