येथे अनेक शिक्षिका घडतात...

0

‘चाक फिरवतो गरागरा... मडकी बनवतो भराभरा... मी कोण?’ असले प्रश्‍न घालत आपल्या बालवाडीच्या शिक्षिकांनी जीवनाच्या सर्व घटकांची माहिती आपल्या कोवळ्या मनावर बिंबवली... एवढंच काय, बाल शिवाजीच्या कथा सांगत जिद्दीची रग लहान वयातच अंगात भिनवली. शिक्षणाची तोंडओळख म्हणजे बालवाडी आहे. इथं चार वर्षांची मुलं येतात. आईपासून पहिल्यांदाच काही काळासाठी बाजूला होणारी मुलं बालवाडीत सुरवातीला रडून रडून गोंधळ घालतात. बालवाडीतच शि, शू करतात. पहिले दहा-बारा दिवस गोंधळ घालणारी मुले हळूहळू बालवाडीत रमतात आणि जगाच्या प्रवाहात तरण्यासाठी प्राथमिक धडे घेऊ लागतात. घराची सवय झालेली मुले तीन-चार तास स्वतंत्रपणे बाहेर बसू लागतात. भावी आयुष्यात ज्ञानाच्या अफाट भांडारात घुसण्यासाठी ग म भ न गिरवू लागतात. ‘‘एक पोळी करपली, दुधासंगे व्हरपली, दूध झालं कडूं... बाळाला आलं रडू!’’ हे गाणं आपल्या बोबड्या स्वरात म्हणू लागतात. आई-बाबा कौतुकानं या मुलांचे पटापटा मुके घेतात.

आपण बालवाडीत असताना जर आपल्या शिक्षिकांना आपल्याला ग म भ न ची तोंडओळख करून देता आली नसती तर? ‘ये ग गाई गोठ्यातट’ ही कविता शिकविता आली नसती तर आपली निसर्ग, प्राणिमात्राशी आपली नाळ जोडली असती का? म्हणून लहान मुलांच्या कोवळ्या मनावर शिक्षणाचे धडे गिरवणार्‍या बालवाडीच्या शिक्षकांनाच उत्तमरित्या घडविले तर भविष्यात कौशल्यपूर्ण व कर्तुत्ववान विद्यार्थी आपल्या भारत देशात घडतील....या विचाराने प्रेरित होऊन मीनाक्षी उज्जनकर यांनी महिलांकरिता वुमन्स वेल्फेअर फाऊंडेशन संस्थेची स्थापना केली. या संस्थेतर्फे गरीब कुटूंबातील व दुर्गम भागातील महिलांना रोजगारही उपलब्ध होईन व अनेक खेडोपाड्यातील गरीब मुलांपर्यंतच शिक्षणाची गंगा पोहोचेल या हेतुने संस्थेतर्फे त्यांना शिशुंना शिकविण्यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये किंडर गार्डन (केजी) किंवा बालवाडीतील विद्यार्थ्यांना छोट्या शिशूंना कसे शिकवायचे, त्यांचा बौद्धिक विकास कसा करावा, त्यांचा पौष्टिक आहार कसा असावा, त्यांच्या आरोग्याविषयी कशी काळजी घ्यावी इत्यादी शिक्षण देण्यात येते. जेणेकरून त्या महिला मुलांना वस्तूंविषयी, अंकांविषयी, अंकलिपी, मुळाक्षरे, फळे ओळखणे इत्यादी गोष्टींची सखोल माहिती करून दिली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते ओळखण्यास सोपे जाते.

आपला समाज अनेक स्तरांमध्ये विभागलेला आहे. खरं तर आपणच त्याचे तसे वर्गीकरण केले आहे. शिकलेला शिक्षित आणि न शिकलेला अशिक्षित अशी वर्गवारी आपण लगोलग करतो. परंतु, एखादी व्यक्ती का शिकली नसेल? जीवनात त्याला कोणकोणत्या अडीअडचणींना सामोरे जावे लागले, हे आपल्याला ठाऊक नसते. बरेचदा आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींमुळे ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षणही होत नाही. हाच धागा पकडून ‘वुमन्स वेल्फेअर फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने विद्यादानाचा अभिजात वारसा राबविला आहे.

मुलींसाठी शाळा सुरु करणार्‍या देशातील पहिल्या शिक्षिका, घरा-घरांत ज्ञानज्योत लावणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले.... सावित्रीबाईंनी घेतलेला स्त्रीशिक्षणाचा वसा आज त्यांच्या लेकी समर्थपणे पुढे नेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर दिसत आहेत. अनेक ठिकाणी ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. परंतू सावित्रीमाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिक्षणक्षेत्रात अनोखे काम करणार्‍या दुर्गम भागात जाऊन अखंड ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या बालवाडीच्या शिक्षिकांना घडविण्याचे कार्य करणारी संस्था म्हणजे वुमन्स वेल्फेअर फाऊंडेशन ही होय...

वुमन्स वेल्फेअर फाऊंडेशन या संस्थेच्याअंतर्गत मॉंटेसरी टीचर्स डिप्लोमा हा मुलुंड पूर्व, म्हाडा कॉलनी येथे केवळ महिलांकरिता चालविण्यात येतो. येथील स्त्रिया शिक्षण घेऊन पुढे त्या अंगणवाडी, बालवाडी किंवा प्रिस्कूल येथे नोकरी करू लागल्या आहेत किंवा स्वत:चे प्लेग्रुपसुद्धा टाकून घर चालवित आहेत. शासनमान्य या सर्टिफिकेट कोर्सचा कालावधी सहा महिने असतो. संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेल्या महिलांद्वारे महिलांनी साहित्य शिक्षण प्रदर्शन भरवून वेगवेगळया कलांचे, वस्तूंचे, शिक्षण साहित्यांचे, खास पदार्थाचे अंक, अकंलिपी तक्ता, फळांचे, झाडांचे, प्राण्यांचे चित्रांद्वारे ओळख व्हावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

वुमन्स वेल्फेअर फाऊंडेशनच्या कार्यामुळे अनेक खेडोपाड्यांमध्ये लहान मुलांना शिक्षणाचे धडे गिरविण्याची संधी तर मिळतच आहे...पण गरीब महिलांनी तुटपुंज्या पगारात का होईना घरखर्चाला हातभार लावण्यास सुरवात केली आहे....

जीवनात यश मिळविण्यासाठी माणसाने सतत धडपडणे गरजेचे आहे. जो माणूस जीवनात जेवढा मोठा संघर्ष करतो त्याला तेवढे मोठे यश मिळते.

Related Stories