कौटुंबिक व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे अक्षय मोदी

0

एका लहान गावातील उद्योजक कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील शेंडेफळाला परदेशातील एका प्रसिद्ध विद्यापीठात शिकण्यासाठी पाठवले. कालांतराने तेच शेंडेफळ शिक्षण पूर्ण केल्यानंतर डोक्यात नवनव्या कल्पना घेऊन मायदेशी परतले आणि कुटुंबाच्या व्यवसायाला एका नव्या स्तरावर घेऊन गेले. कोणाला तरी हे नव्वदीच्या दशकातील चित्रपटाचे कथानक वाटेल, ज्यात वैमनस्यातून कुटुंबाबाहेर फेकला गेलेला नायक कालांतराने यशस्वी झाला आहे. मात्र हे काही कोणत्या चित्रपटाचे कथानक नसून, पिलभीत येथील मोदी कुटुंबियांची आणि त्यांचे वंशज अक्षय मोदी यांची सत्यकथा आहे.

अक्षय यांचे आजोबा डीडी मोदी १९७४ साली पंजाब येथे एका खाद्यतेलाच्या कारखान्याशी संबंधित होते. १९८५ साली त्यांनी उत्तरप्रदेशमधील पिलभीत येथे विद्रावक पदार्थांचा प्रकल्प सुरू करुन त्या कंपनीचा विस्तार केला. त्यानंतर ती कंपनी मुंबई शेयर बाजारात सर्वांकरिता खुली करण्यात आली. त्यानंतर २००८ साली ती कंपनी अनिल मोदी ऑईल इंडस्ट्रीस म्हणून ओळखली गेली आणि राईस ब्रान तेलावर प्रक्रिया करणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी झाली. २००७-०८ या आर्थिक वर्षात कंपनीने १०७ कोटी रुपयांच्या विक्रीची नोंद केली. त्यावेळेस त्यांचा नफा २.८ कोटी होता. याच वेळेस त्यांच्या कंपनीच्या इतिहासातील एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. पाच वर्षानंतर ती कंपनी मोदी नॅचरर्स या नावाने ओळखली गेली. तसेच २०१२-१३ या आर्थिक वर्षात कंपनीच्या विक्रीची नोंद १९५ कोटी एवढी झाली असून, नफादेखील ६.२ कोटी एवढा नोंदवण्यात आला. एवढ्या फायद्यात ही कंपनी अचानक कशी आली, याचे उत्तर म्हणजे २००८ साली तरुण तडफदार अक्षय मोदी यांनी कौटुंबिक व्यवसायात घेतलेली उडी.

अक्षय यांनी त्यांचे शिक्षण डेहराडून येथील डून शाळेतून पूर्ण केले. ते सांगतात की, ʻसांघिक कामाचे महत्व आणि सहकाऱ्यांमधील सद्भावना यांची मूल्य मला शालेय जीवनातच शिकवण्यात आली. तसेच मोठा विचार करण्यास मला माझ्या शाळेने शिकवले.ʼ अक्षय यांनी यूकेमधील लीड्स विद्यापीठातून आपले अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. तेथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. परदेशात शिक्षणाकरिता जाणाऱ्या अनेक भारतीयांप्रमाणे अक्षयदेखील परदेशातच काम करायचे की शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतायचे, या धर्मसंकटात पडले होते. कुटुंबाशी असलेले ऋणानुबंध आणि कौटुंबिक व्यवसायाची संधी, यांमुळे अक्षय यांची पावले पुन्हा भारताकडे वळली आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर त्यांनी कौटुंबिक व्यवसायाचा अभ्यास केला, पाच ते सहा महिने पिलभीत येथील कारखान्यात काम केले. मात्र ते त्यात काही नवे सुरू करू शकले नाहीत. त्यानंतर अक्षय यांनी उद्योजकतेचे जग व्यापकपणे समजून घ्यायचा निर्णय घेतला. त्यांनी स्मार्ट अॅनालिस्ट नावाच्या एका संशोधन कंपनीत काम करण्यास सुरू केले. तेथे ते मार्केट इंटेलिजन्स प्रकल्पांवर सर्वाधिक वेळ व्यतित करत असत. तसेच त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात कशाप्रकारे बदल करता येईल, याचा ते विचार करत असत. अक्षय सांगतात की, ʻविश्लेषक म्हणून काम करताना मला व्यवसाय आणि बाजार याबाबतची माहिती होत गेली. संधी कशा ओळखाव्यात, याचे मला ज्ञान मिळाले आणि संशोधनाद्वारे त्या कशा जाणून घ्याव्यात, याचेदेखील ज्ञान मिळाले. तिथे मला अनेक चांगल्या कल्पना सुचल्या, ज्यामुळे मी माझ्या कौटुंबिक व्यवसायाचा फायदा करुन देऊ शकत होतो. तेव्हा मी माझ्या कौटुंबिक व्यवसायाच्या संचालन मंडळात येण्याचा निर्णय घेतला.ʼ

जेव्हा अक्षय संचालन मंडळात आले, तेव्हा कंपनी कमोडीटी व्यवसायात होती तसेच ती एफएमसीजी कंपन्यांना उत्पादनाचे वितरण करीत असे. तेव्हा अक्षय़ यांना जाणीव झाली की, कमोडीटी व्यवसायातील नफा हा फक्त दोन ते तीन टक्के एवढाच असतो. त्याव्यतिरिक्त स्वतःच्या उत्पादनाची जाहिरात केल्यास नफा २० ते ३० टक्के एवढा होऊ शकतो. त्याशिवाय कंपनीच्या अंतर्गत उत्पादन क्षमतेची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे अक्षय यांनी कमोडीटी मॅन्युफॅक्चरींग कंपनीचे रुपांतर संशोधन आधारीत उत्पादन बनवणाऱ्या कंपनीत करायचे ठरवले. त्यानंतर अक्षय यांनी तराई येथील पाण्याची चाचणी करण्याचे ठरवले. या ब्रॅण्डेड उत्पादनाच्या वितरणाला उत्तर भारतात बंदी आहे. तराई या उत्पादनाने मिळवलेल्या यशाने अक्षय यांच्या कल्पनांना हिरवा कंदील दाखवला. त्यावेळेस अक्षय यांना समजले की, शहरी ग्राहक हा दिवसेंदिवस आरोग्यबद्दल अधिक जागरुक बनत चालला आहे आणि त्यातील नफा हा अधिक आकर्षक आहे. त्यामुळे त्यांनी कंपनीचे नाव मोदी नॅचरल्स असे बदलले आणि त्याच्या पुनर्रचनेचे प्रयत्न सुरू केले. आधुनिक पॅकेजिंगची साधने, नव्या उत्पादनांच्या संशोधन आणि विकासाचे कार्य तसेच व्यावसायिक ब्रॅण्ड सल्लागारांची नियुक्ती यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. जवळपास दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आणि सखोल संशोधनानंतर मोदी नॅचरल्स यांनी २०११ साली तेलाचा ऑलीव नावाचा ब्रॅण्ड बाजारात दाखल केला. चार विविध प्रकारांमध्ये हा ब्रॅण्ड बाजारात उपलब्ध करण्यात आला. त्यापैकी एक म्हणजे ʻऑलीव एक्टीवʼ, हे ऑलीव तेल आणि राईस ब्रान तेलाच्या एकत्रिकरणातून तयार करण्यात आलेले तेल असून, आधुनिक जीवनशैलीच्या गरजा पूर्ण करणारे हे तेल आहे. सफोला सारख्या सुर्य़फूल खाद्यतेलाच्या उत्पादनांना ऑलीव एक्टीव टक्कर देणार होते. बिग बाजारसारख्या मोठ्या बाजारात आमचे उत्पादन इतर उत्पादनांना कडवी टक्कर देत आहे, असे अक्षय यांचे मत आहे. याशिवाय ऑलीव ऑईलचे उर्वरीत तीन प्रकार ऑलीव एक्स्ट्रा वर्जिन, ऑलीव एक्स्ट्रा लाईट आणि ऑलीव पोमेस हे होय. उद्योगामध्ये कायम काम सुरळीत ठेवणे तसे सोपे नसते, असे अक्षय सांगतात. त्यांचे वडिल अनिल मोदी यांना एक सहजसोपा साधा व्यवसाय उभा करायचा होता. व्यावसायिक ब्रॅण्ड सल्लागाराची नियुक्ती तसेच भरपूर पगार घेणारा वितरण आणि जाहिरात विभागाचा कर्मचारी वर्ग, या निर्णयांना सुरुवातीच्या काळात विरोध झाला होता. यामध्ये सर्वात मोठी अडचण होती ती, जुना कर्मचारी वर्ग. त्यापैकी अनेक कर्मचारी जुन्याच पद्धतीने काम हाताळत असत.

ब्रॅण्डेड उत्पादन एका वेगळ्या व्यवसाय युनिटमधून सुरू करण्याबाबत अक्षय सजग होते. त्यामुळे त्यांना योग्य आणि कुशल कर्मचाऱ्यांची भरती करण्याची संधी मिळाली. चांगला कर्मचारी वर्ग नियुक्त करणे, हे सुरुवातीला फार मोठे आव्हान होते. मात्र काही जणांची भरती केल्यानंतर गोष्टी अधिक सोप्या होत गेल्या. पर्यावरणाबाबतीतील सजगता, ही अजून एक गोष्ट अक्षय यांनी अंमलात आणली. २००८-०९ साली उर्जेची गरज भागवण्यासाठी पर्यायी इंधन वापरुन एमएनएलने जवळपास सात हजार टन कार्बनचे उत्सर्जन वाचवले होते. २०१२-१३ साली मोदी नॅचरल्सचा २५ टक्के महसूल हा ब्रॅण्डेड उत्पादनाच्या विक्रीतून मिळाला आहे. पुढील पाच वर्षात अक्षय यांनी कंपनीचे रुपांतर पूर्णतः एफएमसीजी मध्ये करण्याची योजना आखली आहे. खाद्यतेल बाजारात ऑलीव एक्टीव प्रतिवर्ष २० ते २५ टक्के वाढीसह एक हजार कोटी ते एक हजार १०० कोटींचा व्यवसाय करत आहे. पुढील एक ते दीड वर्षात १० टक्के बाजारातील शेयर काबीज करण्याचे मोदी नॅचरल्स यांचे लक्ष आहे. वितरण साखळी शुन्यातून तयार करणे आणि ग्राहकांमध्ये सजगता निर्माण करुन विक्री दर वाढवणे, हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे अक्षय सांगतात. कौटुंबिक व्यवसाय पुढे चालवण्यात अक्षय यशस्वी झाले असून, त्याबाबत त्यांना आत्मविश्वासदेखील वाटतो. अक्षय यांचे वडिल अनिल मोदी सांगतात की, ʻअक्षय याने आमच्या कौटुंबिक व्यवसायात एक नवा दृष्टीकोन निर्माण केला. त्याचे प्रतिबिंब आमच्या ध्येयामध्ये दिसू लागले. आमचा पारंपारिक व्यवसाय एका नव्या उंचीवर नेण्याचे लक्ष्य आम्ही ठरवले. आम्हा सर्वांना विश्वास आहे की, अक्षय यांचे तरुण तडफदार नेतृत्व भविष्यकाळात मोदी नॅचरल्स या कंपनीचे नाव रोशन करेल.ʼ

लेखक - सौरभ देशपांडे

अनुवाद - रंजिता परब

Related Stories

Stories by Team YS Marathi