अपंगांना पायावर उभं करणारी ‘एपीडी’

0

यशाची व्याख्या ही व्यक्तिसापेक्ष असते. काही व्यक्ती किवा संस्था वैयक्तिक सफलतेला यश मानतात. तर काही व्यक्ती आणि संस्था या देशसेवेसाठीच स्वत:ला वाहून घेतात, समाज कल्याणासाठी ते काम करतात आणि याच समाजसेवेला ते यश मानतात. अशाच व्यक्ती किंवा संस्था समाजापुढे आदर्श म्हणून उभ्या राहतात. याचच एक उदाहरण आहे ‘एपीडी’ अर्थात ‘असोसिएशन ऑफ पीपल विथ डिसऍबिलिटीज’. या संस्थेची सुरूवात १९५९ मध्ये एनएस हीमा यांनी केली. त्यावेळी त्या २१ वर्षांच्या होत्या. ही संस्था शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना मदत करते. संस्थेने शारिरिकदृष्ट्या अपंग लोकांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यास मदत केलीये.


एपीडीचं कार्यालय बंगळुरूमध्ये आहे. इथं अनेक अपंग मुलं आहेत. या ठिकाणी या मुलांना विविध प्रकारच्या विषयांवर आधारित प्रशिक्षण दिलं जातं. आपली आवड आणि क्षमतेनुसार ही मुलं यातून एक विषय निवडतात. २००९ मध्ये संस्थेने आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला. यावरुन या संस्थेच्या यशाचा अंदाज येतो. या ५० वर्षात आपल्याला खूप शिकायला मिळाल्याचं हीमा सांगतात. त्यांच्यासाठी ही संस्थाच सर्वकाही आहे.


एपीडीने १९८८ मध्ये जीवन भीमानगर प्रशिक्षण केंद्राची सुरूवात केली. यात फलोत्पादनाचं प्रशिक्षण दिलं जातं. इंग्लंडमध्ये फलोत्पादनाचा अपंग व्यक्तींना शारीरिकदृष्ट्या फायदा होत असल्याचं मानलं जातं, हे कळल्यानंतर हीमा यांनी आपल्या केंद्रातही फलोत्पादनाचं प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. वेगवेगळ्या देशांमधील तज्ज्ञांनी त्यांची मदत केली. इथं बागेची काळजी कशी घ्यायची याचं प्रशिक्षण दिलं जातं. दरम्यान हीमा यांनी बंगळुरूमध्ये खूप प्रयत्न करुन सरकारकडून एक प्लॉट मिळवला. त्यावर त्यांनी स्वयंपाक घर, वर्ग, हरीतगृह, एक छोटं ग्रंथालय आणि कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी खोल्या बांधल्या. विद्यार्थ्यांना इथं प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिलं जातं. रोपं लावण्याचं तंत्र, वृक्षारोपण आणि इतर आवश्यक कौशल्यही त्यांना त्यांच्या भाषेत शिकवली जातात.


१९८८ च्या फेब्रुवारी महिन्यात एपीडीच्या पहिल्या तुकडीनं आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. इथं एका वार्षिक यात्रेचं आयोजनही केलं जातं. यात रोपं, खत, बियाणं, वनस्पती आणि बागकामाशी संबंधित वस्तू विकल्या जातात. या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रशिक्षण आणि साहित्य खरेदीवर खर्च केला जातो.


२००१मध्ये प्रशिक्षणार्थींच्या वाढत्या संख्येमुळे जागा अपुरी पडत असल्याचं हीमा यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी एकाचवेळी ५० विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतील एवढी जागा असावी या हेतुने कर्नाटक सरकारला पत्र लिहिलं. सरकारनेही लगेचच प्रतिसाद देत त्यांना कैलासाहन्ना भागात ५ एकर जमीन दिली. त्यावर २००६पर्यंत एक मोठं प्रशिक्षण केंद्र उभं राहिलं. या इमारतीचा आराखडा अमेरिकेतील एका आर्किटेक्टने तयार केलाय. यात अपंगांना सहजपणे वावरता येईल अशी सोय करण्यात आली आहे. याशिवाय इथं सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे आणि पावसाच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्याचीही सोय करण्यात आली आहे. आधी या ठिकाणी उकीरडा होता. पण आता त्याच जागेवर संशोधन होतंय, औषधी वनस्पती उगवल्या जात आहेत तसंच फळं आणि भाजीपालाही इथं लावला जात आहे. एपीडीच्या या फलोत्पादन केंद्रातून आतापर्यंत एक हजारपेक्षाही जास्त लोकांनी प्रशिक्षण पूर्ण केलंय. एपीडीला आपल्या कामामुळे निधीची कमतरता कधीच भासलेली नाही. अनेक संस्था आणि लोक त्यांना या कार्यात मदत करण्यास तत्पर आहे.