आरोग्य आणि संपत्तीचा मेळ घालून, मिमि पार्थसारथींनी साध्य केला व्यक्तिमत्त्व विकास

0

२००५ साली मिमि पार्थसारथी यांनी ‘सिंहसी कन्सलन्टटस्’ या गुंतवणूक सल्लागार कंपनीला सुरुवात केली. सिंहसी नाव जरा वेगळं वाटतं ना! जपानी कलाप्रकारांमध्ये वाईट शक्ती आणि अपशकुनांचा खातमा करण्याकरता ‘सिंहसी’ म्हणजे संरक्षण कवचाचा वापर करण्यात येतो. मिमि यांच्या मते, त्यांची कंपनी ग्राहकांचं हित सांभाळत त्यांच्या गुंतवणुकीची पुरेपुर काळजी घेते. एकप्रकारे त्या ग्राहकांचं संरक्षण कवच मजबूत करण्याचचं काम करतात. मिमि 'आयएल अँड एफएस इनव्हेस्टस्मार्ट'मध्ये कामाला होत्या. काम करत असतानाचं स्वतःचं शिस्तबद्ध आणि पारदर्शी गुंतवणूक सल्ला केंद्र उभारण्याची त्यांची मनिषा होती.

मिमि गुंतवणुकीविषयी बोलताना म्हणतात की, “आपल्या जवळील रक्कमेचा दोन अंगांनी आपण विचार करायला हवा. एक म्हणजे आपण गुंतवणूक का करत आहोत आणि किती काळाकरता. दुसरं, आपण केलेल्या गुंतवणुकीचा परतावा किती असावा याचा सारासार विचार करणं आवश्यक आहे. यामुळे आपल्या परिस्थितीनुसार आपण कसं वागावं हे आपल्याला कळतं. आपल्या सकारात्मक आयुष्य आणि आरोग्याची हीच गुरूकिल्ली ठरते”.

सिंहसी कन्सलन्टटचं कार्यालय बेंगळुरूमध्ये आहे. सध्या ११ जणांची टीम इथं कामाला आहे. वैयक्तिक आणि कॉर्पोरेटस् असे दोन्ही प्रकारचे ग्राहक त्यांच्याकडून सेवा घेतात. किरण मझुमदार शॉ, गौरव गांधी आणि सुनिल अलग हे काही नामांकित त्यांच्याकडून सेवा घेत आहेत.

मूळच्या तामिळ असल्यामुळे शास्त्रीय नृत्याची आस त्यांना स्वाभाविकपणे आहे. योगावरही त्यांचा ठाम विश्वास आहे. नृत्य आणि योगामुळेच त्यांच्या कामाला शिस्त आणि प्रेरणा मिळते. मिमिंचं बालपण बेंगळुरूमधलच. त्यांच्या लहानपणी बेंगळुरू हिरवाईनं समृद्ध होतं. त्यांच्या पालकांमध्ये असलेली निसर्ग आणि वन्यजीवनाची आवड त्यांच्यामध्येही आलीय. हिरवाईनं नटलेल्या भागात जायला आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहायला त्यांना नेहमीच आवडतं. चिकमगळूरला त्यांचा कॉफीचा मळा आहे.

संगीत, नृत्याचा बाज आणि योगाची आवड त्यांच्या आईकडून त्यांना मिळाली. मिमिंनी वयाच्या आठव्या वर्षापासून भरतनाट्यम शिकायला सुरूवात केली. जेव्हा सवड मिळेल तेव्हा त्या नृत्य करायला आतूर असतात. त्यांची आई योगा प्रशिक्षक असल्याने, लहानपणी आईच त्यांचा योगगुरू होती. पण २०११ मध्ये त्या योगाशी खऱ्या अर्थाने जोडल्या गेल्या. मिमिंचे आई बाबा दोघेही आजारांशी झुंजत होते. आपले ऊर्जास्त्रोतच क्षीण झालेले पाहून मिमि खूप अस्वस्थ आणि हवालदिल झाल्या. याच काळात त्यांना अक्षरजी यांच्या पॉवर योगा अॅकॅडमीबद्दल माहिती मिळाली. आणि मग त्या पॉवर योगाशी जोडल्या गेल्या. योगामुळे त्यांना मनशांती मिळाली, त्यांचा आत्मविश्वास बळावला.

मिमिंच्या भाषेत सांगायचं तर, “योगामुळे माझ्या विचारांमध्ये आणि आयुष्यात आमुलाग्र बदल झाला. आयुष्यातले माझे अग्रक्रम बदलले. कोणत्या गोष्टींना किती महत्त्व द्यायचं, याचा दृष्टीकोन बदलला. माझं व्यक्तिमत्त्व अधिक सुदृढ होण्याकरता नवीन मार्ग मला मिळू लागले. माझ्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या अधिक सक्षमपणे मी पार पाडू लागले. गुंतवणूक सल्लागार, योगा, नृत्य आणि संवर्धनाचं काम ह्या सर्व गोष्टींना न्याय देण्यात मी यशस्वी होतेय ते केवळ योगामुळेच”.

सिंहसी कन्सल्टंटची वाटचाल यशस्वीपणे सुरू असतानाच त्यासोबत इतर गोष्टीही जोडून घ्याव्याशा मिमिंना वाटलं. इतर गोष्टी म्हणजे अर्थातच त्यांचा आत्मा नृत्य आणि योगा. वित्तिय सेवेसोबत योगा आणि नृत्याचं प्रशिक्षण सुरू केल्यास लोकांना एकाच ठिकाणी अनेक गोष्टी उपलब्ध होऊ शकतात असं त्यांना वाटलं. त्या दृष्टीने त्यांनी कामाला सुरूवात केली. आणि जानेवारी २०१४ मध्ये कृष्णा वेलनेस सेंटरची मुहूर्तमेढ रोवली गेली. मिमि यांच्या घराच्या आवारातच सिंहसी कन्सल्टंटचं कार्यालय आणि कृष्णा वेलनेस सेंटर उभारण्यात आलंय. १९६० मध्ये बेंगळुरूतल्या मोक्याच्या अशा मल्लेश्वरम भागात, विस्तीर्ण जागेत गर्द हिरवाईच्या कुशीत त्यांचं घर बांधण्यात आलं. आजच्या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात एवढं मोठ्ठं घर आणि विस्तीर्ण जागा असणं म्हणजे दिवास्वप्नच आहे. मिमिंना वेलनेस सेंटरकरता त्यांच्या घरापेक्षा आणखी योग्य जागा शोधूनही सापडली नसती. त्यामुळे त्यांनी घराच्या आवारातच वेलनेस सेंटर सुरू करायचं ठरवलं.

कृष्णा वेलनेस सेंटरनी अक्षर पॉवर योगासोबत हातमिळवणी केली आहे. इथं योगाचं रोज प्रशिक्षण दिलं जातं. सध्या दीडशेहून अधिक विद्यार्थी त्यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. योगासोबतच इथं नृत्याचेही धडे गिरवण्यात येतात. प्रसिदध नृत्यांगना पद्मिनी रवी भरतनाट्यमचे प्रशिक्षण देतात. या सेंटरमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचही आयोजन केलं जातं.

कृष्णा वेलनेस सेंटरचा सुंदर दिवाणखाना
कृष्णा वेलनेस सेंटरचा सुंदर दिवाणखाना

या वेलनेस सेंटरमध्ये बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडवण्याची काळजी घेतली जाते. त्याचकरता वेगवेगळ्या विषयांवरील कार्यशाळांचं इथे नियमित आयोजन केलं जातं., शारिरीक, मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच बाबतीत एखाद्याला परिपूर्ण करण्याचा वसा या सेंटरने उचलला आहे. त्यामुळे निधी व्यवस्थापन, गुंतवणूकीतल्या संधी, मालमत्ता खरेदी-विक्री, आरोग्य आणि आरोग्य विमा, प्राणायम उपचारपद्धती, योगा, आहार आणि पथ्य अशा वेगवेगळ्या गोष्टींची माहिती एकाच छत्राखाली मिळते. मिमिंच्या मते आर्थिक बाबतीत यशस्वी होण्याकरता शिस्त आणि सगळ्या गोष्टींमध्ये ताळमेळ असणं खूप महत्त्वाचं आहे. योगामुळे आपल्याला सर्व गोष्टींमध्ये समन्वय साधण्याकरता एकाग्रता मिळते.

लहानपणापासूनच मिमिंना प्रवासाची मोठी हौस आहे. आपल्या वडिलांसोबत त्यांनी भारत आणि परदेशांचीही खूप सफर केली आहे. त्या गंमतीने स्वतःला ‘बाबांची एक्स्ट्रा बॅग’ असं म्हणतात. त्यांचे वडिल आंतरराष्ट्रीय निसर्ग आणि संवर्धन संस्थेचे संचालक होते. या संस्थेचं कार्यालय स्वित्झर्लंडला आहे. त्यामुळे कामानिमित्त त्यांच्या तिथे वरच्यावर फेऱ्या व्हायच्या. वडिलांच्या या औपचारिक दौऱ्यांचा मिमिही फायदा उचलायच्या. स्विस शहरांमधील वातावरणाचा आणि लोकांचा मिमिंवर खूपच प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी जिनिव्हाच्या वेबस्टर विद्यापीठातून एमबीए पदवी शिक्षण पूर्ण केलं.

मिमि आपल्या पालकांप्रमाणेच, आपल्या मुलीला एक जबाबदार पालक म्हणून वेळ देतात. आजी-आजोबा आणि आईच्या प्रवासाची आवड मिमिंच्या लेकीमध्येही उतरलीय. भारतात स्थापत्यकलेचा वारसा असलेली जुनी देवालय आणि अभयारण्यात रमायला या दोघींना खूप आवडतं. साऊथ अफ्रिका, केनया, स्वित्झर्लंड, स्पेन, मलेशिया, न्यूझीलंड आणि अलास्का या ठिकाणांचीही मायलेकींनी सफर केलीय. त्यांची मुलगी सध्या सिडनीमध्ये पर्यावरणीय जीवशास्त्र आणि संवर्धन या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.

मिमिंचं आपल्या सगळ्या कामांवर अतिशय प्रेम आहे. कामाशिवाय जगणं केवळ अशक्यचं आहे. त्यांची आई आणि मुलीची त्यांना खूप चांगली साथ लाभत आहे. मिमिंच्या कामामधल्या झपाटलेपणाला त्याही खतपाणी घालतात. त्यामुळेच मिमिंना काम आणि आयुष्य यांच्यात योग्य मेळ साधता येतोय. सुरूवातीपासूनच आई त्यांची ठाम पाठिराखी आहे. समीपाला त्या म्हणतात, “मला ज्या गोष्टी करायला आवडतात, त्याच गोष्टींमध्ये मला काम करायला मिळतयं हे माझं भाग्य आहे”.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

किरण मुझुमदार शॉ, भारतीय उद्योगजगतातील एक प्रेरणादायी नाव

जेन मॅसन एक प्रवास : वकील, योगगुरू ते चाॅकलेट मेकर

A3 Performance! फिटनेसमध्ये दक्ष, खेळाकडे लक्ष!!

लेखिका – शारिका नायर

अनुवाद – साधना तिप्पनाकजे

Related Stories

Stories by Team YS Marathi