‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, भारतीय सेन्सॉर बोर्डाचा नवा बळी!

 ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, भारतीय सेन्सॉर बोर्डाचा नवा बळी!

Sunday February 26, 2017,

2 min Read

गेल्या काही वर्षात, केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळाने (सीबीएफसी) अनेक चुकीच्या गोष्टीमध्ये प्रसिध्दी मिळवली आहे. मग ती उडता पंजाब वरून उठवलेली राळ असो की, ऑस्कर विजेत्या ‘मूनलाइट’मध्ये प्रमाणित करताना अनावश्यक कात्री लावण्याचे प्रकरण असो. केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळाने पुन्हा एकदा नवा बखेडा तयार केला आहे, तो म्हणजे ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ ला त्यात ‘महिलाधार्जिणेपणा’ आणि ‘अपशब्द’ वापरल्याचे कारण देवून प्रमाणपत्र नाकारून! 


Image Source: India Today

Image Source: India Today


‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा सिनेमा आहे चार वेगवेगळ्या वयाच्या महिलांच्या व्यक्तिस्वातंत्र्याबाबतच्या आणि त्यावरील बंधनाबाबतच्या कहाणीचा. प्रकाश झा यांचा हा सिनेमा असून त्यात रत्ना पाठक-शहा, कोंकणा सेन-शर्मा, आहान कुमरा, प्लाइत बोरठाकूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तव यांनी केले आहे, ज्यांनी अलिकडेच ‘टर्निंग३०’ देखील दिग्दर्शित केला होता. या सिनेमाने आधीच लिंगसमानतेबाबत सर्वोत्तम सिनेमाचा ‘ऑक्सफँम पुरस्कार’ मुंबई सिने महोत्सवात मिळवला आहे, त्याच बरोबर टोकिओ येथे आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवात ‘स्पिरिट ऑफ आशिया’ हा सन्मानही पटकाविला आहे. 

ज्या सिनेमाला या पूर्वीच प्रतिष्ठीत सिनेमहोत्सवात पुरस्कार मिळाले आहेत, त्याला टीका करत प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात आला आहे. सीबीएफसी ने त्यांच्या पत्रात नमूद केले आहे की, ‘कहाणी महिला प्रधान आहे, त्यांचे कल्पनाचित्र वास्तवापलिकडचे आहे. यात सातत्याने लैंगिक दृश्य आहेत, अपशब्द आहेत, आवाजातील अश्लिलता आहे, आणि समाजातील विशिष्ट घटकांबाबत वेगळा भाव आहे.

दिग्दर्शकांनी मात्र त्यावर बोलताना माध्यमांना सांगितले की, “ मी शेवटपर्यंत या विरुध्द लढेन. आणि काहीही करेन कारण हे फक्त माझ्या सिनेमासाठी नाही. खरा प्रश्न आहे तो महिलांचे प्रश्न मांडणारा त्यांचा आवाज दाबून टाकणा-या वृत्तींचा, आणि अभिव्यक्तिच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या वृत्तीचा. मी वाकायला नकार दिला आहे. अशा देशात जेथे महिलांबाबत खूप प्रकारचा भेदाभेद केला जातो, खूप प्रमाणात हिंसाचार केला जातो, महिलांच्या कहाण्या त्यांच्या मनोभूमिकेतून पहायला नकोत का? आमच्या सिनेमाला प्रमाणपत्र देण्यास नकार देणे हे मी महिलांचे हक्क नाकारण्याचा प्रमाद मानते.” 

दिग्दर्शकांना धक्का बसला की, जो सिनेमा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला त्याला भारतीय भूमीत प्रमाणन मंडळाची अनुमती मिळत नाही. या सिनेमाच्या पाठिंब्यासाठी चित्रपट जगतानेही आवाज उठवला आहे, या सिनेमाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रेक्षकांनाही सेन्सॉर मंडळाच्या कृतीने धक्का बसला आहे.

हा सिनेमा महिलांना नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळ्या पध्दतीने सादर करतो, आणि त्यालाच दोन सिनेमहोत्सवात दाद मिळाली आहे, त्यामुळेच हा बहुप्रतिक्षित सिनेमा झाला आहे. चला अपेक्षा करूया की, भारतीय सेंन्सॉर मंडळाला जाग येईल, आणि भारतीय दर्शकांची निराशा होणार नाही.

- थिंक चेंज इंडिया