छोट्याशा गावाचा, 'क्लिअर कार रेन्टल'चा देशव्यापी प्रवास.

सचिन काटे - शाबासकीस पात्र असा औरंगाबादचा २८ वर्षीय तरुण उद्योजक

छोट्याशा गावाचा, 'क्लिअर कार रेन्टल'चा देशव्यापी प्रवास.

Wednesday October 14, 2015,

4 min Read

सचिन काटे हा २८ वर्षीय तरुण 'क्लिअर कार रेन्टलचा' संस्थापक आहे आणि तो जेव्हा yourstory च्या ऑफिस मध्ये आम्हांला भेटायला आला तेव्हा त्याने सुरु केलेल्या व्यवसायाचा आवाका किती मोठा आहे, ह्याची मला जर सुद्धा कल्पना आली नव्हती. जरी 'क्लिअर कार रेन्टल' ही भारतातली फक्त गाड्या भाड्यावर देणारी एक संस्था असली तरी तिच्या उभारणीतले काही मुद्दे इतके वेगळे आणि असामान्य आहेत की, ज्यामुळे हा तरुण उद्योजक सर्वांच्या शाबसकीस पात्र ठरतो.

सचिन काटे

सचिन काटे


सचिन काटेची असामान्य गोष्ट -

सचिन काटे हा महाराष्ट्रातल्या औरंगाबाद तालुक्यातील अशा एका छोट्या गावचा रहिवासी आहे, जिथे काही 'नवीन उद्योग-धंदा सुरु करणे' ही संकल्पनाच मुळात फार अनोळखी-अदभूत आहे (दुकान टाकणे हे सुद्धा नवीन सुरुवात करण्यासारखंच आहे, परंतु इथे आपण 'सुरु करणे' ह्या शब्दाच्या पारंपरिक अर्थाने विचार करत आहोत). सचिन अश्या ठिकाणाहून आला आहे, जिथे चौथी नंतर शिक्षण उपलब्ध नव्हते, परंतु सचिनच्या पालकांनी त्याला आवश्यक शिक्षण मिळवून देण्याचा दृढ निश्चय केला होता. म्हणूनच त्यांनी त्याला बाजूच्या गावात मित्राकडे पाठवले, जिथे शिक्षण उपलब्ध होते. सचिनने तिकडे गेल्यावर शिक्षणाबरोबर उपजीविकेसाठी वर्तमानपत्र टाकायला सुरवात केली, कारण पैशांची कायमच चणचण असायची. सुदैवाने त्याला अकरावीत शिकत असताना एका संगणक शिक्षण संस्थेत चपराश्याची नोकरी मिळाली.

  1. सचिनला संगणक नेहमीच आकर्षित करायचे. त्याने या संधीचा फायदा घेतला आणि तो एका वर्षातच प्रगती करत संगणक प्रशिक्षक झाला. सचिन बारावी नंतर उच्च शिक्षणासाठी औरंगाबादला गेला व एका पर्यटन कार्यालयात अर्धवेळ नोकरीही करू लागला.सचिन म्हणाला, "या नोकरीने मला पर्यटन जगताशी प्रथम तोंडओळख करून दिली. अर्धवेळ पगारातच मी पूर्णवेळ काम करू लागलो. कारण मला हळूहळू काम करण्यासाठी संगणक मिळु लागला आणि अशा प्रकारे माझे संगणक कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली." 

तो तेव्हा संगणक विषयात बी एस सी करत होता आणि त्याचा कल सर्च इंजिन आॅप्टीमायझेशन (SEO) तंत्रज्ञान शिकण्याकडे होता. ज्या पर्यटन कार्यालयात तो नोकरी करत होता, त्यांना सचिनचं संगणक कौशल्य उपयोगी पडलं.

आत्मविश्वास वाढल्यानंतर, सचिनने दुसऱ्या शहरात जाण्याचा विचार केला, पण त्याचे कुटुंब त्यासाठी तयार नव्हते. त्याने परत येवून संकेतस्थळं विकसित करण्याचे काम करण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने पर्यटन आणि हॉटेल उद्योगावर लक्ष केंद्रित केले आणि आतापर्यंत त्याने त्याच्या पथकाबरोबर ६०० पेक्षा जास्त संकेतस्थळे विकसित केली आहेत. अशाप्रकारे इन्फोग्रीड (InfoGrid ) आणि नेटमॅन्टल (NetMantle) या त्याच्या संस्था अस्तित्वात आल्या. 

सचिन कायम पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगाशी (hospitality industry) संबंधित राहिला आणि म्हणूनच त्या क्षेत्राच्या गरजांविषयी सतत जागरूक राहिला. 

सचिनने सांगितलं, "हवाई परिवहन अर्थात एअरलाईन आणि हॉटेल बुकिंगसाठी तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, पण कुठल्याही पर्यटन क्षेत्रातील शेवटच्या टप्प्याचा प्रवास जो नेहमीच रस्त्यावरून होतो, तो मात्र दुर्लक्षित राहिलेला आहे." 

त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे त्याला हे ओळखता आले आणि अशाप्रकारे ' क्लिअर कार रेन्टल' या संस्थेची जुलै २०१० मध्ये स्थापना झाली. हा तोच काळ होता जेव्हा Meru Radio Cab (मेरू टॅक्सी सेवा) आणि तशा प्रकारच्या इतर काही सेवा सुरु झाल्या.


CCR संकेतस्थळावर येणारे प्रवासी

CCR संकेतस्थळावर येणारे प्रवासी


क्लिअर कार रेन्टल आपल्याला स्थानिक तसेच बाहेरगावी प्रवास करण्यासाठी गाडया पुरवते. ही योजना पूर्ण दिवस, अर्धा दिवस आणि बदलीसाठी आहे. जाऊन-येऊन प्रवास करणे, एकमार्गी सोडणे तसेच अनेक ठिकाणी प्रवास करण्याची सुविधा क्लिअर कार रेन्टलमार्फत पुरवली जाते. भारतात दीडशेहून अधिक शहरांमध्ये गाडया भाडेतत्वावर देण्याची योजना या संस्थेमार्फत राबवली जाते. यासाठी संस्थेचे १०० कर्मचारी सेवा पुरवण्यासाठी कायम तत्पर असतात.

आणि हे सर्व कोणत्याही अर्थसहाय्याशिवाय -

आपण गाडया भाडेतत्वावर देणाऱ्या संस्थाना इच्छेनुसार अर्थसहाय्य मिळालेले बघतो आणि अशा धंद्यासाठी या अफाट अर्थसहाय्याचे ते समर्थन करतात. आश्चर्य म्हणजे सचिनने दीडशेहून अधिक शहरांमध्ये एक पैसासुद्धा संस्थात्मक अर्थसहाय्य न घेता हे कार्य शक्य करून दाखवले आहे. CCR च्या नावावर १४००० पेक्षा जास्त गाडया आणि हजारो ग्राहक आहेत. स्थानिक ग्राहकांशिवाय, विदेशी पर्यटन आणि सामूहिक (कॉर्पोरेट) संस्था, तसेच OTA (Online Travel Agency) संस्था जसे मेकमायट्रीप (Makemytrip), कॉक्स आणि किंग्स (Cox & Kings) आणि थॉमस कुक (Thomas Cook) सुद्धा CCR बरोबर भागीदारी तत्वावर काम करतात.

सचिन म्हणतो, "आम्ही दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतल्या शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतातील जनतेच्या खरेदी-क्षमतेची सरासरी वाढली आहे आणि एवढेच नाही तर लहान शहरातील लोक सुद्धा आता गाडया भाड्याने घेतात." 

CCR चा महानगरांमध्ये सुद्धा चांगला जम बसला आहे परंतु विकासासाठी ते लहान शहरांकडे लक्ष केंद्रित करत आहेत.

आणि औरंगाबादहून एक संस्था सुरु केली -

आपण लहान शहरांमधून आलेल्या संस्था पाहिल्या आहेत (उदा. धर्मशाला किंवा भुवनेश्वरच्या काही भागांमधून आलेल्या संस्था). सचिनची यशोगाथा अजून एक असे उदाहरण आहे, ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकणार नाही अशा ठिकाणाचे - म्हणजेच औरंगाबादचे. नेहमीप्रमाणेच प्रत्येक यशामध्ये असतात तसे येथेही काही साधक-बाधक मुद्दे आहेतच,

बाधक मुद्दे : कोणतेही सहकार्य नाही किंवा संधी नाही, परिपक्व बाजार नाही, पायाभूत सुविधांचा अभाव आणि भांडवल नाही.

साधक मुद्दे : स्वस्त प्रतिभा (फक्त तुम्हाला त्यांना हेरता आले पाहिजे आणि प्रशिक्षण देता आले पाहिजे), यशाकरिता लागणारी अतिरिक्त इच्छाशक्ती.

सचिनने जे काही केलं ते करताना त्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आणि म्हणूनच त्याच्या जिद्द आणि हिंमतीच्या जोरावर यशाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे झाले. स्थानिक वर्तमानपत्रांनी त्याच्या यशस्वी प्रवासाविषयी लिहिले, तसेच सचिन 'Aurangabad Calling' या नावाने इंटरनेटवर लेखमाला लिहित असे. ते वाचून अनेक स्थानिक तरुण जे शिक्षणासाठी बाहेर गेले होते त्यांना परत त्यांच्या शहरात जाऊन तेथेच रोजगार शोधण्याची प्रेरणा मिळाली.

औरंगाबाद येथील स्थानिक नायक सचिन काटे हा प्रसिद्धीपासून आजपर्यंत दूर होता आणि आम्ही आशा करतो कि या लेखामुळे त्याला त्याचा योग्य तो सन्मान मिळेल.

CCR संकेतस्थळ - Clear Car Rental