ग्रीन सिग्नल...तुम्ही भाजीपाला घरातच पिकवू शकता!

‘द लिव्हिंग ग्रीन’- निसर्गाशी मैत्री आणि आरोग्याची खात्री...

1

कल्पना करा की तुम्ही एक पक्षी आहात, आणि राजस्थानातल्या जयपूरच्या आकाशातून मुक्त भ्रमंती करत आहात. तुम्ही खाली पहाल तर तुम्हाला दिसतील त्या छोट्या छोट्या टेकड्या, त्या टेकड्यांवरून शहराच्या मध्यभागाला जाऊन मिळणारे वेटोळे घेत जाणारे रस्ते, अनेक भव्य ऐतिहासिक वास्तू आणि शेकडो घरांच्या छतावर दिसणारा पिवळा रंग.

२०१३ मध्ये प्रतिक तिवारी यांनी या चित्रामध्ये छोडासा बदल करून त्यात थोडासा हिरवा रंग मिसळायचं ठरवलं. अर्थात, या शहरातल्या लोकांना वजनाला हलके आणि छोट्या आकाराचे ग्रीनहाऊस द्यायचं ठरवलं. जेणेकरून ही सारी मंडळी घरच्या घरीच अगदी त्यांच्या घराच्या टेरेसवर भाज्या, फळं, मसाले आणि औषधी वनस्पती पिकवू शकतील.

टेरेस गार्डनचा अभिनव उपक्रम
टेरेस गार्डनचा अभिनव उपक्रम

आणि त्यांनी ‘द लिविंग ग्रीन्स’ नावाची कंपनी स्थापना केली. भारतात अर्बन फार्मिंग अर्थात शहरी शेतीच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवण्याचा प्रयत्न ही कंपनी करत आहे. प्रतिक तिवारी म्हणतात, “आपल्या घरातच रोज लागणारं अन्न पिकवण्याचं प्रशिक्षण देणा-या संस्था देशातल्या इतर शहरांमध्येही आहेत. पण हे प्रशिक्षण नफ्यावर आधारित देणारी आमची पहिलीच कंपनी. २००२ मध्ये एका सेंद्रिय शेती प्रकल्पाच्या अर्थात ऑरगॅनिक फार्मिंगच्या माध्यमातून थेट शेतक-यांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. तीन वर्ष शेतक-यांसोबत काम केल्यानंतर मला जाणवलं, की हे शेतकरी कधीच शंभर टक्के सेंद्रिय शेती करणार नाहीत. कारण एक तर त्यांच्या अवतीभोवती नेहमीच रासायनिक प्रक्रियेने केल्या जाणा-या शेतीचा प्रभाव असतो, ज्यामुळे त्यांच्या शेतजमिनींना रोग पसरवणा-या कीटक आणि जंतूंचा जास्त धोका असतो. आणि दुसरं म्हणजे सेंद्रिय शेती उत्पादनांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी कोणतीही पायाभूत व्यवस्था नाही.”

शेतात उतरल्यापासून तीन वर्षांनंतर या सगळ्या कारणांमुळे प्रतिक तिवारी यांनी सेंद्रिय शेतीचा तो प्रकल्प थांबवला. त्याचवेळी अगदी छोट्या कालावधीत कर्करोगामुळे तिवारींनी आपले काही मित्र आणि नातेवाईक गमावले. यातल्या बहुतेकांना चुकीच्या आहार सवयींमुळे कर्करोगाची लागण झाली होती.

राजस्थान - जयपूर
राजस्थान - जयपूर

त्यांनी त्यांची वॉलमार्टमधली नोकरी पुन्हा सुरु केली. मात्र एकूणच शेतीची गुणवत्ता सुधारण्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची सुप्त इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. “माझ्यासमोर दोन पर्याय होते”, प्रतिक म्हणाले, “एकतर मी माझी नोकरी करावी आणि शेतीला तिच्या दैवावर सोडून द्यावं, किंवा मग शेतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मी थोडा का होईना, पण हातभार लावावा.” यावर अधिक विचार केल्यानंतर त्यांना उमगलं की सेंद्रिय शेतीची खरी जागा आणि गरज ही शहरांमध्ये आहे. त्यांना हे जाणवलं की त्यांच्या स्वत:च्या शहरात अर्थात जयपूरच्या बाजारात होणारा फळांचा पुरवठा हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. आणि लोकांच्या टेरेसचा अजिबात योग्य वापर केला जात नाहीये. यानंतर प्रतिक यांनी वेळ न दवडता वॉलमार्ट या मल्टीनॅशनल कंपनीतली आपली नोकरी सोडून दिली, आणि पुन्हा एकदा ते त्याच मातीकडे परतले.

सेंद्रिय शेतीची खरी गरज शहरांमध्ये
सेंद्रिय शेतीची खरी गरज शहरांमध्ये

जयपूरसोबतच आता दिल्ली, इंदौर आणि जोधपूरमध्येही ‘द लिव्हिंग ग्रीन’च्या शाखा त्यांनी सुरु केल्या आहेत. या शाखांमधून ते अनेक आकाराचे आणि उच्च दर्जाच्या पॉलिथिलिनचा वापर केलेले ग्रीनहाऊस पुरवतात. याशिवाय व्हर्टिकल गार्डन, अर्थात उभ्या भिंतींवरचे बगिचेही ते तयार करुन देतात. या ग्रीन हाऊससाठी ‘लिव्हिंग ग्रीन’ने वजनाने ओल्या मातीहून हलकं असलेलं मिश्रण वापरलं आहे. एक विशिष्ट प्रकारची पोषक पावडर यामध्ये नियमितपणे मिसळल्यास या मिश्रणातून उत्पादकता अधिक वाढते. त्यांच्या व्हर्टिकल गार्डन्ससाठी तर त्यांनी भन्नाट कल्पना प्रत्यक्षात उतरवलीये. या व्हर्टिकल गार्डन्ससाठी कोणत्याही प्रकारच्या मातीची आवश्यकताच नसते आणि तरीही त्यांची अगदी उत्तम वाढ होते. कारण या व्हर्टिकल गार्डन्ससाठी ‘द लिव्हिंग ग्रीन’ने विशिष्ट प्रकारच्या ट्रेचा वापर केलाय, ज्यामध्ये वापरलेलं पाणी आपोआपच प्रक्रिया होऊन पुन्हा वापरलं जातं.  

“आमच्या प्रत्येक उत्पादनामागे खोलवर केलेलं संशोधन आहे,” प्रतिक सांगतात, “आता मला याची खात्री आहे की आमचं उत्पादन जिथे कुठे जाईल, तिथे उत्तम काम करेल. कारण प्रत्येक छोट्या समस्येवर मात करणारी कार्यप्रणाली आमच्याकडे तयार आहे.” अवघ्या एक ते दीड हजार रुपयांत ‘द लिव्हिंग ग्रीन’ विकलेल्या उत्पादनांसाठी मेंटेनन्स सेवा पुरवतं. “कोणतंही उत्पादन विकण्यापूर्वी आम्ही आमच्या ग्राहकाच्या घराच्या परिसराचा नीट अभ्यास करतो. तिथल्या वातावरणाची माहिती गोळा करतो. यामुळे ग्राहकांना सूचना देणं आमच्यासाठी शक्य होतं. आणि आमच्या ग्राहकांपैकी बहुतेक सगळेच त्यांना लागणा-या भाजीपाल्याचं स्वत: उत्पादन घेऊ शकतात.”

टेरेस गार्डनमध्ये भाजीपाल्याचं उत्पादन
टेरेस गार्डनमध्ये भाजीपाल्याचं उत्पादन

येत्या वर्षभरात अजून १० शहरांमध्ये शाखा उघडण्याचा ‘द लिव्हिंग ग्रीन’चा मानस आहे. यासाठी काही स्थानिक व्यावसायिकांसोबत भागीदारी करण्याचाही त्यांचा विचार आहे. प्रतिक म्हणतात, “मला अनेक तरुणांचे ई-मेल येतात. त्यांचं म्हणणं असतं की त्यांना कोणत्याही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करायचं नाहीये. आपल्याच शहरामध्ये राहून पर्यावरणाशी संबंधित काहीतरी करण्याची कल्पना त्यांना आवडल्याचं हे तरुण सांगतात.” यामुळे कंपनीचं काम वाढणार असून त्यासाठी तिस-यांदा कंपनीच्या संचालकांमधूनच आर्थिक पाठबळ उभारण्याची कंपनीची तयारी आहे.

कायम कशाचा तरी शोध घेणारी टीम
कायम कशाचा तरी शोध घेणारी टीम

कायम कशाचा तरी शोध घेणारी ही १९ जणांची टीम. प्रतिक अधिक समजावून सांगतात, “आम्ही सध्या उभ्या भिंतीवर भाजीपाला पिकवण्याचं तंत्र विकसित करत आहोत. भाजीपाला आणि गवतासाठी टेरेस गार्डन्स तयार करण्याच्या पद्धतीवरही आम्ही काम करत आहोत. आणि सर्वात शेवटी, आम्ही असं तंत्र शोधत आहोत, ज्यामुळे टेरेसवर शेती करणा-यांना त्यांच्याच घरातल्या कच-यापासून कंपोस्ट खत तयार करता येईल.” याच क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या काही नवउद्योजकांना प्रतिक मार्गदर्शनही करत आहेत. प्रतिक म्हणतात, “इतके सारे तरुण अर्बन फार्मिंगमध्ये रस घेत आहेत हे पाहून खरंच मला खूप उत्साह येतो, हुरूप वाटतो. माझी खात्रीच पटते की अर्बन फार्मिंग हा एक नावीन्यपूर्ण आणि शाश्वत अर्थात कायमस्वरुपी चालणारा व्यवसाय आहे.”

‘द लिव्हिंग ग्रीन’ची इत्थंभूत माहिती त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Stories by Pravin M.