ऑनलाईन क्युरेटेड फॅशन आणि लाईफस्टाईल उद्योगात स्टाईलटॅगडॉटकॉमची नवी झेप

ऑनलाईन क्युरेटेड फॅशन आणि लाईफस्टाईल उद्योगात स्टाईलटॅगडॉटकॉमची नवी झेप

Friday November 20, 2015,

5 min Read

ऑनलाईन क्युरेटेड फॅशन आणि लाईफस्टाईल स्टार्टअप स्टाईलटॅगडॉटकॉम ने नुकतीच एक महत्वपूर्ण घोषणा केली. घोषणा होती एन्जल फंडींगच्या माध्यमातून त्यांनी उभारलेल्या पन्नास कोटी रुपयांच्या निधीची... (एन्जल फंडीग म्हणजे छोट्या स्टार्टअपला किंवा उद्योजकाला केलेली आर्थिक मदत ...बहुतेकदा ही मदत कुटुंब किंवा मित्रांकडून होत असते.) एम्बसी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जितू विरवानी यांनी आपल्या वैयक्तिक क्षमतेत हा निधी स्टाईलटॅगला दिला असून सद्यस्थितीत ते एकमेव एन्जल गुंतवणूकदार आहेत, अशी पुष्टी स्टाईलटॅगने दिली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आजपर्यंत भारतातील कोणत्याही स्टार्टअपमध्ये गुंतवली गेलेली ही सर्वात मोठी 'सीड राऊंड' (सुरवातीला केली जाणारी गुंतवणूक) आहे. जाणून घेऊ या स्टाईलटॅगडॉटकॉमची ही कहाणी...

image


आजपर्यंतचा प्रवासः

बंगलोर स्थित स्टाईलटॅगडॉटकॉमची स्थापना झाली २०१२ मध्ये... संजय आणि यशोधरा श्रॉफ यांनी विवेक एसपी (इन्फोसिसबरोबर दहा वर्षांचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव), प्रशांत एचएन (भारतातील आघाडीचे तंत्रज्ञान ब्लॉगर) आणि सौजन्य श्रीनाथ (सॉफ्टवेअर अभियंता आणि वेब डिजायनर) या फॅशन क्षेत्रातील तीन तंत्रज्ञान व्यावसायिकांच्या मदतीने कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. बंगलोरबरोबरच सध्या दिल्ली-एनसीआर आणि मुंबईमध्येही स्टाईलटॅग कार्यरत आहे.

image


भारतभर फॅशन क्षेत्रात परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह फॅशनचा अभाव असल्याचे या पाचही तज्ज्ञांनी हेरले होते. खासकरुन टीअर २ आणि टीअर ३ शहरांमध्ये ही गोष्ट त्यांना प्रामुख्याने दिसून आली. हीच बाब लक्षात घेत, देशभरातील लहान शहरे आणि आसपासच्या परिसरातील लोकांसाठी अत्याधुनिक आणि त्याचबरोबर परवडेल, अशा प्रकारचे फॅशनेबल कपडे देऊ करण्याचे लक्ष्य समोर ठेवूनच स्टाईलटॅगची स्थापना करण्यात आली. सध्या या कंपनीमध्ये सुमारे शंभर कर्मचारी काम करत आहेत.

यशोधरा आणि संजय श्रॉफ यांच्यासाठी हे क्षेत्र नवीन निश्चितच नव्हते. १९९१ मध्ये दक्षिण भारतात फोलिओ (ffolio) या नावाच्या मल्टी-डिजायनर लक्झरी रिटेल स्टोअरची त्यांनी स्थापना केली होती. लक्झरी रिटेलच्या क्षेत्रात त्यांच्या ब्रॅंडला स्थान मिळवून देण्यातही ते यशस्वी ठरले होते आणि त्याचबरोबर भारतात इन-हाऊस फॅशन प्रेझेंटेशन (सादरीकरण), क्युरेटेड फॅशन आणि स्टायलिंग ऍडव्हाईस आणि को-ब्रॅंडेड फॅशन इव्हेंटस् च्या संकल्पनांचा पाया घालण्याचे बरेचसे श्रेयही त्यांना जाते. या उद्योगातील वीस वर्षांहून अधिक काळ घालविल्यानंतर आलेल्या अनुभवानंतर ऑनलाईन माध्यमाच्या दिशेने झालेला त्यांचा हा प्रवास त्यांच्या मते सहाजिकच आहे. त्यामुळेच स्टाईलटॅगडॉटकॉम ची स्थापना करत त्यांचे ऑनलाईन क्षेत्रात येणे अगदी नैसर्गिकच होते.

image


सर्व वयोगटातील भारतीय स्त्री-पुरुषांना भावणाऱ्या फॅशनची त्यांना संपूर्ण समज आहे. सहाजिकच पारंपारिक भारतीय आणि पाश्चिमात्य पोशाखांच्या मिश्रणातून तयार होणारी अगदी ताजी टवटवीत फॅशन देऊ करण्याचे स्टाईलटॅगडॉटकॉमचे लक्ष्य आहे. त्याचबरोबर कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध होणारी सर्व उत्पादने ही काळजीपूर्वक निवडलेली असून मर्यादीत काळासाठी असलेल्या फ्लॅश सेलच्या माध्यमातून ती दुकानदारांपर्यंत पुरविली जात असल्याचा, कंपनीचा दावा आहे. तसेच थेट उत्पादनकर्त्यांकडून, परवानाधारक एजंटस् कडून, किरकोळ विक्रेत्यांकडून किंवा आयातकर्त्यांकडून माल विकत घेत असल्याने, ते सर्व मालाच्या असल्लतेची खात्री देतात.

युवरस्टोरीशी बातचित करताना संजय श्रॉफ आणि विवेक एसपी यांनी त्यांची सद्यस्थिती आणि भविष्यातील योजनांविषयी मोकळेपणाने माहिती दिली. सध्या स्टाईलटॅगकडे महानगरे आणि लहान शहरे अशा दोन्ही ठिकाणांहून चांगली मागणी येत असून खास करुन वीस ते चाळीस वयोगटातील महिला ग्राहकांचा यामध्ये समावेश आहे. “ पण त्यातही २४ ते ३५ वयोगटातील महिलांचे प्रमाण अधिक आहे तर प्रत्येक व्यवहारात आमचा सरासरी बास्केट साईज हा ३५०० रुपये एवढा आहे,” संजय सांगतात.

कंपनी उभारलेल्या निधाचा वापर प्रायवेट लेबल्सची उत्पादन श्रेणी वाढविण्यासाठी, इतर डिजायनर्स ब्रॅंडस् चे मिश्रण मिळविण्यासाठी आणि त्यांच्या टीमची ताकद वाढविण्यासाठी करणार आहे.

स्टाईलटॅग उपक्रमाला दिलेल्या निधीबाबत बोलताना एम्बसी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जीतू विरवानी म्हणाले, “ यापूर्वी देखील अशा प्रकारच्या फायदेशीर प्रकल्पांसाठी माझ्याकडून याप्रकारची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. स्टार्टअप इ कॉमर्स मला खूपच रोमांचक क्षेत्र वाटते आणि हे खूपच डायनॅमिक तर आहेच पण त्याचबरोबर हा बाजार आगामी काळात अतिशय महत्वाचा असणार आहे. अशाच प्रकारच्या इतर गुंतवणूकांमधून मला स्टार्टअप क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचे आहे.”

भविष्यातील योजना

एक औद्योगिक क्षेत्र म्हणून फॅशन या क्षेत्रात भारतात बरेच बदल झालेले दिसतात. इ कॉमर्सच्या क्षेत्रातील बऱ्याच खेळाडूंनी आपले लक्ष ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार कपडे खरेदी करण्यास मदत करणाऱ्या पर्यायांवर केंद्रीत केले आहे. टायगर ग्लोबल-बॅक्ड रोपोसो स्वतःला एक फॅशन केंद्रीत समाज माध्यम व्यासपीठ म्हणून पुढे करताना दिसत आहे. तर मिंत्रा आणि जबोंगसारखी इ कॉमर्स व्यासपीठे आता प्युअर प्ले मार्केटप्लेस न रहाता वैयक्तिकरणावर भर देणारी व्यासपीठे म्हणून समोर येत आहेत. मिंत्राने स्वतःची उत्पादने बाजारात आणत हे दाखवून दिले आहे. दुसरीकडे भारतात पर्सनलायझेशन स्पेस अर्थात वैयक्तिकरणाच्या क्षेत्रात अगदी सुरुवातीच्या काळापासून असलेल्या वुनिकने सेक्वाया कॅपिटल आणि सीडफंडकडून पाच दशलक्ष डॉलर्सचा निधी या वर्षी जून महिन्यात मिळविला आहे. तर महिलांसाठी सामाजिक शोध व्यासपीठ असलेले लाईमरोडने टायगर ग्लोबल आणि इतर गुंतवणूकदारांकडून मार्च २०१५ मध्ये ३० दशलक्ष डॉलर्स सिरिज सी राऊंड उभे केले आहेत. या सर्व खेळाडूंबरोबर स्टाईलटॅगची स्पर्धा आहेच पण तरीही फ्लॅश सेल्सची कार्यपद्धती वापरुन इतरांपेक्षा वेगळे दिसण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

दोन वर्षांच्या आत देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये १०० ओम्नी चॅनेल मॉडेल्स सुरु करणार आणि फॅशन विभागातील महत्वाचा खेळाडू बनणार, असे भविष्य स्टाईलटॅगडॉटकॉम करताना दिसत आहे. त्यांच्या मालकीच्या उत्पादन सुविधा त्यांचा ब्रँड निर्माण करण्यास उपयुक्त ठरेल, ऑनलाईन व्यापाराच्या माध्यमातून आक्रमकपणे फॅशन रसिकांपर्यंत पोहचण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

या वर्षाअखेरी कंपनीचा त्यांची ग्रॉस मर्चंडाईज व्हॅल्यू (जीएमव्ही) ५० कोटी ते ७० कोटी रुपयांपर्यंत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे. तसेच कंपनीचा दावा आहे की सध्याच्या वाढीचा अंदाज पहाता, या फेस्टीव सिझनमध्ये लवकरच कंपनी एक लाख युनिट ऑर्डरचा टप्पा पार करेल. तसेच आज जरी त्यांचा बहुतेक व्यापार हा डेस्कटॉप संकेतस्थळाच्या माध्यमातून असला, तरी भविष्यात भारतातील मोबाईल लाटेवर स्वार होण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

अधिक चांगला मोबाईल अनुभव देण्याच्या दृष्टीने त्यांनी नुकतीच आपली वेबसाईट अधिक अनुकुल केली आहे आणि त्याचबरोबर मोबाईल ऍपवरही त्यांचे काम सुरु आहे, जे येत्या महिन्यात आणण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

युवर स्टोरीचे मत

फॅशन उद्योगात सध्या अनेक खेळाडू असून, प्रत्येकाचा स्वतःचा असा एक युएसपी (युनिक सेलिंग पॉंईंट) आहे आणि त्यांच्यापैकी एकच स्पष्ट असा विजेता नाही. स्टाईलटॅग फ्लॅश सेल्स मॉडेलचे अनुसरण करत आहे आणि परवडणाऱ्या लक्झरी विभागावर त्यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

पेरेनियाज पॉप शॉप, फॅबिटी आणि इतर काही स्टाईलटॅगचे प्रमुख स्पर्धक आहेत. जागतिक स्तरावर फ्लॅश सेल्सकडे एक मोठी संधी म्हणून पाहिले जात असून गिल्टसारख्या स्टार्टअपना मिळालेले यश हेच सिद्ध करते. भारतात सुरवातीपासून प्रचारात असलेले फॅशनएन्डयु अतिरिक्त पर्यायी विस्तार करण्यासाठी सरसावले आहे. तर एक्स्लुझिव्हली.इन मिंत्राला विकली गेली आहे. भारतासारख्या किंमतीच्या बाबत संवेदनशील असलेल्या बाजारात ब्रॅंडप्रती निष्ठा नसताना (खास करुन फ्लॅश सेल मॉडेलमध्ये), भविष्यात कोण टिकून रहाते आणि यशस्वी होते हे पहाणे औत्सुक्याचे आहे. अत्याधुनिक फॅशन, स्टाईल आणि उत्तम कर्मचाऱ्यांची टीम असलेले स्टाईलटॅग येथून पुढे कसे जाते आणि अधिकाधिक ग्राहकांपर्यंत कसे पोहचते ते पहाणेही औत्सुक्याचे आहे

संकेतस्थळः http://www.styletag.com

लेखक – जय वर्धनसह हर्षित माल्या

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन