अण्णा हजारे यांच्या जीवनकथेतील तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी, खुद्द अण्णांच्या भेटीतून जाणूया- भाग पहिला

अण्णा हजारे आधुनिक भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली सामाजिक कार्यकर्ता आहेत. देशाच्या बहुमुखी विकास, जनतेचे भले, आणि लोकशाहीला मजबूत करण्याच्या कामी त्यांनी अनेक महत्वाची आंदोलने केली. भ्रष्टाचार, गरीबी, मागासलेपणा, बेरोजगारी सारख्या समस्यांशी त्यांचा लढा सुरूच आहे. आपले जन्मगाव राळेगणसिध्दीला आदर्श गाव करून त्यांनी ग्रामीण विकासाचे एक मूर्तीमंत उदाहरण घालून दिले आहे त्यातून प्रेरणा घेऊन अनेक गावे आदर्श गावे झाली आहेत. अण्णानी दिलेल्या मार्गाने देशभरात ग्रामसमृध्दीचा प्रयत्न निरंतर सुरु झाला आहे.माहितीचा अधिकार आणि लोकपाल विधेयकाच्या मुद्यावर अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या आंदोलनात देशाच्या सामान्य जनतेला एकत्र केले. लोकांचा अण्णांवर इतका विश्वास होता की लहान मुले काय, तरूण काय, वयोवृध्दसुध्दा भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्यात उतरले आणि म्हणू लागले की, ‘मी अण्णा, तू अण्णा सारा देश अण्णा’ सामाजिक कुप्रथांविरुध्द लढताना कोट्यावधी देशवासीयांना एकत्र करणा-या या महान योध्द्याला त्यांच्या क्रांतीकारी जीवनातील महत्वाच्या घटनांबाबत त्यांच्याकडूनच ऐकण्यासाठी आम्ही वेळ मागितला होता. काही दिवसापूर्वी यूअर स्टोरी सोबत खास मुलाखती दरम्यान अण्णांनी किसनचा अण्णा कसा बनला याचा प्रवास उलगडून दाखवला होता. अण्णांनी आमच्याशी बोलताना बालपणीच्या आठवणी सांगितल्या. भारतीय सैन्यात काम करत असताना आलेल्या रोमांचक आणि ऐतिहासीक अनुभवांबाबत सांगितले. त्यांनी अशाही गोष्टी सांगितल्या ज्या लोकांना अद्याप ज्ञान नाहीत. अशाच प्रकारच्या अनेक महत्वाच्या ऐतिहासीक गोष्टी आम्ही या ठिकाणी उलगडणार आहोत त्या श्रृंखलेतील ही पहिली कडी-

0

अण्णा हजारे यांचा जन्म अहमदनगर शहराजवळच्या भिंगार भागात झाला. तसेच त्यांच्या पूर्वजांचे गाव राळेगणसिध्दी हेच आहे पण अण्णांचे आजोबा कुटूंबाच्या उदर निर्वाहासाठी भिंगार येथे रहात होते. अण्णा म्हणाले की राळेगणसिध्दी मध्ये कुटूंबाची शेती होती पण तेथे नेहमी दुष्काळी स्थिती असे त्यामुळे शेतीचे उत्पन्न असून नसल्यागत होते. त्यामुळे त्याचे आजोबा कुटूंबा सोबत भिंगार येथे आले होते.

अण्णा यांचे आजोबा इंग्रजांच्या सैन्यात जमादार होते. त्यांचे वडीलकाका, आत्या आणि इतर सारे जवळचे नातेवाईक भिंगार मध्ये रहात होते. ते बाबूराव हजारे आणि लक्ष्मीबाई यांचे पहिले अपत्य होते. आईवडील धार्मिक वृत्तीचे असल्याने ईश्वरावर त्यांचा अतूट विश्वास होता. बाबूराव आणि लक्ष्मीबाई यांनी पहिल्याच अपत्याचे नाव किसन असे ठेवले. किसन सर्वांचे लाडके होते. सारेच त्यांचे लाड करत सारे लहानग्या किसनला खेळवत असत.

अण्णांना अजूनही ते दिवस आठवतात जेंव्हा घरात त्यांना खुश करण्यासाठी त्याचे हट्ट पुरवले जात असत. अण्णा म्हणाले की, कितीही लाडका असले तरी घरच्यांना त्यांचे सारेच काही कोडकौतूक पूरवता येत नसे जे सारे आई-वडील आपल्या मुलांसाठी करत असत. अण्णा म्हणाले की, “इतका लाडका असूनही इतरांच्या घरात होत तसे लाड आर्थिक स्थितीमुळे करता आले नाहीत”

चवथ्या वर्गा पर्यंत अण्णांनी भिंगार मध्येच सरकारी शाऴेत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांच्या मामांनी त्यांना त्यांच्यासोबत मुंबईला नेले. मामांना केवळ एकच मुलगी होती आणि त्यांनी अण्णाच्या आई वडीलांना सांगितले की किसनला त्याच्यासोबत मुंबईला पाठवावे. मामानी सांगितले की ते किसनला सख्या मुलाप्रमाणे सांभाळतील. मामांचे असेही म्हणणे होते की त्यांची एकुलती मुलगी मोठी होऊन तिच्या सासरी गेल्यावर ते एकटेच राहणार आहेत. बाबूराव आणि लक्ष्मीबाई यांची आणखी मुले होती त्यामुळे मामांनी किसनला त्याच्या सोबत नेण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला सा-यांनी मान दिला. कारण कुटूंबाची आर्थिक स्थिती हालाकीची होती. आणि मामानी किसनच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे लाडक्या किसनला आई वडीलांनी मामासोबत मुंबईला पाठविले. मात्र जितके दिवस अण्णा भिंगारला राहिले तितके दिवस त्यांचे बालपण सामान्य मुलांसारखे खेळण्यात आणि शिकण्यात गेले.

लहानपणी अण्णांना खेळण्याचा छंद होता. जेंव्हा संधी मिळे ते सवंगडयांना घेऊन खेळायला जात. त्यांना पतंग उडवायला आवडे. त्यांचे बालमनही पतंगाप्रमाणेच उड्डाण घेत असे. आपला पतंग आकाशात उडताना पाहून त्यांना खूप आनंद होत असे. पतंग जसा उंच जात असे अण्णांचा आनंद दुणावत असे. अण्णांना आकाशात कबुतरे उडविण्याचाही छंद होता. त्यातून त्यांनी कबूतरेही पाळली होती. प्रेमाने ते कबूतरांना पकडून आकाशात उडवत असत. आकाशात कबूतरे उडाली की त्याचे मन भरून येत असे. गावाच्या इतर मुलांसोबत अण्णांनी गोट्याही अनेकदा खेळल्या आहेत.

मातीच्या गोळ्यानी खेळणेही अण्णांना खूप आवडत असे. एका गोळीला दुस-या गोळीने उडवताना त्यांच्या आनंदाला पारावार रहात नसे. बालपणीच्या आठवणी आमच्यासोबत सांगताना अण्णा म्हणाले की, कबूतरे मी आकाशात सोडत असे, ती जेव्हा गिरक्या घेत असत ते पाहुन आनंद होत असे. कबूतरांना सुध्दा किती ज्ञान असते दूर सोडून येत असे तरी ती बरोबर परत येत असत.” अण्णा हे सांगायला अजिबात कचरत नाहीत की खेळात लक्ष दिल्याने त्यांच्या शिकण्यावर दुर्लक्ष झाले. अण्णा आम्हाला म्हणाले, “ मी खेळाच्या छंदामुळे जास्त शिकू शकलो नाही. तसे मी शिक्षणात चांगला होतो घरी अभ्यास न करताही शाळेत माझा पहिला क्रमांक येत असे. कारण शिक्षक शिकवत तेंव्हा मी लक्ष देऊन ऐकत असे ते लक्षात रहात असे.” अण्णा शाळेत गेले की लगेच मित्रांसोबत खेळायला जात. त्यातच इतके मग्न रहात की वेळेचे भान रहात नसे. थकून भूक लागली की घरी जात असत. रोज सायंकाळी सात साडे सात वाजेपर्यंत ते बाहेर मित्रांसोबत खेळत.

राळेगणसिध्दी येथील यादवबाबा मंदीरात झालेल्या या खास मुलाखती दरम्यान अण्णांनी आम्हाला जीवनात पहिल्यांदा आणि शेवटचे खोटे बोलले त्याबद्दलची घटना सांगितली. शालेय जीवनातील त्या घटने नंतर पुन्हा ते कधीच खोटे बोलले नाहीत.

त्यावेळी अण्णा शाळेत चौथ्या वर्गात शिकत होते त्यावेळची ही पहिले आणि शेवटचे खोटे बोलण्याची घटना घडली. नेहमी प्रमाणे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला होता,म्हणजे शाळा झाल्यानंतर घरून येताना वहीत काही अभ्यास करून आणायला सांगितले होते. शाळा सुटल्यावर अण्णा घरी अले मात्र नेहमी च्या सवयीनुसार खेळायला गेले. उशीर झाला तरी ते मित्रांसोबत खेळत राहिले. ते इतके खेळले की घरी येताच त्यांना थकवा आला आणि झोप येऊ लागली. दुस-या दिवशी गृहपाठ न करताच ते शाळेत पोहोचले. शिक्षकांनी जेंव्हा वह्या तपासायला सुरुवात केली तेंव्हा ते घाबरले, त्यांना काही समजेनासे झाले की काय करावे? जेंव्हा शिक्षकांनी अण्णांना गृहपाठ दाखवायला सांगितले तेंव्हा ते खोटं बोलले. त्यांनी शिक्षकांना सांगितले की त्यांनी गृहपाठ केला आहे पण वही घरी विसरून आले आहेत. शिक्षकांनी घरी जाऊन वही आणायला सांगितले. अण्णांनी घरी जाणेच पसंत केले.

अण्णांचे आईवर खूप प्रेम होते. तिच्यापासून ते काही लपवत नसत. घरी येताच त्यांनी आपली चूक आईला सांगितली, आणि तिच्यासमोर असा प्रस्ताव ठेवला की ते ऐकून आईला राग आला. अण्णा म्हणाले की ते गृहपाठ पूर्ण करतील पण त्या दिवशी शाळेत जाणार नाहीत. पण ते दुस-या दिवशी जेंव्हा शाळेत जातील तेंव्हा आईला पण शाळेत जावे लागेल. आणि शिक्षकांना हे सांगावे लागेल की, जेंव्हा त्यांचा मुलगा शाळेतून घरी आला तेंव्हा त्याला तिने काही महत्वाच्या कामासाठी बाहेर पाठविले त्यामुळे त्याला पुन्हा शाळेत जाता आले नाही आणि हेच सांगायला मी शाळेत आले आहे. अण्णांच्या या प्रस्तावावर आई रागावली आणि ओरडलीसुध्दा. ‘ तू खोट बोलतोस आणि मलाही बोलायला भाग पाडतोस? मी अजिबात खोट सांगणार नाही.’

आईच्या या कठोर वागण्याने अण्णा अजूनच घाबरले. त्यांना वाटले की त्यांची चूक शाळेत पकडली गेली तर शाळेत बदनामी होईल. शिक्षकांचा मार आणि बदनामी यांची भिती त्यांना जास्तच सतावू लागली. आपला शेवटचा प्रयत्न म्हणून त्यानी आईला ही धमकी दिली की, जर ती शाळेत येऊन खोट बोलली नाहीतर ते शाळेत कधीच जाणार नाहीत. अण्णांच्या शब्दात- ‘जर तू उद्या आली नाहीस आणि हे सांगितले नाहीस तर मी शाळाच सोडून देईन. मी जाऊ शकत नाही. हे काळे तोंड मी कसे दाखवू माझी चूक झाली आहे.’

अण्णा म्हणतात की प्रत्येक आईचे मन सारखेच असते. सगळ्या आया सारख्याच असतात. आपल्या मुलांवर सा-या आया सारखेच प्रेम करतात. त्या दिवशी त्यांच्या आईचे मनही त्यांच्या या बोलण्याने वितळून गेले. तिने शाळेत येऊन अण्णांनी सांगितल्याप्रमाणे बोलण्यास होकार दिला. हा प्रसंग सांगताना अण्णांनी भगवान श्रीकृष्ण आणि यशोदा यांच्यातील लोण्याचा गोळा चोरण्याचा प्रसंगदेखील सांगितला. त्यावेळी त्यांनी सूरदास यांच्या ‘मैय्या मोरी मै नही माखन खायो’ या ओळीदेखील उधृत केल्या. ते म्हणाले की, कृष्णाच्या मुखाला लोणी लागले होते तरी त्याने मी खाल्ले नाही असे खोटेच सांगितले. पण आईने जेंव्हा फटकारले तेंव्हा कृष्णानेही आक्षेप घेतले ज्यामुळे आईचे मन वितळले, आणि यशोदेला मुलासाठी म्हणावे लागले की, ‘ तू नही माखन खायो’

ही रोचक गोष्ट आहे की अण्णांचे लहानपणीचे नाव किसन आहे, सारे त्यांना प्रेमाने किसन म्हणून हाक मारत परंतू जेंव्हापासून त्यांनी अन्याय, अत्याचार आणि हिंसा यांच्याविरुध्द आवाज उठविण्यास सुरुवात केली तेंव्हापासून लोकांसाठी ते ‘अण्णा’ म्हणजे मोठे भाऊ बनले.

शाळेत शिक्षकांना खोटे बोलण्याच्या घटनेबाबत सांगितल्यावर अण्णा म्हणाले की, “ तो धडा जो मी शिकलो, आज माझे जे वय झाले आहे, ७९वर्षे तोवर आजपर्यंत खोटे बोललो नाही, आणि ते जे खोटे बोललो ते मी जीवनात कधीच विसरू शकलो नाही” अण्णाच्या जीवनावर त्यांची आई लक्ष्मीबाई आणि वडील बाबूराव यांचा मोठा प्रभाव आहे. अर्थातच जर अण्णा आज या वयातही इतके मजबूत आहेत तर ते त्यांच्या आई-वडीलांच्या संस्कारामुळेच आणि चांगल्या गुणांमुळेच.

पुढच्या भागात अण्णांवर त्यांच्या आई वडीलांचा कसा प्रभाव झाला आहे आणि अण्णा आज त्या़ंची का आणि कशामुळे आठवण करतात हे सांगूया.

Dr Arvind Yadav is Managing Editor (Indian Languages) in YourStory. He is a prolific writer and television editor. He is an avid traveler and also a crusader for freedom of press. In last 19 years he has travelled across India and covered important political and social activities. From 1999 to 2014 he has covered all assembly and Parliamentary elections in South India. Apart from double Masters Degree he did his doctorate in Modern Hindi criticism. He is also armed with PG Diploma in Media Laws and Psychological Counseling . Dr Yadav has work experience from AajTak/Headlines Today, IBN 7 to TV9 news network. He was instrumental in establishing India’s first end to end HD news channel – Sakshi TV.

Related Stories

Stories by ARVIND YADAV