बाल हक्कांसाठी धडपडणाऱ्या ६२ वर्षांच्या नीना नायक 

0

नीना नायक, वय वर्ष अवघं ६२. त्यांचा उत्साह पाहता त्यांचं वय इतकं आहे, हे कुणी सांगू शकणार नाही. समाजसेविका आणि लहान मुलांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या नीना या कर्नाटक राज्य कमिशनच्या माजी अध्यक्षा आहेत.  नीना यांचं देशभरातील बाल हक्कांसाठी केला जाणारा कायदा आणि धोरणाविषयीच्या मोहिमांमध्ये विशेष योगदान आहे. बाल हक्क आणि विकास या क्षेत्रात गेली ३० वर्ष कार्यरत असल्याने त्यांच्याकडे या संबंधीच्या माहितीचा खजिनाच आहे. व्यवस्थेतही काही प्रमाणात बदल करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. नीना म्हणतात, "मला आनंद आहे की, माझ्यासारख्या समविचारी सहकारयासमवेत मी बाल हक्कांसाठी  धोरण बनवणे आणि भारत सरकारतर्फे त्यांची अंमलबजावणी होणे यासाठी भरीव कार्य करू शकले."  (२००० साली, बाल हक्क कायदा आणि २०१२ साली "पोक्सो " 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल एक्ट ' हे या संदर्भातील महत्त्वाचे कायदे.) तरीही भारतासारख्या देशात मुलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी अधिक भरीवरित्या कार्य होणं गरजेचं असल्याचं मत त्या व्यक्त करतात.

त्यांनी या संदर्भातली विविध संस्थामध्ये महत्त्वाची पदे भूषविली आहेत. राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या सदस्या, भारतीय बालकल्याण परिषदेच्या उपाध्यक्षा, तसंच तीन सत्रांसाठी कर्नाटक राज्याच्या बालहक्क आयोग समितीमध्ये त्यांनी दत्तक प्रक्रिया आणि अनेक मुलांना आसरा शोधून देण्याचं काम केलं आहे. 

नीना आपल्या लहानपणीचे किस्से अत्यंत आवडीने सांगत होत्या. एका प्रशस्त कुटुंबात त्या वाढल्या. नीना यांचे वडील प्रशासकीय सेवेत असल्याने, त्याचं शिक्षण देशातल्या विविध भागात झालं. तामिळनाडूचे पोलिस महासंचालक म्हणून त्यांच्या वडिलांची सेवानिवृत्ती झाली आणि अत्यंत सुखमय असा त्यांचा बालपणाचा काळ होता असं त्या सांगत होत्या. मात्र अगदी लहानपणापासूनच त्यांना हक्क असणे आणि नसणे यातला फरक समजू लागला होता. एकदा त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी एका एंग्लो इंडियन विद्यार्थ्याला शेरेदाखल प्रतिक्रिया दिली, त्यावेळी नीना यांनी आपल्या शिक्षकांनाही ते चुकले आहेत याची जाणीव करून दिली. त्यांच्या या कृतीने संतप्त शिक्षकाने त्यांच्या घरी तक्रार सुद्धा केली की एवढ्या लहान मुलीला एवढा राग कसा येऊ शकतो. दया किंवा कणव हे त्यांना घरातूनच मिळालेले धडे होते. त्यांनी त्यांच्या वडिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या अनेकांचे प्रश्न सोडवताना पाहिलं होतं. तर काही वेळा आर्थिक मदत करतानाही पाहिलं होतं.

विशीच्या घरात पोचल्यावर त्यांच्याकडे समाजसेवा शाखेतील पदवी होती आणि त्यांचा विशेष अभ्यासक्रम  कुटुंब आणि बालकल्याण हा होता. त्यांनी आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या मुलांसाठी काम करायला सुरुवात केली आणि आपली आवड जोपासली. " तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्हाला जग बदलायचं असतं. तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला कुणीच अडवू शकणार नाही." हे सांगताना त्या हसत होत्या.

नीना यांच्या मते दत्तक प्रक्रियेचं (सी ए आर ए ) सेन्ट्रल अडॉप्शन रिसोर्स अथोरिटी अंतर्गत केंद्रीयकरण हे योग्य दिशेन टाकलेलं पाउल आहे . सी ए आर ए हे महिला व बाल कल्याण मंत्रिमंडळातर्गत स्वायत्त मंडळ असून, हेग परिषदेच्या तरतुदींनुसार, देशांतर्गत आणि विविध देशांमधील दत्तक प्रक्रियांचा मागोवा घेणं आणि पूर्तता करणं इत्यादी कामं करते . त्यामुळे, कोणत्याही स्वयंसेवी संस्था किंवा खाजगी संस्था दत्तक प्रक्रिया स्वत:हून करू शकत नाहीत. एका अधिकृत दत्तक संस्थेला, ज्या पालकांना मुल दत्तक घ्यायचे आहे, त्यांच्या घराचा संपूर्ण अहवाल तयार करावा लागतो.  या बदलांमुळे अर्थातच, अयोग्य व्यक्तींच्या ताब्यात मुलं जाणार नाहीत आणि गुप्तपणे होणारया मुलांच्या तस्करीलाही आळा बसेल. अजून खरंतर मोठा पल्ला गाठायचा आहे. उदाहरणार्थ, कर्नाटकातल्या ३० जिल्ह्यांपैकी २२ जिल्ह्यांमध्ये अधिकृत दत्तक संस्था आहेत. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यातील मुलं ही या पद्धतीत गणलीच जात नाहीत. 

नीना यांनी दोन मुल दत्तक घेतली आहेत. लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतर  त्यांनी सात महिन्यांची एक मुलगी दत्तक घेतली. या आजारी मुलीचं वजन होत फक्त ३ किलो ! आज तिची हीच मुलगी कला शिक्षिका आहे आणि दोन मुलांची आई आहे. तिच्या सासरकडच्या मंडळीनी सुरुवातीला दत्तक घेण्याला विरोध दर्शवला पण अखेर ते तयार झाले. त्यानंतर काही वर्षांनी कोलकात्याच्या एस आय सी डब्ल्यू मध्ये त्या एका बाळाला भेटल्या. या मुलाच्या हृदयाला छिद्र होतं. नीना यांना माहित होतं की व्यंग असणाऱ्या किंवा आजारी असणाऱ्या मुलांना दत्तक घ्यायला लोक टाळाटाळ करतात. त्याचबरोबर वय वाढलेल्या मुलांना सुद्धा दत्तक घ्यायला लोक नकार देतात. नीना मात्र या मुलाच्या मोहातच पडल्या आणि त्यांनी त्याला दत्तक घेतलं. काही दिवसातच या मुलाची तब्येत सुधारली, तो उत्तम रित्या बॅडमिंटन आणि स्क्वाश खेळतो. आज तो त्याच्या पत्नीसमवेत ऑस्ट्रेलिया मध्ये राहतो.

बालकांच्या विकासासाठी असलेला केवळ तीन टक्के निधी त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याच्या मुद्द्यावर नीना यांनी प्रकाशझोत टाकला. उर्वरित निधी वापरलाच जात नाही. " सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या केंद्रीय विद्यालयांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात येत, तर अंगणवाड्या आणि अन्य सरकारी शाळांमध्ये का नाही ? " असा प्रश्न त्या विचारतात.

नीना यांनी काही काळ राजकारणातही प्रवेश केला होता. आम आदमी पक्षाच्या तिकिटावर त्यांनी बेंगळूरू दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र यात मात्तबर उमेदवारांसमोर त्यांना हार पत्करावी लागली. त्यांना अद्यापही अस वाटतं की तरुण आणि पदवीधारकांनी राजकारणात उतरायला हव ."आज आपण जो भ्रष्टाचार सर्वत्र पाहत आहोत तो शिक्षित  मध्यमवर्गीयांनी शतकानुशतके मतदानाकडे फिरवलेली पाठ आणि त्यामुळे निवडलं गेलेलं सरकार त्याचबरोबर खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या स्वीकारणे  या सर्वांचा परिपाक आहे . " असं मत नीना व्यक्त करतात. आजच्या तरुणांना जाता जाता त्यांनी सल्ला दिला  तो म्हणजे , " तुमची आवड जोपासा, ज्यामुळे काहीतरी बदल घडवू शकाल, तुम्हीच सत्यात आणू शकता एक समान आणि भेदभाव विरहित जग ! " 

लेखिका : शरिका नायर
अनुवाद : प्रेरणा भराडे