निम्मा पगार गरिबांना देणारा मोठ्या मनाचा गरीब!

0

समाजसेवा करायची तर प्रचंड संपत्ती असायला हवी, असा एक समज लोकांमध्ये आहे. ज्यांच्याकडे द्यायला पैसा आहे, तेच गरजवंतांची मदत करू शकतात, असे सर्वसाधारणपणे लोकांना वाटते, पण तमीळनाडूतील एका तरुणाने हा समज एक गैरसमज असल्याचे समाजाला पटवून दिलेले आहे… स्वत:च्या उदाहरणाने… मणीमारन हे त्याचे नाव. आणि मणीमारन म्हणजे समाजसेवा असे समिकरणच तो राहात असलेल्या परिसरात आता रुढ झालेले आहे.

मणीमारन यांचा जन्म तमीळनाडूतील तिरुवन्नामलई जिल्ह्यातील थलयमपल्लम गावात एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. कुटुंब गरीब होते. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांत त्यांची गणना होती, हे आणखी विशेष. पिवळे कार्डधारक असूनही मणीमारनच्या वडिलांना शिक्षणाचे कार्ड किती महत्त्वाचे त्याची जाणीव होती. मणीमारनला त्यांनी शाळेत घातले. पण पुढे परिस्थिती इतकी बिघडली, की मणीमारनला मधूनच शाळा सोडावी लागली.

शाळा सुटली तेव्हा मणीमारन नववीला होते. मणीमारनही आता कुटुंबाला हातभार लावू लागला. तो एका कापड गिरणीत कामाला लागला. इथे आधीपासूनच त्याचे भाऊ कामाला होते. मणीमारनचा पगार एक हजार रुपये महिना ठरला. आता मणीमारन वडिलांना ५०० रुपये दरमहा देत असे आणि उर्वरित ५०० रुपये गरजूंना मदतीसाठी खर्च करत असे. हा एक चमत्कारच होता! लहानपणापासून त्याला गरजू आणि असहाय लोकांबद्दल करुणा होती. अशा लोकांची मदत करणे तो धर्म मानत असे. मणीमारन स्वत:वरही हे ५०० रुपये खर्च करू शकत होते. नवे कपडे घेऊ शकत होते. पण मणीमारन स्वत:वर खर्च करतच नसत, केला तरी नावाला. आणि ज्याच्याकडे अगदी काहीच नाही, अशा व्यक्तीच्या मदतीला ते तत्पर असत.

रस्त्यांवर, गल्लीबोळांतून आणि मंदिरांच्या ओट्यांवर मुक्कामाला असलेल्या असहाय लोकांसाठी थंडीच्या दिवसांत कांबळ, एरवी कपडे आणि साबण वगैरे इतर आवश्यक सामान ते खरेदी करत आणि वाटून देत. दरमहिन्याचा अर्धा पगार ते या खर्चासाठीच राखून ठेवत. इतक्या गरिबीत कदाचितच कुणी असं वागत असावं. मणीमारन यांना कुटुंबीयांकडूनही कधी विरोध झाला नाही. आपले आयुष्य आपण सेवाकार्यात समर्पित करणार, हे मणीमारनने या सेवाकार्यादरम्यानच मनोमन ठरवून टाकलेले होते.

ते पाणी ओंजळभर... आणि...

एका घटनेने मणीमारन यांच्या आयुष्याची दशा आणि दिशाच बदलवून टाकली.


एकदा मणीमारन कोइंबतूरहून त्रिपूरला चाललेले होते. मध्येच बस खराब झाली. थांबावे लागले. मणीमारन बसमध्येच बसून होते. कुष्ठरोगाने पीडित असलेली एक म्हातारी लोकांना प्यायला पाणी मागत होती आणि कुणीही या वृद्धेला पाणी देण्यास तयार होत नव्हते, हे त्यांनी बसमधून पाहिले. तिच्यापासून सगळेच दोन हात लांब पळत होते. कुणी तिचं काही ऐकायलाही तयार नव्हतं. अखेर तहानेने व्याकुळ झालेली म्हातारी लगतच्या नाल्यावर गेली आणि नाल्यातले घाण पाणी प्यायला म्हणून तिने ओंजळीत घेतले. एवढ्यात मणीमारन तिच्यालगत आलेले होते आणि त्यांनी तिच्या ओंजळीला हलकासा झटका देऊन ओंजळ निर्जळ केलेली होती. मणीमारनने वृद्धेला आधार देऊन तिचे तोंड स्वच्छ केले. हात स्वच्छ केले आणि तिला चांगले पाणी प्यायला दिले. कुष्ठरोगामुळे तिच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा होत्या. हे पाहून मणीमारनचे आधीच करुणामय असलेले मन द्रवले. वृद्धा मणीमारनला बिलगली आणि खूप रडली. ‘‘बेटा मला तुझ्यासोबत घेऊन चल. मला कुणी नाही’’ म्हणाली. मणीमारनने हो घेऊन जाईन, असा शब्द दिला. कारण तत्क्षणी मणीमारन यांना एक वेगळे काम हातावेगळे करायचे होते. मणीमारन यांनी एका ऑटो ड्रायव्हरला पदरचे ३०० रुपये दिले आणि दोन दिवस म्हातारीची काळजी घे म्हणून सांगितले. ऑटो ड्रायव्हर तयार झाला. दोन दिवसांनी परत येऊन मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन, असा विश्वास वृद्धेला देऊन मणीमारन आपल्या वाटेला लागले. काम आटोपल्यावर जेव्हा ते वृद्धेला घ्यायला म्हणून आले, तेव्हा ती जागेवर नव्हती. मणीमारननी तिची शोधाशोध केली, पण उपयोग झाला नाही. मणीमारन हतोत्साहित झाले. इथेच त्यांच्या आयुष्याने वळण घेतले. मणीमारननी ठरवले, की कुष्ठरुग्णांच्या सेवेत आपण आयुष्य समर्पित करायचे. संकल्पानुसार मणीमारन यांनी कुष्ठरुग्णांची पडेल ती मदत करायला सुरवातही केली. जिथे कुठे कुष्ठरुग्ण आढळला तिथून ते त्याला आपल्याकडे घेऊन येत. त्याची सेवाशुश्रुषा करत. मणीमारन पुढे या लोकांवर उपचारही करू लागले.

कुष्ठरोगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आजही फारसा बदललेला नाही. त्याकाळात तर या आजाराला महारोग म्हटले जाई. अनेक गैरसमज या आजाराबाबत प्रचलित होते. कुष्ठरुग्णाला स्पर्श करायलाही कुणी धजत नसे. असे लोक मंदिरांच्या जवळपास त्या काळात भीक मागताना आढळत असत. मणीमारन यांनी अशा सगळ्यांची सेवा सुरू केली.

मदर टेरेसा आणि सिस्टर निर्मला यांचे सेवाकार्य मणीमारन आपला आदर्श मानत असत.

अब्दुल कलामांचा सल्ला

सुप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ अब्दुल कलाम ( जे नंतर देशाचे राष्ट्रपती बनले.) यांना मणीमारन यांच्या सेवाकार्याबद्दल कळले तेव्हा त्यांनी मणीमारन यांना एक संस्था सुरू करण्याचा सल्ला दिला. मणीमारन यांनी त्यानुसार आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने ‘वर्ल्ड पिपल सर्व्हिस सेंटर’ची स्थापना केली. पुढे २००९ मध्ये संस्थेची रितसर नोंदणी केली. तमीळनाडू सरकारने संस्थेच्या सेवाकार्याची दखल घेतली आणि मणीमारन यांना संस्थेसाठी जागा उपलब्ध करून दिली.

मणीमारन यांनी ‘वर्ल्ड पिपल सर्व्हिस सेंटर’च्या माध्यमातून ज्या ताकदीने गोरगरिबांची सेवा केली, त्याला तोड नव्हती. जगभरात या संस्थेचे नाव झाले. सेवाकार्याचे कौतुक होऊ लागले. मणीमारन यांना कितीतरी पुरस्कार प्राप्त झाले. अठराविश्वे दारिद्र्य घरात असताना इतर दरिद्र नारायणांची सेवा करणारा आणि त्यासाठी आधीच तुटपुंजा असलेल्या पगारातून निम्मी रक्कम खर्च करणारा मणीमारन म्हणजे ‘नारायण’च नव्हे काय?


लेखक : मंजू यादव

अनुवाद : चंद्रकांत यादव