“शरीरसौष्ठव हे माझे पहिले प्रेम, “दंभ”मुळे यात तडजोड होणार नाही”- जागतिक शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले

“शरीरसौष्ठव हे माझे पहिले प्रेम, “दंभ”मुळे यात तडजोड होणार नाही”- जागतिक शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले

Wednesday December 09, 2015,

3 min Read

काही महिन्यापुर्वी दसऱ्याच्या निमित्ताने लेखक दिग्दर्शक प्रसाद अप्पा तारकर यांच्या दंभ या आगामी मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर सोशल साईटवर प्रदर्शित केले गेले. शरीरसौष्ठवपटू संग्राम चौगुले याचा त्यावरचा फोटो या पोस्टरचे आकर्षण होते. मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर वर्ल्ड, मिस्टर एशिया, मिस्टर इंडिया हे किताब संग्रामने पटकावलेत. दंभ या सिनेमातनं हा जागतिक स्तरावरचा शरीरसौष्ठवपटू सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. दंभ म्हणजे शेवटची आशा आणि संग्राम सिनेमात दंभच्या म्हणजेच या सिनेमाच्या शीर्षक भुमिकेत दिसणार आहे. किंग़डम ऑफ फिल्मसची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे शुट सुरु होण्याच्या मार्गावर आहे.

image


मनोरंजन क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना दंभच्या निमित्ताने मिळालेल्या अभिनयाच्या संधीबद्दल संग्राम उत्साहात आहे. ही संधी कशी मिळाली याबद्दल संग्रामने सांगितले की, “दंभ सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रसाद अप्पा तारकर यांची बहिण मयुरी राणे ही माझी जवळची मैत्रीण, तिच्या माध्यमातनच प्रसाद यांनी माझे बॉडीबिल्डींगचे फोटो पाहिले होते, खरेतर तेव्हा ते दंभ सिनेमासाठी कलाकारांची जुळवाजुळव करत होते, माझे फोटो पाहिल्यानंतर मला एका मध्यरात्री दीड वाजता त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला दंभच्या या भूमिकेसाठी विचारले. योगायोगाने त्याआधीच दोन वर्षांपूर्वी मी अॅपोकालिप्टो हा हॉलीवूडचा सिनेमा पाहिला होता, दंभ हा सिनेमा अॅपोकालिप्टो या सिनेमावरुन प्रेरित आहे असे जेव्हा प्रसादने मला फोनवरुन सांगितले तेव्हा मी लगेच होकार दिला.”

image


अर्थात दंभच्या या भूमिकेसाठी होकार देताना फक्त या हॉलीवूड सिनेमाचा संदर्भ पुरेसा नव्हता, संग्राम पुढे सांगतो की “शरीरसौष्ठव हे नेहमीच माझे पहिले प्रेम होते, आहे आणि राहीलही, त्यामुळे त्यात कोणतीही तडजोड मला करायची नाहीये. दंभ हा सिनेमा यापद्धतीनेही अनुकूल होता. दिग्दर्शकाच्या सांगण्यानुसार या भूमिकेसाठी मला माझ्या बॉडीत कोणतेही बदल करावे लागणार नाहीये. उलट माझी ही शरीरसौष्ठवाची बॉडी दंभच्या भूमिकेसाठी परफेक्ट असल्याचे मला सांगण्यात आले. सिनेमाला होकार देण्यामागे हेही आणखी एक कारण होतेच.

शिवाय गेली पंधरा वर्षे मी या बॉडीबिल्डींग क्षेत्रात काम करतोय हे वर्ष मी थोडा आराम करायचा विचार करत होतो, दंभ सिनेमा याचदरम्यान बनतोय त्यामुळे माझ्याकडे पुरेसा वेळही आहे. मी स्वतः डाएटिशन आहे माझे खाणे, डाएट, व्यायाम मी स्वतः प्लॅन करतो, त्यामुळे दंभच्या शुटिंगदरम्यान मी माझ्या या गोष्टी सहज सांभाळू शकतो.”

image


आत्तापर्यंत एक खेळाडू म्हणून संग्रामने माध्यमांना मुलाखती दिल्यात किंवा पोझिंगच्या कॅलेंडर्सच्या फोटोशूटचा त्याला अनुभव आहे, पण सिनेमात अभिनय करणे हे या सगळ्यापेक्षा खुप वेगळी प्रक्रिया असल्याची जाणीव त्याला आहे. संग्राम अभिनयाच्या या नव्या अनुभवाबद्दल सांगतो की, “प्रत्येक माणसात एक कलाकार दडलेला असतो, फक्त तो योग्य वेळी योग्य प्रकारे समोर येणे महत्वाचे ज्यात मला दंभ सिनेमाचे माझे दिग्दर्शक प्रसाद सर आणि माझे इतर सहकलाकार यांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरेल. मी कधी अभिनय केला नसला तरी दंभचे शुटिंग सुरु होण्याआधी एक महिना आम्हा सर्व कलाकारांचे अभिनयाचे वर्कशॉप घेतले जाणार आहे. ज्याचाही मला नक्कीच फायदा होईल, मी जेव्हा दंभसाठी हो म्हणालो तेव्हा आधीच दिग्दर्शकाला स्पष्ट केले होते की तुम्हाला माझ्याकडून अभिनय करुन घ्यावा लागेल, प्रसाद सर हे या क्षेत्रातले एक अनुभवी दिग्दर्शक आहेत, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.”

दंभ म्हणजे समूळ नाश झाल्यानंतर राहिलेली शेवटची आशा. या सिनेमाची कथा शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या आदिवासींच्या आयुष्यावर आधारली आहे. याबद्दल बोलताना संग्राम सांगतो की, “आदिवासींच्या आयुष्याचे वास्तव चित्रण दाखवणाऱ्या या सिनेमाची कथा एका आदिवासी मुलीच्याच माध्यमातनं उलगडताना दिसेल. जिला तिच्या आयुष्याच्या एका अकल्पनिय वळणावर हा दंभ भेटतो आणि मग पुढे जे घडते ती या सिनेमाची कथा.”

image


पदार्पणाच्या सिनेमातच मराठी आणि टॉलीवूड अशा दोनही सिनेरसिकांपर्यंत पोचणार असल्याचा आनंद आणि उत्सुकता संग्रामला आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा तामिळ आणि मराठी या दोनही भाषेत शुट केला जाणार आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी आशाही त्याने व्यक्त केलीये.

जागतिक स्तरावर मराठीची पताका अभिमानाने फडकावणारा हा खेळाडू आता रुपेरी पडदयावर रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतोय का ते मात्र पुढच्या वर्षीच कळेल. तोपर्यंत संग्रामला या त्यांच्या नव्या प्रवासासाठी खुप शुभेच्छा...