महिला उत्तम प्रोग्रॅमर, प्रौद्योगिक क्षेत्रात त्यांची गरज : सीमा लाल गुलाबरानी

0

सीमा लाल गुलाबरानी यांची कथा हृदयस्पर्शी तसेच प्रेरक आहे. त्या एक तंत्र विशेषज्ञ आहेत, याउपरही अत्यंत हळव्या आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्येक नव्या बदलागणिक त्या स्वत:ला अद्ययावत ठेवतात. तंत्रज्ञान क्षेत्रात महिलांचा फारसा विकास होऊ शकलेला नाही, यामागे समाजाचा एकुणातील पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन आहे. समाजाच्या या दृष्टिकोनासंदर्भात सीमा जेव्हा विचार करतात, तेव्हा त्यांचा जो निष्कर्ष निघतो तो असाच, की स्त्रिया खरोखर उत्तम प्रोग्रॅमर आहेत. ‘हर स्टोरी’ने जेव्हा सीमा लाल गुलाबरानी यांच्या आयुष्यात डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू समोर आले.

सीमा यांची पार्श्वभूमी

सीमा सांगतात, ‘‘मी कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेय. नंतर पुण्यात Fujitsu फ्युजित्सू नावाच्या कंपनीत मी नोकरीला लागले. तदनंतर मी दिल्लीत एनआयआयटीला जॉइन झाले. दोन्हीही ठिकाणी मी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून होते. एनआयआयटीमध्ये मी चार वर्षे काढली. कॉर्पोरेट विश्वातून मग मी एक छोटासा विराम घेतला. अर्थातच हा स्वल्पविराम होता. यादरम्यान मी एका स्टार्टअपसमवेत काही वेळ घालवला. दिल्लीत लहान आणि मध्यम व्यावसायिकांना सल्ला देण्याचे कामही मी केले. मी Java ‘जावा’तही काम केले. आणि मग दोन वर्षांसाठी मी गुडगावमध्ये Sapient Technologies जॉइन केले. २००३ पासून मी Sopra सोबत आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून सुरवात केल्यानंतर आज मी एक ‘वरिष्ठ सॉफ्टवेअर आर्किटेक्ट’ आहे. मी अगदी पहिल्या दिवसापासून प्रौद्योगिक क्षेत्रात आहे. हेच माझ्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य आहे. मला माहिती होते, की ही शर्यत फारच लांबलचक होत जाणार आहे. आज मी जे काही आहे. आनंदात आहे. पदांबद्दल नव्हे तर कामाबद्दल असलेल्या टोकाच्या आत्मीयतेच्या बळावरच मी आजवरचा हा प्रवास पूर्ण करू शकले.

एक सॉफ्टवेअर आर्किटेक्ट असणे

युरोपातील आमच्या ग्राहकांसाठी मी सॉफ्टवेअर निवारकांची निर्मिती करते. प्रॉडक्टच्या संकल्पनेपासून ते ग्राहक त्याचा वापर करू शकेल इथपर्यंतची जबाबदारी मी पार पाडते. एकाचवेळी कितीतरी आघाड्यांवर मी भूमिका बजावलेल्या आहेत. दैनंदिन कामकाजाच्या पातळीवर मी माझ्या इंजिनिअरिंग टीमसोबत काम करते.

वैयक्तिक अडचणींवर मात

सीमा हळव्या होत सांगतात, ‘‘माझे पती मरण पावले तेव्हा माझी मुले फार लहान होती. मी उद्ध्वस्तच झालेले होते. बालपणीच पितृछत्र हरपणे म्हणजे भारतात तर भयंकरच. माझ्याकडे नोकरी होती म्हणून ठीक. मी माझ्या पायावर उभी होती म्हणून ठीक. अन्यथा लेकरांचे काय झाले असते. नुसत्या कल्पनेनेही माझ्या अंगावर काटा येतो. मुलांकडे पाहून मी कसेबसे स्वत:ला धीर देत आले आणि मुलांसाठीच सावरले. इतका मोठा आघात पचवूनही मी काम आणि घर या दरम्यानचे संतुलन राखू शकले. अनेकदा स्थिती हाताबाहेर जाते, पण आव्हानांचा मुकाबला करत पुढेच चालत राहणे, हेच तर यशाचे गमक असते.’’

प्रौद्योगिक क्षेत्र आणि महिला

‘‘हार्डकोअर प्रौद्योगिक क्षेत्रात मोठ्या संख्येने महिला काम करताहेत हे दृश्य मी पाहू इच्छिते. तंत्रज्ञानात तुम्हाला स्वत:ला अद्ययावत ठेवावेच लागते. हे क्षेत्र गतीमान आहे. म्हणून रोमहर्षकही आहे. जसजसे तुम्ही सिनिअर होत जाता, तसतसे नवनवीन माहिती, तंत्रातील अगदी या क्षणापूर्वी झालेले बदल तुम्हाला माहिती असावे लागतात. तुमची टीम तुमच्याकडे बघत असते. तुम्हाला तिचे नेतृत्व करायचे असते. तंत्रज्ञानाबद्दल ज्या महिलांना आवड आहे, त्यांच्यासाठी या क्षेत्रात खूप साऱ्या रोल मॉडेल आहेत. तुम्ही फक्त इथे दाखल व्हा. माझे खरोखर प्रौद्योगिक क्षेत्रावर प्रेम आहे. म्हणूनच मी निरंतर या क्षेत्राच्या पावलावर पाऊल ठेवत चालतेच आहे.’’

‘‘मला असे स्पष्ट दिसते, की महिला मूळ विकासापासून फार लांबवर फेकल्या गेलेल्या आहेत. कुटुंबातील अन्य पूर्वग्रह तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विपरित परिणामही महिलांच्या वैयक्तिक विकासावर होतोय. कारणे काहीही असोत आम्हाला ज्या-ज्या क्षेत्रांतून महिलांचे प्रमाण कमी आहे, त्या-त्या क्षेत्रांतून महिलांचे प्रमाण वाढवत न्यायला हवे.’’

महत्त्वाकांक्षा

येत्या दहा वर्षांत मी एखाद्या कंपनीची प्रौद्योगिक प्रमुख होऊ इच्छिते.

महिलांसाठी मंत्र

तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. महिलांमध्ये प्रौद्योगिक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याची क्षमता आहे. माझ्या बहिणींनो तुम्ही या क्षेत्रात या. या क्षेत्रासोबत रहा आणि या क्षेत्राचा आनंद लुटा…