सत्य बोला आणि कर्तव्यरत राहा

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी प्रदान

सत्य बोला आणि कर्तव्यरत राहा

Saturday March 11, 2017,

5 min Read

सत्य बोलणे हे आपले कर्तव्य असून माता-पिता व गुरुजनांचा नेहमी आदर करा, असा संदेश राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी नागपूर येथे दिला. तर आधुनिक विज्ञानाच्या जोडीने पशुधनाचा विकास गरजेचा असून समाजासाठी कार्य करणे हीच खरी पदवी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या आठवा पदवीदान समारंभ आज झाला. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.


image


या समारंभात कुलपती या नात्याने राज्यपालांनी पदवी प्राप्त करणाऱ्या स्नातकांना पारंपरिक उपदेश केला. नेहमी खरे बोला, आपले कर्तव्य पार पाडा, जे शिक्षण प्राप्त केले आहे त्यापासून दूर जावू नका, आई-वडील- शिक्षक-अतिथी आणि देश यांना देव माना, असे कुलपती आपल्या पारंपरिक उपदेशात म्हणाले. विद्यार्थ्यांनी या उपदेशाचा आदर करुन पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जीवनातील विचारांची दिशा ठरविण्याचे काम विद्यापीठे करीत असतात. मोहनजी भागवत यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले. भागवत यांना सन्माननीय पदवी प्रदान केल्यामुळे त्यांच्या नव्हे तर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेत भर पडली आहे. व्यक्ती, समाज आणि देश घडविणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचे ते प्रमुख आहेत. जीवनाच्या सर्व क्षेत्रात देशभक्तीचा संस्कार असलेल्या व्यक्ती कार्यरत असाव्यात यासाठी ते सर्वांनाच प्रेरणा देत असतात. त्यांचे व्यक्तिमत्व या विद्यापीठात घडले, असे त्यांनीच सांगितलेले आहे. त्यावरुन विद्यापीठाकडून घडणारे कार्य किती मोलाचे असते हे आपल्या लक्षात येईल.


image


विद्यार्थ्यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले की, आपण पदवी प्राप्त करुन देशाच्या मानव संसाधनामध्ये सहभागी झाला आहात. आपला देश युवा देश आहे. आपल्या लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षांच्या आतील आहे. आपण अनेक देश पाहिले, त्या देशाच्या विकासयात्रेत तरुणाईचा मोठा वाटा आहे. जेथे तरुणाई मानव संसाधनात रुपांतरित झाली तो देश विकसित झाला आहे. हीच संधी आज आपल्याला प्राप्त झाली आहे. ही संधी अविरत मिळणार नाही. तरुणाईचा टक्का अधिक असणारे दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा 2020 साल तर दुसरा टप्पा 2035 साल आहे. 2035 सालापर्यंत आपल्याला मानव संसाधनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास साधावयाचा आहे, असे ते म्हणाले.

देशातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचविण्याचे माध्यम आपण सगळे आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एका मोठ्या बृहद व्यवस्थेचे आपण प्रतिनिधी असून ही व्यवस्‍था समृद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे. मागील काही काळात पर्यावरणाची व पशुधनाची हानी झाल्यामुळे राज्य व देशात शेती तसेच शेतकरी संकटात सापडला होता. आता श्वाश्वत विकासात पर्यावरणावरील आक्रमण थोपविण्याची जबाबदारी तरुणाईवर आली आहे. पर्यावरणाची व पशुधनाची हानी न होता आधुनिक विज्ञानाच्या जोडीने शेती व पशुधनाचा विकास साधण्यावर भर द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.


image


मोहनजी भागवत : यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपण याकडे केवळ एका पदवीच्या रुपाने पाहत नाही. या माध्यमातून आपल्याला पदवीपलिकडचे खूप काही मिळाले. विशेष म्हणजे आपलेपण मिळाले आणि सोबतच परिश्रम करुन दुसऱ्याची सेवा करण्याची वृत्ती इथेच रुजली, असे ते म्हणाले. कृषी व पशुपालनाचे महत्त्व खूप असून आजच्यासारखी प्रतिष्ठा आमच्यावेळी नव्हती, आज प्रतिष्ठा वाढली असली तरी प्रतिष्ठेला शोभेल असे शोधकार्य विद्यार्थ्यांच्या हातून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जे बोलू शकत नाही आणि मारतात अशा घटकाला प्रेमाने ठीक करण्याचे आपले कार्य असून हे कार्य आपल्या हातून सतत व निरंतर घडावे असे त्यांनी सांगितले. आपला देश कृषी व उद्योग यांना सोबत घेवून चालणारा देश आहे. आणि म्हणूनच कृषी सोबत पशुपालनाचे महत्त्वसुद्धा वाढले आहे. या क्षेत्रात नव-नवीन शोध लावण्याची जबाबदारी आपण पार पाडावी, असे ते म्हणाले. विद्यापीठात पायाभूत सुविधांचा विकास व्हावा आणि अभ्यासक्रमाचा वेळोवेळी आढावा घेतला जावून त्यात बदल व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते पदवी व पदक प्रदान करण्यात आले. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कु. अश्विनी रमेश चापले या विद्यार्थिनीने शैक्षणिक वर्ष 2014-15 साठी सहा सुवर्ण पदके व चार रौप्य पदके प्राप्त केली आहेत. तर 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शिवांगी देवदास पै या विद्यार्थिनीने आठ सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त केले आहे. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या रोहीत सिंग या विद्यार्थ्याने तीन सुवर्ण व चार रौप्य पदके मिळविली आहेत. या विद्यार्थ्यांचा राज्यपाल व मुख्यमंत्री यांनी गौरव केला.

2014-15 तसेच 2015-16 या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे एकूण 58 पदके वितरित करण्यात आली. यात 42 सुवर्ण व 16 रौप्य पदकांचा समावेश आहे.

यावेळी दीक्षांत भाषणात डॉ. त्रिलोचन मोहापात्रा म्हणाले की, माफसू विद्यापीठाला अधिस्वीकृत दर्जा प्रदान करण्यात आला असून देशातील 73 विद्यापीठापैकी माफसू हे गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.शेती आणि पशुसंवर्धन या बाबतीतील देशभरातील आजची स्थिती आणि आव्हाने यांचा त्यांनी परामर्श घेतला. शेतीतील उत्पादन दुप्पटीने वाढविण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाची पूर्तता करण्याची जबाबदारी आपली आहे. असे ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. या विद्यापीठाला यंदा 3 कोटी तर पुढील वर्षी 5 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरु ए. के. मिश्रा यांनी केले. विद्यापीठातील सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु केली असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयात 21 संशोधन प्रकल्प सध्या सुरु असून विद्यापीठाच्या स्थापनेपासून 64.75 किंमतीचे 130 संशोधन प्रकल्प पूर्ण केले गेले आहेत. यापैकी काही प्रकल्पांचे निष्कर्ष हे खूपच उत्तम असून त्यावर आधारित उद्योग व शेतकऱ्यांना उपयोगी असणाऱ्या शिफारशी विद्यापीठाने वेळोवेळी प्रसारित केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध पदव्या व पदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शिरिष उपाध्ये व डॉ. सुनीत वानखेडे यांनी केले. या पदवीदान समारंभात राज्यातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. (सौ महान्यूज )