गाव तिथे एसटी आणि गाव तिथे मराठी कविताही.... 

0

कवि श्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा वाढदिवस राज्यभर मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी  रेल्वेच्या सर्वच स्थानकावर मराठी अभिमान गीत दिवसभर प्रसारीत करण्यात येत होते. ठिकठिकाणी कार्यक्रम हाती घेण्यात आले. सरकारी, निमसरकारी आणि खासगीही. उद्देश एकच मराठी भाषेचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा आणि मराठी भाषा नव्या पिढीशी जोडली जावी. मुलांना जिथं इंग्रजी शाळेत टाकण्याचं फॅड निर्माण झालंय. यामुळेच हे सर्व उपक्रम आपली मराठी भाषा जपावी आणि समृध्द व्हावी यासाठी करण्यात येत होते. यात महाराष्ट्र रस्ते वाहतुक महामंडळ कसं मागे राहिल, त्यांनी एक आगळावेगळा उपक्रम सुरु केलाय 'गाव तिथं एसटी आणि गाव तिथं मराठी कविता'. मुंबई सेंट्रल आगारात या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यंदा पहिल्यांदाच सर्वच एसटी आगारांमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. 

एसटी बसेसला लाल डब्बा म्हटलं जातं. आता हा लाल डब्बा गावागावात जाऊन मराठी कवितेचा प्रचार आणि प्रसार करणार आहे. मराठी कविता ही समृध्द आहे. या कवितेला कुसुमाग्रज, नामदेव ढसाळ आणि अरुण कोल्हटकर सारख्या कवींनी जगभरात नेलं. जगभरात यामराठी कवितेला वाहवाही मिळाली अशी ही कविता आता खेडोपाडी नेण्याचं काम एसटी करणार आहे. कुसुमाग्रज, वि.म. कुलकर्णी, सुरेश भट, फादर स्टीफन्स यांनी मराठी भाषेवर रचलेल्या कविताच्या रचना १८ हजार ५०० एसटी बस आणि ५६८ बस स्थानकावर लावण्यात येणार आहेत. यामुळे मराठी कविता आणि त्याद्वारे मराठी भाषा गावागावात पोहचण्यात मदत होईल अशी आशा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केली आहे. 

मराठी भाषेच्या प्रसारासाठी हा उपक्रम हाती घेण्याची घोषणा परिवहन मंत्रालयातर्फे आधीच घेण्यात आला होता. याची अंमलबजावणी आता करण्यात येत आहे. गावागावात जाणाऱ्या लाल रंगाच्या या बसेसवर आता या कविता चिटकवण्यात येणार आहे. ज्यामुळे मराठी कविता आणि मराठी भाषा दोन्ही गावागावात पोचतील अशी ही यामागची भावना आहे. 

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मराठी अभिमान गीताला संगीतबध्द करणारे कौशल इनामदार यांनी या उपक्रमाची प्रशंसा केलीय. अमराठी भाषिकांनी तोडकी मोडकी का होईना पण मराठी बोलायला हवी, या भाषेचं स्वागत करायला हवं असं म्हटलं आहे. मराठी भाषेतली गाणी एफएम चॅनल्सवर वाजवण्यासंदर्भात कौशल यांनी मोहिम उघडली होती. त्याला ही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गाव तिथं धावणारी ही एस टी मराठी कविता आणि मराठी भाषेचा प्रचार करणार असल्यानं त्याचा फायदाच होईल असं म्हटलं जातंय. 

आणखी काही नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.