‘हेअर कटिंग सलून’ च्या व्यवसायातून महिन्याकाठी ४० लाखाचे उत्पन्न घेणाऱ्या मंगेशचा प्रेरणादायी प्रवास

1

प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम, नम्रता आणि जिद्दीच्या बळावर मंगेश सुरवसे या २६ वर्षीय तरुणाने अनेक संकटांवर मात करत आपल्या स्वप्नांना सत्यात परिवर्तीत केले आहे. सुरवातीच्या संघर्षाच्या काळात ६०० रुपयावर सुरु केलेला व्यवसायात आज मंगेश प्रतिमहिना ४० लाखांचे उत्पन्न घेत आहे. युवर स्टोरीच्या माध्यमातून त्याचा हा प्रेरणादायी प्रवास जाणून घेऊ या.

सोलापूर जिल्हयातल्या बार्शी तालुक्यात मंगेशचा जन्म झाला. न्हाव्याचा पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या त्याच्या वडिलांचे छोटेसे दुकान होते. महिन्याकाठी जेमतेम ४०० रुपये त्यांची मिळकत होती. त्याच्या वडिलांनी नेहमी वाटायचे की त्यांच्या मुलाने त्यांच्या व्यवसायात हातभार लावून मिळकत वाढवावी. शिक्षणात अतिशय सामान्य असलेल्या मंगेशला अभ्यास न केल्यामुळे नेहमीच आई-वडिलांचा मार खावा लागायचा. बारावीचे शिक्षण घेत असताना वाईट मित्रमंडळीच्या संगतीत गेल्याने त्याला वाईट सवयी लागल्या. तो व्यसन करू लागला, त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

मंगेश सुरवसे , संस्थापक मंगेशज् अकादमी
मंगेश सुरवसे , संस्थापक मंगेशज् अकादमी

शिक्षण सोडल्यानंतर घराची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी मंगेशने दुकानात लक्ष घालावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते, मात्र मंगेशला काहीतरी वेगळे करावे असे वाटत होते. छोट्याश्या न्हाव्याच्या दुकानात काम करणे त्याला पसंत नव्हते. त्यामुळे वडिलांबरोबर काम करण्याचे तो टाळत असे. अभ्यास नाही, काम नाही, नुसतीच स्वप्न पाहणाऱ्या मंगेशचा वडिलांना राग यायचा. एकदा राग आल्याने त्यांनी मंगेशला घराबाहेर काढले.

काहीतरी वेगळे करावे म्हणून मंगेश आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत बार्शी सोडून पुण्याला आला आणि आपल्या काकांच्या घरी राहू लागला. येथे रोजच्या जगण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. त्याचे काकादेखील न्हावीकाम करायचे. पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून मंगेश संपूर्ण दिवस काकांच्या दुकानात सफाईचे काम करू लागला. सकाळी आठ वाजता सुरु झालेले काम रात्री बारा वाजेपर्यंत चालायचे. केर काढणे, लादी पुसणे, कपडे धुणे यांसारखी अनेक छोटीमोठी कामे तो करू लागला. दिवसाचे सतरा तास काम केल्यानंतर त्याला २० रुपये मिळायचे. ही कामं करत असतानाच त्याने दुकानात केस कापायला येणाऱ्या ग्राहकाचे बारीक निरीक्षण केले. त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्या. या व्यवसायातले बारकावे त्याने लक्षपूर्वक समजून घेतले आणि स्वतःचे सलून सुरु करण्याचा विचार त्याच्या मनात आला.

“ केश-कर्तनालयाचे अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मी थेट मुंबई गाठले आणि मुंबईच्या जावेद हबीब हेअर सलून अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तीन महिन्याचे प्रशिक्षण त्याने केवळ दीड महिन्यात पूर्ण केले. प्रशिक्षणाची फी भरण्यासाठी मुंबईमधल्या छोट्या-मोठ्या सलूनमध्ये पार्ट टाईम काम केले आणि वीस हजार रुपये जमवले. काकांच्या दुकानात काम करताना त्याने १५ हजार रुपये जमवले होते, मात्र मुंबईमध्ये वास्तव्य करण्यासाठी तेवढी रक्कम पुरेशी नव्हती. म्हणून मग मी दिवसाला सलूनमध्ये काम करण्याबरोबरच त्यात काही नाविन्यपूर्ण करता येईल का यावर विचार करायचो. राहण्यासाठी जागा आणि पुरेसे पैसे नसल्याकारणाने मी मित्राच्या गॅरेजमध्ये झोपायचो ” मंगेश सांगत होता.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने जावेद हबीब हेअर सलून सारख्या नावजलेल्या ब्रान्ड बरोबर काम करायला सुरवात केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो सिंगापूरला गेला आणि सात वर्ष हेअर सलून इंडस्ट्रीमधील परिपूर्ण ज्ञान आणि अनुभव त्याने प्राप्त केला.

“ परिपूर्ण अनुभव गाठीशी असल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता. आता स्वत:चाच व्यवसाय, स्वतःचा ब्रान्ड निर्माण करण्याचा मी निश्चय केला. मात्र स्वतःचा व्यवसाय सुरु करणे इतके सोपे नव्हते. स्वतःच्या बचतीतून आणि बीवायएसटीच्या (Bharatiya Yuva Shakti Trust ) मदतीने मी स्वतःचे अद्ययावत, सलून सुरु केले”. मंगेशने सांगितले.

‘मंगेशज् युनिसेक्स सलून आणि अकादमी’ - व्यवसाय विस्तार

प्रामाणिकपणा जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मंगेशचा व्यवसाय वृद्धिंगत होत गेला. नुसत्या महाराष्ट्रातच नाही तर मध्यप्रदेशमध्ये देखील त्याने व्यवसायाचा विस्तार केला ‘मंगेशज युनिसेक्स सलून आणि अकादमी’ ही दोन्ही राज्यात कार्यरत आहे. सध्या भारतात त्यांचे चार सलून आऊटलेट्स आणि चार प्रशिक्षण केंद्र आहेत. कंपनीचे स्वतःचे सलून आणि प्रशिक्षण केंद्र आहेत तसेच फ्रांचायजीसही आहेत. ज्यात ३८ कर्मचारी काम करत आहे.

मंगेश स्वतः हेअरस्टाईल आणि ब्युटी विभाग सांभाळतो. ग्राहकांना आवडेल आणि रुजेल तसे हेअरकटस, मेकओवर, ग्रुमिंग, हेअर कलरिंगची दर्जेदार सेवा पुरवली जाते. मंगेशकडे या क्षेत्रातील सर्वोत्तम सेवा पुरवणारे कर्मचारी आहेत जे ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अपेक्षित सेवा देण्यास तत्पर असतात.

ज्यांना सौंदर्य प्रसाधन क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांना प्रशिक्षण केंद्रामार्फत परिपूर्ण शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाते. सुरवातीपासून आतापर्यंत १०० पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन यशस्वी व्यवसायिक झाले असल्याचे मंगेश सांगतो.

कर्मचाऱ्यांची काळजी घेणे

मंगेश त्याच्या कर्मचाऱ्यांची जातीने काळजी घेतो. अडचणीच्या वेळी त्यांना मदत करतो. प्रशिक्षणाबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान अवगत करण्यास शिकवतो. आणि वेळोवेळी प्रोत्साहित करून त्यांचे मनोधेर्य वाढवतो. त्यांना या क्षेत्राशी संबंधित मुंबई येथे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यशाळेत पाठवतो, जेणेकरून त्यांचा कौशल्य विकास होईल. कर्मचाऱ्यांच्या जेवणाखाण्याची सोयही केली जाते. सांगितलेले उद्दीष्ट पूर्ण केल्यास इनसेंटीव्ह दिले जातात.

व्यावसायिक कामगिरी

मंगेशने एका जागी हा व्यवसाय सुरु केला होता, आज त्याचे पुणे आणि भोपाळमध्ये पाच केंद्र आहे. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी त्याने ३.६ लाखाचे कर्ज घेतले होते. २०१४-२०१५ मध्ये त्याने ४० लाखाचा व्यवसाय केला. महाराष्ट्रभर शाखा सुरु करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. यु एस ब्रांसच्या सहकार्याने त्याने हेअर स्टुडिओ सुरु केला आहे. पुढील वर्षी अमेरिकेत शाखा सुरु करण्याची त्याची योजना आहे.

नव निर्मिती, हिट फॉर्म्युला, सर्वोत्तम व्यवसाय पद्धती :

1) या क्षेत्रात बाजारात अनेक नामवंत मोठे ब्रान्ड असल्याने त्याच्यासाठी यशस्वी व्यवसाय करणे सोपे नव्हते, तेव्हा त्याने ग्राहकाला अपेक्षित आणि जलद सेवा देण्यास सुरवात केली.

2) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने नवनवीन ऑफर्स देऊ केल्या.

3) दर्जेदार उत्पादन वापरून ग्राहकाला सर्वोत्तम सेवा प्रदान केली जाते, जेणेकरून ग्राहक खुश होईल आणि पुनःपुन्हा त्यांच्याकडे येईल, त्याचबरोबर इतर ग्राहकांनाही इथे येण्याचे सुचवेल.

4) सर्व ग्राहकांबरोबर तो सवांद साधतो. त्यांना चहा नाश्ताची विशेष सेवा प्रदान केली जाते, त्यामुळे ग्राहकराजा खुश होऊन जातो.

सामाजिक भान

• आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या गोष्टीवर मंगेशचा विश्वास आहे. सुरवातीच्या काळात त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला, त्यामुळे त्याला अशाच काही करू इच्छीणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन आणि मदत करायची आहे.

• गरजू विद्यार्थ्यांना तो अतिशय कमी शुल्क आकारून हेअर क्ट्स आणि हेअर ट्रीटमेन्टचे प्रशिक्षण देतो.

• आजपर्यंत त्याने बाराशेहून अधिक जणांना त्याच्या अकादमी मार्फत प्रशिक्षित केले आहे. पैकी ८०० जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत तर २०० जणांनी त्याच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे सलून्स सुरु केले आहे.

• बार्शी इथल्या अनाथआश्रमातील मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तो मोफत हेअर क्ट्स आणि हेअर ट्रीटमेन्टचे प्रशिक्षण देतो.

• भारतातील सर्व महिला सक्षम व्हाव्या या हेतूने त्यांच्यासाठी मोफत परिसंवादाचे आयोजन करतो

• नव्याने उद्योग सुरु करू इच्छीणाऱ्यांना तो प्रोत्साहित करतो आणि त्यांना मदत व्हावी म्हणून आपले अनुभव कथन करतो.

त्याचे मार्गदर्शक प्रसाद चुन्द्री यांना गुरुस्थानी मानून नियमित मंगेश त्यांच्या संपर्कात असतो. त्यांच्याकडून व्यवसाय वृद्धीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन मिळते, ज्याप्रमाणे तो भविष्यातील योजना आखतो. त्याच्या भावी वाटचालीसाठी युवर स्टोरीच्या शुभेच्छा !

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा.